प्रजनन : विद्यमान वनस्पती किंवा प्राणी यांच्या पृथ्वीवरील विविध जाती (स्पीशिज्‌) निसर्गतः वंशपरंपरेने आपले सामान्य गुणधर्म राखीत आल्या आहेत ही वस्तुस्थिती असली, तरी अधिक बारकाईने पाहिल्यास असे दिसून येते की, क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) तत्त्वाप्रमाणे सर्व जाती हळूहळू बदलत आल्या आहेत. ह्या बदलाला मनुष्याने पण हातभार लावला आहे. त्यामुळे त्याचा विशेष संबंध ज्या ज्या वनस्पतींशी (पिके, फुलझाडे व फळझाडे यांच्याशी) किंवा पाळीव प्राण्यांशी (गाय, म्हैस, कुत्रा इ.) आला त्यांमध्ये स्वतःच्या व्यावहारिक फायद्याच्या दृष्टीने त्याने थोडेफार इष्ट फरक घडवून आणले आहेत त्यामध्ये इष्ट जातींची निवड व अनेकदा संकर (भिन्न नर व मादी यांचे मीलन) घडवून आणले होते. परिणामी अशा अनेक जातींत नवीन उपजाती, प्रकार व वाण अस्तित्वात आले आहेत. ह्या प्रक्रियेस ‘प्रजनन’ म्हणतात. निसर्गतः होणाऱ्या जातीच्या संख्यावाढीस ⇨ प्रजोत्पादन किंवा पुनरुत्पादन म्हणतात परंतु या प्रक्रियेत मनुष्याने त्या त्या जातीची ⇨ आनुवंशिकता व सद्‌गुणांची व्यावहारिकता लक्षात घेऊन नवीन संततीत हितकारक गुण प्रकर्षाने दिसून येतील, असे प्रयत्न कृत्रिम रीत्या अंतर्भूत करणे हा प्रजननाचा हेतू (उद्देश) आहे. गुणांच्या आनुवंशिक वाढीबरोबर, नवीन गुणांचा उगम व दोषांचा लोप प्रजननाच्या हेतूशी सुसंगत आहे. एखाद्या जातीत किंवा प्रकारात नसलेले इष्ट गुण अर्थातच दुसऱ्या संबंधित जातीतून किंवा प्रकारातून आणवून नवीन गुणसंपन्न किंवा दोषरहित संतती बनविणे ही प्रक्रिया (म्हणजेच शास्त्रशुद्ध संकर करणे) प्रजननात प्रमुख आहे. तसेच ही प्रक्रिया यशस्वी होण्यास व नवीन संतती चिरकाल तशीच गुणसंपन्न व सतत निर्मिती करीत राहील, हे उद्दिष्ट सफल होण्यास संबंधित जाती व प्रकार यांचा सर्व दृष्टिकोनांतून प्रथम प्रायोगिक अभ्यास व्हावा लागतो. त्यांमध्ये ⇨ शरीरक्रियाविज्ञान, ⇨ विकृतिविज्ञान, ⇨ जीवरसायनशास्त्र, ⇨ सांख्यिकी, ⇨आनुवंशिकी, ⇨ परिस्थितिविज्ञान इ. संबंधित शास्त्रांची मदत घ्यावी लागते. सारांश, मनुष्याच्या विविध वाढत्या गरजा (धान्य, फुले, भाज्या, चाऱ्यांची गवते, फळे, धागे, लाकूड, तेले, साखर, औषधे इ.) भागविण्यास पिके व तत्सम वनस्पतींत मूलभूत इष्ट सुधारणा करण्यास प्रजननाची नितांत आवश्यकता आहे तसेच दुभती जनावरे, लोकरीसाठी मेंढ्या, मांसाकरिता बकऱ्या, मासे, कोंबड्या, डुकरे व इतर प्राणी यांमध्ये सुधारणा करण्याकरिता शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रयोग करण्याची आणि त्याद्वारे विशिष्ट प्रकार व वाण यांमध्ये निवड व प्रजनन घडवून आणण्याची आवश्यकता आहे. पाळीव पशू व वनस्पती यांच्या प्रजननासंबंधी अनुक्रमे ‘पशु-प्रजनन’ व ‘वनस्पतिप्रजनन’ या नोंदीत अधिक तपशीलवार विवरण दिलेले आहे.

परांडेकर, शं. आ.