साल–२ : (राळ हिं. सखुया, कार्श्य गु. राल क. कब्बा सं. अश्वकर्ण, साल, शाल इं. साल लॅ. शोरिया रोबस्टा कुल-डिप्टेरोकार्पेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] हा मोठा, १८–३० मी. उंच  साल (शोरिया रोबस्टा):(१) फुलोऱ्यासह फांदी, (२) फूलवाढणारा, अर्धवट पानझडी व फार उपयुक्त वृक्ष आहे. तो पंजाब ते आसाम, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कोरोमंडल किनारा इ. ठिकाणी आढळतो व अनेक ठिकाणी याचे लहान-मोठे समूह आढळतात [⟶ वनश्री]. व्यापारात हा ‘साल’ नावानेच ओळखला जातो. त्याचा घेर १·८–२·१ मी. असतो. अनुकूल परिसरात तो सु. ४५ मी. उंच वाढतो व त्याचा घेर सु. ३·६ मी. होतो. खोडावरची साल लालसर तपकिरी किंवा करडी आणि गुळगुळीत किंवा भेगाळ असते. त्याचा सोट (फांद्या नसलेला खालचा भाग) सरळ १८–२४ मी. पर्यंत उंच असतो व त्यावरच्या भागात शाखा व पाने यांची गर्दी असते. याची पाने साधी, सोपपर्ण (तळाशी उपांगे असलेली), एकाआड एक, चिवट, गुळगुळीत, चकचकीत १०–३० × ५–१८ सेंमी. अंडाकृती-आयतासारखी फुले लहान, नियमित, द्विलिंगी व पिवळट असून ती परिमंजरी [⟶ पुष्पबंध] प्रकारच्या फुलोऱ्यात येतात संवर्त व पुष्पमुकुट बाहेरून लवदार व पाकळ्या (प्रदले) आतून नारिंगी केसरदले १५ ते अनेक ऊर्ध्वस्थ किंजपुटात तीन कप्पे व प्रत्येकात दोन बीजके असतात [⟶ फूल].  फळे शुष्क, लंबगोल, एकबीजी, लालसर ते फिकट पिवळसर हिरवी १०–१५ मिमी. लांब व १० मिमी. व्यासाची असून प्रत्येकावर तीन किंवा अधिक पंख आणि प्रत्येक पंख (संदलाच्या रूपांतराने बनलेला) ५–७ सेंमी. लांब असतो. बीज अंडाकृती व त्यात दोन विषम आकाराच्या दलिका असतात पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) नसतो. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ डिप्टेरोकार्पेसी  (शाल) कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. भारत, श्रीलंका व म्यानमार येथे शोरिया  प्रजातीतील नऊ जाती आढळतात, त्यांपैकी साल या जातीचे महत्त्व अधिक आहे. शोरियाच्या सु. १८० जाती असून त्यांपैकी भारतात फक्त सहा जाती आढळतात, असे काहींचे मत आहे. शो.आसामिका  ही आसामातील जातीही उपयुक्त आहे. कारवारच्या जंगलात शो.टालूरा (जलरंदा) ही जाती आढळते तिच्यापासून रेझीन मिळते. मलायातील शो.हायपोक्रा   जातीपासून ‘डामर’ हे ओलिओरेझीन [ राळेसारखा किंवा राळयुक्त विशिष्ट रासायनिक पदार्थ ⟶ रेझिने] काढतात.

उपयोग : सालाचे लाकूड फार कठीण, मजबूत, मध्यम जड, भरड व फार टिकाऊ असून त्याला वाळवीपासून हानी पोहोचत नाही. मध्यकाष्ठ प्रथम फिकट तपकिरी व नंतर गर्द पिंगट होते. रसकाष्ठ (बाह्यकाष्ठ) प्रथम फिकट, परंतु नंतर काळपट होऊ लागते मध्यकाष्ठ फार टिकाऊ असते. योग्य खबरदारी घेतल्यास त्याचे खांब २५–४० वर्षे टिकतात. उ. व पू. भारतात व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात असणारे लाकूड म्हणून ते प्रसिद्घ आहे मात्र कापण्यास व रंधण्यास ते अवघड जाते. पूलबांधणी, घरबांधणी, खाणकाम, हत्यारांचे दांडे, नावा, वल्ही, खांब, सजावटी सामान, शेतीची अवजारे, पिपे, जळण इ. विविध प्रकारे ते उपयोगात असते. खोडावरची साल तिच्यातील सु.९०% टॅनिनामुळे कातडी कमविण्यास वापरतात. पानांत सु. २०%, पानांसह डहाळ्यांत २२ % आणि भुशात जवळपास १२% टॅनीन असते. खोडापासून फळ्या, पट्ट्या इत्यादींकरिता तासणी, कापणी इ. होत असताना साल व भुसा भरपूर मिळतो. त्यामुळे पाने, डहाळ्या व भुसा यांचा टॅनिनाकरिता बराच उपयोग होतो. टॅनीनमिश्रित अर्क काढून घेतल्यावर उरलेल्या चोथ्यातून तूलीर (सेल्युलोज) वेगळा करून उरलेला भाग तक्ते करण्यास वापरतात. भुसा मिसळूनही चोथा तक्त्यासाठी वापरतात. पानांत सु. ०·९४% नायट्रोजन व २·७९% राख (खनिजे) असल्याने गुरांना खाद्य (चारा) म्हणून ती उपयोगाची नाहीत.

खोडापासून काढलेले ‘साल-डामर’ नावाचे ओलिओरेझीन बूटाचे पॉलिश, कार्बन कागद, टंकलेखनाच्या फिती, हलके रंगलेप, रोगण, धूप इत्यादींत वापरतात. प्रत्येक वृक्षापासून दरवर्षी साधारणतः ४ ते ५ किग्रॅ. रेझीन मिळते. रसकाष्ठातील गुहारुधांमुळे (वाहक नलिकांत बाहेरून वाढणाऱ्या अनेक कोशिकांमुळे) रेझिनाचा प्रवाह निर्बंधित होतो. तसेच साल-डामरापासून ऊर्ध्वपातनाने ‘चुआ तेल’ (४१–६८%) मिळते ते सुगंधी द्रव्यात वापरतात तसेच नावा व गलबते यांतील भेगा बुजविण्यास व धूपाकरिता हे तेल वापरतात. ते स्तंभक (आकुंचन करणारे) व निरोधक असल्याने आमांशात देतात शिवाय धुरी देण्यास वापरतात. मंद पचनक्रिया व परमा यांवर ते देतात. ते वाजीकर (कामवासना वाढविणारे) आहे. ते जड अत्तरात स्थिरत्व आणण्यास घालतात आणि स्वादाकरिता तंबाखूत वापरतात. चर्मरोगांवर व कानदुखीवरच्या औषधांत ते घालतात.

बिया व त्यांचे तेल : रुचीच्या दृष्टीने बिया साधारणच असल्या, तरी विशेषतः अन्नतुटवडा असताना, गरीब लोक त्या भाजून खातात. त्यांची टरफले काढून सु. ५%मक्याबरोबर मिसळून त्या कोंबड्यांच्या खाद्यात समाविष्ट करतात. सुक्या बियांत प्रतिशत प्रमाणात पाणी ५·२३, प्रथिने ६·१३, ईथर अर्क १६·७७, भरड धागा ४·८१, नायट्रोजन विहित अर्क ६३·२५, कॅल्शियम ०·१८, राख ३·७८ व अम्लात न विरघळणारी राख ०·९५ हे घटक असतात. बियांत १९-२०% स्थिर तेल (साल-लोणी) असते. बिनटरफलाच्या बिया पाण्यात उकळल्यास तेल वेगळे होते. थंड हवेत त्यापासून घन स्वरूपात लोणी मिळते. ते हिरवट किंवा नितळ दिसते. दिव्यांकरिता किंवा स्वयंपाकात ते उपयोगात येते तुपात त्याची भेसळ करतात. इतर काही तेलांबरोबर त्याचा साबणांत वापर करतात, तसेच कोको बटरऐवजी चॉकोलेट बनविण्यातही त्याचा वापर करतात. तेल काढून घेतल्यावर सालाच्या पेंडीचा उपयोग गुरे व कोंबड्या यांच्या खाद्याकरिता करतात त्यात १०–१२%  प्रथिने व सु. ५०% स्टार्च असतो


 इतर उपयोग : टसर रेशमाचे किडे पोसविण्यास साल वृक्ष उपयुक्त असून ‘कुसुमी’ वाणाचे लाखेचे किडेही त्यावरच वाढविता येतात. पश्चिम बंगाल, ओरिसा व आसाम येथे पानांचा उपयोग बिड्या बांधण्यास करतात. तसेच पानांच्या पत्रावळी व द्रोणही करतात. फळांचा लेह अतिसारात देतात. सालाच्या फुलांपासून भरपूर मध मिळतो.

अभिवृद्घी : जमीन, हवा व पाणी: साल वृक्षाच्या प्रसाराच्या मर्यादा लक्षात घेतल्यास हवामानाच्या बाबतीत तो भिन्न प्रकारच्या हवामानांशी जुळवून घेतो असे दिसते. हिमतुषारापासून त्याला हानी होते, असे आढळले आहे. उत्तर भारताच्या पूर्व भागात दमट, परंतु फारसा बदल न होणाऱ्या हवामानात त्याची वाढ बरी होते. आसामात हवेतील ओलाव्यावर त्याच्या प्रसाराची मर्यादा अवलंबून असते. मध्य प्रदेशात फार रुक्ष हवामानाखेरीज इतर अधिक ओलसर ठिकाणी तो आढळतो. साधारणपणे उंच ठिकाणी आढळणाऱ्या सावलीतील सु.  ४४°से. कमाल तापमानापासून ते बिहारातील सर्वांत उष्ण भागी असलेल्या सु. ४७° से. पर्यंतच्या तापमानाच्या क्षेत्रात व कमीत कमी−१° ते ७° से. च्या किमान तापमानात आणि तसेच १००–४५० सेंमी. पर्जन्यमानाच्या प्रदेशांत हा वृक्ष वाढत असल्याचे आढळते. साल वृक्षाची उत्कृष्ट वाढ चांगल्या निचऱ्याच्या, रेतीयुक्त, खोल, दुमट व ओलसर जमिनीत होते. जमिनीच्या खालच्या थरात अधिक चिकणपणा असल्यास वृक्ष उंच वाढत नाही. बाह्य हिमालयातील खोलीवर असलेल्या मुख्यतः शेल, अभ्रकी सुभाजा व कोठे कोठे चुनखडीयुक्त जुन्या खडकांवरच्या जमिनीत साल वाढतो. तसेच वालुकाश्म, शेल व पिंडाश्म हे खडक असलेल्या शिवालिक रांगांतील जमिनीवर आणि टेकड्यांच्या पायथ्याशी आणि इतरत्र दऱ्याखोऱ्यांत खोलवर मोठे दगडधोंडे असलेल्या जमिनीतही तो वाढतो. भारताच्या मध्य व द्वीपकल्पी भागांतील अभ्रकी सुभाजा, शेल, वालुकाश्म, जांभा दगड, पट्टिताश्म व क्वॉर्ट्‌झाइट इ. खडक असलेल्या जमिनीत त्याची वाढ बरी झाल्याचे आढळते. कधीकधी चुनखडी असलेल्या किंवा जुन्या खडकावर साचलेल्या गाळवट जमिनीतही सालाची वाढ झालेली आढळते.

साल वृक्षाचे बहुधा लहान मोठे समूह वाढतात त्यामुळे फक्त साल वृक्ष असलेली वने आढळतात. कधीकधी त्यांमध्ये इतर वृक्षांच्या जातीही फार थोड्या संख्येने असतात. एकाच वेळी अनेकांच्या बिया रुजून त्यांपासून समवयस्क व सारख्या आकारमानाचे सालाचे लहान-मोठे समूह बनतात. डोंगराळ भागात तसेच तुटक व खंडित क्षेत्रात, परिस्थिती सलग व सारखी नसल्याने, इतर पिकांमध्ये अधूनमधून किंवा इतर जातींच्या वृक्षांसोबत सालाचे वृक्ष असतात ह्या इतर जाती सर्वत्र सारख्या नसतात. ⇨ बांबूच्या काही जाती विशेषतः ⇨ वासा  कित्येकदा सालाबरोबर आढळतो. रुक्ष व घनदाट वने असे वनांचे दोन प्रकार केले जातात. या दोन टोकांत मध्यम प्रकारची वनेही असतात. रुक्ष वने मध्य भारतात व घनदाट वने उत्तरेच्या पट्ट्यातील पश्चिम भागात आहेत. चारोळी, केंदू, तेंडू इ. वृक्ष साल वृक्षाबरोबर आढळतात. दाट जंगलांचा आढळ आसाम आणि प. बंगालच्या भागात असून तेथे इतर अनेक वृक्ष साल वृक्षाबरोबर आढळतात. भारताच्या एकूण वनक्षेत्राच्या सु. १३·३%क्षेत्र सालाने व्यापलेले आढळते इतके मोठे क्षेत्र इतर कोणत्याही दुसऱ्या प्रभावी वृक्ष जातीमुळे व्यापलेले आढळत नाही.

साल वृक्षाला वरून भरपूर सूर्यप्रकाश मिळाल्यास त्याची वाढ चांगली होते हिमतुषार व जलदुर्भिक्ष्य यांपासून याला संरक्षण मिळणे आवश्यक असते. त्याचे प्रधानमूळ जमिनीत  खोलवर जाते तथापि पाण्याची तेथील पातळी फारच खाली गेलेली असल्यास त्याच्या जीवनास धोका पोहोचतो. साल अग्नीपासून त्याच्या आगनिरोधक गुणामुळे सुरक्षित असतो साल वृक्षाला इजा झाल्यावरही तो त्वरित बरा होतो. खोल मुळांमुळे त्याचे वादळापासून संरक्षण होते. डुकरे व साळ यांच्यामुळे सालाच्या कोवळ्या रोपट्यांना फार उपद्रव होतो तसेच हरणे व गुरे त्याच्या पानांवर हल्ला करतात. त्यामुळे त्याच्या नैसर्गिक अभिवृद्घीला आळा बसतो. जंगली हत्ती कधीकधी याची बाह्य साल ओरबडून काढतात. वृक्ष कापून उरलेल्या खुंटापासून नवीन वाढ चांगली होते. ताज्या बियांपासून याची त्वरित लागवड होते. मूळच्या झाडापासून २७–३६ मी. अंतरावर रोपटी असल्यास पुढील वाढ सुसूत्रपणे होते. मात्र योग्य वेळी पुरेसे पाणी न मिळाल्यास वाढ थांबून रोपटे नष्ट होते. तसेच जमिनीतील खेळती हवा काही कारणाने फार कमी झाल्यास हाच परिणाम होतो. कृत्रिम पुनर्जननात प्रथम ताजे बी पेरून आलेल्या रोपट्यांचे पुनरारोपण करतात ठोंब लावून नवीन लागवड जवळजवळ करीतच नाहीत.

साल वृक्षांच्या बाबतीत कृत्रिम लागवडीमध्ये त्यांचा वाढीचा वेग अधिक असून साधारणतः सालाच्या मळ्यात ३५ वर्षांपर्यंत उंची जलद वाढते ५० वर्षांपर्यंत घेर अधिक जलद वाढतो उत्तम साल वनांमध्ये ८० वर्षांत वृक्षांची उंची सु. ३३ मी. व व्यास ४० सेंमी. होतो.

रोग, पीडक जीव व परोपजीवी : साल वृक्षांना सु. १५० प्रकारच्या कवकांपासून (उदा., गॅनोडर्मा, पॉलिपोरस, फोम्स, लेन्झाइटस, पॉलिस्टिक्टस, लेंटिनस, स्टेरियम  व ट्रामेटिस  इ.) हानी पोहोचते. इतर कारणांनी दुर्बल झालेल्या वृक्षांना यांचा उपद्रव अधिक लवकर होतो काही मरणोन्मुख वा मृत वृक्षांनाच जलद हानी पोहोचते. पानांचा नाश करणारे व भोके पाडणारे पीडक जीव कीटकांपैकी असून काही सामुद्रिक प्रच्छिद्रक आहेत त्या सर्वांचा नाश किंवा नियंत्रण भिन्न उपायांनी केले जाते [⟶ कवकनाशके कीटकनाशके]. ⇨ बांडगुळांच्या कित्येक जाती जिवंत साल वृक्षांवर वाढून त्यांच्या वाढीवर दुष्परिणाम घडवितात.

पहा : कल्होणी चालन लाकूड वृक्ष.

संदर्भ: 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IX, New Delhi, 1972.

   2. Hill, A. F. Economic Botany, Tokyo,1952.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.