अंबरी : (क. अंबट्टी, उळागेरा लॅ. नोथोपेजिया कोलेबुकियाना कुल-ॲनाकार्डिएसी). सु. ४-५ मी. उंचीच्या या मध्यम वृक्षाचा प्रसार कोकण व उत्तर कारवारच्या सदापर्णी जंगलात असून शिवाय निलगिरी, त्रावणकोर व श्रीलंका येथेही आहे. यात जहाल पांढरा रस असतो. साल पातळ व भुरी पाने एकाआड एक,चिवट, मध्यम आकाराची, दीर्घवृत्ताकृती, गुळगुळीत फुले लहान, पांढरी, एकलिंगी (जानेवारी-मार्च) पुं-मंजऱ्या स्त्री मंजऱ्यापेक्षा लहान [→ पुष्पबंध] फुलांची संरचना व सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ॲनाकार्डिएसी  कुलात वर्णिल्याप्रमाणे फळ (मार्च-मे) अश्मगर्भी (कोय असलेले), लाल मगज गोड व खाद्य लाकूड कठिण, बळकट, धन व गुळगुळीत पण दुर्लक्षित आहे.

जमदाडे, ज. वि.