जरबेरा जमेसोनी : (इं. बार्बर्टन डेझी, ट्रान्सव्हाल डेझी; कुल-कंपॉझिटी). ही खुजी, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) व काहीशी केसाळ ⇨ ओषधी मूळची द. आफ्रिकेतील असून तिचा प्रसार इतरत्र बागांतून, मैदानी प्रदेशांत, टेकड्यांत सर्वत्र झाला आहे. ही वाफ्यांत, वाफ्यांच्या कडेने अथवा कुंड्यांत लावण्यास किंवा हिची फुले कापून फुलदाणीत घालून ठेवण्यास फार सोयीची असतात. जमिनीवर खोड नसते व जमिनीत नाममात्रच असते. पानांच्या खालच्या बाजूस लोकरीसारखी लव असून पाने जमिनीलगत झुबक्याने (गुच्छ) येतात; ती भाल्यासारखी १५·२ सेंमी. लांब असून थोडीफार विभागलेली व दातेरी असतात. फुलांचे स्तबक [ फुलोरे; ⟶पुष्पबंध] पानांच्या झुबक्यांतून सु. ४० सेंमी. लांब देठावर हिवाळ्यात व उन्हाळ्याच्या आरंभी येतात. स्तबकाचा व्यास १२.५ —१५ सेंमी. असून त्यातील बाहेरील किरण पुष्पके (लहान फुले) पिवळी, लाल, पांढरी, गुलाबी किंवा नारिंगी असतात व मध्यवर्ती त्रिपुष्पके पिवळी असतात [→ कंपॉझिटी; फूल]. एकेरी व दुहेरी किरण पुष्पकांचे विविधरंगी प्रकार संकराने काढले आहेत व ते बागेची शोभा वाढवितात. स्तबके फुलदाणीत बरेच दिवस टिकतात. या वनस्पतीच्या यशस्वी लागवडीकरिता सुपीक जमीन व भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. पानांचे झुबके काढून विभागून पुन्हा २५—३० सेंमी. अंतरावर लावून किंवा बियांपासून नवीन लागवड करता येते. (चित्रपत्र ५० ).

जमदाडे, ज. वि.

जरबेरा जमेसोनी