उंबर : (हिं. गुलर, गु. उमरो क. अट्टी सं. औदुंबर इं. कंट्री फिग लॅ. फायकस ग्‍लोमेरॅटा, कुल-मोरेसी). हा सु. १५–१८ मी. उंच व सदापर्णी वृक्ष ब्रह्मदेशात, श्रीलंकेत व भारतात सर्वत्र (सह्याद्री, कोकण, राजस्थान, खासी टेकड्या इ.), खेड्याच्या आसपास व नदीनाल्यांच्या किनाऱ्यावर आढळतो. साल जाड, पिंगट करडी, गुळगुळीत पाने मोठी, एकाआड एक, अंडाकृती किंवा आयत उपपर्णे दोन सेंमी. व आकाराने पानासारखी. फुलोरा (कुंभासनी) मोठा, सवृंत (देठ असलेला), लालसर व त्यात तीन प्रकारची फुले [→ अंजीर] फुलांची सामान्य लक्षणे ⇨ मोरेसी  कुलाप्रमाणे. औदुंबरिक फळे (संयुक्त फळे) सच्छद, संवृत, पूर्ण पिकल्यावर जांभळट व मोठ्या फांद्यांवर घोसांनी लटकलेली असून त्यांना सामान्य भाषेत ‘उंबर’ म्हणतात यात बारीक कृत्स्‍नफळे विपुल असतात [→ फळ]. पक्षी व कित्येक प्राणी ही फळे खातात, त्यांच्या विष्ठेतून बीजांचा प्रसार होतो व अनेक ठिकाणी झाडे उगवलेली आढळतात. याचे लाकूड पांढरट किंवा लालसर, मऊ व हलके असते त्याचा उपयोग अनेक सामान्य वस्तू, घरबांधणी, शेतीच्या उपयोगाच्या वस्तू इ. बनविण्यास करतात. सालीचा उपयोग उत्तम काळा रंग बनविण्यास होतो. पाने व फळे गुरांना चारतात. या झाडाच्या सर्व भागांपासून चीक निघतो व त्यापासून पक्षी  पकडण्याचा गोंद बनवितात. हे झाड (औदुंबर) हिंदूनी पवित्र मानले आहे त्याच्या लहान फांद्या समिधा म्हणून वापरतात त्याचा इतर धार्मिक उपयोगही असून हा वृक्ष श्री दत्तात्रेयाचे वसतिस्थान मानले जाते. गरीब लोक दुष्काळात कच्ची किंवा पिकलेली फळे खातात. सर्व भाग औषधी आहेत. साल स्तंभक (आकुंचन करणारी) व जनावरांच्या बुळकांड्या रोगावर देतात. मूळ आमांशावर व मुळांचा रस मधुमेहावर उपयुक्त पानांचे चूर्ण पित्तविकारावर मधातून देतात संयुक्त फळ स्तंभक, दीपक (भूक वाढविणारे), वायुनाशी असून ते मासिक अतिस्रावार व कफक्षयात थुंकीतून रक्त पडण्यावर देतात. चीक मूळव्याध व अतिसार यांवर गुणकारी आहे. 

उंबर, काळा : (बोकेडा, रंबळ हिं. गोब्‍ला गु. धेडउंबर सं. काकदुंबर लॅ. फायकस हिस्पिडा). उंबराच्या वंशातील व त्यासारखाच हा ६–९ मी. उंचीचा लहान वृक्ष सामान्यतः सर्व भारतात (विशेषतः कोकण, कारवार, खंडाळा येथे) तसेच श्रीलंका, मलाया, चीन, ऑस्ट्रेलिया इ. देशांमध्ये सापडतो. कोवळ्या प्ररोहावर (कोंबावर) राठ केस व समोरासमोर पातळ पाने असतात. कुंभासनींचा देठ आखूड व त्यांचा उगम तळाशी बुंध्याजवळ, वर पानांच्या बगलेत किंवा जून फांद्यांवर, जोडीने अथवा झुबक्यांनी असतो त्यांचा रंग पिवळट व त्या केसाळ असून त्यांच्या तळाशी तीन छदे असतात. औदुंबरिक फळे उन्हाळ्यात व पावसाच्या आरंभी येतात पुं-पुष्पे व गुल्म-पुष्पे एकत्र व स्त्री-पुष्पे स्वतंत्र केसरदल एक गुल्म-पुष्पास व स्त्री-पुष्पास परिदले नसतात [→ फूल मोरेसी अंजीर]. पाला गुरांना चारतातफळ, बी व साल रेचक व वांतिकारक फळ मधुर, शीत, शक्तिवर्धक व कामोत्तेजक असते. 

पहा : चीक.

ज्ञानसागर, वि. रा.