यवासयवास : (म., हिं. जवास गु. जवासो सं. दुर्लभा क. बळिक तुरूचे इं. अरेबियन मान्ना, कॅमल थॉर्न, पर्शियन मान्ना प्लँट लॅ. अल्हागी मौरोरम कुल-लेग्युमिनोजी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित (बियांत दोन दलिका असलेल्या) वर्गातील हे अत्यंत काटेरी व भरपूर फांद्या असलेले लहान शिंबावंत (शेंगा येणारे) झुडूप भारतात सर्वत्र व पाकिस्तानात रुक्ष जागी आढळते. याच्या प्रजातीतील एकूण पाच जातींपैकी भारतात ही एकच आहे. अ. स्यूडाल्हागी आणि . कॅमेलोरम या नावांनीही हे ओळखले जाते. काहींच्या मते मौरोरम कॅमेलोरम या दोन स्वतंत्र जाती आहेत. बलुचिस्तान, सिंध, गुजरात, राजस्थान, पंजाब, उ. प्रदेश इ. ठिकाणी हे सापडते. हे सु. ३०–४५ सेंमी. उंच असून याचे लांब काटे फांद्याची रूपांतरे असतात. पाने एकाआड एक, गोलसर, चिवट व फार लहान, ६–१० X ३–४·५ सेंमी. असून त्यांच्या बगलेत मार्चमध्ये लहान, लाल, पतंगरूप, ५–८ फुलांच्या मंजऱ्या काट्यांवर किंवा लहान फांद्यांवर येतात [⟶ फूल]. फळ (शिंबा) लहान (१·८–३ सेंमी. लांब), बारीक पण वाकडे व तडकणारे, साधारण चपटे व गाठाळ असते. बिया मूत्रपिंडाकार, काळ्या, पिंगट, गुळगुळीत व चकचकीत असतात. ह्याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨लेग्युमिनोजी अथवा शिंबावंत कुलातील पॅपिलिऑनेटी उपकुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. गुजरातमध्ये हिरव्या फांद्यांपासून पडदे करतात व पानांचा चारा उंटांस घालतात. या झुडुपाचे सर्व भाग औषधी आहेत. हे सारक (पोट साफ ठेवणारे), मूत्रल (लघवी साफ करणारे), कफोत्सारक (कफ पाडून टाकणारे) आहेत. त्याचे पोटीस मूळव्याधीवर बांधतात रस नेत्ररोगांवर व अर्धशिशीवर उपयुक्त असतो. अर्क शामक (शांत करणारा), कफोत्सारक व दुधाबरोबर घेतल्यास वाजीकर (कामोत्तेजक) व आरोग्यप्रद आहे. काढा स्वेदजनक (घाम आणणारा) आहे. पानांचे तेल संधिवातावर लावण्यास उपयुक्त असते. या झाडांपासून काढलेली मान्ना नावाची सारक साखर इराणमधून आयात करतात. ती झाडांतून स्रवलेली असून भारतातील जातीपासून मान्ना मिळत नाही.

पहा : मान्ना लेग्युमिनोजी.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. I, Delhi, 1948.

2. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, New Delhi, 1975.

३. देसाई, वा. गो. ओषधीसंग्रह, मुंबई, १९७५.

परांडेकर, शं. आ.