बोंडारा : (व्यापारी नावे : बोंदारा, लेंडी, लेंडिया हिं. सैना, बाल्की गु. काक्रिया क. चणंगी लॅ. लॅगर्स्ट्रोमिया पर्व्हिफ्लोरा कुल- लिथ्रेसी). हा पानझडी वृक्ष भारतात सर्वत्र (विशेषतः सह्याद्री, कोकण व बेळगाव येथे) आढळतो. हिमालयात सु. ९०० मी. उंचीपर्यंत हा सापडतो. उंची ४.५० – ६.५० मी. व घेर १.५ मी. साल फिकट तपकिरी, पातळ व चिवट तुकड्यांनी सोलली जाते. पाने साधी, चिवट, झडणारी, समोरासमोर, लंबवर्तुळाकृती, ५-१० सें.मी. लांब व २.५-३.६ सेंमी. रुंद, वरच्या बाजूस गुळगुळीत व खालील बाजूस लवदार असतात. पानांच्या बगलेत अगर फांद्यांच्या टोकांवरच्या फुलोऱ्यावर [परिमंजरीवर ⟶ पुष्पबंध] एप्रिल-जूनमध्ये पांढरट, लहान, सुगंधी फुले येतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लिथ्रेसी कुलात (मेंदी कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. फळे (बोंडे) व बी (सपक्ष) साधारणतः ⇨ नाण्याप्रमाणे पण मोठी. संवर्त [⟶ फूल] फळास अधिक वेढून राहतो. याचे लाकूड बळकट, कठीण, जड व टिकण्यास मध्यम प्रतीचे, कापण्यास व रंधण्यास सोपे असून गुळगुळीत होते हे घरबांधणी, वल्ही, पूल, कुंपण, शेतीची अवजारे, गाड्या, सजावटी सामान, शिळेपाट, जळाऊ लाकूड व कोळसा, होड्या, हत्यारांचे दांडे इत्यादींस उपयुक्त असते. पाने व साली यांपासून निघणारे टॅनीन रंगविण्यास व कातडी कमाविण्यास चांगले असते. ‘टसर’ जातीच्या रेशमी किड्यांना व जनावरांना झाडांची पाने खाण्यास देतात. सालीतून पाझरणारा डिंक गोड असून खाण्यास वापरतात. ⇨ ऐनाची साल व बोंडाऱ्याची साल चामड्यांना काळा रंग देण्यास वापरतात. सालीपासून निघणारे धागे छोटा नागपूरकडे दोऱ्या वळण्यास वापरतात. निसर्गतः नवीन झाडे बियांपासून येतात. सर्वच बिया फलनक्षम नसतात. वाढ बहुधा जलद होते सरासरीने घेरात वार्षिक वाढ सु २.४ सेंमी. होते. खोड तोडून राखलेल्या खुंटांवर पुन्हा चांगली वाढ होऊन सु. तीस वर्षांत बांधकामास उपयुक्त असे सरळ उंच खोड जोमाने वाढलेले आढळते.

कुलकर्णी, उ. के. परांडेकर, शं. आ.