लॉसन सायप्रस : (लॅ. कॅमिसायपॅरिस लॉसोनियाना, कुल-क्युप्रेसेसी). उघडी बीजे असलेल्या शंकुधारी वनस्पतींच्या विभागातील [⟶ वनस्पति, प्रकटबीज उपविभाग] एका मोठ्या वृक्षाचे इंग्रजी नाव. याचे ‘पोर्ट ऑर्फोर्ड सीडार’ असेही इंग्रजी नाव असून क्युप्रेसस लॉसोनियाना ह्या शास्त्रीय नावाने तो ओळखला जातो. हा मूळचा अमेरिकेतील (नैर्ऋत्य ऑरेगन व वायव्य कॅलिफोर्निया येथील) असून त्याची उंची सु. ५५-६० मी व घेर ६ मी. असतो. याचा माथा सदापर्णी, अरूंद व त्रिकोनी असतो. तथापि लागवडीत असलेल्या वृक्षात खुजे, पसरट फांद्यांचे, समांतर फांद्यांचे, लोंबत्या फांद्यांचे व भिन्न रंगांचे असे विविध प्रकार आढळतात. ह्यांची सर्वसाधारण शारीरिक लक्षणे शंकुमंत [⟶ कॉनिफेरेलीझ] गणात व ⇨ देवदार, ⇨ सुरू इ. वृक्षांच्या वर्णनांत दिल्याप्रमाणे असतात. त्यांचे शंकू गोलसर असतात. डोंगरावर लावला जाणारा ग्रॅसिलिस पेंड्यूला त्याच्या झुकत्या फांद्यांमुळे डौलदार दिसतो. तसेच अर्जेंटिया प्रकार पानांच्या चंदेरी रंगामुळे आकर्षक दिसतो. ह्या वृक्षांना साधारणपणे कोणतीही जमीन चालते व ते हिमतुषाराचा वर्षाव सहन करू शकतात. छाटकलमे अथवा बिया रूजवून केलेली रोपे लावून नवीन लागवड करतात. साधारणपणे दोन झाडांतील अंतर एक ते दीड मी. ठेवतात. कुंपणाकरीता ती काहीशी जवळजवळ लावतात. शोभेकरीता भारतात टेकड्यांवर ही झाडे लावतात.

ह्या झाडांचे लाकूड पिवळट पांढरे व तुकतुकीत असून पुढे पुढे याचा उघडा पडलेसला भाग गडद होतो. ते हलके, कठीण व टिकाऊ असून त्याला खंमग वास येतो. ते तेलकट व चिवट असून घासून व रंधून गुळगुळीत होत नाही. विशिष्ट प्रकारची खिडक्यांची दारे, घरबांधणी, नौका बांधणी, तक्तपोशी, सिलिपाट, सजावटी सामान, कुंपणाचे खांब, विमानांचे भाग, आगकाड्या इत्यादींसाठी ते उपयुक्त असते. लाकडात व पानांत उडून जाणारे तेल असते. 

पहा : सीडार.  

संदर्भ : 1. C. S. I. R. The wealth of India, Raw Materials, vol. ll, New Delhi, 1950.

            2. Hill, A. F. Economic Botany, Tokyo, 1962.

चिन्मुळगुंद, वासंती रा.