वड : (हिं. वड गु. वड सं. वट, न्यग्रोध इं. बनियन ट्री लॅ. फायकस बेंगालेन्सिस कुल-मोरेसी). या सुपरिचित प्रचंड वृक्षाचा अंतर्भाव आवृतबीज वनस्पतींच्या द्विदल वर्गात होतो [⟶वनस्पती, आवृतबीज उपविभाग]. हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश, द्विकल्पाचा पश्चिम भाग व दक्षिणेकडील टेकड्यांचा भाग या ठिकाणी हा जंगलात आढळतो. रस्त्यांच्या दुतर्फा, शेताच्या कडेला, बागांत, मंदिराच्या परिसरांत, समाधिस्थानांलगत सावलीसाठी हा लावतात. पक्ष्यांच्या विष्ठेद्वारे याचा बीजप्रसार होऊन खेड्यांच्या आसपासच्या मोकळ्या जागा, पडक्या इमारती, भिंतीमधील भेगा इ. अनेक ठिकाणी तो वाढताना दिसतो. कडक ऊन, थंडी व पाऊस यांचा त्यावर प्रतिकुल परिणाम होत नाही.

आर्यांना हा वृक्ष प्राचीन काळापासून परिचित असल्याचे दिसते. वेदांमध्ये याचा ‘न्यग्रोध’ नावाने उल्लेख आहे. रामायण, महाभारत, चरकसंहिता, बृहत्संहिता, कौटिलीय अर्थशास्त्र, रघुवंश इ. अनेक संस्कृत ग्रंथातून भिन्न भिन्न संदर्भात वडाचा निर्देश आहे. प्लिनी यांनी ‘इंडियन किग ट्री’ असा याचा उल्लेख केला आहे. हिंदूधर्माय वडाला पवित्र मानतात. सुवासिनी ज्येष्ठ पौर्णिमेस याची पूजा करतात. सीतीदेवीने प्रयागाच्या प्रसिद्ध वटवृक्षाची प्रार्थना केल्याचा उल्लेख रामायणात आहे. वडाच्या काटक्यांचा उपयोग होमहवनात व यज्ञात समिधा म्हणून करतात. बौद्ध धर्मीयही या वृक्षाला पवित्र मानतात. त्यांच्या सात बोधीवृक्षांपैकी हा एक आहे.

गयेचा अक्षयवट व प्रयागचा श्यामवट फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहेत. सिबपूर (कलकत्ता) येथील भारतीय वनस्पती उद्यानातील वटवृक्ष पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनला आहे. वडाचे बी ताडवृक्षाच्या (काहींच्या मते खजुराच्या) पानांच्या दुबेळक्यात इ. स. सु. १७८२ मध्ये पडले ते बी रूजून वडाचे झाड वाढले. १९०० मध्ये डी. प्रेन यांनी या वृक्षाचे वर्णन केले. त्या वेळी त्याच्या खोडाचा घेर सु. १५ मी. होता. पारंब्यांची संख्या ४६४ भरली. सर्वांत जाड वायवी मुळाचा घेर सु. ३.६ मी. होता. वृक्षाच्या माथ्याचा परिघ सु. ३७७ मी. होता. १९६५ मध्ये वृक्षाच्या मुळांची संख्या एक हजारावर गेली व परिघ ४१६ मी. झाला. १९७६ मध्ये या वृक्षाच्या वायवी मुळांची संख्या १,५०० भरली. त्याची उंची सु. २९ मी. होती, तर परिघ ४५५ मी. होता. दोनशे वर्षाहून अधिक आयुःकाल असलेल्या या वृक्षाचे मूळचे खोड रोगग्रस्त होऊन नष्ट झाले आहे.

भडोचपासून जवळ असलेल्या नर्मदा नदीतील एका बेटावर कबीरवड हा पुरातन वृक्ष आहे. फॉर्बझ यांनी (१७७६−८३) वर्णन केल्याप्रमाणे याचा परिघ सु. ६०० मी. होता. सु. ३५० मोठी वायवी मुळे व ३,००० लहान वायवी मुळांच्या आधारावर तो उभा असून त्याखाली ७,००० सैनिकांचा तळ पडत असे. १८९९ मध्ये या वृक्षाने व्यापलेले क्षेत्र एक ते दीड हेक्टर इतके होते. हल्ली त्याचे भव्य स्वरूप खूपच कमी झाले आहे. जावळी (जिल्हा सातारा) व जुन्नर (जिल्हा पुणे) येथील वटवृक्षही प्राचीन व प्रचंड आहेत. सर जॉन किंग यांनी जावळीजवळच्या एका वटवृक्षाचे मोजामाप घेतले. या वृक्षाच्या माथ्याचा परिघ सु. ४८३ मी., दक्षिणोत्तर लांबी १८१ मी. तर पूर्व- पश्चिम लांबी १३४ मी. होती. मद्रास येथील अड्यार नदीच्या दक्षिण तिरावर एका ५०० वर्षे आयुःकाल असलेला वृक्ष असून त्याने सु. ४,००० चौ. मी. इतके क्षेत्र व्यापले आहे. त्याची दक्षिणोत्तर लांबी ६७.५ मी. व पूर्व−पश्चिम लांबी ६१.५ मी. आहे. त्याला जमिनीत गेलेली सु. १०० मोठी मुळे आहेत. या वृक्षाखाली सु. ३,००० माणसांची परिषद भरली होती, अशी नोंद आहे.

आ. १. रॉयल बोटॅनिकल गार्डन (कलकत्ता) येथील वडाचा विस्तार दाखविणारा तळाचा एक भागवटवृक्षाची उंची सु. ३० मी. पर्यंत असते. हा वृक्ष सदापर्णी आहे. तथापि रूक्ष ठिकाणी त्याची पाने गळून पडल्यामुळे तो पानझडी दिसतो. वटवृक्षात दुधी रंगीत चीक असतो. त्यात काऊट चाऊल व रेसिन असते. कोवळ्या भागांवर दाट मऊ लव असते. खोड जाड व घट्ट असते. फांद्या जाड व जमिनीत समांतर वाढतात. फांद्यांवर ठराविक अंतरावर पारंब्या फुटतात, त्या जमिनीत गेल्यानंतर फांद्यांना आधार देतात. त्यामुळे वटवृक्षाची वाढ प्रचंड प्रमाणात होऊ शकते. पाने जाड, कातडीप्रमाणे चिवट, १०−२० सेंमी. लांब व ५ ते ७.५ सेंमी. रूंदी, अंडाकृती, दीर्घवर्तुळाकृती, वरचा पृष्ठभाग केशविरहीत, चकचकीत व गर्द हिरवा आणि खालचा पृष्ठभाग सूक्ष्म लवयुक्त, ठळक शिरा असणाराव फिकट हिरवा, तळाचा भाग गोलाकार किंवा काहीसा खाचदार, ३ ते ७ प्रमुख शिरा कडा मिळतात तेथे विशालकोन देठ १ ते ५ सेंमी. लांब, बळकट, उपपर्णे ०.५ ते २.५ सेंमी. लांब इ. लक्षणांनी युक्त असतात.

फुलोरो गोलाकार, काहीसे पोकळ, पानांच्या दुबेळक्यात येणारे, देउविरहीत, लवयुक्त, सु. २. सेंमी. व्यास, कोवळ्या व अपक्वावस्थेत हिरवे व टणक, पक्कावस्थेत लालबुंद व नरम अशा लक्षणांनी युक्त असतात. या फुलोऱ्यांनी कुंभालनी पुष्पबंध म्हणतात [⟶ पुष्पबंध]. याच्या आतील भागात सूक्ष्म पुं-पुष्पे, स्त्री-पुरूषे व गुल्मपुष्पे असतात. पुं-पुष्पे पुष्पबंधाच्या मुखाजवळ असून त्यांची संख्या जास्त असते. प्रत्येक पुं-पुष्पात एक पुं-केसर असतो. गुल्मपुष्पे व स्त्री-पुष्पे कुंभासनीच्या खालच्या भागात असतात. गुल्मपुष्पांचा कळा आखूड असतो, तर स्त्री-पुष्पांचा लांब असतो. यातील परागण कीटकांद्वारे होते. या सर्वच फुलोऱ्यांचे संयुक्त फळ बनते. त्याला औदुंबरिक फळ असे म्हणतात. मार्च ते जूनच्या काळात ही फळे झाडावर विपुल प्रमाणात दिसतात. अनेक पक्षी, वटवाघळे, खारी व माकडे इ. प्राणी ती खातात. फळांत असणाऱ्या कीटकांमुळे ती माणसांना खाण्यास योग्य नसतात, तथापि दुष्काळात गरीब लोक ती खातात. प्राण्यांच्या विष्ठेतून असंख्य बिया रूजून वडाचा प्रसार होतो. पुष्कळ वेळा वडाचे बी दुसऱ्या मोठ्या वृक्षांच्या फांद्यांना वा पानांच्या दुबेळक्यात रूजते. प्रारंभी अपवनस्पती या स्वरूपात हे रोपटे वाढते तथापि कालांतराने मुळे जमिनीत जातात व वृक्ष मूळच्या आश्रय वृक्षांवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे वाढतो. वडाची लागवड जून पण लहान फांद्या लावून करतात.


वटवृक्षांचा अंतर्भाव मोरेसी कुलातील फायकस या प्रजातीत करतात. फायकस या प्रजातीत सु. १,००० जाती असून त्यांपैकी ७० जाती भारतात सापडतात. उंबर, पिंपळ, अंजीर, पिंपळी, काळा, उंबर इ. वृक्षांचा अंतर्भाव या प्रजातीत केला जातो.

आ. २. कृष्णवडाचे पानमुळांचे लाकूड लवचिक व अधिक बळकट असते. तंबूंचे खांब,  बैलगाड्यांचे जू व दांडे इत्यादींसाठी ते उपयोगी आहे. खोडाचे लाकूड करडे व साधारण कठीण असते. त्याचा उपयोग अनेक किरकोळ वस्तू तयार करण्यासाठी व सर्वसाधारण सजावटी सामानासाठी होतो. वडाच्या लाकडापासून कागदाचा लगदा तयार करता येतो. सालीच्या धाग्यांपासून दोर तयार करतात. पारंब्यांचाही दोरी म्हणून वापर करता येतो. चिकापासून अतिशय चिकट गोंद बनवितात त्याचा उपयोग पाखरे पकडण्यासाठी केला जातो. पानांच्या पत्रावळी व द्रोण करतात. कोबळ्या फांद्या व पानांचा शेळ्या, मेंढ्या व इतर गुरांना चारा म्हणून उपयोग होतो. हा चारा हत्तींना मोठ्या प्रमाणात लागतो. चीक दातदुखी, संधिवात, कटिशूल इ. व्याधींवर उपयोगी आहे. तळपायांच्या भेगांवर याचा लेप देतात. वडाच्या सालीत ११% टॅनीन असते. तिचा रस स्तंभक (आकुंचन करणारा) व पौष्टिक असतो. आमांश व अतिसारात तो उपयोगी आहे. सालीचा काढा मधुमेहात देतात. मुळांची साल परम्यावर उपयुक्त आहे. पानांचे पोटीस गळवांवर बांधतात. बी पौष्टिक व शीतकर (थंडावा देणारे) असते. टॉमेटीज प्रसोंनी या कवकाचा संसर्ग झाल्यास संसर्ग झालेला झाडाचा भाग कुजतो.

कृष्णवड : या नावाने परिचित असलेला वृक्ष खऱ्या वडांपेक्षा निराळा आहे. त्याचे शास्त्रीय नाव फा. कृष्णी असे आहे. इंग्रजीत त्याला कृष्णाज बटरकप असे संबोधितात. याची पाने पात्याच्या तळाजवळ दुमडलेली असून पेल्यासारखी (द्रोणासारखी) दिसतात. या पानांच्या पेल्यात श्रीकृष्ण लोणी ठेवून खात असे, अशी दंतकथा आहे. हा वृक्ष लहानसर असून शोभेसाठी बागेत लावतात.

संदर्भ : 1. C. S. I. R The Wealth of India, Raw Materials, Vol. IV, New Delhi, 1956.

           2. Randhava, M. S. Flowering Trees, New Delhi, 1965.

           3. Santapau, H. Common Trees, New Delhi, 1966.

           ४. काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर, १९७४.

शानसागर, वि. रा. भागवत, श. द.