फांगळा: (पांगळी, सं.फणिज्जक, लॅ. पोगोस्टेमॉनपार्विफ्लोरस कुल-लॅबिएटी). सु. १·२-१·८ मी. उंचीची ही लहान, रानतुळस [→ तुळस] व ⇨ पाच यांसारखी व अनेक फांद्या असलेली ओषधी [→ ओषधि] भारतात सर्वत्र (हिमालय, आसाम, कोकण, दख्खन, महाबळेश्वर, कारवार इ.) डोंगराळ भागांत (सु. १,२०० मी. उंचीपर्यंत) आढळते. खोड व फांद्या चौधारी, काहीशा लवदार, चकचकीत गुळगुळीत व जांभळट असतात. त्यांवर साधी, समोरासमोर रुंदट, विविध आकारांची पण बव्हंशी अंड्याच्या आकारासारखी, ७·५-१८ X ४-९ सेंमी., किंचित तांबूस व दातेरी (द्विदंतुर) पाने असून ती चुरगळल्यास तीव्र सुगंध येतो. या वनस्पतीला डिसेंबर ते फेब्रुवारीत विरळ परिमंजरी फुलोऱ्यामध्ये [→ पुष्पबंध] लहान, त्रिकोणी, गर्द व लवदार कणिशांवर अनेक जांभळट फुले वर्तुळाकार झुबक्यांत येतात. दोन ओठांसारख्या पुष्पमुकुटाचा वरचा ओठ त्रिखंडी (तीन अपूर्ण भागांचा) व पांढरा असून त्यावर जांभळे ठिपके असतात, खालचा ओठ अखंड व पाढंरा असून बाहेर डोकावणारी केसरदले व किंजल जांभळट असतात[→ फूल]. प्रत्येक फुलातील शुष्क फळाच्या चार एकबीजी कपालिका [→ फळ ]. लंबगोल, गुळगुळीत व काळ्या असतात. ही वनस्पती पाच व तुळस यांच्या वंशातील आणि ⇨ लॅबिएटी कुलातील (तुलसी कुलातील) असल्याने तिची अनेक शारीरिक लक्षणे तेथे वर्णिल्याप्रमाणे आहेत.

 

फांगळा : फुलोऱ्यासह फांदीफांगळ्याच्या पानांत बाष्पनशील (उडून जाणारे) तेल व पोगोस्टेमॉनीन हे अल्कलॉइड असते. ताजी पाने काहीशी तिखट, उत्तेजक व रक्तस्तंभक (रक्तस्त्राव आंबविणारी) असून जखम स्वच्छ करण्यास वाटून किंवा चुरगळून त्यांची उपनाह (पोटीस) लावतात. पानांचा रस सर्दी, शूल (पोटदुखी), जंत व ताप यांवर देतात. मधमाश्यांनी गोळा केलेला याच्या फुलांतील मध ‘पांगळ मध’ या नावाने वापरला जातो. भाताच्या पिकाला फांगळ्यापासून बनविलेले हिरवे खत उपयुक्त असल्याचे आढळले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials. Vol. VIII, New Delhi, 1969.

            2. Kirtikar. K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. Il, Delhi, 1975.

  

परांडेकर, शं. आ.