तिळवण, पिवळी : (कानफोडी हिं. हुलहुल, कानफुटिया गु. तिनमणी क. नायीबेला सं. आदित्यभक्त, कर्णस्फोट, तिलपर्णी लॅ. क्लेओम व्हिस्कोजा कुल–कॅपॅरिडेसी). उष्ण कटिबंधात सर्वत्र वाढणारी व महाराष्ट्रात सामान्यपणे तणासारखी आढळणारी ही लहान वर्षायू (एक वर्ष जगणारी) ⇨ ओषधी पांढरी तिळवण, काबर व गोविंदफळ यांच्या कुलातील आहे आणि यांची अनेक शारीरिक लक्षणे समान आहेत. चिकट द्राव स्रवणारे अनेक प्रपिंडयुक्त (ग्रंथियुक्त) केस हिच्या सर्वांगावर असतात (त्यावरून जातिवाचक लॅटिन नाव पडले आहे). पाने संयुक्त, ३–५ दली खालची पाने लांब देठाची असतात व मंजरीवर सप्टेंबर ते जूनमध्ये लहान पिवळी फुले येतात. फुलात २० केसरदले असून बोंड लांबट,  केसाळ, ५–६ सेंमी. लांब असते. बी काळसर पिंगट, गोलसर व रेषांकित असते. पानांचा रस कानदुखीवर कानात घालतात त्यावरून काही देशी नावे पडली आहेत. तसेच जखमांवर हा रस लावतात बी कृमिनाशक, ज्वरनाशक आणि वायुनाशी असते.

पहा : कॅपॅरिडेसी.

घवघवे, ब. ग.