शाल्मली :  (सफेद सावर, पांढरी शाल्मली हिं. सफेद -सिमल, हतिआन गु. घोळो शिमलो क. दुडिमर, मरळी सं. कूट – शाल्मली, श्वेत शाल्मली इ. व्हाइट सिल्क कॉटन ट्री, कपोक ट्री लॅ. सैबा पेंटॅड्रा कुल-बॉम्बॅकेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक पानझडी वृक्ष. शाल्मली हे नाव शाल्मली : संयुक्त पाने, फुले व कळ्यांसह फांदी.लाल सावर या वृक्षालाही दिलेले आढळते व सातवीण असाही त्याचा अर्थ आढळतो. सैबा प्रजातीत दहा जाती असून त्यांपैकी भारतात फक्त एकच जाती आढळते. त्याचे आकारमान मध्यम असून उंची सु. १८–२४ मी. असते. या वृक्षाचा प्रसार अंदमान, मलाया, श्रीलंका व दक्षिण अमेरिका येथे आहे. भारतात (गुजरात, खानदेश, पुणे, कोकण व उत्तर कारवारमध्ये जंगली अवस्थेत) बहुतेक उष्ण भागांत तो आढळतो. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा किंवा मंदिराजवळ तो लावलेला आढळतो. याचे खोड सरळ उभे असून कोवळेपणी त्यावर लहान शंकूसारखे बळकट काटे असतात. फांद्या क्षितिज समांतर असतात. पाने संयुक्त, हस्ताकृती, ५-८ दलांची व लांब देठाची. दले कुंतसम (भाल्यासारखी), अल्पवृंत (आखूड देठाची), प्रकुंचित (निमुळत्या टोकाची). थंडीत पानगळ होते व उन्हाळ्याच्या आरंभी नवी पालवी येऊ लागते. तत्पूर्वी जानेवारी-मार्चमध्ये फुले येतात. त्यांचे लांब देठाचे झुपके पानांच्या बगलेत किंवा फांदीच्या टोकाला लोंबतात. संदले पाच, जाड, चिवट व हिरवी प्रदले (पाकळ्या) पांढरी, पाच, तळाशी जुळलेली व संदलांच्या दुप्पट मोठी पाच केसरदलांचा एक जुडगा तळाशी जुळलेला असतो. किंजपुट पाच कण्यांचा व ऊर्ध्वस्थ फळ (बोंड) लांबट, गोलसर, चिवट, तडकून त्याची पाच शकले होतात. काळ्या बिया अनेक असून रेशमी कापसात विखुरलेल्या असतात. एप्रिल-मेमध्ये बोंड फुटल्यावर कापसासकट बिया वाऱ्याद्वारे सर्वत्र पसरविल्या जातात.

शाल्मलीच्या वृक्षापासून गर्द लाल डिंक मिळतो. तो बाजारात ‘हतिआना गोंद’ म्हणून ओळखला जातो. कोवळी पाने उपशामक असतात. मुळे मूत्रल (लघवी साफ करणारी) असतात. कच्ची फळे स्तंभक व शामक आणि मुळांचा रस मधुमेहावर देतात. सालीपासून हलक्या प्रतीचा वाख मिळतो. फळातील रेशमी कापूस गाद्या, उशा भरण्यासाठी वापरतात. त्याचे सूच कातून चटया, पट्टे वगैरे बनवितात. बियांचे तेल सरकीच्या तेलासारखे असून त्याच्या पेंडीचा जनावरांना खुराक देतात. लाकूड हलके, पांढरे व मऊ असून किरकोळ वस्तूंसाठी वापरतात. पाला जनावरांना खाऊ घालतात.                                                                                                                                                   

जमदाडे, ज. वि.