थीएसी : (चहा कुल). फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) एका कुलाचे नाव. यामध्ये सु. २३ वंश व ३८० जाती (जे. सी. विलिस यांच्या मते १६ वंश व ५०० जाती) अंतर्भूत असून त्या सदापर्णी वृक्ष किंवा क्षुपे (झुडपे) आहेत व त्यांचा प्रसार आशियातील उष्ण, उपोष्ण व डोंगराळ समशीतोष्ण प्रदेशांत आहे. पाने साधी एकाआड एक व चिवट फुले अरसमात्र, एकलिंगी व द्विलिंगी, मंडलित किंवा सर्पिल–मंडलित. एकेकटी किंवा विरल मंजरीवर पानांच्या किंवा छदांच्या बगलेत अथवा फांद्यांच्या टोकांवर येतात. संदले ४–७, मुक्त (सुटी) किंवा क्वचित युक्त (जुळलेली) प्रदले (पाकळ्या) ५, कमीअधिक सुट्या वा क्वचित युक्त केसरदले अनेक मुक्त किंवा युक्त किंजपुट ऊर्ध्वस्थ, कधी अधःस्थ, २–१० कप्प्यांचा व बीजके अनेक [⟶ फूल]. मृदुफळ बोंड किंवा अश्मगर्भीसारखे (आठळीयुक्त) शुष्क फळ असते.

फुलांची संरचना व शारीर (अंतर्गत अवयवांची रचना) यांतील साम्यावरून ह्या कुलाचे ⇨ डायलेनिएसी व गटिफेरी या कुलांशी नाते असून ⇨ रॅनेलीझ गणापासून डायलेनिएसी द्वारे हे थीएसी कुल अवतरले असावे, असे काही शास्त्रज्ञ मानतात. या कुलातील स्टेवर्शिया, कॅमेलिया, गॉर्डोनिया, टर्नस्ट्रोमिया इ. वंशांतील जाती शोभेकरिता लावतात. ⇨चहाची भारतात लागवड होते. यूर्या जॅपोनिका  ही जाती भारतात आढळते. या वंशातील वनस्पतींच्या पानांत व खोडात कठककोशिका (कठीण आवरणाच्या पेशी) आढळतात.

जमदाडे, ज. वि.

 थीएसी : चहा कुलातील कॅमेलिया वंशाच्या एका जातीचे फूल.