तांदुळजा :(चवळाई हिं. चवराई गु. तांदुळजो क. कीरेसोप्पु सं. तंडुलीय, अल्पमारिष इं. ॲमरँथ लॅ. मरँथस पॉलिगॅमस कुल–ॲमरँटेसी). भारतात सर्वत्र आणि श्रीलंकेतील उष्ण देशांतील शेतांत तणासारखी व पसरट वाढणारी ही एक लहान, वर्षभर जगणारी व अनेक शाखांची ⇨ ओषधी  आहे. ती पोकळा, माठ, राजगिरा यांच्या वंशातील (मरँथस ) असल्यामुळे त्यांची अनेक शारीरिक लक्षणे सारखी आहेत. पाने साधी, एकाआड एक आणि गोलसर फुले सच्छदक, लहान, हिरवट, एकलिंगी असून डिसेंबर ते मार्चमध्ये पानांच्या बगलेतील कणिशात किंवा गुच्छात येतात. परिदले तीन आणि केसरदले सुटी व तीन [→ फूल]. फळ शुष्क, बहुधा तडकणारे व करंडरूप असते. बी एक, बारीक व काळे. कोवळ्या फांद्या व पानांची भाजी करतात. रक्तपित्त, वात, ज्वर, कफ व प्रदर इत्यादींचे निवारण करणारे गुण या वनस्पतीत आहेत. तांदुळजा हेच नाव दुसऱ्या एका जातीस (मरँथस ब्लायटम  प्रकार ओलेरॅसिया ) दिलेले आढळते. हीच एक उंच, मांसल, सरळ वाढणारी ओषधी भारतात लागवडीत असून तिचे फळ तडकत नाही. तिची भाजी शीतक (थंडावा देणारी), दीपक (भूक वाढविणारी), वेदनाहारक व पथ्यकर असते. तिची इतर शारीरिक लक्षणे सामान्यपणे वर वर्णन केलेल्या जातीप्रमाणे आहेत.

पहा : ॲमरँटेसी.

चौगुले, द. सी.