बचनाग : वनस्पतींच्या ॲकॉनिटम वंशातील दोन जाती बचनाग नावाने ओळखल्या जातात. त्यांपैकी एकीला काळा बचनाग तर दुसरीला दुधिया बचनाग म्हणतात.
काळा बचनाग : (हिं. बिश. बच्छनाग गु. वछनाग क. वत्साभि सं. विष, वत्सनाभ इं.इंडियन ॲकोनाइट लॅ.ॲकॉनिटम फेरोक्स कुल-रॅनन्क्युलेसी). सुमारे ०.४-१.५ मी. उंच वाढणारी ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) सदापर्णी ओषधीय [⟶ओषधी] वनस्पती हिमालय, नेपाळ, काश्मीर, व अंदमान येथे आढळते. ॲकोनाइट या इंग्लिश नावाने ओळखल्या जाणाऱ्या ॲकॉनिटम वंशातील सर्वच जाती थंड, दमट व डोंगराळ भागांत वाढतात आणि उत्तर गोलार्धात त्यांचा प्रसार अधिक झालेला असून त्या कमीजास्त विषारी आहेत यांची सामान्य शारीरिक लक्षणे ⇨रॅनन्क्युलेसी कुलात (मोरवेल कुलात) वर्णिल्याप्रमाणे आहेत. या प्रस्तुत जातीत मुळे लांबट, ग्रंथिल (गाठाळ) व बहुवर्षायू असून पाने साधी, हस्ताकृती अर्धखंडित व एकांतरित (एकाआड एक) फुलोरा-मंजरी फुले निळसर, अनियमित, अवकिंज, द्विलींगी संदले ५ त्यांपैकी एक (पश्च) फडीप्रमाणे पाकळ्या लहान केसरदले अनेक ऊर्ध्वस्थ किंजदले ३-५ सुटी बीजके अनेक [⟶फूल]. घोसफळात अनेक शुष्क, सुटी, पेटिकाफळे बिया लांबट, अनेक व सपक्ष (पंखधारी). या वनस्पतींच्या मुळांपासून ‘ॲकॉनिटीन’ नावाचे अल्कलॉइड काढतात. ते फार विषारी असून औषधी आहे. त्याला स्यूड-ॲकॉनिटीन असेही म्हणतात. ज्वर, पटकी, कुष्ठ, संधिवात इत्यादींवर हे गुणकारी असते. मुळांपासून बनविलेला लेप संधिवातात बाहेरून कातडीस लावतात. या औषधाचा उपयोग फार प्राचीन काळापासून केला जात आहे. अँटोन स्टोर्क यांनी १७६३ मध्ये यासंबंधी निरीक्षण करून उपयोग सुचविले होते.
दुधिया बचनाग : (हिं. मिठा जहर क. वसनाभि सं. विष, कालकूट इं. माँकशूड, ऊल्फ्सबेन ,लॅ ॲ. नॅपेलस ही). ॲकोनिटमची दुसरी जाती मुख्यत्वेकरून यूरोपीय देशांत आशियात व अमेरिकेतही सापडते. शोभेकरीता ही बागेत लावतात भारतात काश्मीर व हिमालय येथे हिचा प्रसार झालेला आहे. हिची पाने साधी व हस्ताकृती अधिक खोलवर विभागलेली व फुले गर्द जांभळी असतात. यात पांढरट फुलांचे प्रकारही आढळतात. किंजमंडलात तीन सुटी किंजदले असून तीन पेटिकाफळांचा एक घोस बनतो.
याचे सर्व भाग विषारी असतात. तथापि ग्रंथिल मुळांपासून विषद्रव्य (ॲकॉनिटीन) काढतात. ते विशिष्ट प्रकारच्या स्फटिकस्वरूपात असते. विषद्रव्य सूक्ष्म प्रमाणात वेदनाहारक असते. कातडीवर लावल्यास ती विरविरते व दाह होतो. परंतु ती जागा नंतर बधीर होते. १८४५ मध्ये ॲलेक्झांडर फ्लेमिंग (१८२४-७५) यांनी याच्या क्रियेसंबंधीच्या माहितीचे अचूकपणे वर्णन केले होते. ह्रदय व रूधिराभिसरण यांवर होणाऱ्या परिणांमामुळे या द्रव्याचा उपयोग ह्रदयविकार, ताप इत्यादीवर करतात. तथापि या औषधापासून होणाऱ्या दुष्परिणामांमुळे अलीकडे याचा वापर कमी झाला आहे. अधिक प्रमाणात हे द्रव्य शरीरात आल्यास मळमळ, ओकाऱ्या, अतिसार, श्वासावरोध, स्नायु-दुर्बलता, कातडी थंड होणे, वाचा बंद होणे, आचके इ.लक्षणे दिसतात व कधी मृत्यूही येतो.
पहा : रॅनन्क्युलेसी रॅनेलीझ वनस्पति, विषारी.
ठोबंरे, म. वा. परांडेकर, शं. आ.
“