अतिविष : (हिं. अतविका, अतिस लॅ.ॲकॉनिटम हेटेरोफायलम, कुल-रॅनन्क्युलेसी). बचनागाच्या वंशातील व त्यासारखी ही ओषधीय जाती [→ओषधि] हिमालयात २,०००—५,००० मी. उंचीपर्यंत सापडते हिंदुकुश ते काराकोरमपर्यंत ही पसरली आहे. हिची पाने साधी, एका आड एक व दातेरी फुले पिवळी किंवा फिकट निळी घोसफळात पाच लहान पेटिकाफळे [→फळ] मुळे राखी असून चांगल्या दर्जाची चटकन मोडतात उघडा भाग रवाळ व दुधासारखा पांढरा असतो (चित्रपट ५५). ती अतिशय कडू असतात. त्वचेस स्पर्श झाल्यास चुणचुणत नाही. त्यात ॲटिसीन नावाचे बिनविषारी अस्फटिक अल्कलॉइड (वनस्पतींत निसर्गत: आढळणारे कार्बनी क्षारक, →अल्कलॉइड) ४० टक्के असते. थोड्या प्रमाणात घेतल्यास ॲकॉनिटिनाप्रमाणे विषबाधा होत नाही. आदिवासी याची पाने भाजीकरिता वापरतात. फार प्राचीन काळापासून तापावर व शक्तिवर्धक म्हणून वापरात आहे. अतिविषाच्या पांढऱ्या भुकटीत कधी शतावरीच्या मुळ्यांच्या भुकटीची भेसळ करून विकतात अतिविषाची मुळी वाजीकर (कामोत्तेजक), स्तंभक (आकुंचन करणारी), शक्तिवर्धक असून अतिसार, आमांश, खोकला व पाळीचा ताप यांवर गुणकारी आहे.

पहा : बचनाग वनस्पती, विषारी रॅनेलीझ.

ठोंबरे, म. वा.