पर्मियन व पर्मो-ट्रायसिक पादपजाति : पुराजीव महाकल्पाच्या (सु. ६० ते २४·५ कोटी वर्षापूर्वीच्या काळाच्या) शेवटच्या विभागाला ⇨पर्मियन कल्प म्हणतात. हा कल्प सु. २७·५ कोटी वर्षांपूर्वीपासून तो २४·५ कोटी वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजे एकूण सु. तीन कोटी वर्षे टिकला. पर्मियन कल्पाच्या मागोमाग मध्यजीव महाकल्पाचा पहिला विभाग म्हणजे ट्रायासिक कल्प (सु. २३ते२० कोटी वर्षांपूर्वीचा काळ) सुरू झाला पर्मियन व ट्रायासिक या कल्पांच्या संधिकालाला पर्मो-ट्रायासिक काल असे म्हणतात. पर्मियन कल्पाच्या आधीच्या कल्पाला कारबाॅनिफेरस कल्प (सु.३५ ते ३१ कोटी वर्षांपूर्वीचा काळ) आणि त्याच्या व पर्मियन कल्पाच्या संधिकालाला  ⇨पर्मो-कारबॉनिफेरस काल असे म्हणतात.पर्मो-कारबॉनिफेरस  ते पर्मो-ट्रायसिकपर्यंतच्या कालावधीत म्हणजे पर्मियन कालाचा प्रारंभ होण्याच्या किंचित आधीपासून ते पर्मियन कल्प संपून काही थोडा काळ उलटेपर्यंतच्या कालावधीत पृथ्वीच्या जमिनीवर ज्या पादपजाती [⟶ पादपजात] (वनस्पतिसमुदाय) होत्या त्यांचे वर्णन पुढे दिले आहे या काळात पृथ्वीवर भिन्न भागांत जलवायुमानात (दीर्घकालीन सरासरी हवामानात) फार मोठे बदल झाले व त्यामुळे कित्येक वनस्पतींचे जुने गट, काही अंशतः व काही पूर्णतः नाहीसे झाले. पृथ्वीवर झालेल्या पादपसृष्टीच्या क्रमविकासातील (उत्क्रांतीतील) एक मोठा टप्पा ओलांडला जाऊन तिने नवीन रूप धारण करण्यास आरंभ केला, इतकेच नव्हे, तर त्या क्रमविकासाला पुढे एक भिन्न दिशा मिळाली तसेच त्याकाळात व नंतर झालेल्या भूभागांच्या नवीन मांडणीमुळे कित्येक वनस्पतींची विद्यमान वाटणी व पर्मियन कालापूर्वीची त्यांच्या पूर्वजांची वाटणी यांतील फरक व कारणेही स्पष्ट झाली. या कालावधीतील पादपजातींचे पुढील चार गट पडतात.

(१) यूर-अमेरिकन पादपजात : उरल पर्वत आणि त्याच्या पश्चिमेकडील यूरोपचा सर्व भाग, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पूर्वेकडील बराचसा भाग व कॅनडा एवढ्या प्रदेशातील पादपजाती.

(२) ग्लॉसोप्टेरीस किंवा गोंडवनी पादपजात : उत्तर गोलार्धातील भारत (व पाकिस्तान) व दक्षिण गोलार्धातील मध्य व दक्षिण आफ्रिका, मॅलॅगॅसी, दक्षिण अमेरिकेचा दक्षिणेकडील अर्धा भाग, आॅट्रेलिया व अंटार्क्टिका ह्या प्रदेशांतील पादपजाती. 

(३) अंगारा किंवा सायबीरियातील किंवा कुझ्नेत्स्क पादपजात: उत्तर आशियाच्या उत्तरेकडील आणि उरल पर्वताच्या पूर्वेकडील पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्‍यापर्यंतच्या आणि सायबीरिया व उत्तर मंगोलिया यांचा समावेश असलेल्या प्रदेशांतील पादपजाती.

(४) कॅथेशिया किंवा जायगँटॉप्टेरीस पादपजात : कोरिया, चीन, थायलंड, सुमात्रा व न्यू गिनी या प्रदेशांतील पादपजाती. तशाच पादपजातींचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पश्चिमेकडच्या कोलोरॅडो, ओक्लाहोमा व टेक्सास येथेही सापडतात. अंगारा व कॅथेशिया यांच्या पादपजातींच्या प्रदेशांत क्वचित ग्लॉसोप्टेरीस गटातील वनस्पतींचे जीवाश्म आढळले आहेत पण यूर-अमेरिकन प्रदेशात ते कोठेही आढळलेले नाहीत.

पादपजातींच्या वरील चार गटांपैकी पहिल्या दोहोंचे क्षेत्र बरेच अधिक असून सु. शतकभर त्यांचे अध्ययन झालेले आहे. उरलेल्या गटांची माहिती सापेक्षतः अलीकडे झालेली आहे. आपण विचार करीत आहोत त्या काळी वरील पादपजातींच्या गटांची भौगोलिक वाटणी अशी का होते, विशेषतः यूर-अमेरिकन व गोंडवनी पादपजातींच्या गटांची वाटणी अशी का होती, हे कोडेच आहे. त्या काळातील भूगोल म्हणजे सागर व खंडे यांची भौगोलिक वाटणी आजच्याहून वेगळी असावी, नंतर  ⇨खंडविप्लव होऊन आजचा भूगोल निर्माण झाला असावा किंवा निरनिराळ्या खंडांना जोडणारे भूसेतू पूर्वी असावेत व नंतर ते नाहीसे झाले असावेत इ. स्पष्टीकरणे सुचविण्यात आली आहेत [⟶ गोंडवनभूमी].

यूर-अमेरिकन पादपजात : कार‌्बाॅनिफेरस कल्पाच्या उत्तरार्धात उत्तर अमेरिका व उत्तर यूरेशिया या प्रदेशांतील जलवायुमान उष्ण व दमट असून त्यांच्या बऱ्‍याचशा क्षेत्रांत वनस्पतींची दाट वाढ झालेल्या दलदली होत्या पण जलवायुमान हळूहळू रूक्ष होत गेले, प्राकृतिक भूगोलात फेरफार झाले व पर्मियन कल्प अवतरल्यावर वरील सर्व प्रदेशांचे जलवायुमान रूक्ष, वाळवंटी झाले व पूर्वीची दाट वने नाहीशी झाली. पूर्वीच्या वनांत लेपिडोडेंड्रॉन [⟶ लेपिडोडेंड्रेलीझ], सिजिलॅरिया, कॅलॅमाइटस [⟶कॅलॅमाइटेलीझ], कॉर्डाइटस [⟶ कॉर्डाइटेलीझ] व ⇨बीजी नेचे या गटातील वनस्पती विपुल असत. त्या रूक्ष हवामानात व रूक्ष प्रदेशातील हिवाळ्याच्या थंडीत टिकू शकणाऱ्‍या नव्हत्या. लेपिडोडेंड्रेलीझ आणि ⇨ लायकोपोडिएलीझ या गटांतील बहुतेक वनस्पती नाहीशा झाल्या. कॉर्डाइटेलीझ गटही बहुतेक नाहीसा झाला पण त्याचा विकास होऊन शंकुमंत [⟶ कॉनिफेरेलीझ] निर्माण झाले. बीजी नेचांची संख्याही पुष्कळच कमी झाली होती. सारांश, यूर-अमेरिकन पादपजातींच्या प्रदेशात पर्मियन व पर्मो-ट्रायसिक काली फारच थोड्या वनस्पती होत्या त्यांपैकी बहुतेक कार‌्बाॅनिफेरस कल्पातील वनस्पतींच्या अवशिष्ट होत्या उदा., नेचे, बीजी नेचे, एक्विसीटेलीझ, लायकोपोडिएलीझ, स्फेनोफायलेलीझ व कॉर्डाइटेलीझ या गणांतील काही वनस्पती खऱ्‍या शंकुमंतांचा उदय व विकास झाला आणि आदिम (आद्य) सायकॅडिऑइडिया [⟶ बेनेटाइटेलीझ] वनस्पती अवतरल्या.

ग्लॉसोप्टेरीस पादपजात : उत्तर गोलार्धातील बहुतेक क्षेत्रांत रूक्ष, वाळवंटी व उष्ण किंवा उबदार जलवायुमान असताना दक्षिण गोलार्धातील जलवायुमान अगदी भिन्न होते. पर्मो-कार‌्बाॅनिफेरस काळी व पर्मियन कल्पाच्या प्रारंभी दक्षिण गोलार्धातील सर्व खंडांत व भारताच्या द्वीपकल्पात हिमकाल अवतरला होता व त्या प्रदेशांतील विस्तीर्ण क्षेत्रे हिम-बर्फाने झाकली गेली होती. त्यानंतर वरील सर्व प्रदेशांत दमट व शीतल ते उबदार मध्यम कटिबंधी जलवायुमान अवतरले व त्यांच्यातील विस्तीर्ण क्षेत्रांत दलदली व वने वाढली. त्या दलदलींतील व वनांतील वनस्पती यूर-अमेरिकन क्षेत्रातील वनस्पतींहून अगदी भिन्न प्रकारच्या होत्या. त्यांच्यापैकी प्रमुख वंश म्हणजे ग्लॉसोप्टेरीस [⟶ बीजी नेचे] व त्याच्यावरून त्याच्या बरोबरीने असणाऱ्‍या वनस्पतींच्या एकूण गटाला ‘ग्लॉसोप्टेरीस फ्लोरा (पादपजात)’असे नाव देण्यात आले आहे.


ग्लॉसोप्टेरीस वंशातील सु. चाळीस जातींची माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यांची पाने लांब, जिभेच्या आकाराची असून त्यांना ठळकशी मध्यशीर असते. या पादपजातींतील आणखी एक महत्त्वाचा वंश ग्लॉसोप्टेरीस होयत्याच्या अठरा जातींची माहिती मिळालेली आहे. गँगॅमोप्टेरिसाची पाने ग्लॉसोप्टेरिसाच्या पानांच्या मानाने अधिक मोठी असून त्यांच्यात मध्यशीर नसते. या पादपजातीतील वनस्पतींना चमच्याच्या आकाराच्या पानांचे झुबके असत. या वनस्पतींच्या सुट्या पानांचेच जीवाश्म आढळलेले आहेत व ती पाने कशावर वाढत असत याविषयी निश्चित माहिती नाही. तिरश्चर (जमिनीतील खोडापासून निघून जमिनीत आडवी वाढणारी शाखा) अथवा मूलक्षोड (जमिनीतील जाडसर खोड) यावर ते झुबके वाढत असावेत, अशी कल्पना आहे. ज्यांच्यात जवळजवळ एक मिमी. जाडीच्या काडीसारख्या अक्षाला पानांची मंडले चिकटलेली आहेत, असे काही जीवाश्म अलीकडे सापडलेले आहेत. ई. पी. प्लस्मेड यांनी अलीकडे असे सुचविणारा पुरावा गोळा केला आहे की, ग्लॉसोप्टेरीस गटातील वनस्पतींची ठेवण वृक्षासारखी असावी. ते वृक्ष मोठेव पानझडी असावेत व त्यांच्या लांब तसेच आखूड प्ररोहावर (कोंबावर) पाने वाढत असावीत. ग्लॉसोप्टेरीस गटाखेरीज वनस्पतींच्या इतर गटांतील वंशही गोंडवनी पादपजातीत असत. काही कॉर्डाइटेलीझ गणातील (उदा., डॅडोझायलॉन हा काष्ठ जीवाश्म) व शंकुमंतांचे थोडे (फक्त तीन : बुरियार्डिया, पॅरॅनोक्लॅडसवाल्कोमिएला) वंश प्रकटबीजी वनस्पतींपैकी असल्याचे आढळले आहेत. स्फेनोफायलमाच्या [⟶ स्फेनोफायलेलीझ] जातींचा निम्नरोह (जमिनीच्या जवळ वाढणारा थर) असतो. लायकोपोडांच्या जाती बहुधा आढळत नाहीत व उत्तरेकडील पादपजातींत आढळणारा या गटातील एकही वंश गोंडवनी पादपजातींत अद्याप आढळलेला नाही. मॅरॅटिएसी या नेच्यांच्या कुलातील थोड्या वनस्पती त्या काळी होत्या [⟶ मॅरॅटिएलीझ].

पर्मियन व पर्मो-ट्रायासिक पादपजाती: (१) स्फेनोफायलम स्पेसिओजम, (२) फायलोथिका एथेरिजेईं, (३) जायगँटॉप्टेरीस निकोटिनिफोलिया, (४) जायगँटॉप्टेरीस अमेरिकाना, (५) लोबेटअँन्युलॅरिया, (६) टीनिऑप्टेरीस लॅटेकॉस्टॅटा, (७) बैरा (पाने), (८) टिंजिया कार्बोनिका (पान).

अंगारा पादपजात : नेच्यासारख्या पानांचे जीवाश्म विपुल आढळतात. अधिक अध्ययनानंतर नेच्यांच्या व बीजी नेच्यांच्या अनेक नव्या जाती आढळून येण्याची शक्यता आहे. येथील काही जीवाश्म उदा., स्फेनोप्टेरिस हे यूर-अमेरिकन गटातील जीवाश्मांसारखे तर काही उदा., गोंडवनीडियम, अंगारीडियम हे अगदी भिन्न प्रकारचे आहेत. कॉर्डाइटेलीझपैकी नोगोराथिऑप्सिस या पर्णजीवाश्मी वंशाच्या सतरा जाती आढळलेल्या आहेत. इतर जीवाश्मी वनस्पती : स्फेनोफायलम, ॲन्युलॅरिया, पॅरॅकॅलॅमाइटस, फायलोथीका, गिंकोफायलस, काही हरिता [ब्रायेलीझ ⟶ शेवाळी] व पीटजनक हरिता (प्रोटोस्फॅग्नेलीझ) इ. आढळतात. शंकुमंतांचे जीवाश्म येथे विरळा, परंतु यूर-अमेरिकन पादपतातीत ते बरेच आढळतात. अंगारा पादपजातीत व्होजनोव्हस्काया पॅरॅडोक्सा ही प्रकटबीजी वनस्पतीची एक अद्वितीय जाती आढळते हिचा अंतर्भाव एका स्वतंत्र गणात (व्होज्नोव्हस्किएलीझ) करावा असे एम्.एफ्. नॉइबुर्ग या रशियन पुरावनस्पतिवैज्ञानिकांनी सुचविले आहे.

कॅथेशिया पादपजात : एकूण जातींपैकी शेकडा जवळजवळ पन्नास इतक्या जाती नेचे व बीजी नेचे गटांतील असत. त्यांतील सर्वांत महत्त्वाची म्हणजे जायगँटॉप्टेरीस निकोटिनिफोलिया ही होय. ती इतकी विपुल होती की, या पादपजातीला ‘जायगँटॉप्टेरीस फ्लोरा’ असेही नाव दिले आहे. यामध्ये ॲन्युलॅरिया विपुल असून त्यांच्यापैकी काही यूर-अमेरिकन जातींसारखे असत. लोबेटॲन्युलॅरिया, स्फेनोफायलमच्या अनेक जाती, ⇨नेचांपैकी ग्लायकेनिएसी कुलातील ऑलिगोकार्पा व चँसिथीका आणि ऑस्मुंडेसी कुलातील क्लॅडोफ्लेबिस इ. आढळतात. तसेच बीजी नेचांपैकी पेकॉप्टेरीस वोंगाय, ॲलेथॉप्टेरीस नोरिनाय, एम्लेक्टॉप्टेरीस ट्रायअँग्युलॅरिस टीनिऑप्टेरिसाच्या सु. अकरा जाती आढळतात. कॉर्डाइटसाच्या दोनच जाती तसेच बैरा [बहुतेक गिंकोएलीझपैकी ⟶ गिंकोएलीझ]  याच्याही दोनच जाती व टिंजियाच्या अनेक जाती होत्या. एकाच पर्णमंडलात भिन्न आकाराची पाने असणाऱ्‍या एक्विसीटेलीझ व स्फेनोफायलेलीझ ह्या बऱ्‍याच आणि लायकोपोड फार थोडे होते. शंकुमंत विरळाच आढळतात. यूर-अमेरिकन प्रदेशात आढळणारा वाल्चिया येथे आढळत नाही. काही जाती गिंकोएलीझपैकी असाव्यात. पहा : आयसॉएटेलीझ पुरावनस्पतिविज्ञान वनस्पती, प्रकटबीज उपविभाग.

संदर्भ : 1. Andrews, H. N. Studies in Paleobotany. New York, 1967.

    2. Arnold, C.A. An Introduction to Paleobotany, New York, 1947.

    3. Datta, S. C. An Introduction to Gymnosperms, Calcutta, 1931.

परांडेकर, शं. आ.