वनश्री, कच्छ: (मॅन्ग्रोव्ह व्हेजिटेशन). विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत निसर्गतः वाढलेल्या व त्या परिस्थितीशी पूर्णपणे समरस झालेल्या वनस्पतींचा एक समुदाय. समान परिस्थितीत वाढणाऱ्या भिन्न कुलांतील व प्रजातींतील अनेक जाती काही लक्षणांत विलक्षण साम्य कसे दर्शवितात याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून या वनश्रीचा निर्देश करता येईल. एखाद्या प्रदेशातील वनश्रीच्या अभ्यासात हा एक सामुदायिक घटक ठरतो [⟶ परिस्थितिविज्ञान]. या घटकातील प्रत्येक व्यक्तिला (वनस्पतीला) इंग्रजीत ‘मॅन्ग्रोव्ह’ म्हणण्याचा प्रघात पडला आहे. कच्छ वनस्पती हे मराठी नाव या संदर्भात अशा समुदायातील प्रत्येक व्यक्तीस लागू पडते पण एकूण समुदायाला कच्छ वनश्री असे म्हणता येईल. या समुदायामध्ये झुडपे व लहान वृक्ष असतात. उष्ण कटिबंधातील समुद्रकिनाऱ्यावर जेथे वाऱ्याचा जोर कमी, लाटा फार जोराने आपटत नाहीत व बराचसा खारा चिखल साठून खारी दलदल कायम रहाते अशा ठिकाणी कच्छ वनस्पती आढळतात. मुंबई व साष्टी बेटांबोवती, दहिसर, बोरिवली, मिऱ्या, घोडबंदर इ. आणि भावनगर-सुरतपासून कारवारपर्यंत पश्चिम किनारी व बंगालमध्ये सुंदरबन येथेही वनश्री आहे. यातील झाडे खाऱ्या पाण्यात साधारण भरतीओहोटीच्या पट्ट्यात वाढतात. पाण्यातील लवणाच्या मोठ्या प्रमाणाने व दलदली जमिनीत मुळांना श्वसनार्थ मिळणाऱ्या अपुऱ्या ऑक्सिजनामुळे या झाडांना अभिशोषणाच्या अडचणीने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते, यामुळे या वनस्पतींची अंतर्बाह्य संरचना विशिष्ट प्रकारची (रुक्षतेशी समरस होण्याची) असते. जाड व मंसल पाने, टेकूप्रमाणे आधार देणारी मुळे [⟶ मूळ−२], जमिनीपासून बरीच वर वाढणारी काही श्वसनमुळे (श्वसनास मदत करण्याकरिता) अनेक जातींत आढळतात [⟶ कांदळ तिवर तिवार इ.]. काही झाडांत ‘अपत्यजनन’ [⟶ परिस्थितीविज्ञान उदा., काजळा, तिवर, कांदळ इ.] दिसून येते.

बी जमिनीत पडल्यावर अंकुरणाला प्रतिकूल परिस्थिती असते म्हणून झाडावरच बी (फळात) रुजून अंकूर (प्राथमिक मुळाचा भाग) बाहेर येतो व काही वेळ (शेंगेसारखा) लोंबत राहून नंतर खाली पडतो, पाण्यावर तरंगत राहून प्रसारित होतो व शेवटी खाऱ्या मऊ चिखलात पडल्यावर वाढून नवीन झाड बनते. समुद्राच्या भरतीच्या पाण्याच्या मर्यादपासून ते ओहोटीच्या पाण्याच्या मर्यादेपर्यंत निरनिराळे गट पडतात व त्यांची उथळ पाण्यात बेटे तयार होतात. कच्छ वनस्पतींच्या दाट झाडीमुळे समुद्र व जमीन, तसेच खाडी, किनारा व त्यांवरील प्रदेश यांत एक हिरवी भिंत निर्माण झाल्याने किनाऱ्याजवळच्या जमिनीची प्रखर वादळे व पाण्यापासून होणारी धूप थांबते. यामुळे भूसंरक्षणाच्या दृष्टीने या वनस्पतींना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या भिंतीमुळे इतर वनस्पती आणि जीवनसृष्टीचे संरक्षण होते. जमिनीवरील पाण्याला खाडी वा समुद्राला मिळण्याकरिता या वनस्पतिसमुदायातून जावे लागते, त्या वेळी या पाण्यात उपयुक्त मूलदव्ये त्यात थांबविली जातात व त्यामुळे ती जमिनीवर वापरण्यात परत उपलब्ध होतात. या वनश्रीत इतर जलचर प्राण्यांना संरक्षण मिळते. मासे, खेकडे, झिंगे वगैरे प्राणी येथे अंडी घालतात. पिले मोठी व संरक्षणक्षम झाली म्हणजे समुद्राकडे जातात. झिंगे या वनस्पति-समुदायात फारच चांगले वाढतात व त्या दृष्टीने या समुदायाचा फार उपयोग आहे. या वनस्पति-समुदायातील पाने व इतर वनस्पती अवशेष कुजतात. त्यांचे अपघटन होते. हे अपघटित व वापरता येण्यासारखे अन्न समुद्रात जाते व तेथील जलसृष्टी त्यावर वाढते. जेथील कच्छ वनस्पति-समुदाय नष्ट केले गेले तेथील मत्स्योद्योगावर अनिष्ट परिणाम झाल्याचे आढळून आले आहे. या वनस्पति-समुदायात विशिष्ट प्रकारचे गवत व संपूर्णपणे पाण्याखाली वाढणाऱ्या सपुष्प सागरी वनस्पती आढळतात आणि त्याही प्राणिसृष्टीला अन्न पुरवितात. क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) जडघडणीतून अगदी बाहेरील आणि आतील अनुकूल अवयव व प्रक्रिया आत्मसात केलेला कच्छ वनश्री हा महत्त्वाचा वनस्पति-समुदाय आहे, असे म्हणावे लागेल. त्यांच्या लाकडांपासून कोळसा तयार करण्यास व सालीपासून टॅनीन द्रव्य काढण्यास ही झाडे फार उपयुक्त असतात. हे टॅनीन कोळ्यांची जाळी मजबूत करण्यास वापरतात. एकदा तोडल्यावर पुन्हा जलद वाढण्याबद्दल ही झाडे प्रसिद्ध आहेत. फक्त चार जाती अमेरिका व आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रामुख्याने सापडतात, तर दहा जाती पूर्व आफ्रिका, आशिया व पश्चिम पॅरिफिक भागात मुख्यतः मिळतात. सुंदरबनातील कच्छ वनस्पति-समुदायात बारा कुलांतील सु. एकवीस जाती सापडतात. (‘भारत’ या नोंदीतील ‘वनश्री’ या उपशीर्षकाखालील ‘गंगा-मैदान विभाग’ ही माहिती पहावी). थोड्याफार प्रमाणात प्रत्येकात तेथे आवश्यक ती लक्षणे असतात.

पहा : गुलगा चौरी तिवर दलदल निवगूर परिस्थितिविज्ञान लवण वनस्पति.

संदर्भ : 1. Chapman, V. J. Coastal Vegetation, Oxford, 1976.

           2. Chapman, V, J., Mangrove Vegetation, Oxford, 1976.

           3. Chapman, V. J. Ed., Wet Coastal Ecosystems, Amsterdam, 1977.

नवलकर, भो. सुं. जोशी, गो. वि.