मयूरशिखा

मयूरशिखा : (मण्यारशिखा, मोरशेंडा; हिं. लाल मुर्गा; गु. मोरशिखा; सं. मयूरशिखा; इं. कॉक्सकोंब; लॅ. सेलोशिया क्रिस्टॅटा; से. अर्जेन्शिया प्रकार क्रिस्टॅटा; कुल – ॲमरँटेसी). फुलोर्‍याच्या शोभेकरिता बागेत लावलेली एक वर्षायू (जीवनक्रम एका हंगामात पूर्ण करणारी) ⇨ ओषधी चुकून कधी कधी मैदानी प्रदेशात किंवा हिमालयात (सु. १,५०० मी. उंचीवरही) आढळते. हिचे खोड सु. २०–३० सेंमी. उंच असून ते सरळ ताठ वाढते. पाने विविध आकारांची, साधी, एकाआड एक व अंखड असतात. ⇨ प्रपट्टनामुळे (विशिष्ट कारणामुळे येणार्‍या विचित्र आणि फार मोठ्या आकारामुळे) फुलोरा मोठ्या तुर्‍यासारखा (कहीसा कोंबड्याच्या तुर्‍याप्रमाणे) बनतो; तो अनेक कणिशे [⟶ पुष्पबंध] एकत्र वाढून बनलेला व सु. ३० सेंमी. लांब असतो; तो खोडाच्या टोकावर असून बाजूस सपाट व पसरट आणि वर नागमोडी व नारिंगी, लाल, पिवळा, गुलाबी किंवा पिवळट असतो. त्यांमध्ये असंख्य अपूर्ण, लहान फुले छदांनी वेढलेली असतात; परिदले ३–५, सुटी, खरबरीत, लांबट व भाल्यासारखी; केसरदले ५, तळात जुळलेली, ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा व त्यात ४–८ बीजके असतात [⟶ फूल]. फळे करंडरूप (लहान गोल डबीसारखी); बिया फार लहान, ४–८ व चपट्या असतात. हिची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ॲमरँटेसीत (आघाडा कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात. ⇨ आघाडा, ⇨ कुरडू, जाफरी गेंद व ⇨ माठाच्या जाती याच कुलातील असल्याने अनेक लक्षणांत त्यांच्याशी मयूरशिखेचे साम्य आहे. ह्या वनस्पतीचा स्वयंपाकात स्वादाकरिता किंवा भाजीसारखा उपयोग करतात. खोडापासून निघणार्‍या धाग्याचा उपयोग दोराकरिता होतो. बियांपासून तेल (सेलोशिया तेल) काढतात व बेटानीन नावाचे नायट्रोजनयुक्त अँथोसायनीन रंजकद्रव्य मिळते. फुले स्तंभक (आकुंचन करणारी) असल्याने अतिसारात गुणकारी असतात. बिया शामक (आग कमी करणार्‍या), आव कमी करणार्‍या, मूत्रल (लघवी साफ करणार्‍या), वेदनाहारक व कफनाशक असतात. मुतखड्यावर मूळ तांदळाच्या धुवणात वाटून पितात.

कडक उन्हाळा व कडक थंडी नसलेल्या ठिकाणी ही वनस्पती चांगली वाढते; तसेच तिच्या फुलोर्‍याला पावसाचा सतत माराही सहन होत नाही. पूर्ण खतावलेली, भुसभुशीत जमीन हिच्या वाढीला हितकारक असते. लागवडीकरिता प्रथम उथळ खोक्यांत किंवा टोपल्यांत बी पेरून रोपे तयार करतात; त्यांना पाचसहा पाने आल्यावर ती तेथून काढून वाफ्यांत १५–२२ सेंमी. अंतरावर लावतात. भरपूर पाणी व फुले येण्याच्या सुमारास द्रव खत देतात. हिचे खुजा आणि उंच असे दोन प्रकार आढळतात. खुज्या प्रकारच्या झाडाला बी पेरल्यापासून दोन प्रकार आढळतात. खुज्या प्रकारच्या झाडाला बी पेरल्यापासून सु. दोन अडीच महिन्यांनी फुले येतात, तर उंच प्रकाराला फुले उशिरा येतात. (चित्रपत्र ६०).

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II, Delhi, 1950.

2. Desai, B. L. Seasonal Flowers, New delhi, 1962.

चौगले, द. सी.; परांडेकर, शं. आ.