फूल: विज्ञानक्षेत्राबाहेर ‘फूल’ याचा अर्थ कोणत्याही बाबीतील अत्युत्तम भाग किंवा बाजू असा केला जातो, कारण सामान्य लोकांना फूल हे वनस्पतींच्या जीवनसाफल्याचे, उत्कर्षाचे व वैभवाचे द्योतक वाटते त्यांच्या मते तो वनस्पतींचा अलंकार व उपमेय भाग आहे. वनस्पतिविज्ञानाच्या दृष्टीने फूल ही संज्ञा बीजे निर्माण करणाऱ्या इंद्रियास सर्वसाधारणपणे लावली जाते सर्व बीजोत्पादक वनस्पतींना बीजी वनस्पती म्हणतात. यांपैकी फक्त उच्च गणल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या अधिक निश्चित व जटिल (गुंतागुंतीच्या) प्रजोत्पादक इंद्रियापुरतीच फूल या संज्ञेची व्याप्ती ठेवावी व ती धारण करणाऱ्या वनस्पतींना फुलझाडे [⟶ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] म्हणावे, असे बहुतेकांचे मत आहे. अनेक विविध वनस्पतींचा सखोल अभ्यास करून आजच्या वनस्पतिविज्ञांनी फुलाची व्याख्या शक्यतो निरपवाद करण्याचा प्रयत्न केला आहे.

चिनी तत्त्ववेत्ते कन्फ्यूशस (इ.स.पू. ५५१-४७९) यांनी सुसंस्कृत मनुष्याला आवश्यक अशा कलांमध्ये पुष्पसंवर्धनाचा अंतर्भाव केला होता. प्राचीन ईजिप्शियन, ग्रीक व रोमन संस्कृतींत फुलांचे सौंदर्य व सुगंध यांना मोठे स्थान मिळाले होते. वर्षातून एकदा ‘फ्लोरा’ [⟶ पादपजात] या पुष्पदेवतेचा मोठा उत्सव ते करीत विलासी व संपन्न सम्राटांच्या काळात तर मातबर लोक दिवाणखान्यात गुलाबपुष्पांची पखरण करीत [⟶ गुलाब]. भिन्न फुलांत भिन्न गुणधर्म अथवा वृत्ती असून फुलांचे रंग व वास यांच्याशी त्यांचा काल्पनिक संबंध असावा, असे अनेक मानवी समाज मानतात. उदा., लिलीचे फूल निष्पापदर्शन देते असा समज आहे. डेझीचा साधेपणाशी, आयव्हीचा विश्वासूपणाशी, व्हायोलेटाचा सौजन्याशी आणि लॉरेलचा कीर्तीशी संबंध जोडलेला आढळतो. भारतात फुलांचा वापर ऋग्वेद कालापासून होत असावा असे अनुमान वैदिक वाङ्‌मयावरून निश्चितपणे काढता येते. भिन्न देवतांची पूजा भिन्न रंगाच्या फुलांनी भारतीय करीत आले आहेत. श्री महादेवाला श्वेत (पांढरी) पुष्पे व श्री गजाननाला लाल पुष्पे अर्पण करावी, असा संकेत आढळतो. काही वनस्पतींना फुलातून फळ येते, काहींना मुळातून येते काहींना फुले येतात, काहींना येत नाहीत, असा स्पष्ट उल्लेख तैत्तिरीय ब्राह्मणऋक्‌संहिता यांत आढळतो. जे. जी. क्लरॉइटर (१९३३-१८०६) व सी. के. श्प्रेंगेल (१७५०-१८१६) यांनी परिश्रमपूर्वक केलेल्या निरीक्षणामुळे फुलातील भागांच्या भिन्न जैव कार्याच्या माहितीचा पाया घातला गेला व चार्ल्‌स डार्विन (१८०९-८२) यांनी त्यात मोलाची भर घातली.

सर्वसामान्य वनस्पतींचे खोड व पाने यांना त्यांची संरचना, मांडणी व वर्धन-पोषणादि क्रिया या दृष्टीने ‘शाकीय प्ररोह’ (कोंब) म्हणतात. फूल हा आरंभापासून रूपांतर होऊन विकास पावलेला ‘जनन-प्ररोह’ असून त्यामध्ये विशेषता पावलेले असे एक किंवा अशी अनेक जननक्षम पाने किंवा बीजुकपर्णे (प्रजोत्पादक घटक धारक पाने) असतात याशिवाय पानांसारखे पण थोडा फरक झालेले अतिरिक्त अवयव म्हणजे ‘परिदले’ बहुसंख्य फुलांत असतात. या दोन्हींना ‘पुष्पदले’ म्हणतात. जननक्रियेत बीजुकपर्णे प्रत्यक्ष भाग घेतात पण परिदले (असल्यास) अप्रत्यक्षपणे त्यांना मदत करतात. त्यांच्या अभावी जननकार्य अडून राहत नाही. काही खोडे (उदा., आले, अळू, गुलाब) व पाने (उदा., पानफुटी, बिगोनिया) यांपासून नवीन उत्पत्ती होते तसेच कित्येक फुलांचा (उदा., केळ, गुलाब) नवीन लागवडीस उपयोग नसतो, हे सुपरिचित आहे तथापि अशी उदाहरणे फार थोडी असल्याने फुलाच्या शास्त्रीय व्याख्येला बाध येत नाही. पुष्पदलांच्या विविधतेमुळे फुलांचे नाना प्रकार आढळतात. फुलांचा उगम व पूर्वपीठीका समजण्यास फुलांची संरचना व विविधता समजणे जरूर असल्याने ते विवेचन प्रथम केले आहे.

वनस्पतींच्या जीवनात काही काळ शाकीय प्ररोहाचे नित्य व आवश्यक कार्य (पोषण, वर्धन इ.) चालू राहून जरूर तितकी अन्ननिर्मिती झाल्याशिवाय फुले येत नाहीत. बहुधा फुले येणे ही सतत चालणारी क्रिया नसून, ती मधून मधून कमीजास्त वेळ थांबत चालणारी (आवर्ती) घटना असते. केव्हा सर्व जीवनात एकदाच (कित्येक वर्षायू, द्विवर्षायू-जीवनक्रम पूर्ण होण्यास अनुक्रमे एक व दोन हंगाम लागणारी-व बहुवर्षायू-अनेक वर्षे जगणारी-झाडे व केळ, कळक, बांबू, कारवी इ.), तर केव्हा प्रतिवर्षी एकदा (उदा., खैरचाफा, बाहवा, निंब इ.), दोनदा (शेवगा) किंवा पूर्ण वाढ झाल्यावर वर्षभर सतत (उदा., जास्वंद, कण्हेर, गुलाब इ.) फुले येतात. हवामानाप्रमाणे फुलांच्या संख्येवर व मोसमावर भलाबुरा परिणाम होतो.

आ. १. सामान्य फुलाची संपूर्ण संरचना : (१) वृंत, (२) पुष्पस्थली, (३) संदल, (४) प्रदल, (५) केसरदल, (६) परागकोश, (७) किंजपुट, (८) किंजल, (९) किंजल्क, (१०) बीजक, (११) बीजकाधानी (७ ते ११ हे किंजमंडलाचे भाग आहेत).

सामान्य संरचना : प्रत्येक फुलात तो प्ररोह असल्याने अक्षासारखा (खोडासारखा) आधारभूत भाग असतो, त्यास ‘पुष्पाक्ष’ म्हणतात. याच्या तळभागास वृंत (देठ) व वृतांच्या टोकास असलेल्या मजबूत व पसरट भागास ‘पुष्पस्थली’ म्हणतात (आ. १), कारण यावरच फुलातील निरनिराळ्या पुष्पदलांची मंडले रचलेली असतात. काही फुलांत निरनिराळ्या मंडलांमध्ये पुष्पाक्षावरची कांडी व पेरी स्पष्ट दिसतात. (उदा., पांढरी तिळवण, कृष्णकमळ) परंतु बहुसंख्य फुलांत सर्वत्र मंडले पुष्पस्थलीवर जणू एकाच स्थानातून उगवल्यासारखी वाटतात वास्तविक त्यांचा उगवण्याचा क्रम तळापासून टोकाकडे असतो. सर्वात खालचे, म्हणजे पहिले, हिरवट दलांचे मंडल असून त्याला ‘संवर्त’ व त्याच्या सुट्या भागाना ‘संदले’ म्हणतात. फुलाच्या कळीस (कलिका) सर्वात बाहेरचे संरक्षक वेष्टन हेच असते. त्याच्या आत ‘प्रदलमंडल’ (पुष्पमुकुट) व त्याच्या दलास ‘प्रदल’ (पाकळी) म्हणतात याचा उपयोग संरक्षणापेक्षा अनेकदा आकर्षणाकरिता होतो. या मंडलाच्या आत तिसरे तंतूसारख्या दलांचे (केसरदलांचे) मंडल येते त्यास ‘केसरमंडल’ म्हणतात व हा फुलातील पुल्लिंगसूचक भाग होय. यानंतर शेवटचे मंडल किंजदलांचे असून त्यास ‘किंजमंडल’ म्हणतात आणि हे स्त्रीलिंगसूचक असते. बाहेरची दोन मंडले (संवर्त व पुष्पमुकुट) अतिरिक्त म्हणून गौण व आतील दोन (केसरमंडल व किंजमंडल) लिंगविशिष्ट व प्रजोत्पादक म्हणून आवश्यक असे मानतात. कलिका वाढत असताना संदलापासून किंजदलापर्यंत क्रमाने अक्षावर टोकाकडे वाढ होत जाते व हाच प्रकार शाकीय प्ररोहाच्या कळीमध्ये (कोरकात) दिसतो म्हणून याला ‘अग्रवर्धी क्रम’ म्हणतात. अनेक वनस्पतींच्या फुलाच्या संरचनेत या सामान्य संरचनेहून काही फरक आढळतात त्या सर्व तपशिलाचा वनस्पतींच्या परस्परांतील नात्याची सम्यक्‌ कल्पना येण्यास व त्यांच्या वर्गीकरणात [⟶ वनस्पतींचे वर्गीकरण] फार उपयोग होतो. कमळाच्या फुलात संदलापासून केसरदलापर्यंतची सर्व पुष्पदले मंडलात नसून ती सर्पिल पद्धतीने (फिरकीसारखी) मांडलेली दिसतात. पिवळ्या चाफ्याच्या फुलांत किंजदले सर्पिल असतात. सर्व पुष्पदले असल्यास फुलाला ‘पूर्ण पुष्प’ म्हणतात. 

फुले कधी झाडांवर एकेकटी (उदा., जास्वंद) तर कधी अनेक व समूहाने [⟶ पुष्पबंध] येतात प्रत्येक फुलाला कधी आखूड देठ, कधी लांब देठ तर कधी तो नसतोच (उदा., निशिगंध) देठ असल्यास सवृंत व नसल्यास अवृंत म्हणतात. 


पुष्पस्थली : देठाचा हा पसरट भाग असून त्यावर पुष्पदले आधारलेली असतात (आ. २.). पुष्पस्थली उंच सुळक्यासारखी अथवा दंडगोलाप्रमाणे (शूलाकृती अथवा दंडाकृती उदा., सीताफळ, मॅग्नोलिया,

आ. २. पुष्पस्थलीचे प्रकार : (१) शूलाकृती, (२) फुगीर, (३) भ्रमराकृती, (४) चषकाकृती, (५) केसरधर, (६) किंजधर, (७) फलधर, (८) अवंकिंज, ( ९ व १०) परिकिंज, (११) अपिकिंज.

फुगीर (उदा., बटरकप, रासबेरी), मोठी, पसरट व भोवऱ्यासारखी (भ्रमराकृती उदा., कमळ) अथवा खोलगट पेल्यासारखी (चषकाकृती उदा., गुलाब) असते. कधी ती पाकळ्यांच्या वर वाढून केसरदलास (उदा., पांढरी तिळवण) व पुढे आणखी वाढून किंजदलास आधार देते यास अनुक्रमे ‘केसरधर’ व ‘किंजधर’ अशी नावे आहेत. पुष्पस्थली पुढे अधिक वाढून फळांच्या भागांना आधारभूत होते (उदा., बडीशेप, जिरेनियम, गाजर) त्यास ‘फलधर’ म्हणतात. तिचे व पुष्पदलांचे संबंध मुख्यतः तीन प्रकारचे असतात. फुगीर अथवा लांबट पुष्पस्थलीच्या टोकास किंजमंडल व इतर मंडले क्रमाने खालच्या पातळीवर असतात तेव्हा या प्रकारास ‘अवकिंज’ म्हणतात (उदा., मोहरी, वांगे) परंतु सपाट व खोलगट पुष्पस्थलीवर सर्व पुष्पदले सारख्या पातळीवर येतात तेव्हा व पुष्पस्थली पेल्यासारखी असून किंजमंडल तळात व इतर दले पेल्याच्या काठावर उगवतात तेव्हा ‘परिकिंज’ म्हणतात (उदा., गुलाब) पुष्पस्थली किंजमंडलास पूर्णपणे वेढून त्यास चिकटून राहते तेव्हा त्यास ‘अपिकिंज’ (उदा., डाळिंब) म्हणतात येथे किंजमंडलाला संरक्षण मिळाल्याने हा प्रकार सर्वांत प्रगत समजला जातो. 

छद : अक्षावर फुलोरा [⟶ पुष्पबंध] किंवा फुले ज्या लहान पानासारख्या अवयवांच्या कक्षेतून उगवतात त्यास ‘छद’ म्हणतात (आ. ३). फुलोऱ्यावरच्या प्रत्येक फुलास हा अवयव असल्यास त्यास ‘छदक’ म्हणतात. छद असल्यामुळे फुले ‘सच्छद’ (उदा., अडुळसा) व ती नसल्यास ‘छदहीन’ म्हणतात. जास्वंदाच्या फुलास अनेक छदांचे एक मंडल संवर्ताखाली असते त्यास ‘अपिसंवर्त’ व सूर्यफूल, गाजर किंवा कोथिंबीर यांसारख्यांच्या फुलोऱ्याखालच्या अनेक छदांच्या मंडलास ‘छदमंडल’ म्हणतात. छदे संरक्षण व आकर्षण या दोन्हीकरिता बनलेली असतात. ती जास्वंद, गुलबुश व अडुळसा यात ‘पर्णसम’ असतात गवतांच्या फुलात (उदा., भात) शुष्क व पातळ किंवा जाड छदे (तुष) असतात. पानचेटी व बुगनविलिया यांची फुले ‘प्रदलसम’ (पाकळ्यासारख्या) आकर्षक व रंगीत छदांमुळेच शोभिवंत दिसतात. अळू, सुरण, नारळ यांच्या सर्व फुलोऱ्यास संरक्षण देण्यासाठी मोठी छदे (महाछदे) असतात. केवड्याची पुं-फुलोऱ्यावरची छदे वासामुळे आकर्षक वाटतात. ओकच्या फळाभोवती छदांचे पेल्यासारखे (चषिका) आवरण बनते. फुलाचे प्ररोह स्वरूप पुढील माहितीवरून अधिकांशाने पटण्यास हरकत नाही. फुलांच्या कळ्यांचे स्थान अक्षाच्या टोकास किंवा पानांच्या कक्षेत (बगलेत) शाकीय कळ्यांप्रमाणे असते. फुलाच्या अक्षावरील पेरी, कांडी व त्यावर येणाऱ्या पुष्पदलांची मांडणी एकांतरित म्हणजे एकाआड एक ( सर्पिल उदा., कमळ, पिवळा चाफा इ.) किंवा मंडलित (उदा., पांढरी तिळवण) ही खोडावरच्या पानाच्या मांडणीप्रमाणे असते दोन्हींतही वाढीचा क्रम अग्रवर्धी असतो. अनेक फुलांतील संदले व प्रदले आकारमानाने पानासारखी दिसतात. तसेच काही फुलांत केसरदले व किंजदलेही असेच साम्य थोड्याफार प्रमाणात दर्शवितात (उदा., कमळ, कर्दळ इ.) व परिदलांतून केसरदलाकडे संक्रमण आढळते. ⇨सायकसाची किंजदले पानांशी बरेच साम्य दर्शवितात. कधी एक फूल पूर्णपणे उमलल्यावर त्यातून पुष्पाक्ष पुन्हा वाढून येतो व त्यावर पाने अथवा फुले येतात. शाकीय व प्रजोत्पादक प्ररोह यांच्या साम्यावरून दोन्ही आद्य समान पूर्वजापासून स्वतंत्रपणे विकास पावले आहेत, असे मानतात. 

परिदले : या अतिरिक्त अवयवांचे संवर्त व पुष्पमुकुट (प्रदलमंडल) असे भिन्नत्व काही फुलांत आढळते व अशा फुलास ‘द्व्यावृत’ (उदा., संकेश्वर), जेथे एकच मंडल असते किंवा दोन्ही अभिन्न असतात तेथे ‘एकावृत’ (उदा., गुलबुश) व ज्यात दोन्हींचा अभाव असतो त्यास ‘अनावृत’ किंवा ‘अपरिदल’ म्हणतात (उदा.,  गवत, खडशेरणी). हे शेवटचे दोन्ही प्रकार प्रारंभिक किंवा ऱ्हाय पावलेल्या फुलांतील आहेत. परिदले सुटी असल्यास मुक्तपरिदल व अंशतः किंवा पूर्णतः जुळलेली असल्यास युक्तपरिदल म्हणतात. कोणत्याही एका मंडलातील दले परस्परांशी जुळलेली असणे यास ‘संसंग’ व एकातील दले दुसऱ्यातील दलाशी जुळलेली असणे यास ‘आसंग’ म्हणतात. 

संवर्त : (संदलमंडल आ. ४). याचे कार्य मुख्यतः संरक्षणाचे असून शिवाय हा भाग बहुधा हिरवा असल्याने त्यात अन्ननिर्मिती होते कधी रंगीत असताना (प्रदलसम) आकर्षक होतो (उदा., संकेश्वर, लाल अशोक) याचे केसाळ झुबक्यात (पिच्छसंदल) रूपांतर होते (उदा., एकदांडी, सहदेवी) त्या वेळी फळाचे वाऱ्याकडून विकिरण (प्रसार) होते. संदलावरची शुंडिका (लहान नळीसारखा अवयव) मधुर-संचय करते (उदा., गार्डन नॅस्टर्शियम, ट्रोपिओलम, तेरडा). सर्व संदले अंशतः किंवा पूर्णतः जुळलेली असल्यास ‘युक्तसंदल’ व सुटी असल्यास ‘मुक्तसंदल’ म्हणतात. भुतकेस नावाच्या वनस्पतीत एकच संदल मोठे, पाकळीसारखे (प्रदलसम) व फिकट पिवळे असल्याने आकर्षण वाढविते. सवर्ताचे काही आकार पुष्पमुकुटासारखे असल्याने त्यांचा उल्लेख पुढे त्याच्या वर्णनात केला आहे. 

आ. ३. छदे व त्यांचे प्रकार : (१) पर्णसम, (२) तुष, (३) प्रदलसम, (४) महाछद, (५) चषिका, (६) अपिसंवर्त, (७) छदमंडल.

संवर्ताचे अस्तित्व सर्वच फुलांत इतर अवयवांइतके नसते. उदा., अफूच्या फुलातील संवर्त कळी उमलल्यानंतर लागलीच पडून जातो म्हणून त्याला ‘शीघ्रपाती’ म्हणतात डाळिंब, तुळस व सब्जा यांचे संवर्त पाकळ्या पडून गेल्यावर फळावर काही काळ राहून त्याला संरक्षण देतात म्हणून त्यांना ‘दीर्घस्थायी’, करंबळ व वांगे यांचा संवर्त फळाबरोबर वाढत राहतो म्हणून त्याला ‘सहवर्धिष्णू’ म्हणतात. पुष्पमुकुटाबरोबर संवर्त पडून जात असल्यास त्याला ‘पतिष्णू’ म्हणतात (उदा., कमळ). 

प्रदलमंडल : (पुष्पमुकुट). प्रदले बहुधा रंगीत व सुवासिक असल्याने प्राण्यांचे लक्ष वेधून घेतात याचा ⇨परागणात फार उपयोग होतो. संकेश्वर व गुलाब यांच्या पाकळ्या सुट्या असल्याने त्यांच्या पुष्पमुकुटास मुक्तप्रदल आणि जाई, जुई

आ. ४. संवर्ताचे प्रकार : (१) पिच्छसंदल, (२) शुंडिकावंत, (३) प्रदलसम.

इत्यादींच्या जुळलेल्या असल्याने त्यांच्या पुष्पमुकुटास युक्तप्रदल म्हणतात. रंगाप्रमाणे पुष्पमुकुटाच्या आकारातही विविधता आढळते व त्यामुळे शोभाही वाढते आकाराचा फुलांच्या भेटीस येणाऱ्या प्राण्यांच्या संरचनेच्या दृष्टीने परस्परसंबंध असतो. 

मुक्तप्रदल पुष्पमुकुटाचे आकार (आ. ५) सामान्यतः चार प्रकारचे असतात : (१) क्रुसाकार : (उदा., मोहरी) चार पाकळ्यांपैकी प्रत्येकीस खाली बारीक उभा देठ व वर सपाट पात्यासारखा भाग असून पाकळ्यांची एक जोडी दुसरीशी काटकोनात राहते. (२) लवंगरूपी : (उदा., डायांथस, पिंक) पाच पाकळ्यांची वरीलप्रमाणे मांडणी असते. (३) गुलाबकृती : (उदा., गुलाब, चहा) प्रदलांचा देठ फार लहान व पाते पसरट, गोलसर व अशा पाकळ्यांचे एक मंडल किंवा अनेक एकांतरित मंडले असतात. (४) पतंगरूप : (उदा., अगस्ता, वाटाणा) सर्व फूल फुलपाखरासारखे दिसते पाच पाकळ्यांपैकी एक मोठी व सर्वांत बाहेरची असून पसरट असते बाजूच्या दोन लहान पंखाप्रमाणे व मध्ये दोन वाकड्या आणि परस्परांस थोड्या चिकटलेल्या असतात. 


युक्तप्रदलमंडलाचे (पुष्पमुकुटाचे) नऊ प्रकार (आ. ६) सामान्य आहेत : (१) घंटाकृती : (उदा., आफ्रिकन ट्यूलिप वृक्ष, जहरी सोनटक्का) तळाजवळ फुगीर व पुढे थोडा पसरट, असा घंटेसारखा (२) अपछत्राकृती : (उदा., सदाफुली, जाई, जुई), समईप्रमाणे खाली लांब नळी व वर पाकळ्यांची सपाट व नळीस काटकोन करणारी पाती (३) नलिकाकृती : (उदा., सूर्यफुलातील बिंबपुष्पके) नळीसारखा व शेंड्याकडे किंचित पसरट (४) नलिकाकृती : (उदा., धोतरा, गारवेल) तळापासून टोकाकडे नरसाळ्याप्रमाणे पसरत गेलेला (५) चक्राकृती : (उदा., रूई, वांगे) नळीचा भाग फार लहान व पसरट भाग मोठा वरून चक्रासारखा दिसणारा (६) कुंभाकृती : (उदा., हॅक्सिनियम) तळातून फुगीर, मध्ये   

आ. ५. मुक्तप्रदल पुष्पमुकुटाचे प्रकार : (१) क्रुसाकार, (२) लवंगरूपी, (३) गुलाबाकृती, (४) पतंगरूप.

आ. ६. युक्तप्रदल पुष्पमुकुटाचे प्रकार : (१) घंटाकृती, (२) अपछत्राकृती, (३) नलिकाकृती, (४) नालिकाकृती, (५) चक्राकृती, (६) कुंभाकृती, (७) जिव्हिकाकृती, (८) द्व्योष्ठक जृंभोष्ठी, (९) द्व्योष्ठक बद्वोष्ठी, (१०) हस्तपाकृती,

  जास्त पसरट व टोकाकडे बराच लहान अशा

गडूप्रमाणे (७) जिव्हिकाकृती  : (उदा., सूर्यफुलातील किरणपुष्पके) तळास थोडा भाग नळीसारखा, परंतु वर पसरट सपाट पट्टीप्रमाणे (८) द्व्योष्ठक : (उदा., तुळस) खाली जुळलेला पण वर दोन ओठाप्रमाणे यात दोन ओठांत भरपूर जागा असल्यास जृंभोष्ठी (उदा., तुळस) परंतु खालच्या ओठावरच्या उंचवट्यामुळे तोंड फार लहान झाल्यास बद्धौष्ठी (उदा., स्‍नॅपड्रॅगॉन) (९) हस्तपाकृती : तिळाच्या किंवा विंचवीच्या फुलाचा एकंदर आकार साधारण घंटेसारखा पण टोकास त्रिकोणी असतो. त्याचा हातमोजासारखा (हस्तपाकृती) असे वर्णन करता येते. काही संवर्तांना याच संज्ञा वापरता येतात (उदा., नलिकाकृती-जास्वंद नालिकाकृती-पारिजातक). प्रदले कधी टोकाकडे गोलसर पण फणीप्रमाणे विभागलेली (आ.७) असल्यास कंकतिक म्हणतात (उदा., पिंक) तळाशी प्रदलापासून लहान शुंडिका निघाल्यास शुंडिकावंत (उदा., हरिणखुरी, व्हायोला) व तळाशी लहान फुगवटा असल्यास कोशवंत (उदा., स्‍नॅपड्रॅगॉन) म्हणतात. काही फुलांत पाकळ्यांवर आतील बाजूस खवले (उदा., अमरवेल), जाड केस (उदा., लाल कण्हेर, कृष्णकमळ) किंवा लहान पाकळ्यांसारख्या उपांगांचा पेला (उदा., नार्सिसस पॅँक्रॅशियम इ.) आढळतो, त्यास ‘तोरण’ म्हणतात. सर्वच पाकळ्यासारख्या असल्यास पुष्पमुकुटाला नियमित व नसल्यास अनियमित म्हणतात.  

 फूल उमलण्यापूर्वी कलिकावस्थेत परिदले फार थोड्या जागेत सामावली जातात कारण ती स्वतःभोवती अनेक रीत्या दुमडलेली तर असतातच [⟶ पर्णवलन] शिवाय ती परस्परांशीही विविध तऱ्हांनी भिडलेली असतात [⟶ पुष्पदलसंबंध]. या एकंदर प्रकारास ‘कलिकारचना’ म्हणतात. शाकीय कळ्यांच्या बाबतीत असाच प्रकार आढळतो तेथे पर्णवलन व पर्णसंबंध अशा संज्ञा वापरतात भिन्न कुले, वंश व जाती यांतील वनस्पतींत त्या त्या गटात कधी एकाच प्रकारची कलिकारचना आढळते व याचा वनस्पतींच्या वर्गीकरणात उपयोग होतो.

 केसरदले व किंजदले : फुलातील जननप्रक्रियेत प्रत्यक्ष भाग घेणारे आवश्यक असे हे दोन्ही अवयव (बीजुकपर्णे) एकाच फुलात (उदा., सदाफुली) अनेकदा आढळतात, त्यांना द्विलिंगी (उभयलिंगी) फुले किंवा ‘सिद्धपुष्पे’ म्हणतात परंतु काही फुलांत त्यांपैकी फक्त केसरदले किंवा किंजदले असतात त्यांना एकलिंगी फुले म्हणतात ‘केसर-पुष्प’ अथवा पुं-पुष्प व ‘किंज-पुष्प’ किंवा स्त्री-पुष्प या संज्ञा त्या दृष्टीने वापरतात पपईची केसर-पुष्पे एका झाडावर व किंज-पुष्पे दुसऱ्या झाडावर पण एरंडाच्या झाडावर दोन्ही प्रकारची असतात साहजिकच पपईच्या बाबतीत नर व मादी अशी दोन झाडे असतात, त्यांना ‘विभक्तलिंगी’ व एरंडास ‘एकत्रलिंगी’ म्हणतात. आंबा, काजू, रिठा यांमध्ये एकाच झाडावर एकलिंगी व द्विलिंगी फुले असतात त्यांना ‘बहुयुतिक’ म्हणतात. एकलिंगी फुलात कधी दुसरे अवयव वंध्यरूपात (वंध्यकेसर, वंध्यकिंज) आढळतात.  

प्रकटबीज वनस्पती [⟶ वनस्पति, प्रकटबीज उपविभाग], ⇨ सिलाजिनेला, लायकोपोडियम [⟶ लायकोपोडिएलीझ] व ⇨नेचे या वनस्पतींत आढळणारी बीजुकपर्णे ही केसरदले व किंजदले यांच्याशी समरचित आहेत. त्यांमध्ये प्रजोत्पादन एककोशिक (एकाच पेशीच्या बनलेल्या) बीजुकांच्या साहाय्याने होते. बीजुके परागकणांप्रमाणेच बीजुककोशात तयार होतात व हे बीजुककोश बहुधा स्वतंत्र व थोड्याफार प्रमाणात रूपांतर पावलेल्या पानांवर येतात व त्यांना बीजुकपर्णे म्हणतात. सापेक्षतः लहान 

आ. ७. प्रदल-प्रकार व उपांगे : (१) कंकतिक, (२) शुंडिकावंत, (३) खवल्यांचे तोरण, (४) केसांचे तोरण , (५) पाकळ्यांसारखे (पेला) तोरण.

बीजुके असलेल्या बीजुककोशास लघुबीजुककोश व मोठी बीजुके असलेल्यास गुरूबीजुककोश म्हणतात. त्यांना आधार देणाऱ्या पानांना अनुक्रमे लघुबीजुकपर्णे व गुरूबीजुकपर्णे म्हणतात. आवृतबीज वनस्पतींची [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] केसरदले व किंजदले तत्वतः हीच आहेत. प्रकटबीज व आवृतबीज वनस्पतींच्या बीजुकपर्णांत बरेच साम्य असले, तरी काही फरकही निश्चित आहेत. आवृतबीज व प्रकटबीज वनस्पतींची गुरूबीजुके बीजुककोशातून बाहेर कधीच येत नाहीत परंतु आवृतबीज वनस्पतीत गुरूबीजुककोश (बीजक) बीजुकपर्णाने वेष्टिलेला असतो व प्रकटबीज वनस्पतीत तो उघडाच असतो. त्यामुळे परागणानंतर प्रकटबीज वनस्पतींच्या गुरूबीजुककोशात परागनलिका प्रवेश करते आवृतबीज वनस्पतीत परागनलिका किंजल्क व किंजलातून मार्ग काढून किंजपुटातील बीजकात जाते. किंजपुटापासून जसे फळ मिळते तसे प्रकटबीज वनस्पतीत नसते. प्रकटबीज वनस्पतींतील बीजोत्पादक इंद्रियास ‘शंकू’ म्हणतात. [⟶ प्रजोत्पादन]. 


केसरमंडल :  यात एक किंवा अनेक केसरदले असून ‘तंतू’ व ‘परागकोश’ हे त्या दलाचे मुख्य भाग होत. या दोन्हींस सांधणारा भाग ‘योजी’ कधी स्पष्टपणे दिसतो (आ. ८). तंतू बहुधा बारीक दोऱ्यासारखा व  आ.८. केसरमंडल : (१) तंतू, (२) योजी, (३) परागकोश, (४) परागखंड, (५) परागकोटर, (६) परागकण, (७) एकसंघ, (८) द्विसंघ, (९) बहुसंघ, (१०) युक्तपरागकोश, (११) संकेसरमंडल, (१२) तलस्थ, (१३) व (१४) पृष्ठबद्ध, (१५) विलोल, (१६) द्वयोन्नत, (१७)चतुरोन्नत, (१८) परागपुंज.

 पुष्पस्थलीपासून निघालेला असतो. कधी तो पोकळीस अंशतः चिकटलेला असतो, त्यास अपिप्रदललग्न (उदा., धोतरा) म्हणतात. काही फुलांत उदा., आमरे [⟶ ऑर्किडेसी] केसरदले व किंजदले यांच्या संयोगाने बनलेला ‘किंजकेसराक्ष’ असा स्तंभ असतो सर्व केसरदले फक्त तंतूंनी जुळून एक गट झाल्यास (उदा.,जास्वंद) एकसंघ, दोन गट झाल्यास (उदा., कौरची, फांसी, अगस्ता) द्विसंघ, तीन अथवा अधिक झाल्यास बहुसंघ (उदा., एरंड, नारिंग) म्हणतात. परागकोश जुळलेले असल्यास (उदा., सूर्यफूल) युक्तपरागकोश आणि तंतू व परागकोश सर्वच जुळून असल्यास ‘संकेसरमंडल’ (उदा., भोपळा, कोहळा इ.) म्हणतात. तंतूवर कार्यक्षम परागकोश नसल्यास वंध्यकेसर व तंतू नसलेल्या परागकोशास अवृंत, म्हणतात. केसरदले चार असून दोन मोठी असल्यास ‘द्व्योन्नत’ (उदा., घाणेरी) व सहापैकी चार मोठी असल्यास ‘चतुरोन्नत’ (उदा., मोहरी) म्हणतात. कर्दळीच्या फुलात तंतू पाकळीसारखा (प्रदलसम) सपाट व रंगीत असतो व काही वंध्यकेसरही तसेच असतात. परागकोश तंतूस योजीद्वारे मुख्यतः तीन प्रकारांनी चिकटलेले असतात: ( १) तलस्थ : परागकोश तंतूच्या टोकावर (उदा., मोहरी) (२) पृष्ठबद्ध: परागकोशाच्या पाठीशी संपूर्ण तंतूचा भाग असतो (उदा.,पिवळा चाफा व कमळ) किंवा पाठीशी एखाद्या बिंदूवर चिकटलेला असतो (उदा., कृष्णकमळ) (३) विलोल : तंतूवर परागकोश कसाही सहज हालेल असा पाठीशी एका बिंदूवर चिकटलेला असतो (उदा., गवते, कुमूर). तंतूपेक्षा परागकोश हा भाग अधिक महत्त्वाचा असतो त्याचे बंद पिशवीसारखे दोन भाग (खंड) असून त्यांत असंख्य सूक्ष्मकण असतात व त्यांना ⇨ पराग  म्हणतात. योजीतून त्यांना अन्नपुरवठा होतो (आ. ८). प्रत्येक खंडात बहुधा दोन कप्पे (परागकोटर) असतात व यांतच परागकणांची बहुधा पिवळी भुकटी तयार होते. परागकोश पक्व झाल्यावर आपोआप तडकतात (स्फुटन). त्या वेळी प्रत्येक खंडातील दोन कप्पे फुटून खंडाच्या पृष्ठभागावर एक उभी (उदा., धोतरा) अथवा आडवी चीर (उदा., तुळस) पडून किंवा खंडाच्या टोकास भोक पडून (उदा., वांगे) किंवा परागकोश खिडकीच्या झडपेप्रमाणे उघडून (उदा., तमाल) त्यातून परागकण बाहेर पडतात. स्फुटन बाहेरच्या बाजूस झाल्यास बहिर्मुख (उदा., कळलावी) व फुलाच्या मध्याकडे झाल्यास अंतर्मुख (उदा., सूर्यफूल) म्हणतात. केसरदले संकेश्वरातल्याप्रमाणे फुलाबाहेर आलेली असल्यास बहिरागत व धोतऱ्याच्या फुलाप्रमाणे आतच राहिल्यास अंतःस्थित म्हणतात. परागकणांत कमालीची विविधता आढळते परागांचा अभ्यास स्वतंत्र शाखेत (परागविज्ञानात) केला जातो [⟶ पराग]. अनेक परागकण चिकटून एक पूर्ण परागपुंज (उदा., रूई, ऑर्किड) बनलेला आढळतो.  

आ. ९. किंजमंडल (आ) युक्तकिंज : (१) किंजपुट, (२) किंजल, (३) किंजल्क.

किंजमंडल : फुलात मध्यभागी असलेले व खालून वर अशा वर्धनक्रमात शेवटचे असलेले हे मंडल एक किंवा अनेक किंजदलांचे बनलेले असते. ही अनेक किंजदले सुटी असल्यास मुक्तकिंज (उदा., सोनचाफा) व पूर्णपणे जुळलेली असल्यास ‘युक्तकिंज’ (उदा., भोपळा) म्हणतात. किंजमंडलाचे किंजपुट, किंजल व किंजल्क असे तीन भाग असतात (आ. ९). त्यांपैकी कधी फक्त किंजपुट, तर कधी फक्त किंजले किंवा किंजल्क जुळलेली आढळतात. किंजपुटात बनलेली बीजके (गुरूबीजुककोश) मुख्यतः चार प्रकारांनी चिकटलेली असतात, त्यास ‘बीजक-विन्यास’ व जेथे चिकटलेली असतात त्यास ‘बीजकाधानी’ म्हणतात (आ. १०). बीजकांस संरक्षण, आधार व अन्न देणे हे किंजपुटाचे कार्य असते. किंजपुटातील एका किंवा अनेक कप्प्यांत (पुटकांत) बीजके असतात. वाटाण्याच्या एक किंजदलाच्या (एककिंजक) किंजपुटात बीजके एका उभ्या रांगेतील बीजकाधानीवर असतात. ज्यापासून किंजपुट बनतो त्या किंजदलाच्या दोन्ही कडा विकासावस्थेत परस्परांस चिकटून तेथेच शिवण (औदर सेवनी) बनलेली असते त्याच्या उलट बाजूस किंजदलाची मध्यशीर असून तिला पृष्ठसेवनी म्हणतात. या मांडणीस ‘धारास्थित’ म्हणतात. मोहरीच्या दोन किंजदलांच्या (द्विकिंजक) किंजपुटात व काकडीच्या तीन किंजदलांच्या (त्रिकिंजक) किंजपुटात विशिष्ट ठिकाणी त्याच्या भिंतीवर बीजके चिकटलेली (तटलग्‍न) असतात, तर सावरीच्या पाच किंजदलांच्या (पंचकिंजक) किंजपुटात ती मधल्या अक्षावर आधारल्याने (अक्षलग्‍न) प्रत्येक कप्प्यात थोडीथोडी असतात. घोळ, पिंक यांमध्ये किंजपुटाच्या पोकळीत तळातून अक्ष वाढून येतो व त्यावर बीजके वाढतात (मुक्त मध्यवर्ती). अक्षलग्‍न मांडणीमध्ये अक्षाला चिकटलेले पडदे नाहीसे झाले म्हणजेही मध्यवर्ती प्रकार बनतो. हा मधला अक्षच नाहीसा झाला म्हणजे फक्त तळातून उगवणारे (तलोद्‌भव) एकच बीजक आढळते (उदा.,सूर्यफूल) अथवा अनेक बीजके असतात. कधी बीजके किंजपुटाच्या भिंतीवर सर्वत्र चिकटलेली (पृष्ठलग्‍न) आढळतात (उदा., अफू, कमळ). या सर्व प्रकारांत अक्षलग्‍नाखेरीज इतर सर्वांत किंजपुटात एकच कप्पा असतो. धारास्थित, तटलग्‍न या प्रकारांत बीजकाधानींच्या  संख्येवरून व अक्षलग्‍न प्रकारात कप्प्याची संख्या पाहून किंजदलांची संख्या ठरविता येते. कप्प्यांच्या संख्येवरून किंजपुटाला एकपुटक, द्विपुटक, त्रिपुटक इ. म्हणतात. एकच बीजक केव्हा लोंबते (दोलित) तर केव्हा बाजूस चिकटलेले पण जणू वर चढणारे (आरोही) अथवा बाजूंकडून आडवे वाढणारे असते एकाच पातळीत जवळजवळ वाढणारी (संलग्‍न) किंवा एकावर दुसरे अशी भिन्न पातळ्यांत चिकटलेली (उपरिस्थित) बीजकेही असतात. बीजकाच्या अभावी किंजमंडलास ‘ वंध्य किंज’ म्हणतात. किंजपुट मागे वर्णिल्याप्रमाणे अवकिंज व परिकिंज अशा अवस्थेत ऊर्ध्वस्थ व अपकिंज अवस्थेत अधःस्थ मानला जातो. किंजल हा भाग कधी लांब (उदा., मका), कधी आखूड (उदा., पपई) तर कधी जवळजवळ नसतोच (उदा., अफू, कमळ). बहुधा किंजल लांब नलिकेसारखा असतो व तो किंजपुटाच्या बरोबर टोकावरून निघतो (अग्रस्थ) पण कधी त्याच्या बाजूने (पार्श्विक) निघून वर वाढतो (उदा., स्ट्रॉबेरी) अथवा (उदा., सीताफळ) तो तळातून निघतो किंवा पुष्पस्थलीत रूतलेल्या किंजपुटाखालून आल्यासारखा दिसतो (किंजतलोद्‌गामी उदा., तुळस). बहुतेक गवतांची किंजले द्विशाखी तर कित्येक इतर वनस्पतींची अनेक शाखायुक्त असतात. किंजलाचे कार्य किंजल्कास आधार देऊन परागग्रहणास मदत करण्याचे असते. किंजपुट, किंजल व किंजल्क यांचे एकाच किंजमंडलात जुळून किंवा अलग असणे यात विविधता असते. त्यांच्या संख्येवरून किंजदलांची संख्या अजमावता येते. कर्दळीच्या फुलातील किंजल पाकळीसारखा असतो. किंजल्क हे प्रत्यक्ष परागग्रहणाकरिता असते. त्याचा पृष्ठभाग बहुधा खरबरीत, केसाळ अथवा चिकट असतो त्याला शाखा असल्यास त्यांच्या संख्येवरून द्विभिन्न, त्रिभिन्न वगैरे व नसल्यास त्या एकाच संयुक्त 

आ. १० . बीजक-विन्यास: (अ) धारास्थित : (१) बीजकाधानी, (२) बीजक, (३) औदर सेवनी, (४) पृष्ठसेवनी (आ) तटलग्‍न : (१) पृष्ठसेवनी (इ) अक्षलग्‍न (ई) मुक्त मध्यवर्ती (उ) तलोद्‌भव (ऊ)पृष्ठलग्‍न : [(अ), (आ), व (ई) यांमध्ये उजव्या बाजूस काटच्छेद दर्शविला आहे].

 गोलाकार समूहास सशीर्ष म्हणतात. जास्वंदाच्या फुलांतल्या किंजलाच्या टोकास पाच शाखा असून त्या प्रत्येकीच्या टोकास चकतीसारखा किंजल्क असतो अफूच्या व कमळाच्या किंजल्काला अनेक शाखा असतात लाल कण्हेरीचा किंजल्क डंबेलसारखा (डमरूसारखा) असतो. वनस्पतींच्या वर्गीकरणात वर दिलेला तपशीलांचा बराच उपयोग केलेला आढळतो, कारण कित्येक लक्षणे एका वंशात, जातीत वा कुलात सुसंगतपणे आढळतात.  


आ.११. बीजक व त्याचे प्रकार : (अ) बीजक : (१) बीजकतल, (२) प्रदेह, (३) तलस्थ कोशिका, (४) गर्भकोश, (५) मीलन –प्रकल, (६) अंदुक परिवार, (७) अंदुक, (८) साहाय्यक कोशिका, (९) नाभी, (१०) बीजकाधानी, (११) बीजबंध, (१२) बीजकरंध्र (आ) अधोमुख (इ) ऊर्ध्वमुख (ई) तिर्यङ्‌मुख (उ) वक्रमुख. बीजक : बीजे नसलेल्या पण वाहिनीवंत (पाणी अथवा अन्नरस यांची ने-आण करणारे शरीर घटक असणाऱ्या) वनस्पतींशी तुलना केल्यास गुरूबीजुककोशाची ही अधिक प्रगतावस्था म्हणता येईल. बीजी वनस्पतीत यातील गुरूबीजुक सदैव आतच राहते व प्रत्यक्ष फलनक्रिया त्यातच घडून येते. याची संरचना आवृतबीज वनस्पतींत (फुलझाडांत) ,सामान्यतः सारखीच असते. प्रकटबीज वनस्पतींतील बीजकात व यात तपशिलाबाबत फरक असतात. प्रत्येक बीजकास बहुधा आखूड देठ (बीजबंध) आणि बाहेरचे व आतले अशी दोन आवरणे असतात (आ.११). बीजबंधाच्या टोकास (जेथून दोन आवरणे निघतात त्या स्थानास) ‘बीजकतल’ व बीजकाच्या दुसऱ्या टोकास असलेल्या लहान छिद्रास ‘बीजकरंध्र’ म्हणतात. आवरणाच्या आतील मुख्य गाभ्यास ‘प्रदेह’ व त्यातील लंबगोल गुठळीस ‘गर्भकोश’ म्हणतात हेच गुरूबीजुक होय. यात रंध्राकडील बाजूस तीन व तलाकडे तीन सूक्ष्म कोशिका असतात मधे एक सुटा बिंदू (प्रकल) प्राकलनाने [⟶ कोशिका] वेढलेला असतो. वरच्या तिन्हींपैकी (अंदुक-परिवार) मधली एक जननक्षम कोशिका (स्त्री-गंतुक, अंदुक) व बाजूच्या दोन ‘साहाय्यक कोशिका’ असतात खालच्या बाजूच्या तीन कोशिकांना ‘तलस्थ कोशिका’ म्हणतात. सुटा दिसणारा एकच प्रकल तत्त्वतः दोन (एकगुणित) प्रकलांच्या संयोगाने बनलेला असल्याने त्यास ‘दुय्यम प्रकल’ किंवा ‘मीलन-प्रकल’ म्हणतात बीजबंध व बीजकतल यांमध्ये दोन्हींच्या संधिस्थानास ‘नाभी’ आणि बीजबंध व किंजपुटाच्या संधिस्थानास ‘बीजकाधानी’ म्हणतात अनेकदा बीजबंधाच्या अभावी बीजकतल, नाभी व बीजकाधानी निकटवर्ती असतात. बीजकातील सर्व भाग जननकार्याच्या दृष्टीने कार्यक्षम असतात[⟶ प्रजोत्पादन]. बीजकतल, बीजबंध, नाभी व बीजकरंध्र यांच्या वर दिलेल्या स्थानांत परस्परसापेक्ष जे फरक आढळतात त्यावरून बीजकांचे ऊर्ध्वमुख (उदा., मिरी), अधोमुख (उदा., सूर्यफूल), वक्रमुख (उदा., गुलबुश) व  तिर्यङ्‌मुख [उदा., लेम्‍ना ⟶ डकवीड] असे चार प्रकार ओळखले जातात. (आ. ११).  

दलसंख्या : फुलातील प्रत्येक मंडलातील दलसंख्या बहुधा सारखी असते किंवा एका मंडलातील दलसंख्या दुसऱ्यातील दलसंख्येच्या काही पट असते, यास (फुलास) समभागी व तशी नसल्यास असमभागी म्हणतात. अनेकदा केसरदले व किंजदले यांची संख्या परिदलांपेक्षा अधिक (उदा., सीताफळ, पिवळा चाफा) असते. दलसंख्या दोन अथवा दोनाच्या पटीने असल्यास द्विभागी (उदा., मोहरी क्रुसीफेरी कुल), तीन किंवा तीनाच्या पटीने असल्यास त्रिभागी (उदा., एकदलिकित वनस्पती) व चार किंवा पाच (किंवा त्याची पट) अशी संख्या असल्यास चतुर्भागी किंवा पंचभागी (उदा., द्विदलिकित वनस्पती) अशा संज्ञा वापरतात.  

आ. १२. क्रुसीफेरी कुलातील फुलांची संरचना : (अ) पुष्पचित्र : (१) अग्रीय किंवा पुरश्च, (२) पश्च, (३) मध्यक, (४) पार्श्विक, (५) कर्ण, (६) संदले, (७) प्रदले, (८) केसरदले, (९) किंजदले, (१०) बीजके (आ) पुष्पसूत्र (इ) मराठी पुष्पसूत्र. पुष्पसमात्रता : फुलांचे सर्वसाधारण स्वरूप त्यांतील पुष्पदलांचे परस्परांशी असलेले साम्य, प्रमाणबद्धता, संख्या इ. बाबींवर अवलंबून असते व त्यांचा विचार समात्रता (समप्रमाणता) ठरविण्याकरिता आवश्यक असतो. फुलाच्या केंद्रातून जाणाऱ्या एका अथवा अनेक उभ्या पातळ्यांनी फुलाचे दोन अथवा अधिक सारखे अर्ध (भाग) होतात तेव्हा ते फूल ‘समात्र’ व न झाल्यास ‘असमात्र’ (उदा., निवडुंग) म्हणतात. या पातळ्या फुलाची बाजू व तिचा खोडाशी (अक्षाशी) असणारा संबंध यांवर अवलंबून असतात. फुलाच्या छदाकडील बाजूस अग्रीय किंवा पुरश्च, खोडाकडील बाजूस पश्च या दोन्हींच्या मध्यातून व पुष्पाक्षातून जाणाऱ्या उभ्या पातळीस अग्रपश्च (मध्यक) म्हणतात (आ. १२). याला काटकोनात छेदणाऱ्या पातळीस कर्ण वा यांखेरीज इतर कोणत्याही पातळीस तिर्यक् म्हणतात. कोणतेही इंद्रिय दोनापेक्षा अधिक पातळ्यांनी छेद्य असल्यास व दरवेळी सारखे भाग (समार्ध) होतात, तेव्हा ते अरसमात्र (उदा., गुलाबाचे फूल, बहुधा सर्व खोडे व मुळे) दोन (अग्रपश्च व पार्श्विक) पातळ्यांनी अथवा एकाच पातळीने दोन समार्ध होतात तेव्हा ते द्विपार्श्व समात्र व फक्त एकच मध्यक पातळीने दोन समार्ध होतात तेव्हा एकसमात्र (उदा., धोतरा, वाटाणा यांची फुले) एकसमात्र प्रकारात पुरश्च व पश्च अर्ध असमान असल्यास पृष्ठामुखीन (उदा., तेरड्याचे फूल) प्रसर्पी (भूमिस्थित परंतु दोऱ्यासारखी बारीक) खोडे व सामान्य पाने यांची हीच समात्रता असते.  

पुष्पचित्र व पुष्पसूत्र :  भिन्न कुले, वंश व जाती यांतील फुलांची पूर्ण संरचना चित्ररूपाने व सूत्ररूपाने दर्शविण्याकरिता ह्या योजना उपयोगात आहेत. पुष्पचित्रात (आ. १२) फुलाच्या आडव्या छेदाची आकृती काढून सर्व भाग एकाच पातळीत दाखविले जातात (वास्तविक ते तसे एका पातळीत नसतात) यामध्ये खोड, छदे, पुरश्च व पश्च बाजू, पुष्पदलांचे परस्परसंबंध (संसंग, आसंग), संख्या, दलवलन, पुष्पदलसंबंध, बीजक-विन्यास इ. तपशील येतो परंतु त्यांशिवाय फुलाचा मध्यक उभा छेदही स्वतंत्र आकृतीने दाखविल्यास पुष्परचनेची पूर्ण कल्पना येते. पुष्पसूत्रात अक्षरे, खुणा, आकडे व चिन्हे यांचा उपयोग करून पुष्पचित्रातील माहितीची उणीव भरून काढण्यात येते. पदार्थांच्या रासायनिक संघटनाची माहिती जशी सूत्ररूपाने सांगतात, तशीच पुष्पसंरचनेची बरीचशी कल्पना पुष्पसूत्राने मिळते. यात पुष्पदलमंडलांच्या संज्ञांची रोमन लिपीतील इंग्रजी आद्याक्षरे वापरतात आणि तसेच पुढे दिल्याप्रमाणे काही खुणा, चिन्हे वगैरे वापरण्याची आंतरराष्ट्रीय पद्धत आहे. इंग्रजी आद्याक्षरापुढील आकडा दलसंख्या दर्शवितो.  

संज्ञा 

संक्षिप्त रूप, खुणा इ. 

संज्ञा 

संक्षिप्त रूप, खुणा इ. 

इंग्रजी 

मराठी 

संवर्त 

प्रदलमंडल 

केसरमंडल 

किंजमंडल 

ऊर्ध्वस्थ किंजपुट 

अधस्थ किंजपुट 

द्विलिंगी 

एकलिंगी (पु.) 

एकलिंगी (स्त्री) 

C

A

G

G

 

   

सं 

प्र 

के 

किं

अरसमात्र 

एकसमात्र 

आसंग 

संसंग (युक्त)

संसंग (युक्त) 

अनेक दले 

मंडलाधिक्य 

†  

( ) 

कंसरहित 

 नमुन्याकरिता आ. १२ मध्ये ⇨क्रुसीफेरी कुलातील (मोहरी कुलातील) फुलांची संरचना म्हणजे पुष्पचित्र (अ), पुष्पसूत्र (आ) आणि पुष्पसूत्राचे मराठीकरण दर्शविले आहे.  

अमेरिकन पद्धतीत संवर्ताकरिता Ca, प्रदलमंडलाकरिता Co, केसरमंडलाकरिता S आणि किंजमंडलाकरिता P ही अक्षरे वापरतात . प्रत्येक मंडलातील दलांची संख्या घातांकाप्रमाणे दर्शवितात. उदा., Ca4-5 म्हणजे संवर्त ४-५ सुट्या संदलांचा आणि Co4-5 म्हणजे प्रदलमंडल ४-५ जुळलेल्या प्रदलांचे. अधःस्थ किंजपुट Pहे अक्षर इतर मंडलांखाली छेदस्थानी व फळाचा प्रकार सर्वांच्या छेदस्थानी दर्शवितात. याप्रमाणे ⇨ कुकर्बिटेसी कुलाचे (कर्कटी कुलाचे) पुष्पसूत्र खालीलप्रमाणे मांडतात: 

Ca3-5C(3-5) S3

P(1-3) 

 Pepo (कर्कटीफल)

 इतिहास,पुरातनत्व, क्रमविकास (उत्क्रांती) वगैरे : बीजोत्पादनाच्या दृष्टीने फुलांचे महत्त्व ढोबळमानाने फार पूर्वीपासून मनुष्यास माहीत असावे. ॲसिरियन व ग्रीक लोक कृत्रिम रीत्या खजुरांच्या फुलांचे ⇨ परागण करीत असत. भूस्तरातील जीवाश्मांच्या (शिळारूप अवशेषांच्या) अभ्यासाने फुलांचे मध्यजीव महाकल्पातील जुरासिक आणि ट्रायासिक काळात (म्हणजे सु. २३-१५.५ कोटी वर्षांपूर्वी, सायकॅड युगात) असलेले अस्तित्व सिद्ध झाले आहे. हा महाकल्प संपण्यापूर्वी अनेक फुलझाडांचा [ उदा., मॅग्‍नोलिया (ओक), बर्च, यूकॅलिप्टस, वाळुंज, गवते, वडाच्या वंशातील व नारळाच्या कुलातील अनेक झाडे] उदय झाला होता. तसेच पुराजीव महाकल्पातील (सु. ६०-२४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) प्रारंभिक स्थलवासी वनस्पतींच्या जीवाश्मांवरून असा निष्कर्ष काढण्यात येतो की, पुष्पदले प्रारंभिक पानापासून क्रमविकसित झाली नसून त्यांच्याप्रमाणे समांतरित विकासाने प्रारंभिक खोडावरील द्विशाखायुक्त मांडणीतील काही मर्यादित वाढीच्या शाखांच्या रूपांतराने झाली असावी. अर्थात सायकॅडयुगाच्या पूर्वी कित्येक लाख वर्षांपासून ही विकासक्रिया चालू असली पाहिजे. फुलाचा उगम, पूर्वपीठिका व क्रमविकास समजण्यास अबीजी वनस्पतींपैकी ⇨नेचे (फर्न) व इतर वाहिनीवंत वनस्पती, तसेच प्रकटबीज व प्रारंभिक (किंवा ऱ्हसित) आवृतबीज वनस्पती यांचे जनन-प्ररोह यांचा विचार केला पाहिजे. नेचांमध्ये शाकीय प्ररोहाची पाने बहुधा जून झाल्यावर बीजुककोश धारण करतात. क्वचित पानांचे विशिष्ट भाग ( किंवा फार क्वचित काही पाने) फक्त बीजुकधारी असतात म्हणजे सुरुवातीस शाकीय प्ररोह व जनन-प्ररोह अभिन्न होते परंतु ⇨ लायकोपोडिएलीझ गणामध्ये स्वतंत्र अक्षासारख्या भागावर थोडीफार रूपांतरित बीजुकपर्णे एकत्रित होऊन शंकूसारखा स्वतंत्र व फुलाच्या प्रथम केलेल्या व्याख्येत बसणारा प्ररोह आढळतो [लायकोपोडियमएक्‍विसीटम ⟶ एक्‍विसीटेलीझ] यांच्या शंकूंना प्रारंभिक व साधे फूल म्हणण्यास हरकत नसावी. यापुढची प्रगतावस्था ⇨सिलाजिनेलेलीझमध्ये भिन्न बीजुकपर्णे (लघु व गुरू-बीजुकपर्णे) एकाच शंकूवर असलेली अशी आढळते तसेच प्रकटबीज वनस्पतीतही (उदा., सायकस, पाइन, देवदार इ.) भिन्न बीजुकधारी पर्णे असलेले स्वतंत्र शंकू असतात. फक्त ⇨ बेनेटाइटेलीझ या जीवाश्म वनस्पतीत भिन्न बीजुकपर्णे एकत्र असलेली प्रारंभिक फुले (द्विलिंगी) आढळतात. उंबळी किंवा कुंबळमध्ये [नीटम ⟶ नीटेलीझ] बीजुकपर्णांशिवाय एकलिंगी फुलात सूक्ष्म परिदले आढळतात. प्रकटबीजीमध्ये बहुधा फुलात (शंकूत) एका लांबट अक्षावर (पुष्पस्थलीवर) बीजुकपर्णे एकांतरित रचलेली असून गुरूबीजककोश उघडे असतात. प्रकटबीजीपासून आवृतबीजी वनस्पती क्रमविकसित झाल्या असाव्यात असे मानतात यात दोन मतप्रवाह आहेत. (१) ⇨ कॉनिफेरेलीझ ( शंकुमंत गण) व ⇨ नीटेलीझ (उंबळी गण) यांसारख्या पूर्वजांशी हल्लीच्या ॲमेंटिफेरी (नतकणिश गण) सारख्या (उदा., बीच, ओक, ॲल्डर, अक्रोड, वाळुंज इ.) प्रारंभिक समजल्या जाणाऱ्या वनस्पतींचे बरेच साम्य असून इतर आवृतबीज वनस्पती त्यापासून क्रमविकसित झाल्या असाव्या (या ‘ॲमेंटिफेरियन सिद्धांता’ चे आडोल्फ एंग्‍लर, ए. बी. रेंडेल इ. वनस्पतिशास्त्रज्ञ पुरस्कर्ते आहेत) प्रारंभिक फुलात फक्त छदकांसह एकच केसरदल (किंवा किंजदल) असावे (उदा., खडशेरणी, वाळुंज, केतकी इ.) व अशा अपरिदल (नग्‍न) एकलिंगी फुलापासून परिदलयुक्त द्विलिंगी व आधुनिक फुलांचे उत्क्रमण झाले असावे परिदले छदकापासून विकसित झाली असावीत. (२) याउलट दुसऱ्या मताप्रमाणे बेनेटाइटेलीझसारख्या पूर्वजांच्या फुलापासून परिदलयुक्त, अमंडलित व द्विलिंगी फुलांचा विकास होऊन ⇨ मॅग्‍नोलिएसी (चंपक कुल,) रॅनन्क्युलेसी [मोरवेल कुल ⟶ रॅनेलीझ] इत्यादींच्या सारखी फुले क्रमविकसित झाली खडशेरणीपेक्षा ती आद्य असून एकंदरीने एकलिंगी, अपरिदल फुले ही द्विलिंगी, परिदलयुक्त व लंब पुष्पासनावर सुटी किंजदले असलेल्या फुलांपासून क्रमविकसित झाली असावी व त्यात त्यांचा ऱ्हास झाला असावा अशा ऱ्हसित फुलांच्या वनस्पती (ॲमेंटिफेरी) मूलतः प्रारंभिक नाहीत. आज आधुनिक वर्गीकरणतज्ञांपैकी जॉन हचिन्सन हे दुसऱ्या म्हणजे ‘रॅनॅलियन सिद्धांता’चे पुरस्कर्ते आहेत. 


रॅनॅलियन सिद्धांत मान्य केल्यास आद्य पुष्पापासून क्रमाने विकास पावून आजची विविध फुले क्रमविकसित होण्यात पुढे दिलेल्या प्रवृत्ती संभवतात, ही गोष्ट सहज लक्षात येईल : (१) पुष्पस्थली आखूड होऊन तीवर पुष्पदलांची मंडले (सर्पिल मांडणीऐवजी) येणे (२) पुष्पदलांची संख्या कमी होऊन त्यात अधिक निश्चिती येणे (३) परिदलांमध्ये श्रमविभागणी तत्त्वावर संवर्त व प्रदलमंडल असे भिन्नत्व येणे (४) परिदलांत घट होऊन परागती होणे (५) पुष्पस्थलीत परिदल संबंधानुरूप फरक पडून क्रमाने अवकिंज, परिकिंज व अपिकिंज हे प्रकार येणे (६) पुष्पदले अंशतः किंवा पूर्णतः जुळून वाढणे (संसंग) व तसेच भिन्न मंडलांतील दले जुळून वाढणे (आसंग) (७) समात्रतेत फरक होऊन अनियमितपणा येणे. ऊर्ध्वस्थ किंजपुटापासून अधःस्थ किंजपुट क्रमविकसित झाले याबद्दल एकमत असले, तरी ते पुष्पस्थलीच्या वाढीमुळे (‘पुष्पस्थली सिद्धांत’) झाले किंवा किंजदलाखेरीज इतर पुष्पदले प्रथमपासून जुळून वाढून त्यांच्या तळभागाच्या वेष्टनामुळे (‘उपांग सिद्धांत’) झाले याबद्दल दुमत आहे तथापि दिवसेंदिवस उपलब्ध होणाऱ्या पुराव्यावरून उपांग सिद्धांतच अधिक मान्य झाला आहे. या सर्व प्रवृत्तींची परिणती सध्याच्या सर्व जाती, वंश व कुले यांतील वनस्पतींच्या फुलांत कमीअधिक प्रमाणात आढळते व त्यावरून त्यांच्या प्रगतीचे मोजमाप करता येते. क्रमविकासातील सर्वच बदल नेहमी फायद्याचे ठरले आहेत असे नाही. फुलांचे संरचनावैचित्र्य, संरक्षण व परागण हे अनुयोजनाच्या दृष्टीने आले असावे असे मानतात पण याबद्दल मतभेद आहेत. जातींतील पारंपरिक संरचना कधी अकस्मात बदलल्याचा अनुभव येतो [⟶ उत्परिवर्तन]. मनुष्याने संकर-पद्धतीने आपल्या गरजेनुसार बदल घडवून नवीन जातींचे उत्पादन केले आहे [⟶ प्रजनन वनस्पति प्रजनन ]. कर्दळ, गुलबुश, डेलिया, कॉसमॉस इत्यादींच्या विविध व शोभिवंत जातींनी उद्यानांच्या सौंदर्यात खूप भर टाकली आहे.  

उपयुक्तता :  वनस्पतीशिवाय इतरांनी फुलांचे विविध उपयोग आजपर्यंत केले आहेत व नवनवीन उपयोग उजेडात येत आहेत. देवादिकांची पूजा, उत्सवसमारंभ, थोर व्यक्तींचा गौरव, प्रेमभावना व्यक्त करणारे, वास्तुशोभा (शिल्प), गृहशोभा, शरीरशोभा ,मार्गशोभा इत्यादींकरिता फुले वापरणे हे प्रकार जुनेच आहेत. अत्तरे, मध, भाज्या (उदा., फुलकोबी, अगस्ता , केळफूल इ.), रंग (उदा., केशर, पळस, धायटी, कुसुंबा इ.) औषधे (उदा., पाणकणीस, पळस, जास्वंद, धायटी इ.) यांकरिता कित्येक फुलझाडांना शेतीत, बागेत व इतरत्र महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. मोहाची फुले खाद्य असून मद्य बनविण्यासाठी वापरतात. गांजाची फुले मादक पदार्थांकरिता प्रसिद्ध आहेत. प्रत्येक देशाने विशिष्ट कारणामुळे एखाद्या फुलास राष्ट्रीयत्वाचा मान दिला आहे ईजिप्तचे व भारताचे राष्ट्रीय फूल ‘कमळ’ असून त्याचा हिंदूंच्या अनेक धार्मिक कार्यांत व मंदिरांच्या शिल्पात वापर पूर्वीपासून होत आहे. चीनचे नार्सिसिस, इंग्‍लंड व इराण यांचे गुलाब, स्पेनचे डाळिंब, मेक्सिकोचे निवडुंग इ. उदाहरणे राष्ट्रीय पुष्पांची आहेत. बागेत व रस्त्यावर लावलेली कित्येक झाडे आपल्या सुंदर फुलांनी व छायांनी मनुष्यास आनंद देतात.  

व्यापारी उत्पादन :  आज बहुतेक लहानमोठ्या शहरांत फुलांची दुकाने आढळतात. विविध बाबतींत फुले मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत. फुलांची आवड ही बाब फार जुनी आहे. फुलांच्या गरजेतून त्यांचे उत्पादन आणि विक्री सुरू झाली. हा व्यापारी पुष्पोत्पादनाचा उद्योग ग्रीक व रोमन काळी प्रथम सुरू झाला असावा, हे त्या वेळी बाजारात फुलांची विक्री होत असल्यावरून सिद्ध होते. त्या काळात उच्च कुलीन लोकांना फुलांचे वेडच होते. शोभेकरिता अन्नांतही फुलांची पखरण करीत कोशिंबिरीत व्हायोलेट फुलांचा चुरा घालीत व जेवणानंतरच्या मुखशुद्धीच्या पदार्थांवर गुलाबाच्या शिजविलेल्या पाकळ्या पसरून ठेवीत. मेजवानीच्या वेळी बादशहा नीरो गुलाबाच्या फुलांनी खोल्या सुशोभित करण्याकरिता फार मोठा खर्च करीत होते. १५२० मध्ये मेक्सिकोत फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड होत असून फुले बाजारात विक्रीसाठी ठेवलेली असत आणि घरे व देवळे सुशोभित करण्यासाठी फुलांचा वापर होत असे, असा उल्लेख आढळतो. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्‍लंडात व प. यूरोपात तुर्कस्तानातून ट्यूलिपची फुले आयात करीत त्यामुळे स्थानिक पुष्पसंवर्धनाला मोठी चालना मिळून व्यापारी दृष्टीने पुष्पोत्पादन चालू झाले. नेदर्लंड्‌समध्ये तर १६३४-३७ या काळात ट्यूलिप पुष्पाच्या व्यापारात सट्टेबाजी इतकी बोकाळली होती की, शेवटी शेवटी एका कंदाची किंमत २,६०० गिल्डर्सपर्यंत चढली. पाश्चात्य देशांत औद्योगिक क्रांतीनंतर फुलांचे गुच्छ व शोभेच्या वनस्पतींच्या कुंड्या यांचा व्यापार वाढू लागला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकात शहरी लोकसंख्येतील वाढ व लोकांच्या राहणीमानातील प्रगती यांमुळे पुष्पोद्योगाला वेग आला. याकरिता आवश्यक ते कार्यक्षम व प्रशिक्षित मनुष्यबळ आरंभी खाजगी व सार्वजनिक उद्यांनातून मिळत असे. पुढे १९५० च्या सुमारास शाही व खाजगी उद्यानांच्या क्षेत्रात कपात झाल्याने प्रशिक्षणाचे कार्य यूरोप व अमेरिका येथे शासकीय कृषी महाविद्यालये व विद्यालये येथे चालू झाले त्यामुळे उत्पादन पद्धतीत बदल होत गेले. १९२५ पासून व्यापारी पुष्पोत्पादनाला वैज्ञानिक संशोधनाची मदत मिळत गेली आणि १९४०-५० या अवधीत यामुळेच अधिक कार्यक्षम व्यापारी उत्पादनाला सुरूवात झाली आणि ते शास्त्र या सदरात आले. भारतात उद्यानविज्ञानाचे शिक्षण कृषी महाविद्यालयातच सुरू केले गेले व त्यातूनच पुढे पुष्पोद्योगाची सुरूवात झाली. आर्थिक संदर्भात ह्या पुष्पोद्योगाची प्रगती वा विकास एखाद्या देशातील किरकोळ विक्रीच्या तपशिलावरून कळून येतो. अमेरिकेत १९०९  मध्ये फुलांचा दरडोई खर्च एकूण प्राप्तीपैकी खर्च केलेल्या रकमेतील प्रत्येक डॉलरमागे / सेंट होता १९३५ मध्ये (आर्थिक मंदीच्या काळात) प्राप्तीतील एकूण खर्चाची रक्कम ५७ अब्ज डॉलर असून त्यातील फुलांच्या विक्रीची किंमत १४ कोटी २ लक्ष डॉलर होती  १९६० मध्ये हेच आकडे ३०० अब्ज व ७० कोटी डॉलर असे होते यावरून असा निष्कर्ष काढला गेला की, देशातील नागरिकांच्या एकूण खर्चाच्या सु. ०·२% रक्कम फुलांकरिता खर्च होत असे. फुलांचे उत्पादन व विक्री या धंद्यात आता बरेच आर्थिक स्थैर्य आले असून ते यूरोप, अमेरिका (व थोड्याफार प्रमाणात इतर प्रगत देश) येथील सामान्य सुसंस्कृत नागरिकांची सौंदर्यदृष्टी व सामाजिक वागणूक यांमुळे आले आहे. मृताबद्दल आदर दर्शविणे, विवाह किंवा तत्सम समारंभात शोभा आणणे, रुग्णाइतांना आनंदित करणे, यजमानीणबाईंचे आभार मानणे, मित्रमैत्रिणी व प्रिय व्यक्ती यांच्याविषयी स्‍नेहभाव व्यक्त करणे इत्यादींकरिता सु. ८०% फुलांची विक्री होते.  

उत्पादनपद्धती : लोकांच्या खरेदीतील बहुतेक फुले ⇨पादपगृहातसंवर्धन केलेल्यांपैकी असून ह्या पादपगृहांचे विविध प्रकार आहेत. त्यात भरपूर प्रकाश येण्यासाठी काचांचा वापर मोठ्या प्रमाणावर केलेला असतो. पादपगृहात फक्त कुंड्यातील झाडेच बनवितात त्या वेळी दर ४६५ चौ. मी. क्षेत्राची देखभाल एक फुलारी (माळी) करू शकतो परंतु काटपुष्पांकरिता (‘कट फ्लॉवर’करिता लांब किंवा आखूड देठांच्या आणि थोड्या फुलांच्या डहाळ्या इत्यादींकरिता) जेव्हा काचगृहात संवर्धन करतात तेव्हा प्रत्येक फुलारी सु. ७४५ चौ. मी. क्षेत्र सांभाळू शकतो, असे आढळले आहे. तथापि फुलझाडांचे प्रकार, आधुनिक तंत्रांचा वापर, कामगारांचे वेतन व कार्यक्षमता यांसंबंधीच्या भिन्नत्वामुळे वरील बाबतींतही फरक आढळतात. सर्व बाजूंनी विचार करून असा निष्कर्ष काढला गेला आहे की, सु. ९५ चौ. मी. क्षेत्र (काचगृहातील) एका फुलारीने सांभाळून यशस्वी व्यापारी उत्पादन होऊ शकते. अशा किमान क्षेत्रात भरपूर वेळ काम करून काही विशिष्ट वनस्पतींचे (उदा., नेचांची रोपे, आफ्रिकी व्हायोलेटांचे गंमतीदार प्रकार) संवर्धन करतात कधी तेथेच किरकोळ विक्रीसाठी थोडा साठा करतात. काही काचगृहांतील क्षेत्र ९३,००० चौ. मी. इतके मोठे असते. अशी मोठी क्षेत्रे लहान लहान क्षेत्रांपेक्षा जेथे संख्येने कमी असतात, तेथे मोठ्यांतील विक्री सर्वात अधिक असल्याने त्यांची स्थापना अधिक प्रमाणात करून पुष्पोद्योग अधिक फायदेशीर करण्याची प्रवृत्ती आढळते. सर्वसाधारणपणे मोठी व लहान क्षेत्रे मिळून होणारी ठोकळ वार्षिक प्राप्ती भांडवली गुंतवणीइतकी होते असा अनुभव आल्याचे नमूद आहे.

  

पादपगृहाला पुष्पोत्पादनाच्या उद्योगाचे द्योतक मानले असून दिवसेंदिवस त्यांच्या बांधणीत सुधारणा होत आल्या आहेत. १९५० पासूनच्या अलीकडील काळात ती मोठी व प्रशस्त असून काच आणि अंशतः लोखंडी किंवा लाकडी चौकटींचा वापर करून त्यांत हवा खेळण्यास, उबदारपणा ठेवण्यास व ओलावा राखण्यास स्वयंचलित नियंत्रणाची व्यवस्था केलेली असते. लाकडी बांधकामात प्लॅस्टिकचे छप्पर ठेवून विशिष्ट हवामानाला अधिक उपयुक्त आणि वारा व पाऊस यांपासून संरक्षक असे पादपगृह बनवितात. अलीकडील उत्पादनपद्धतीतील बदलांमुळे फुले व कुंड्यांतील झाडे यांचे उत्पादन अधिक निश्चित व कमी कष्टाचे होत असून गुणवत्ता व परिणाम यांचे प्रमाण वाढल्याचे आढळले आहे. वाफ व रसायने यांचे संस्कार पादपगृहातील जमिनीवर करून फुलझाडांचे आरोग्यरक्षण केले जाते. तेथील पिकांची अभिवृद्धी (लागवड) वाढ व समयसाधन (व्यापाराच्या दृष्टीने कधी लवकर तर कधी उशिराने फुलांना बहर आणणे किंवा कुंड्यांतील वनस्पतींची जलद वाढ करणे इ.) ह्या संदर्भात उपयुक्त अशी द्रवरूप खते घालणे आणि पारिस्थितिक (वनस्पती व सभोवतालची परिस्थिती यांचे परस्परसंबंध लक्षात घेणाऱ्या) व रासायनिक उपचारांचा शोध घेणे शक्य होते. ह्या प्रागतिक बाबींमुळे व्यापारी उत्पादनांचा अचूक अंदाज करणे व त्यात एकरूपता आणणे शक्य झाले आहे. सुधारित कीडनाशके तर पादपगृहातील लागवडीत वरदान ठरली आहेत. याचमुळे पादपगृहातील गुलाबांचे उत्पादन २५% वाढले आहे. 

गेली कित्येक वर्षे फुलांच्या खरेदी-विक्रीकरिता स्पष्ट मार्ग उपलब्ध झाला आहे. बहुधा फुलांची विक्री घाऊक व्यापाऱ्यांकरवी किरकोळ विक्रेत्यांकडे होते याशिवाय उत्पादकांकडून प्रत्यक्ष ग्राहकास फुले मिळू शकतात आणि लिलावानेही त्यांची विक्री केली जाते. 

भारतातील लहानमोठ्या शहरांत विविध स्थानिक गरजा भागविण्यास वाढती मागणी लक्षात घेऊन पुष्पोत्पादन व पुष्पविक्री हा उद्योग दिवसेंदिवस वाढत आहे. मोठ्या बागांतून व शेतांतूनही ह्या दृष्टीने बरीच लागवड होते संवर्धन व विक्री ही कार्ये अनुक्रमे शेतकरी व माळी (फुलवाले) यांनी अनेकदा परस्परांत विभागलेली आढळतात. तथापि फुले फार दूरवर पाठविण्याच्या दृष्टीने अद्याप त्यांना फारसे व्यापारी महत्त्व आलेले नाही. फुलझाडांच्या बी-बियाण्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादन व विक्री हा धंदा थोड्याफार प्रमाणावर चालू आहे. 

काटपुष्पे: ही सर्व लांब किंवा आखूड देठाची असून पुष्पालंकराकरिता वापरण्यास योग्य असतात त्यांचे उपयोग तुरे, फुलदाण्या, व्यक्तिगत शोभा इत्यादींकरिता करतात. यामध्ये कार्नेशन, शेवंती, गुलाब, जरबेरा, कॉसमॉस, डेझी, डेलिया, डॅफोडिल, आमरे, कॅमेलिया, गार्डेनिया इ. अनेकांचा समावेश होतो. यांपैकी प्रत्येकाच्या संवर्धनाकरिता विशिष्ट सोयी कराव्या लागतात, त्यामुळे त्यांचे संवर्धन अलग अलग प्रकारे फुलवाले स्वतंत्रपणे करतात. यांच्या भिन्न देशांत लागणाऱ्या भिन्न भिन्न जाती ऋतुमान व औचित्य (देवतांचे उत्सव, सणवार इ.) लक्षात घेऊन कमीअधिक प्रमाणात लागवडीत आणतात. काही वनस्पतींना अधिक प्रकाशात, तर काहींना कमी प्रकाशात फुले येतात हे लक्षात घेऊन कृत्रिम रीत्या ती परिस्थिती पादपगृहात निर्माण करतात. त्यामुळे लोकांच्या गरजेनुसार फुलांचा पुरवठा केल्यास उत्पादन व व्यापार यशस्वी होतात. ट्यूलिप, ग्लॅडिओलस, हायसिंथ, डच, आयरीस, ईस्टर, लिली इ. वनस्पतींचे गड्डे (कंद, दृढकंद इ.) एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठविता येतात व त्यानंतर पारिस्थितिक नियंत्रणाने इच्छित वेळी, त्यांना रुजवून पुष्पोत्पादन करता येते. कमी तापमानात कमी जास्त वेळ त्यांचा साठा ठेवून व्यापारी दृष्ट्या गरजेनुसार नंतर त्यांना पुष्पोत्पादन करणे भाग पाडता येते.

  

कुंड्यांत वाढविलेल्या फुलझाडांचे उत्पादन हा उद्योग पुष्पोत्पादन उद्योगाच्या मानाने फार छोटा असून तो अधिकांश अनेक ठिकाणी विखुरला आहे. याचे कारण अशा वनस्पती एका ठिकाणाहून दुसरीकडे दूर पाठविणे फार खर्चाचे असते शिवाय काही वनस्पती त्या त्या ठिकाणी लोकप्रिय असतात व त्यांचा खप इतरत्र होईलच, याची खात्री नसते. 

रांडेकर, शं. आ. 


चिरस्थायी फुले : वाळविल्यानंतर ज्या फुलांचा आकार, रंग व काही इतर गुणधर्म कायम टिकून राहतात, अशा फुलांना चिरस्थायी म्हणतात. पुष्पचक्रे, हार, गुच्छ आणि घरगुती सजावटीसाठी अशा फुलांचा वापर केला जातो. फ्रान्समध्ये अशा फुलांची व्यापारी प्रमाणावर लागवड केली जाते व ती अनेक देशांत पाठविली जातात. पुढील वनस्पतींची फुले चिरस्थायी असल्याचे आढळले आहे. 

कंपॉझिटी (ॲस्टरेसी) कुलातील (सूर्यफूल कुलातील) अनेक वनस्पती : [⟶ कंपॉझिटी]. विशेषतः हेलिक्रायसम वंशातील कित्येक जाती याबद्दल प्रसिद्ध आहेत. हेलिक्रायसम ॲरेनॅरियम या मूळच्या उ. आफ्रिकेतील जातीची पिवळी फुले विशेष लोकप्रिय असून ती ‘फ्रेंच इम्मॉर्टेलीझ’ म्हणून ओळखली जातात. या फुलाचा फ्रान्समध्ये पुष्पचक्रे तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. फुलांच्या स्तबक फुलोऱ्यात [⟶ पुष्पबंध] रंगीत, पातळ, चिवट आणि काहीशी पारदर्शक पुष्पछदे (तळाशी असलेली उपांगे)  असतात व वाळल्यावर देखील त्याचा रंग कायम राहतो. प्रतिकूल हवामानात देखील ही पुष्पचक्रे पुष्कळ दिवस टिकतात आणि मोठ्या प्रमाणावर ती परदेशी पाठवितात. विरंजन केलेली (रंग काढून टाकलेली) पांढरी अथवा त्यांना कृत्रिम रंग देऊन विविध रंगांची केलेली फुलेही मोठ्या प्रमाणावर परदेशात पाठविली जातात. मूळच्या केप ऑफ गुड होपकडील हेलिक्रायसम ग्रॅन्डिफ्लोरमची फुले सॅटीन कापडासारखी मऊ व पांढरी असतात. ऑस्ट्रेलियातील हे. ब्रॅक्टिएटमची लागवड इंग्लंड व अमेरिकेत बगीचांतून करण्यात येते याची फुले मोठी, पांढरी, तपकिरी अथवा गवती रंगाची असतात. ती रंगवून त्यांत विविध छटा निर्माण करतात. हे वर्षायू झाड ५०-९० सेंमी. उंच असून त्याला ६०-७० खोडे झुबक्याप्रमाणे असतात आणि प्रत्येक खोडावर सु. २·५ ते ४ सेंमी. व्यासाचे सु. २० फुलोरे (स्तबके) येतात. पूर्ण उमललेल्या फुलांपेक्षा अर्धवट उमललेली फुले तोडल्यास वाळल्यावर त्यांचे रंग जास्त चांगले टिकतात. याच कुलातील हेलिप्टेरम,ॲम्मोबियम, अँटेनॅरिया, नॅफॉलम, झिरँथेमम आणि ॲनॅफॅलिस इ. वंशांतील जातींची फुलेही चिरस्थायी असतात.  

ॲमरँटेसी कुलातील (आघाडा कुलातील) वनस्पती : [⟶ ॲमरँटेसी] ह्या वनस्पती ⇨ ओषधी (नरम व लहान) आहेत उदा., जाफरी गेंदे (गॉफ्रिना ग्लोबोजा, इं. ग्लोब ॲमरँथ) मयूरशिखा (सेलोशिया क्रिस्टॅटा) कुरडू (सेलोशिया अर्जेन्शिया). 

ग्रॅमिनी कुलातील (तृण कुलातील, गवतांपैकी) वनस्पती : [⟶ ग्रॅमिनी]. यांच्या आकर्षक परिमंजऱ्या अथवा कणिशे तशीच किंवा रंगवून चिरस्थायी करतात. सुकवलेले भेंड, रंगीत कागद व प्लॅस्टिक यांपासून बनविलेल्या फुलांचाही चिरस्थायीत समावेश करतात. यांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने प्रत्यक्ष वनस्पतींच्या चिरस्थायी फुलांचा वापर हल्ली कमी होऊ लागला आहे. (चित्रपत्रे). 

चौधरी, रा. मो. 

पहा : उद्याने व उपवने पराग पर्णवलन पादपगृह पान पुष्पदलसंबंध पुष्पबंध पुष्परचना प्रजोत्पादन शास्त्रीय उद्याने. 

संदर्भ :  1. Bailey, L. H. The standard  Cyclopeida  of Horticulture, Vol. I, New York, 1961.

             2. Eames, A. J. Morphology of Angiosperms, New York, 1961.

             3. Lawrence, G. H. M. An Introduction to Plant Taxonomy, New York, 1958.

             4. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

            5. Mitra, G. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

            6. Mukherji, H., Ganguli, A. K. Plant Group, Calcutta, 1964.

           7. Strasburger, E. Textbook of Botany, London, 1965.

           8. काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर, १९७४.