ॲस्क्लेपीएडेसी : (रुई कुल). रुई, मांदार, अनंतमूळ (उपरसाळ) इ. वनस्पती समाविष्ट असलेल्या या कुलाचा अंतर्भाव जेन्शिएनेलीझ या आवृतबीजी वनस्पतींच्या [→ वनस्पति, आवृतवीज उपविभाग] एका गणात केला आहे. या कुलात एकूण २८० वंश व २,००० जाती असून त्यांपैकी सु. १,८०० जाती उष्णकटिबंधात आढळतात. या बहुतेक चिकाळ ⇨ओषधी अथवा झुडुपे असून वेलीप्रमाणे चढतात. दक्षिण आफ्रिकेतील मरुप्रदेशात वाढणाऱ्या (स्टॅपेलिया, हूडिया, ट्रायकोकॉलोन इ.) कित्येक वनस्पती निवडुंगाप्रमाणे मांसल आहेत (उदा., माकडशिंग). पाने साधी, समोरासमोर, मंडलित (वेढ्यासारखी), क्वचित एकाआड एक असतात. सोमलतेला पानेच नसतात. फुले द्विलिंगी, नियमित, एकंदरीने पंचभागी फुलोरा बहुधा चवरीसारखा व पानांच्या बगलेत असतो. पाकळ्या जुळलेल्या व त्यांवर आतील बाजूस केस किंवा खवल्यांचे तोरण असते केव्हा हे तोरण केसरदलांस जोडलेले असते व त्यात मधाचा साठा असतो. केसरदले पाच, केव्हा अलग पण बहुधा जुळलेली असून किंजदलांभोवती त्यांची नळी बनते व ती टोकाशी किंजल्काखाली चिकटते. यालाच ‘किंजकेसराक्ष’ म्हणतात [→ फूल] प्रत्येक परागकोशातील परागांचे दोन किंवा चार परागपुंज बनतात किंजल्काला स्पर्श करणाऱ्या कीटकांकडून त्यांच्या केसाळ पायांस चिकटल्यामुळे परागपुंज उचलले जातात [→ परागण]. येथे किंजमंडलात दोन अलग किंजपुटे व किंजल असून, किंजल्क पंचकोनी व एकच असते. पेटिकाफळ बहुधा जोडीने, क्वचित एकटे [→ फळ] बिया विपुल व चपट्या असून त्यांवर टोकास प्रसारार्थ केसांचा झुबका असतो. यातील अनेक वनस्पती औषधी, काही विषारी, तर काहींपासून उपयुक्त धागे मिळतात. भारतातील सामान्य वनस्पती : रुई, मांदार, कावळी, काकमारी, होया, माकडशिंग, सोमलता इत्यादी. ह्या कुलाचे ⇨ॲपोसायनेसी, जेन्शिएनेसी व ⇨लोगॅनिएसी यांच्याशी जवळचे नाते आहे. याला ‘मंदारादि कुल’ असेही म्हणतात.

पहा : जेन्शिएनेलीझ वनस्पति, विषारी.

हर्ढीकर, कमला श्री.