खोड : बी रुजल्यानंतर त्यातून येणारा टोकदार मोड (आदिमूळ) जमिनीत वाढून त्यापासून मूल तंत्र (मूल संस्था) बनते आणि मोडाच्या विरुद्ध टोकास असलेल्या सूक्ष्म भागाची (आदिकोरक) वाढ जमिनीच्या वर होऊन त्यापासून पुढे खोड, फांद्या (असल्यास), पाने इत्यादींचे प्ररोह तंत्र बनते. फांद्या, पाने, फुले, फळे इत्यादींना आधारभूत असा जो कणखर स्तंभ असतो त्याला खोड (क्षोड) अशी संज्ञा आहे यालाच वनस्पतीचा मुख्य आस (अक्ष) मानतात. या दृष्टीने फांद्या उपाक्ष ठरतात आणि अक्ष व उपाक्ष मिळून अक्ष तंत्र बनते. कांदा, सुरण, बटाटा व हरळी यांच्या जमिनीत वाढणाऱ्या खोडांचे अपवाद वगळल्यास खोड नेहमी वर हवेत प्रकाशाकडे कमी जास्त उंच वाढते आणि पानांना व फुलांना भरुपूर प्रकाश आणि त्यांच्या वाढीला व कार्याला अनुकूल परिस्थिती मिळावी अशा प्रकारे आधार देते शिवाय ते त्यांना जमिनीतील मुळांच्या द्वारे शोषलेली लवणे  व पाणी उपलब्ध करून देते आणि पानांत बनलेले अन्न मुळांना व इतर अवयवांना पुरवते.

खोडांचे विविध प्रकार : (१) फांदी : (अ) कोरक, (आ) पान, (इ) पेरे, (ई) कांडे, (२) द्विशाखाक्रम : (२अ) खरा, (२आ) आभासी, (संयुक्तपद) अक्ष (३) पार्श्विक : (३अ) एकपद अक्ष, (३आ) आभासी द्विशाखाक्रम (४) डाळिंबाची फांदी : (अ) शूल, (आ) दंडगोलाकृती खोड (५) कांडवेल : (अ) चौकोनी खोड, (आ) प्रतान, (इ) पक्ष (६) नेचा : (अ) तिरश्चर (७) स्ट्रॉबेरी : (अ) धावते (८) गोंडाळ : (अ) अपप्ररोह, (आ) मुळे, (इ) पानांचा झुबका (९) मुहलनबेकिया : पर्णकांड (१०) कारंदा : (अ) कंदिका (११) घायपात : कंदिका (१२) वेखंड : मूलक्षोड (१३) हरळी : (अ) मूलक्षोड, (आ) मुळे, (इ) प्ररोह (१४) पुदिना : (अ) अधश्चर (१५) बटाटा : (अ) ग्रंथिक्षोड (१६) केशर : (अ) धनकंद (उभा छेद) (१७) कांदा : (अ) कळ्या, (आ) मांसल शल्क, मुळे (१८) ऑक्सॅलिस : शल्ककंद.

 शैवले व शेवाळी या अबीजी व अविकसित वनस्पतींत अक्षस्वरूप असा खोडासारखा अवयव असला, तरी खऱ्या अर्थाने खोडाचे अस्तित्व वाहिनीवंत (पाणी अथवा अन्न यांची ने-आण करणारे शरीर घटक असलेल्या काही अबीजी व सर्व बीजी) वनस्पतींतच आढळते. यांपैकी प्राचीन काळच्या अत्यंत प्रारंभिक वनस्पतींत [→सायलोफायटेलीझ] खोडांना मुळे व पाने दोन्ही नसून फक्त द्विशाखाक्रमी हिरवा अक्षच असे. हल्ली अशा वनस्पतींपैकी फक्त दोनच [→सायलोटेलीझ] वनस्पती आढळतात बाकी सर्व नामशेष झाल्या आहेत. वनस्पतींच्या क्रमविकासात (उत्क्रांतीमध्ये) या पहिल्या साध्या अक्ष तंत्रापासूनच पुढे त्याच्या भूमिस्थित (जमिनीतील) व हवेत वाढणाऱ्या काही भागांना विशेषत्व प्राप्त होऊन विविध कार्यांकरिता पर्णयुक्त, मूलयुक्त व वाहक कोशिका (पेशी) आणि वाहिन्यादी अंतर्रचनेसह आजचे जटिल खोड क्रमविकसित झाले असावे, असे मानतात. हे खोड बीजुकधारी (लाक्षणिक प्रजोत्पादक अवयव असलेल्या) पिढीचा प्रमुख अवयव होय. विविध परिस्थितींना अनुसरून त्याची विविध रूपे दिसतात त्याचा तपशील पुढे दिला आहे.

भाग : कित्येक खोडांवर कोवळेपणी (आ.१) अथवा जून झाल्यावरही (उदा., ऊस, कळक) पाने येण्याची निश्चित स्थाने स्पष्ट दिसतात त्यांना पेरी आणि दोन पेऱ्यांमधल्या भागास कांडे म्हणतात.बऱ्याच वनस्पतींत हे भाग पुढे फार अस्पष्ट होतात. खोडाच्या किंवा फांदीच्या टोकास असलेल्या कळीमुळे सदैव वाढ चालू राहते [ →कळी]. पानांच्या बगलेत तशीच कळी असते. मुळांच्या टोकासही सदैव वाढ चालू असून त्यामुळे मूल तंत्र सतत वाढत राहते. व्यक्तीच्या जीवनात सतत अग्रस्थ (टोकाची) वाढ अशी चालू ठेवणे ही गोष्ट वनस्पती व प्राणी यांमधील मूलभूत फरक दर्शविते, कारण अशी सतत वाढ प्राण्यांत नसते परंतु हा निरपवाद नसतो. कळीमध्ये (कोरक) अत्यंत सूक्ष्म अवस्थेत कांडी, पेरी व पाने असून तो एक संक्षिप्त प्ररोह (कोंब) होय. खोड, फांद्या व पाने यांचे कार्य पोषणविषयक असल्याने त्या सर्वांना मिळून शाकीय प्ररोह म्हणतात. काही वनस्पतींत (उदा., गिंको, वृक्षी नेचे, सायकस, पामी, घायपात व युका) पूर्ण वाढ झाल्यावरही पेरी व कांडी स्पष्ट नसून पाने एकत्रच गर्दीने वाढलेली आढळतात. त्यास ऱ्हस्व-प्ररोह म्हणतात. अनेक गुच्छाकृती वनस्पती (उदा., कोरफड, पँक्रॅशियम, झेफीर लिली इ.) याच सदरात येतात. उलट लांब कांडी असलेल्यांना दीर्घ-प्ररोह म्हणतात. संरक्षणाकरिता कोरकावर खवल्यांप्रमाणे आच्छादने (उदा., सायकस) असतात केव्हा केव्हा ती उपपर्णे (उदा., वड, फणस, पिवळा चाफा इ.) असतात. काही थोड्या वनस्पतींचे खोड एकटेच असे वाढत राहिले (उदा., नारळ, सायकस), तरी बहुसंख्य वनस्पतींत त्यावरील बाजूच्या कळ्या वाढून अनेक फांद्या येतात व प्ररोह तंत्र बनते. बाह्यस्वरूप, अंतर्रचना व कार्य यांबाबतीत खोड व फांद्या यांत फरक नसतो म्हणून दोन्ही समान अवयव होत परंतु पाने, फुले व फळे यांचे अंतरंग, स्वरूप व कार्य ही परस्परांपासून आणि खोड व फांद्या यांपासून भिन्न असल्यामुळे ती असमान मानली आहेत. खोड व मुळे यांतील फरक असा की, मुळावर पानांफुलासारखे असमान अवयव व कळ्या नसतात. मुळावरील फांद्या (दुय्यम व इतर लहान मुळे) यांची वाढ वरवरच्या ऊतकांपासून (समान रचना आणि कार्य असलेल्या पेशींच्या समूहांपासून) होत नाही परंतु खोडावरच्या फांद्यांची तशी होते (बहिर्भव). मुख्य मुळावर नवीन मुळे खोलवरच्या ऊतकापासून (अंतर्भव) वाढतात.


 शाखाविन्यास : वनस्पतीच्या कोणत्याही एका अवयवावर तत्सम विभागनिर्मिती होणे याला शाखीभवन म्हणतात. शाखांचा (फांद्यांचा) उगम विविध प्रकारे होऊन एकूण शाखांचा विन्यास (मांडणी) वा विस्तार यांचे स्वरूप भिन्न होते. मुख्य खोडावर येणार्‍या पहिल्या फांद्यांना प्राथमिक शाखा व त्यांवर नंतर येणाऱ्यांना अनुक्रमे द्वितीयक व तृतीयक इ. म्हणतात. सर्व शाखांच्या विस्ताराचा पाने व त्यांचे कार्य यांवर फार प्रभाव पडतो. शाखांचा विस्तार जितका अधिक तितका पर्णसंभार मोठा होतो व अन्ननिर्मितीही अधिक होते. द्विशाखी व पार्श्विक (बाजूचा) असे दोन मुख्य प्रकारचे शाखाविन्यास आढळतात.

(१) द्विशाखी : या प्रकारात खरा व खोटा (आभासी) अथवा संयुतपद असे उपप्रकार आहेत. खोडाच्या टोकास असलेल्या कोरकाचे दोन विभाग होऊन प्रत्येकापासून एकेक अशा दोन फांद्या होतात व असाच प्रकार (विभागणी) पुढे सतत चालू राहतो (आ.२). बीजी वनस्पतींत असा खरा द्विशाखाक्रम फारच क्वचित परंतु शैवले, यकृतका (लिव्हरवर्ट) व काही टेरिडोफायटा यांमध्ये सामान्यपणे हा प्रकार आढळतो. या प्रकारांमध्ये एका फांदीची वाढ फारच जलद व दुसरी फार सावकाश होऊन पुढे पुनःपुन्हा हाच प्रकार चालू राहिल्यास प्रमुख अक्ष (खोड) अनेक जलद वाढणाऱ्या फांद्यांचे मिळून बनते (संयुतपद) म्हणून याला खरा न म्हणता खोटा (आभासी) अक्ष म्हणतात. 

(२) पार्श्विक : या प्रकारात प्रमुख खोडाची शेंड्यावरची कळी सतत वाढत राहून बाजूच्या कक्षास्थ (बगलेतील) कोरकांच्या वाढीमुळे नवीन फांद्या येतात व हा प्रकार बीजी वनस्पतींतील द्विदलिकित व प्रकटबीज वनस्पतींत सामान्य आहे. यात अकुंठित (अमर्यादित) व कुंठित (मर्यादित) असे दोन उपप्रकार आहेत. पहिल्यात प्रमुख अक्ष व बाजूस येणाऱ्या फांद्या शेंड्याकडे सतत वाढत राहतात, याला एकपद (आ.३) म्हणतात सर्वांत लहान फांद्या टोकाकडे व जून फांद्या क्रमाने तळाकडे येणे याला अग्रवर्धी अनुक्रम म्हणतात. अनेक फांद्या एकाच पेऱ्यात आल्यास त्यांना मंडलित असे नाव देतात [ →ॲरॉकॅरिया]. कुंठित प्रकारात मुख्य अक्ष आपली शेंड्याची वाढ थांबवून बाजूच्या कोरकांना अधिक जोमाने वाढण्यास प्रवृत्त करतो यामुळे पुढे बाजूकडून आलेली एक फांदी किंवा दोन फांद्या बऱ्याच वाढून पुनरपी मुख्य अक्षाप्रमाणे आपल्या बाजूच्या फांद्यांना पुढील वाढीस अधिक वाव देतात (उदा., करवंद, गुलबुश इ.). बाजूच्या दोन फांद्या अधिक वाढून पुढे तोच क्रम चालू ठेवतात, तेव्हा हा शाखाविन्यास वरील वर्णनात आलेल्या द्विशाखाक्रमाप्रमाणे दिसतो आणि याला खोटा द्विशाखाक्रम (आ.३) म्हणतात. फुले येणाऱ्या प्ररोहावरही [→पुष्पबंध] वर सांगितलेले भिन्न शाखाविन्यास व त्यांचे उपप्रकार सामान्यपणे आढळतात. ताड, नारळ, शिंदी, सायकस इत्यादींच्या फांद्या नसलेल्या खोडास शाखाहीन खोड म्हणतात. 

वर दिलेल्या लक्षणांवरून खोड व मूळ यांमध्ये काही बाबतींत साधारण साम्य आढळते (उदा., टोकाशी होणारी सतत वाढ, अक्षीय स्वरूप, फांद्या इ.), तरी त्या दोन्हींत निश्चित फरकही आढळतात. प्रकाशानुवर्तनी (प्रकाशाच्या उत्तेजनास प्रतिसाद देणारी) व गुरुत्वाकर्षणाविरुद्ध वाढ, अग्रस्थ कोरकावर मूलत्राणासारख्या (मुळाच्या वाढणाऱ्या टोकावरील शंकूच्या आकाराच्या, पोकळ संरक्षक आवरणासारख्या) स्वतंत्र उपांगाचा (अवयवाचा) अभाव, फांद्यांचा बहिर्भाव उगम, खवले व पाने वगैरे असमान अवयवांची उपस्थिती, हिरव्या खोडावर व पानांवर आढळणारी त्वग्रंध्रे (सालीतील छिद्रे) व भिन्न प्रकारच्या कळ्या इ. लक्षणे खोडाची वैशिष्ट्ये, मुळे आणि खोडे यांतील भेद स्पष्ट करण्यास पुरेशी आहेत. अंतर्रचनेतही फरक असतातच [ →शारीर, वनस्पतींचे]. 

वर्णन : भिन्न वनस्पतींत आढळणाऱ्या खोडांचे स्वरूप, आकार पृष्ठभाग इ. बाबतींत इतकी विविधता आढळते की, त्याची यथार्थ कल्पना विशिष्ट वर्णनात्मक संज्ञा वापरूनच दिली जाते. खोड आडवे कापल्यावर त्याचा छेद वाटोळा असल्यास चितीय किंवा दंडगोलाकृती (आ.४) म्हणतात परंतु छेदात तो कोनयुक्त दिसल्यास कोनांच्या संख्येप्रमाणे त्याचे वर्णन त्रिधारी [ →लव्हाळा], चौधारी [ →कांडवेल, आ.५ ] आणि कोनावर बाहेर पंख असल्यास सपक्ष [ →उदा., कांडवेल  →गोरखमुंडी ] असे करतात. ⇨खडशेरणीच्या आणि ⇨एक्किसीटमच्या फांद्यांवर अनेक उभ्या खोलगट खोबणी (सीता) असतात, त्या फांद्यांना ससीता आणि कळक, मका इत्यादींच्या खोडांवर फुगीर पेरी असतात त्यांना संधिक्षोड म्हणतात. तुळशीचे खोड केसाळ व आघाड्याचे गुळगुळीत नांग्या शेराच्या खोडावर निळसर झाक असते म्हणून आनील बाभूळ, गुलाब व निवडुंग यांवर काटे असतात म्हणून ते काटेरी मऊ आखूड लव असल्यास लोमश परंतु राठ केस असल्यास रोमश इ. प्रकार आढळतात. आयुर्मानाच्या संदर्भात वर्षायू, द्विवर्षायू व बहुवर्षायू असे वर्ग करता येतात. सूर्यफूल, तुळस, तेरडा इ. वनस्पतींचे जीवन जास्तीत जास्त एक वर्ष असल्याने त्यांना वर्षायू म्हणतात मुळा, बीट, गाजर, कोबी वगैरेंचे बी रुजल्यापासून ते पुन्हा फुले, फळे व बीजे येईपर्यंत जास्तीत जास्त दोन वर्षे (किंवा दोन ऋतू) जगतात, यांना द्विवर्षायू आणि आंबा, निंब, पेरू, गुलाब यांसारख्या अनेक वर्षे जगणाऱ्यांना बहुवर्षायू म्हणतात. बहुतेक धान्ये आणि भाज्या एकवर्षायू वनस्पतींपासून तर अनेक फळे, लाकूड, रबर, डिंक वगैरे बहुवर्षायूंपासून मिळतात. खोडांची उंची, आकार, काष्ठांश, ⇨आयुःकाल  इ. लक्षणांचा विचार करून ⇨ओषधी, क्षुपे (झुडपे), वृक्ष, वेली व महालता (मोठ्या वेली) असे वनस्पतींचे लहानमोठे प्रकार (रोपटी, झुडपे, झाडे इ.) ओळखतात. कित्येक वनस्पतींची खोडे (उदा., कांदा, सुरण, आले इ.) कधीच जमिनीवर दिसत नाहीत, परंतु जमिनीखाली कमीजास्त खोलीवर, लहानमोठ्या स्वरूपात ती आढळतात यांना भूमिस्थित म्हणतात. उलट अनेकांची (उदा., आंबा, तुळस, रुई, काकडी इ.) खोडे जमिनीवर येऊन कमीजास्त उंच वाढतात म्हणून त्यांना वायवी म्हणतात यांपैकी वेलींची खोडे मऊ व दुर्बल असल्याने त्या ताठ (उन्नत) वाढणाऱ्या कणखर झाडावर किंवा अन्य आधारावर चढतात कलिंगड, रताळी व बटाट्याचे दुर्बल वेल जमिनीवर पसरतात त्यांच्या खोडांना प्रणत म्हणतात. कठीण खोडांना काष्ठमय व मऊ खोडांना ओषधीय म्हणतात.

रूपांतरे : कित्येक वनस्पतींची खोडे आपले नित्य स्वरूप बदलून अन्य कार्याच्या दृष्टीने या परिस्थित्यनुरूप नवीन स्वरूप धारण करतात. त्यामुळे त्यांच्या संरचनेतही थोडाफार फरक दिसतो.

(१) वायवी प्रकार : जमिनीजवळ येणाऱ्या काही फांद्या वर न वाढता पुन्हा जमिनीकडे झुकून टोकाशी जमिनीचा संपर्क होतो तेथे आगंतुक मुळे (१) व जमिनीवर नवीन पाने वगैरे निर्माण करतात या फांद्यांना तिरश्वर म्हणतात (उदा., रास्पबेरी, नेचे आ. ६) हाच प्रकार कृत्रिम रीत्या (दाब कलम) करून नवीन तत्सम वनस्पती बनविण्याच्या तंत्राने याचा फायदा घेतात. स्ट्रॉबेरीची व ब्राह्मीची अनेक नवीन रोपे याच पद्धतीने बनतात यांची लहान फांदी जमिनीसरपट वाढते व टोकास नवीन रोपे बनविते आणि त्यापासून पुढे पुन्हा तशाच फांद्या निघून प्रजोत्पादन चालू राहते या फांदीस धावते (आ.७) किंवा धुमारा म्हणतात. पाण्यात सदैव वाढणाऱ्या ⇨गोंडाळ हायसिंथ या वनस्पतीही अशाच आखूड व जाड फांद्यांनी (आ.८)  खूप पसरतात या फांद्या अपप्ररोह होत. निवडुंग, नागफणा, नांग्याशेर, थोर, मुहलनबेकिया वगैरे वनस्पतींत पानांच्या अभावी खोडाते रूपांतर पानासारख्या अवयवात होते हिरवी खोडे व फांद्या पानांप्रमाणे हरितद्रव्याच्या साहाय्याने अन्ननिर्मिती करतात यांना पर्णकांड किंवा पर्णक्षोड म्हणतात (आ.९). डाळिंब, मेंदी, डुरांटा या वनस्पतींच्या फांद्याच्या टोकास अनेकदा सरळ, लांब व तीक्ष्ण काटा असतो हा पानांच्या बगलेतून वाढतो, त्यावर खाली पार्श्विक कळ्या व लहान पाने दिसतात व त्यांची अंतर्रचना खोडाप्रमाणे असते, यावरून तो खोडाच्या रुपांतराने बनलेला असतो हे उघड आहे याला शूल म्हणतात. गुलाबाच्या खोडावरील इतस्ततः विखुरलेले वाकडे काटे वरवरच्या ऊतकापासून बनलेले असतात, त्यांना शल्य म्हणतात. सर्व प्रकारचे काटे वनस्पतींचे प्राण्यांपासून संरक्षण करण्यास उपयुक्त असल्याने त्यांना संरक्षक अनुयोजना म्हणतात. दुर्बल खोडांच्या वनस्पतींना जवळच्या आधाराला बिलगण्यास लांब, पर्णहीन, स्पर्शसंवेदी दोऱ्यासारखा अवयव बहुधा पानांच्या बगलेत येतो, तो साधा किंवा शाखित असतो व त्याला प्रतान (तनावा) म्हणतात हेही खोडाचे रूपांतर असते (उदा., कांडवेल). पानाच्या भिन्न भागांचेही असेच रूपांतर झालेले अनेकदा आढळते. ⇨कारंदा नावाच्या वेलीवर काही कक्षास्थ कोरकांचे लहानमोठ्या गाठीसारख्या अवयवांत रूपांतर झालेले आढळते यांना कंदिका म्हणतात (आ.१०). त्या पूर्ण बनल्यावर सहज खाली पडून त्यापासून नवीन वनस्पती येतात, कारण त्यांत अन्नसंचय असतो. ⇨घायपाताच्या (आ.११) दांड्यावर व ⇨कलांचोच्या पानावर कंदिका येतात आणि प्रजोत्पादनास मदत करतात.


(२) भूमिस्थित रूपांतरे : वायवी प्रकाराप्रमाणे या सदरातील खोडात आढळणारे फरक विशिष्ट कार्यानुरूप किंवा परिस्थितीसापेक्ष पडलेले असतात. यांचे (जमिनीत वाढणाऱ्या खोडांचे) मुळांशी असलेले साम्य वरवरचे असून कळ्या, शल्के (खवले), शल्कपर्णे (खवल्यासारखी पाने) व पर्ण-किण (पान गळू गेलेल्याची खूण) इत्यादींचे अस्तित्व आणि मूलत्राण व मूलकेशांचा (कोवळ्या मुळाच्या पृष्ठभागावरील कोशिकांपासून निघालेल्या नलिकाकृती, अन्नपदार्थ शोषणाऱ्या वाढींचा) अभाव व अंतर्रचना या लक्षणांवरून ती खोडेच आहेत हे ओळखणे सोपे असते. या खोडांचे मुख्यतः चार प्रकार आढळतात : मूलक्षोड, ग्रंथिक्षोड, घनकंद व कंद.

 मूलक्षोड : आले, हळद, कर्दळ, वेखंड (आ.१२)  इत्यादींचे जमिनीतील खोड आडवे वाढणारे, जाडजूड असून त्यावर खवल्यासारखी पाने आणि कळ्या असतात अनेक आगंतुक जाड मुळे यांना जमिनीत घट्ट धरून ठेवतात व यांच्या काही कळ्यांपासून जमिनीत व काहींपासून जमिनीवर फांद्या येतात. जमिनीवर प्रतिकूल परिस्थिती असते त्यावेळी आतील खोड व फांद्या सुरक्षित राहून अनुकूल परिस्थितीत पुन्हा वरचा प्ररोह वाढतो. यात उभट वाढणारा प्रकार काही नेचे व हस्तिकर्णी यांत आढळतो. हरळी [आ.१३ →दूर्वा ] व तीसारख्या इतर कित्येक गवतांची खोडे भूमिस्थित परंतु दोऱ्यासारखी बारीक असतात, त्यांना प्रसर्पी म्हणतात. गुलाब, शेवंती व पुदिना यांच्या भूमिस्थित खोडापासून किंवा खोडाच्या भागापासून (क्वचित काही इतर वनस्पतींच्या मुळापासून) निघणाऱ्या फांद्या पुन्हा जमिनीच्या पृष्ठाजवळ येऊन नवीन वनस्पती निर्मितात यांना अधश्वर म्हणतात (आ.१४).

ग्रंथिक्षोड : काही वनस्पतींच्या (उदा., बटाटा, आ. १५) खोडाच्या जमिनीतील भागांपासून (पेऱ्यांपासून) निघणाऱ्या फांद्या टोकाशी गाठदार बनतात हेच ग्रंथिक्षोड होय बटाटा हे रूपांतरित खोड आहे.काळजीपूर्वक पाहिले असता त्यावर पुसट पेऱ्यांच्या रेषा व कळ्यांच्या खाचा (डोळे) दिसतात. अनुकूल परिस्थितीत या कळ्यांपासून प्रजोत्पादन होते. जेरूसलेम आर्टिचोक [→आर्टिचोक] व काही नेचे यांनाही ग्रंथिक्षोड असते.

घनकंद : या प्रकारच्या भूमिस्थित खोडात व ग्रंथिक्षोडात फरक इतकाच की, यातील गाठदार भाग पूर्वीच्या ताठ वायवी खोडाच्या बिंबासारख्या तळभागापासून बनलेला असतो त्याला पातळ खवल्यांचे आवरण कधीकधी असते व त्यांच्या काही बगलांत कोरक असतात. अग्रस्थ कोरकांपासून वायवी प्ररोह येतो व खाली जमिनीत आगंतुक मुळांचा झुबका येतो. प्ररोहाच्या अन्ननिर्मितीपासून पुन्हा त्याच्या तळास (पण पूर्वीच्या कंदावर) नवीन घनकंद बनतो. सुरण, केशर (आ.१६), अळू, ग्लॅडिओलस इत्यादींचे खोड या प्रकारचे असते.

कंद : या भूमिस्थित खोडात व घनकंदात फरक असा की, येथे अन्नसंचय वरीलप्रमाणे लहान चकतीसारख्या (बिंबासारख्या) तळभागात (खोडात) नसून त्याभोवतालच्या अनेक खवल्यांत (शल्कपर्णांत) असतो (उदा., कांदा, आ.१७). बिंबाखाली आगंतुक मुळांचा झुबका व शल्कपर्णाच्या बगलेत कोरक असतात. कंदाच्या बाहेरील काही शल्कपर्णे पातळ आणि शुष्क असून त्यांचे वेष्टन सर्व मांसल शल्काभोवती असते म्हणून याला आवृतकंद म्हणतात. हे वेष्टन सर्वच कंदांना नसते व मांसल शल्कपर्णे कांद्याप्रमाणे परस्परांभोवती एकमध्य रचलेली नसतात त्यांच्या फक्त कडांचा परस्परांशी संपर्क असतो यांना शल्ककंद (ऑक्सॅलिस, आ.१८) म्हणतात. बिंबापासून निघणाऱ्या कळ्या जमिनीवर वाढून हिरवी पाने आणि फुलोरा येतो. लसणाची गड्डी हा आवृतकंदच आहे परंतु त्यातील खाद्य कुडी (पाकळी) ही कळी असते व कंदात मांसल शल्कपर्णांचा पूर्ण अभाव असतो सर्वच खवले पातळ व शुष्क असतात.

वरील विवेचनावरून हे सहज लक्षात येईल की, अनेक विविध कार्यांकरिता खोड नित्य स्वरूप टाकून विशेषत्व पावते यामुळे अन्नसंचय (उदा., पर्णकांड, घनकंद, ग्रंथिक्षोड, कंद, मूलक्षोड इ.), आधार (उदा., प्रतान, वलयिनी, आरोहिणी, महालता), शोषण (उदा., जलवनस्पती, जीवोपजीवी म्हणजे इतर वनस्पतींवर आधार वा अन्न यांकरिता अवलंबून असणाऱ्या वनस्पती इ.), संरक्षण (उदा., शूल, शल्य, कंटक इ.), प्रजोत्पादन (उदा., धावते, अधश्वर, अपप्ररोह, मूलक्षोड, कंदिका, कंद, ग्रंथिक्षोड इ.) वगैरे विशेष कार्ये खोडाकडून अनेकदा केली जातात. दुर्बल खोडांच्या वनस्पती (उदा., काकडी, जाई, कांडवेल, गोकर्ण इ.) प्रतान व तत्सम साधनांनी किंवा स्पर्शग्राही खोडांनी दुसऱ्यांचा आधार घेऊन प्रकाशाकडे वाढतात. त्यांना लता, वेली ही सामान्य नावे आहेत. फार मोठ्या व काष्ठमय वेलींना (उदा., गारदळ, माधवलता) ⇨महालता म्हणतात. बागेत किंवा शेतात लागवड करण्याच्या दृष्टीने खोडांना अनेक रूपांतरांचा व्यावहारिक उपयोग आज अनेक वर्षे होत आला आहे पितरांची अनेक लक्षणे पिढ्यानपिढ्या फारसा फरक न पडता चालू ठेवण्यात या शाकीय (अलैंगिक) प्रजोत्पादनाचा अत्यंत उपयोग होतो ही बाब सर्वमान्य आहे [→कृत्तक ].

उपयोग : वनस्पतींच्या भिन्न प्रकारच्या (नित्य व विशेष) खोडांचा मनुष्यजातीस विविध प्रकारे उपयोग होतो व त्यांचे नवीन उपयोगही हळूहळू कळू लागले आहेत. इमारतींचे बांधकाम, सजावटी सामान, होड्या, जहाजे, नावा, गाड्या, विमाने, खेळणी इत्यादींसाठी साग, मॅहॉगनी, तून, शिसवी, ऐन, नाणा, किंजळ, साल, बाल्सावुड, अक्रोड, चंदन इ. अनेक वृक्षांची खोडे वापरतात. कित्येकांच्या (बाभूळ, खैर, पोफळी, धावडा, आवळी, कुंभा, खडशेरणी, तरवड, काही कच्छ वनस्पती इ.) सालीतील टॅनिनामुळे कातडी कमावणे व रंगवणे हा धंदा चालतो. तसेच काहींच्या सालीपासून बळकट धागे (वाख) मिळतात, त्यांपासून दोर व जाडे भरडे कापड बनवितात (उदा., रुई, कुडझू, चांदकुडा, अळशी, ताग, चिनी ताग, सनहेंप, रॅमी, अंबाडी, मॅनिला हेंप इ.). लाखेचे किडे पोसण्यास पळस, बोर, उंबर, साल, शिरीष इ. झाडांच्या खोडांचा उपयोग करतात. अनेक गवतांच्या खोडांचा (उदा., मका, जोंधळा, सोयाबीन, ल्यूसर्न इ.) जनावरांना चारा घालतात. उसाच्या खोडापासून साखर, गूळ व मद्ये बनवितात शिवाय त्यांची चिपाडे व बांबूंची खोडे कागद बनविण्यास वापरतात. चंदनतेल, राळ-धूप, कापूर, अगरू, कात, डिंक, रबर व राळ यांसारखे अनेक उपयुक्त पदार्थ खोडापासूनच काढतात. आले, हळद, वेखंड, कचेरा, दालचिनी यांसारखी औषधी खोडे अनेक आहेत. ताड, माड, शिंदी इत्यादींपासून नीरा, गूळ व मादक पेये बनवितात. बटाटे, सुरण, कांदा, अळू, लसूण, नवलकोल इत्यादींची खोडे खाद्य आहेत. सॅगो पाम या वृक्षांच्य खोडापासून ⇨साबुदाणा काढतात. ⇨आरारूट हा पिष्ट पदार्थही काहींच्या खोडांपासून मिळवितात. अंबाश, बाल्सावुड, ॲश इ.खोडांचे हलके लाकूड विशिष्ट कामाकरिता उपयुक्त ठरले आहे. अनेक शंकुमंत वृक्षांची [ →कॉनिफेरेलीझ] खोडे राळ, टर्पेंटाइन, धूप, बर्गंडी पिच (डांबर ), अंबर, उत्तम लाकूड, कागदाकरिता लगदा इ. वस्तू मिळविण्यास वापरतात. इतर सदुपयोगाच्या अभावी अनेक खोडे जळणासाठी व कोळसा बनविण्याकरिता वापरण्यात येतात. तथापि काही याचकरिता बिनधुराची म्हणून चांगली आहेत (उदा., बाभूळ व त्यांच्या वंशातील आणखी काही जाती अंकोल, धावडा, बाहवा कासोद, हिंगणबेट, लाल खैर, ऐन, तिवर, निवर इ.). शिवाय विशेषतः कोळशाकरिता पळस, बोहका, बाहवा, धावडा, चार, सालई, काजू, बाभूळ, इ. उपयुक्त आहेत. खोडाची अंतर्रचना मुळे व पाने यांच्याहून भिन्न असते तसेच बीजी वनस्पतींतील भिन्न उपविभाग व वर्ग यांतील वनस्पतींतही या बाबतीत भिन्नता आढळते [ →शारीर, वनस्पतींचे].

पहा : ओषधि पान पुनर्जनन पुष्पबंध प्रजोत्पादन बीज महालता मूळ यकृतका वृक्ष शेवाळी शैवले सायलोटेलीझ सायलोफायटेलीझ हरिता क्षुप.

संदर्भ : 1. d’ Almeida, J. F. R., Mullan, F. P. Lessons in Plant Morphology, Bombay, 1946.

    2. Hill, A. F. Economic Botany,  New York, 1952.

    3. Lawrence, G. H. M. An Introduction to Plant Taxonomy, New York, 1958.

परांडेकर, शं. आ.