चिनाई मेंदी : (हिं. फुरुश इं. इंडियन लिलॅक, कॉमन क्रेप मिर्टल लॅ.लॅगर्स्ठ्रोमिया इंडिका  कुल – लिथ्रेसी). हे लहान पानझडी क्षुप (झुडूप) मूळचे चीनमधील असून फुलांच्या विविध रंगछटांच्या सौंदर्यामुळे भारतात व इतरत्र बागेत लावण्यास लोकप्रिय झालेले आढळते. याची उंची २-३ मी. असते, परंतु आसामात त्याची उंची सु. १५ मी. पर्यंत जाते. साल गुळगुळीत, राखी किंवा पांढरट असून तिचे पातळ तुकडे सोलून निघून जातात पाने गुळगुळीत, साधी, समोरासमोर, दीर्घवर्तुळाकृती असून ती पाच सेंमी. लांब असतात. याला जून ते जुलैमध्ये फिकट गुलाबी ते गर्द किरमिजीपर्यंत सर्व छटांची सुंदर फुले परिमंजऱ्यांवर, पावसाळ्याच्या आरंभी फांद्यांच्या टोकास येतात. संवर्त घंटाकृती व लाल पाकळ्या सहा, सुट्या आणि चुरमडल्यासारख्या, केसरदले सहा, इतरांपेक्षा मोठी ऊर्ध्वस्थ किंजपुट [⟶ फूल] आणि बोंडात अनेक सपक्ष (पंखासारखा विस्तार असलेल्या) बिया असतात. नवीन लागवड बिया किंवा कलमे यांपासून करतात. सामान्य शारीरिक लक्षणे ⇨लिग्रेसी  अगर मेंदी कुलात वर्णिल्याप्रमाणे. याच्या लाकडाचा कोळसा जपानात रोगण दाट करण्यास वापरतात. झाडाची साल उत्तेजक व ज्वरनाशक असते. साल, पाने व फुले तीव्र रेचक असतात असा समज इंडोचायनात आहे. मुळे स्तंभक (आतड्यांचे आकुंचन करणारी) असून गुळण्यांकरिता उपयुक्त बियांत मादक द्रव्य असते. ॲटलस नावाच्या रेशमी किड्याचा पतंग या झाडावर उपजीविका करतो. 

पहा   : तामण नाणा बोंडारा. 

कुलकर्णी, उ. के.

चिनाई मेदी : (१) फुलांसह फांदी, (२) फूल (मोठा बोंडारा), (३) फूल (मोठा बोंडारा, तामण), (४) तडकलेले बोंड.