सॅक्स, कार्ल : (२ नोव्हेंबर १८९२– ८ ऑक्टोबर १९७३). अमेरिकन जीववैज्ञानिक. कोशिकाविज्ञान, उद्यानविज्ञान, प्रारण जीवविज्ञान, आनुवंशिकी, जनांकिकी इ. क्षेत्रांत संशोधन करून त्यांनी जीवविज्ञानात मोलाची भर घातली. अनेक नवीन शोभादायक वृक्षांचे व झुडपांचे ते जनक होते (उदा., शोभेची चेरी व सफरचंदे).

सॅक्स यांचा जन्म वॉशिंग्टनमधील स्पोकेन येथे झाला. त्यांचे शिक्षण वॉशिंग्टन येथील स्टेट महाविद्यालयात झाले आणि १९१६ मध्ये त्यांना बी. एस्सी. पदवी मिळाली. त्यानंतर त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठातील बसे संस्थेत पदव्युत्तर संशोधन करून १९२२ मध्ये डी.एस्सी. पदवी संपादन केली. ते मेन ॲग्रि कल्चरल एक्सपेरिमेंट स्टेशनमध्ये संशोधन जीववैज्ञानिक होते (१९२०–२८). त्यांनी बॉस्टनजवळील आर्नल्ड आर्बोरेटम या वृक्षोद्यानामध्ये काम केले (१९२८–५१). ते हार्व्हर्ड विद्यापीठात वनस्पतिविज्ञानाचे प्राध्यापक होते (१९३६–५९).

सॅक्स वॉशिंग्टन येथील महाविद्यालयात पदवीपूर्व शिक्षण घेत असतानाच त्यांना गव्हाच्या जातींच्या संकरण प्रयोगांत गोडी निर्माण झाली. त्यांनी यासंबंधी प्रयोग करून गव्हाच्या भिन्न जातींचा उगम व त्यांचे परस्परसंबंध यांचा कोशिका-आनुवंशिकीदृष्ट्या अभ्यास केला. गव्हाच्या पहिल्या (प्रारंभिक) जातींत कोशिकेतील रंगसूत्रांच्या (पिढ्यान्पिढ्या गुणदोषांचे अनुकरण करण्यास जबाबदार असलेल्या) सात सात जोड्या असून जातींच्या संकरामुळे आणि रंगसूत्रांच्या द्विगुणनामुळे चौदा व एकवीस जोड्यांच्या जाती तयार झाल्या. पावरोटीचा गहू एकवीस रंगसूत्रांच्या जोडीच्या जातींत येतो. अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि जपान येथे चौदा व सात रंगसूत्रांच्या जोडीच्या संकराने आणि नंतर कृत्रिमरीत्या रंगसूत्रांची संख्या दुप्पट करून एकवीस जोड्यांची जाती तयार करण्यात आली आहे. [⟶ बहुगुणन].

सॅक्स व त्यांचे शिष्य यांनी ट्रॅडेस्कँशिया या वनस्पतींच्या परागकणातील रंगसूत्रांवर क्ष-किरणांचा काय परिणाम होतो यासंबंधी संशोधन केले. प्रारणामुळे कोशिकेच्या समविभाजनातील भिन्न अवस्थांत घडून येणाऱ्या रंगसूत्रांच्या विकृती संख्या व प्रकार या दृष्टींनी भिन्न असतात. उद्यानविज्ञानात सॅक्स यांनी तात्त्विक व व्यावहारिक अशी महत्त्वाची भर घातली. त्यांनी सप्ताळू व अलुबुखार या वृक्षांचे खुजे प्रकार बनविण्याची पद्घतीही दाखवून दिली.

सॅक्स हे आर्नल्ड आर्बेरेटम या वृक्षोद्यानाचे संचालक होते (१९४७ –५४). त्यांना नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्यत्व १९४१ मध्ये मिळाले. त्यांचा स्टँडिंग रूम ओन्ली : द चॅलेंज टू ओव्हर पॉप्युलेशन हा ग्रंथ १९५५ मध्ये प्रसिद्घ झाला.

सॅक्स यांचे मेडिया (पेनसिल्व्हेनिया) येथे निधन झाले.

परांडेकर, शं. आ.