शिदोदी ( होलोस्टेमा ऱ्हीडियानम) : पाने व फुलोरे यांसह फांदी

शिदोदी : (तुळतुळी, दुदुर्ली हिं. छिरवेल गु. खिरवेल, खिरदोडी, खर्ने सं. अर्कपुष्पी, जीवन्ती लॅ. होलोस्टेमा ॲन्युलेर, हो. र्हीदडियानम कुल – ॲस्क्लेपीएडेसी). फुलझाडांपैकी [→ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] झुडपाप्रमाणे परंतु वर चढत वाढणारी व शोभादायक मोठी वेल [→ महालता] हिच्या प्रजातीत (वंशात) एकूण दोनच जाती असून त्या आग्नेय आशियात आढळतात. भारतात शिदोदी सु. १,८०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात सर्वत्र आढळते. तसेच चीन व श्रीलंका येथेही सापडते. तिला अनेक फांद्या असून त्यांवर साधी, जाडसर, समोरासमोर असणारी, लांबट, आयत-अंडाकृती, तळाशी हृदयाकृती, ७·५–१२·५ X ५–७·५ सेंमी. व टोकदार अशी पाने असतात. मध्यशिरेच्या तळाशी वरच्या बाजूस लहान प्रपिंडे (ग्रंथी) असतात. जुलै ते ऑगस्टमध्ये या वेलीला पानांच्या बगलेजवळ चवरीसारख्या गुच्छांत [चामरकल्प वल्लरीत → पुष्पबंध] लहान, द्विलिंगी, पंचभागी, मांसल, सुगंधी, बाहेर रुपेरी पांढरट व आतून जांभळट किरमिजी रंगाची अशी फुले येतात. पुष्पमुकुटाच्या तळापासून वर वाढलेल्या केसरदलांच्या (पुं-केसरांच्या) स्तंभाचे तंतू जुळलेले असून त्यांच्या तळाशी मांसल, वलयाकृती व टोकाशी सपाट असे तोरण असते. ते स्तंभाला चिकटून असते. परागकोश मोठे व सपक्ष (पंखांसारखी उपांगे असलेले) असून परागपुंज (अनेक परागकणांचे पातळ पापुद्र्याने वेढलेले समूह) लांबट, मेणचट व चपटे असतात [→ फूल]. फळे शुष्क, चितीय (लांबट व गोलसर), टोकास बोथट आणि पेटिकासम (एका शिरेवर पेटीप्रमाणे तडकणारी) असून ती १०–१२·५ X ०·६ सेंमी. असतात. प्रत्येक फुलापासून फळांची जोडी बनते. बिया ०·६ सेंमी. लांब, अनेक, पातळ, आयत, चपट्या व तळाशी सपाट असून टोकावर रेशमी केसांचा २–२·५ सेंमी. लांब गुच्छ असतो. इतर सामन्य शारीरिक लक्षणे ⇨ ॲस्क्लेपीएडेसी कुलात (रुई कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

पाने, फुले व फळे यांची भाजी करतात. ह्या वनस्पतीत पांढरा चीक असतो. रक्तरोग, कृमी, व्रण, पित्त, प्रकोप, कंडू, श्वेतकुष्ठ, परमा व मूत्राशयातील खडे इ. शारीरिक विकारांवर हिचा उपयोग करतात. हिच्या मुळांचा उपयोग डोळ्यांच्या विकारांवर होतो हे र्हीषडे नावाच्या शास्त्रज्ञांनी दाखवून दिल्याने त्यांच्या नावाचा निर्देश लॅटिन व जातिवाचक नामात (र्हीयडियानम) पूर्वी केला जाई. नेत्रशोथ व वृषणशोथ झाल्यास मुळे ठेचून त्यांचा लेप लावतात. मूळ उगाळून थंड दुधातून मधुमेहावर देतात. स्वप्नावस्थेवर शिदोदीचे मूळ व ⇨ शाल्मलीचे मूळ यांची चूर्णे मिसळून ती दूध व साखरेतून दररोज दोनदा देतात. संथाल लोक शिदोदीच्या मुळाचा काढा खोकला व वृषणाची आग यांवर देतात तर मुंडा लोक तो पोटदुखीवर देतात. मूळ शीतक (थंडावा देणारे), पौष्टिक, आरोग्यपुनःस्थापक व दुग्धोत्पादक असते. खोडाच्या सालीपासून बारीक रेशमासारखा धागा काढून त्याचा उपयोग दोर व कागद लगदा बनविण्यासाठी करतात. ही वनस्पती गुरांना चारा म्हणूनही देतात.

पहा : ॲस्क्लेपीएडेसी.

हर्डीकर, कमला श्री.