बोरॅजिनेसी : (भोकर कुल). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ⇨बोरॅजिनेलीझ गणातील एक कुल. यामध्ये एकूण वंश सु. १०० व जाती १,८०० (जे. सी. विलिस यांच्या मते २,००० जाती) असून त्यांचा प्रसार उष्ण व समशीतोष्ण कटिबंधांत आहे. भूमध्य सामुद्रिक प्रदेश हे यांचे प्रमुख प्रसारकेंद्र असून तेथून मध्य यूरोपात व आशियात या वनस्पतींचा प्रसार झाला आहे. ह्या वनस्पती एक किंवा अनेक वर्षे जगणाऱ्या ओषधी [⟶ ओषधि], झुडपे किंवा क्वचित लहान वृक्ष असतात. पाने साधी व एकाआड एक फुले द्विलिंगी, अरसमात्र किंवा काहीशी एकसमात्र, अवकिंज व पंचभागी फुलोरा बहुधा वृश्चिकाम (नागमोडी) वल्लरी [⟶पुष्पबंध]. संवर्त (पाकळ्यांखालचे मंडल) घंटेसारखा. पाकळ्या जुळलेल्या व पुष्पमुकुट खाली नळीसारखा आणि वर सपाट तबकडीसारखा किंवा नरसाळ्यासारखा अथवा तुतारीसारखा असतो. केसरदले पाकळ्यांस आतून तळाशी चिकटलेली किंजदले दोन किंजपुट ऊर्ध्वस्थ, प्रथम दोन पण नंतर चार कप्प्यांचा प्रत्येक कप्प्यात एकच बीजक व किंजपुटाखाली मधुरस स्त्रवणारे बिंब असते. किंजल तळातून आलेला [⟶ फूल]. फळ अश्मगर्भी (आठळीयुक्त) किंवा चार कवचयुक्त फलांशांचे (कपालिकांचे) असते. पुढील उपयुक्त वनस्पती यात अंतर्भूत आहेत : भोकर, मोती, गोंदणी, शेंदरी, चेरीपाय, बुरुंडी, त्रिपक्षी, दत्रंग (अजान वृक्ष) इत्यादी. अनेक जाती शोभेकरिता बागेत लावतात. यातील अँकूसा वंशातील कित्येक जाती वाफ्याच्या कडेने लावण्यास वापरतात त्यांना ‘बग्लॉस’ हे सामान्य इंग्रजी नाव आहे. अँकूसा सिक्किमेन्सिस ही जाती आल्पीय हिमालयातील एक लहान, सरळ, केसाळ ओषधी असून तिला निळी फुले येतात. हिच्या मुळात अल्कानीन (अँकूसीन) हे द्रव्य असते. अल्कानीन हे जांभळे रंगद्रव्य असून ते अल्काना टिंक्टोरिया या वनस्पतीच्या मुळापासून मिळवितात. त्याचा उपयोग वसा, तेल, लाकूड इ. रंगविण्यास करतात. ह्या द्रवात बुडविलेले कागदाचे कपटे अम्लाशी संपर्क झाल्यास लाल आणि क्षाराशी (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणाऱ्या पदार्थाशी अल्कलीशी) संपर्क झाल्यास हिरवे-निळे होतात त्यांचा उपयोग दर्शकासारखा करतात. अल्काना व अल्कानेट ही इंग्रजी नावे सामान्यपणे ह्या वनस्पतींना व रंगद्रव्याला वापरतात. अल्काना व अँकूसा ही शास्त्रीय वंशनामे समानार्थी आहेत. फळ व किंजल यांची लक्षणे विचारात घेऊन बोरॅजिनेसी कुलाची पुढील चार उपकुले केलेली आढळतात : कॉर्डिऑइडी, एहरेटिऑइडी, हेलिओट्रॉपिऑइडी व बोरॅजिनॉइडी.

संदर्भ : 1. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

2. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Cambridge, 1963.

3. Willis, J. C. A Dictionary of the Flowering Plants and Ferns, Cambridge, 1966.

चौगले, द. सी.