कॉर्डेटा: (रज्जुमान संघ.) बहुकोशिक (ज्यांचे शरीर अनेक पेशींचे बनले आहे अशा) प्राण्यांचे अनेक संघ (फायलम) पाडलेले आहेत. कॉर्डेटा (रज्जुमान संघ म्हणजे पृष्ठरज्जू असलेल्या प्राण्यांचा संघ) हा एक बहुकोशिक प्राण्यांचा संघ असून त्यात कायम स्वरूपाची किंवा अल्पस्थायी पृष्ठरज्जू असणाऱ्या सर्व प्राण्यांचा समावेश केलेला आहे.

रज्जुमान संघाची बरीच लक्षणे – उदा., तीन आद्यस्तर (बहुकोशिकी प्राण्यांच्या विकासात उत्पन्न होणारे मूळ स्तर), द्विपार्श्व सममिती (ज्या स्थितीत प्राण्याच्या शरीराचे फक्त एकाच पातळीतून केलेल्या विभाजनाने दोन सारखे अर्धे भाग करता येतात ती स्थिती), समखंडता (शरीराचे खंड जवळपास सारखे असणे), पूर्ण पचनमार्ग इ.

अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांतही स्पष्टपणे दिसून येतात. पुष्कळ अपृष्ठवंशी प्राण्यांप्रमाणेच रज्जुमानांमध्येही हृदय आणि संवृत (ज्यात रक्त फक्त रक्तवाहिन्यांतूनच वाहते) परिवहन तंत्र (रुधिराभिसरण संस्था) असते. तथापि, इतर कोणत्याही प्राणिसमूहात न आढळणारी पुढील तीन अनन्यसाधारण लक्षणे रज्जुमान संघातील प्राण्यांमध्ये आढळतात: (१) पृष्ठरज्जू. सर्व रज्जुमान प्राण्यांच्या भ्रूणावस्थेत तंत्रिकारज्जूच्या (मज्जारज्जूच्या) खाली व आद्यांत्राच्या (मूळ आतड्याच्या) वर एक श्र्लेषी (जेलीसारख्या पदार्थाची) किंवा उपास्थिमय (कूर्चायुक्त) आधार – शलाका उत्पन्न होते तिला पृष्ठरज्जू म्हणतात. यूरोकॉर्डेटा (पुच्छ-रजमान) उपसंघात ती फक्त डिंभाच्या (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे जगणाऱ्या आणि प्रौढाशी साम्य नसणाऱ्या क्रियाशील पूर्व अवस्थेच्या) पुच्छात असते. सेफॅलोकॉर्डेटा (शीर्ष-रज्जुमान) उपसंघात आणि इतर सर्व वरच्या दर्जाच्या प्राण्यांत ती शीर्षप्रदेशापासून मागे पुच्छात शिरलेली असते. लॅंप्री आणि ऍफिऑक्सस यांत शरीराला आधार देण्याकरिता सर्व आयुष्यभर ती असते. मासे, उभयचर (जल व स्थलवासी प्राणी), सरीसृप (सरपटणारे प्राणी), पक्षी आणि स्तनी प्राणी यांत नंतर पृष्ठरज्जूच्या जागी अथवा तिच्याभोवती खंडयुत विन्यास (मांडणी) असलेल्या पृष्ठवंशाच्या कशेरुका (मणके) तयार होतात. (२) तंत्रिकारज्जू. सर्व रज्जुमानांमध्ये पृष्ठीय नलिकाकार तंत्रिका तंत्र असते आणि सर्व प्रकारांमध्ये ते आयुष्यभर टिकून असते. तंत्रिका रज्जू भ्रूणाच्या वरच्या पृष्ठावर तयार होते. पृष्ठीय बाह्यत्वचा दुमडली जाऊन दुमडी एकमेकांना मिळतात आणि त्यामुळे नळीसारखी तंत्रिकारज्जू तयार होते. नंतर ही तंत्रिकारज्जू पृष्ठापासून अलग होऊन खाली जाते. युरोकॉर्डेटांच्या डिंभात आणि अँफिऑक्सस (सेफॅलोकॉर्डेटा) मध्ये तंत्रिकारज्जूचे पुढचे टोक किंचित मोठे होऊन मेंदूची पूर्वचिन्हे दिसतात, पण सर्व पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये हे टोक जाड आणि मोठे होऊन त्याला घड्या पडतात आणि मेंदू तयार होतो. (३) क्लोम- दरणे. सर्व रज्जुमानांच्या आयुष्यातील एखाद्या तरी अवस्थेत ग्रसनी (घशाच्या) प्रदेशात क्लोम-दरणांच्या (श्वासोच्छ्वासाच्या इंद्रियाकडे म्हणजे कल्ल्यांकडे जाणाऱ्या चिरांसारख्या प्रवेशमार्गांच्या) जोड्या असतात. काही प्राण्यांत क्लोम-दरणे फक्त भ्रूणावास्थेतच असतात, पण माशांसारख्या जलचरात ती आयुष्यभर कार्यक्षम असतात. माशांच्या तोंडातून पाणी आत जाते अणि ते क्लोम-दरणांमधून बाहेर पडताना क्लोमतंतूंवरून वहात जाते व या ठिकाणी वायूंची अदलाबदल होते. बेडूक, भेक आणि सॅलॅमॅंडर या उभयचर प्राण्यांना डिंभावस्थेत क्लोम असतात, पण प्रौढावस्थेत हे प्राणी वायुश्वासी असल्यामुळे त्यांचे क्लोम आणि क्लोम-दरणे नाहीशी होतात. सरीसृप, पक्षी आणि स्तनी प्राणी फुफ्फुसांनी श्वासोच्छ्वास करतात. या प्राण्यांच्या भ्रूणावस्थेत क्लोम-दरणांच्या जोड्या असतात, पण त्या लवकरच बंद होतात.

 आ.१. अरज्जुमान व रज्जुमान प्राण्यांच्या संरचनेतील मूलभूत फरक : (अ) अरज्जुमान : (१) बाह्यकंकाल, (२) स्पंदनशील पृष्ठीय रुधिरवाहिका, (३) तंत्रिकारज्जू, (४) पचन-नलिका, (५) गुदद्वार. (आ) रज्जुमान : (१) पृष्ठरज्जू, (२) गुदपश्च पुच्छ, (३) तंत्रिकारज्जू, (४) आहारनाल, (५) गुदद्वार, (६) यकृत, (७) ह्रदय, (८) क्लोम-दरणे.

पृष्ठरज्जूविषयी सांगावयाचे तर इतर कोणत्याही संघामध्ये ती अथवा तिच्या समान संरचना आढळत नाही. अपृष्ठवंशी प्राण्यांच्या विविध  संघात अनुदैर्घ्य (उभी) तंत्रिकारज्जू आढळते. (उदा., ऍनेलिडा व आथर्रोपोडा संघ), पण ही रज्जू भरीव असून नेहमी प्राण्याच्या अधर (खालच्या) पृष्ठाजवळ असते. पाण्यात राहणाऱ्या विविध प्राण्यांना श्वसनाकरिता क्लोम असतात, पण क्लोम-दरणांनी बाहेर उघडणाऱ्या रज्जूमानांच्या क्लोमांसारखे त्यांचे स्वरूप नसते. परंतु यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे खालच्या दर्जाच्या रज्जूमानांमध्ये अन्न गोळा करण्याकरीता या यंत्रणेचा उपयोग होतो. ग्रासनीत येणारे पाणी तेथे गाळले जावून अन्नकण ग्रासनीतच राहतात व तेथून आंत्रात जातात आणि पाणी क्लोम-दरणांमधून बाहेर पडते.

रज्जुमानांची उत्पत्ती: रज्जुमानांची उत्पत्ती कशारीतीने झाली याविषयी खात्रीलायक पुरावा अद्याप मिळालेला नाही. त्यांची उत्पत्ती आणि संबंध यांच्याविषयी एकमत नाही. प्राण्यांचे जीवाश्म (अवशेष) प्रथम कॅंब्रियन (सु. ६०-५१ कोटी वर्षांपूर्वीच्या) खडकांत सर्व-साधारणपणे आढळतात, पण त्या रज्जुमानांचे अवशेष मुळीच आढळलेले नाहीत. बहुतकरून आद्य रज्जुमानांचे शरीर मृदू असावे आणि त्यात सुरक्षित राहण्यासारखे कठीण भाग नसावेत म्हणूनच त्यांचे अवशेष आढळत नसावेत. सिल्युरियन (सु. ४२ कोटी वर्षांपूर्वीच्या) आणि ऑर्डोव्हिसियन (सु. ४९-४४ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील मासे हे पहिले पृष्ठवंशी प्राणी होत. यानंतर पुढे पुष्ठवंशी प्राण्यांचे जीवाश्म मुबलक आढळू लागले आणि निरनिराळ्या थरांत आढळणाऱ्या त्यांच्या जीवाश्मांच्या अभ्यासावरून हल्लीच्या मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी व स्तनी या पाच वर्गांच्या संभाव्य उत्पत्तीच्या उलगडा झाला आणि त्यांचा क्रमविकास (उत्क्रांती) कसा होत गेला याचीही माहिती मिळाली. या जीवाश्मांच्या अभ्यासाने पृष्ठवंशी प्राण्यांच्या वर्गीकरणाला महत्त्वाची मदत झाली.कनिष्ठ प्रतीचे रज्जुमान आणि काही अपृष्ठवंशी प्राणी यांत कित्येक बाबतींत साम्य आढळल्यावरून रज्जुमानांच्या उत्पत्तीविषयी कित्येक कल्पना पुढे मांडण्यात आल्या, त्या पुढीलप्रमाणे आहेत.

(१) ॲनेलिड उपपत्ती : वलयी (ऍनेलिड) आणि रज्जुमान हे दोन्हीही द्विपार्श्व सममित व सखंड असून त्यांच्यात खंडयुत उत्सर्जनांगे, मोठी देहगुहा, तंत्रिकारज्जू आणि अनुदैर्घ्य रुधिर-वाहिका (रक्तवाहिन्या) असतात. वलयी प्राण्याला जर उलटा केला (खालची बाजू वर केली), तर त्याची तंत्रिकारज्जू पचनमार्गाच्या वर येईल आणि रक्तप्रवाहाचा मार्ग रज्जुमानांच्यासारखा होईल. तथापि, मुख रज्जुमानांच्या मुखापेक्षा वेगळ्या ठिकाणी म्हणजे वरच्या पृष्ठावर असेल व इतर उत्तराधर संबंधात बदल होईल. यांशिवाय पृष्ठरज्जू किंवा क्लोम-दरणे सूचित करणाऱ्या कोणत्याही संरचना वलयींमध्ये आढळत नाहीत.

(२) ॲरॅक्निड उपपत्ती :  पुराजीव महाकल्पातील (सु. ६०-२४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) यूरिप्टेरिड या आथर्रोपोडा संघाच्या अष्टपाद वर्गातील (ऍरॅक्निडा) लुप्त प्राण्याचे रज्जुमानांपैकी पूर्व ऑस्ट्रॅकोडर्मशी साम्य दिसून येते दोहोंचाही पृष्ठभाग बाह्यकंकालाने (बाह्य सांगाड्याने) झाकलेला असतो. पण रज्जुमानांना संधिपादांच्यासारखी उपांगे (अवयव) नसतात व त्यांची तंत्रिकारज्जू पृष्ठीय असते. यांशिवाय आणखीही काही महत्त्वाचे फरक या दोहोंत आहेत.

(३) एकायनोडर्म उपपत्ती : एकायनोडर्माटातील (कंटकचर्म संघ) ऑरिक्युलॅरिया डिंभ आणि हेमिकॉर्डेटा (सामि-रज्जुमान) उपसंघातील बॅलॅनोग्लॉसससारख्या प्राण्यांचा टोर्नारिया डिंभ (डिंभ) हे दोन्हीही सूक्ष्म आणि पारदर्शक असतात दोहोंच्याही शरीरावर पक्ष्माभिकामय (हालचाल करणाऱ्या केसांसारख्या रचनायुक्त) बाह्य पट्टे असतात आणि देहगुहांची संख्याही सारखीच असते दोहोंच्या शरीरावर पृष्ठीय छिद्र असते. या उपपत्तीप्रमाणे पूर्वजपरंपरेचा क्रम पुढे दिल्याप्रमाणे असू शकेल: ऑरिक्युलॅरिया डिंभापासून हेमिकॉर्डेट डिंभ याच्यापासून यूरोकॉर्डेट डिंभ याच्यापासून अँफिऑक्सस आणि अँफिऑक्ससपासून ऑस्ट्रॅकोडर्म.

अलीकडील जीरसायनशास्त्रीय आणि रक्तरसशास्त्रीय परीक्षावरंनू एकायनोडर्म हे रज्जुमानांचे निकट संबंधी आहेत असा पुरावा मिळाला आहे. त्यावरून वरील दोन्ही संघांचा एकच पूर्वज असावा असे प्राणिशास्त्रज्ञांचे मत आहे.


वरील मतप्रणालीला जीवाश्मांचा निर्णायक पुरावा मात्र मिळालेला नाही.

रज्जुमान संघाचे वर्गीकरण : रज्जुमान संघाचे पुढे दिल्याप्रमाणे चार उपसंघ केलेले आहेत.

रज्जुमान संघ: उपसंघ १. हेमिकॉर्डेटा (सामि-रज्जुमान). उपसंघ २. यूरोकॉर्डेटा (पुच्छ-रज्जुमान). उपसंघ ३. सेफॅलोकॉर्डेटा (शीर्ष-रज्जुमान). उपसंघ ४. पृष्ठवंशी (कर्परी).

रज्जुमान संघातील हेमिकॉर्डेटा हे निकृष्ट दर्जाचे आहेत असे सामान्यतः समजले जाते. या प्राण्यांत आढळणारी पृष्ठरज्जू ही खरी पृष्ठरज्जू नाही असे काही प्राणिशास्त्रज्ञांचे मत असल्यामुळे त्यांनी तिला ‘मुखरज्जू’ असे नाव दिले आहे. या कारणाकरिता सदरहू प्राणिशास्त्रज्ञ हेमिकॉर्डेटा हा स्वतंत्र संघ मानतात. येथे हेमिकॉर्डेटा हा कॉर्डेटा संघाचा (रज्जुमान संघाचा) एक उपसंघ मानलेला आहे.

पृष्ठवंशी उपसंघामध्ये पुढील वर्गांचा समावेश होतो.

वर्ग १. सायक्लोस्टोमाटा (गोलमुख वर्ग).

वर्ग २. कॉंड्रिक्थीज (उपास्थिमत्स्य वर्ग, ज्या माशांचा सांगाडा फक्त उपास्थींचा असतो अशा माशांचा वर्ग).

वर्ग ३. ऑस्टेइक्थीज (ऍस्थिमत्स्य वर्ग, हाडांचा सांगाडा असणाऱ्या माशांचा वर्ग).

वर्ग ४. अँफिबिया (उभयचर वर्ग).

वर्ग ५. रेप्टिलिया (सरीसृप वर्ग).

वर्ग ६. ऍव्हीज (पक्षी वर्ग).वर्ग ७. मॅमॅलिया (स्तनी वर्ग).

(१) हेमिकॉर्डेटा (सामि-रज्जुमान) उपसंघ: या उपसंघातील प्राणी सर्व रज्जुमानांमध्ये अतिशय आद्य आहेत.

आ. २. बॅलॅनोग्लीसस : (१) शुंड,(२) मुख,(३) गलपट्टी,(४) क्लोम-दरणे.

हे समुद्रात राहणारे व कृमिसदृश असून शरीराचे शुंड (सोंड), गळपट्टी व घड असे तीन भाग असतात. मुख गळपट्टीच्या लगेच पुढे अधर पृष्ठावर  असते. आहारनालाच्या (मुख ते गुदापर्यंतच्या अन्नमार्गाच्या) पृष्ठभित्तीपासून एक अंधनलिका (टोकाशी बंद असलेली नळी) निघून पुढे  गळपट्टीत गेलेली असते हीच यांची पृष्ठरज्जू होय. धडाच्या अग्र भागात पार्श्व क्लोम-दरणांच्या जोड्या असतात. या उपसंघात एंटेरोन्यूस्टा,    टेरोब्राँकिया आणि ग्रॅप्टोझोआ हे तीन वर्ग आहेत.

 आ.३. साध्या चोलधारीची आंतरिक रचना : (१) मुखद्वार, (२) गुच्छिका, (३) परिग्रसनी-रंध्र, (४) परिग्रसनी-गुहा, (५) एंडोस्टाइल, (६) ग्रसनी, (७) गुदद्वार, (८) चोल, (९) जननवाहनी, (१०) आंत्र, (११) प्रावार (देहभित्ती), (१२) जनन ग्रंथी.

(अ) एंटेरोन्यूस्टा : हे कृमिसदृश असून त्यांना क्लोम-दरणांच्या पुष्कळ जोड्या असतात उदा.,  बॅलॅनोग्लॉसस. (आ) टेरोब्रॅंकिया: खोल किंवा उथळ समुद्रात राहणारे सूक्ष्म प्राणी क्लोम-दरणे मुळीच  नसतात किंवा एकच जोडी असते उदा., ऱ्हॅब्डोप्ल्यूरा, सेफॅलोडिस्कस. (इ) ग्रॅप्टोझोआ: ग्रॅप्टोलाइट्स.  जीवाश्मांचा वर्ग. हे प्राणी निवहजीवी (वसाहती करून राहणारे) आणि शाखित होते त्यांच्या देहांकुरांवर  (आडव्या खोडासारख्या संरचनांवर) कायटिनमय चोल (कठीण बाह्य आच्छादन) असे ते उत्तर  कॅंब्रियनापासून पूर्व डेव्होनियन कालात होते त्यांच्या उत्कर्षाचा काल ऑडोव्हिसियन हा होता [→  हेमिकॉर्डेटा].

(२) यूरोकॉर्डेटा (पुच्छ-रज्जु-मान) उपसंघ : या उपसंघाला ट्यूनिकेटा (चोलधारी) असेही नाव आहे.

या उपसंघातील सगळे प्राणी समुद्रात राहणारे आहेत. त्यांचे शरीर कोशसदृश आवरणाने (याला चाल म्हणतात) वेढलेले असते. काहींच्या विकासात डिंभावस्था असते. या डिंभाच्या पुच्छात अनुदैर्घ्य पृष्ठरज्जू असते. यांच्या रक्तात रंगहीन रुधिरकोशिका बऱ्याच असतात, पण त्याखेरीज व्हॅनेडियमाची वेगवेगळी ऑक्साइडे असलेल्या थोड्या हिरव्या, निळ्या आणि नारिंगी कोशिका असतात.

यूरोकॉर्डेटा उपसंघाचे लार्व्हासिया, ॲसिडियासिया व थॅलिॲसिया असे तीन वर्ग आहेत. (अ) लार्व्हासिया : या वर्गातील प्राणी सूक्ष्म व भैकरांसारखे (बेडकांच्या डिंभांसारखे) दिसणारे असतात चोल अस्थायी (तात्पुरता) असतो क्लोम-दरणांची एकच जोडी असते पृष्ठरज्जू स्थायी (कायम) असते उदा., ऑइकोप्ल्यूरा, ॲपेंडिक्युलारिया (आ) ॲसिडियासिया : या वर्गातील प्राणी एकेकटे किंवा निवहजीवी असून स्थानबद्ध असतात चोलात विखुरलेले स्नायू असतात क्लोम-दरणे पुष्कळ असतात उदा., हर्डमानिया, सायोना, क्लॅव्हेलिना. (इ) थॅलिॲसिया : चोलात स्नायूंचे वर्तुलाकृती पट्टे असतात या वर्गातील प्राणी अतिपरिवर्तित असतात उदा., साल्पा, डोलिओलम [→ यूरोकॉर्डेटा].

 आ. ४. अँफिऑक्सस : सबंध प्राण्याचे पार्श्व दृश्य

(३) सेफॅलोकॉर्डेटा (शीर्ष-रज्जुमान) उपसंघ : या उपसंघातील प्राणी समुद्राच्या उथळ पाण्यात वाळूत बिळे करून राहतात, पण शरीराचे अग्र टोक वाळूच्या वर पाण्यात असते पृष्ठरज्जू शरीराच्या वरच्या भागात तंडाच्या टोकापासून शेपटीच्या टोकापर्यंत गेलेली असते. तांत्रिकारज्जू पृष्ठरज्जूच्या वर असून तितकीच लांब असते पृष्ठरज्जू व तांत्रिकारज्जू स्थायी असतात स्नायू समखंडी (सारखे खंड पडलेले) असतात ग्रसनी मोठी असून तिच्यावर पुष्कळ क्लोम-दरणे असतात देहगृहा मोठी व खंडयुक्त असते  शीर्ष, मेंदू व जबडे नसतात. या उपसंघात लेप्टोकार्डिआय हा एकच मार्ग असून त्याची लक्षणे वरीलप्रमाणेच आहेत. उदा., अँफिऑक्सस (→अँफिऑक्सस सेफॅलोकॉर्डेटा).

(४) पृष्ठवंशी उपसंघ : या उपसंघातील सर्व प्राण्यांना पृष्ठवंश अथवा पाठीचा कणा असतो या सर्वांना मोठा मेंदू असून तो मस्तिककोशात अथवा कर्परात (मेंदूला वेढणाऱ्या कवटीच्या भागात) असतो पृष्ठरज्जूची जागा कशेरुकांनी बनलेल्या अक्षीय पृष्ठवंशाने घेतलेली असते आणि त्यामुळे शरीराला मजबुती येते मेंदूच्या मागे पृष्ठवंशातून गेलेली मेरुरज्जू (मेंदूला लागून त्याच्या मागे असलेला नळीसारखा तंत्रिकारज्जूचा भाग) असते प्रारूपिक (नमुनेदार) पृष्ठवंशी प्राण्याला शीर्ष, मान, धड, उपांगांच्या दोन जोड्या आणि पृच्छ असते. या उपसंघाच्या विविध वर्गात संरचना आणि शरीरक्रिया यांच्या दृष्टीने सर्व अंग-संहतींमध्ये क्रमिक प्रगती झालेली दिसून येते. पृष्ठवंशी उपसंघ हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे त्याच्या लक्षणांचा थोडा जास्त तपशील पुढे दिला आहे.


(क) शरीरावरील त्वचा, बाह्यत्वचा आणि चर्म (बाह्यत्वचेच्या खालचे स्तर) यांची बनलेली असते बहुतेक माशांच्या शरीरावर खवले असतात सरीसृपांच्या अंगावर खवले, पक्ष्यांच्या अंगावर पिसे आणि स्तनींच्या अंगावर केस असतात पिसे आणि केस निरोधक असतात.

(ख) संधियुक्त आंतर कंकाल (सांगाडा) असतो. खालच्या प्रतीच्या पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये तो उपास्थींचा तर वरच्या दर्जाच्या प्राणीसमूहांमध्ये अस्थिमय असतो. शरीराला आकार देणे, विविध अंगांना आधार देऊन त्यांचे संरक्षण करणे हे कंकालाचे कार्य असते. त्याचप्रमाणे कंकालावर असलेल्या स्नायूंच्या आकुंचनामुळे कंकालाच्या भागांची हालचाल होते व यामुळे चलन शक्य होते. कर्परात मेंदू असतो. कर्पराला युग्मित संपुट (पिशवीसारखे आवरण) जोडलेले असून त्यात विशिष्ट ज्ञानेंद्रिय असतात. ग्रसनी-चापांच्या एका मालिकेने क्लोमक्षेत्राला आधार दिलेला असतो. काही चापांपासून जबडे आणि इतर काहींपासून शीर्षप्रदेशातील इतर संरचना बनतात. पृष्ठवंश कर्पराच्या बुडापासून शेपटीच्या टोकापर्यंत पसरलेला असतो. अवयवांच्या दोन जोड्या असून त्या मेखलांच्या (कड्यांच्या) मार्फत पृष्ठवंशाला जोडलेला असतात.

(ग) आहारनाल पृष्ठवंशाच्या खाली असून मुख शरीराच्या अग्रटोकाकडे आणि गुदद्वार धडाच्या मागच्या टोकावर असते. मुखात जीभ आणि बहुधा दात असतात. यकृत व अग्निपिंड या दोन पचन ग्रंथी असून त्यांचा स्राव वाहिन्यांमधून आंत्रात जातो.

(घ) खालच्या दर्जाच्या पृष्ठवंशी प्राण्यांचे श्वसन क्लोमांनी आणि भूचर प्राण्यांचे फुप्फुसांनी होते.

(च) परिवहन तंत्र संवृत (बंद) प्रकाराचे असून त्यात हृदय, रोहिण्या (हृदयापासून शरीराच्या भागांना रक्त नेणाऱ्या सूक्ष्म वाहिन्या) आणि शिरा यांचा समावेश होती. हृदय आहारनालाच्या खाली असून ते प्राणी ज्या वर्गातील असेल त्याप्रमाणे व्दिकोष्ठ, त्रिकोष्ठ किंवा चतुर्कोष्ठ असते. रक्तच्या प्लाविकेत (ज्यात रुधिरकोशिका लटकत असतात अशा रक्तातील पाण्यासारख्या पातळ द्रव पदार्थात) पांढऱ्या रुधिरकोशिका आणि तांबड्या रुधिरकोशिका असतात तांबडया रुधिरकोशिकांत हीमोग्लोबिन (लाल रंग उत्पन्न करणारे लोहयुक्त प्रथिन) हे श्वसनरंजक (ज्याच्या व्दारा प्राण्याच्या शरीरातील ऊतकांना म्हणजे) समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांना ऑक्सिजनाचा पुरेसा पुरवठा होतो तो रक्तात असणारा पदार्थ असते. लसीकावाहिकांचे (ऊतकांकडून रक्तात जाणाऱ्या आणि रक्तद्रवाशी साम्य असलेला द्रव पदार्थ नेणाऱ्या वाहिन्यांचे) तंत्र असते.

(छ) वृक्क (मूत्रपिंड) उत्सर्जनाचे (निरुप्योगी पदार्थ बाहेर टाकण्याचे) कार्य करतात त्यांची एक जोडी असते खालच्या दर्जाच्या पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये ते खंडयुक्त असून देहगुहा आणि रक्त या दोहोंमधून क्षेप्यद्रव्ये (निरुपयोगी पदार्थ) गोळा करून वाहिन्यांमधून बाहेर सोडतात उच्च दर्जाच्या पृष्ठवंशींमध्ये ते खंडयुक्त नसून फक्त रक्तातून क्षेप्यद्रव्ये गोळा करतात मूत्रवाहिन्या गुदव्दाराजवळ किंवा अवस्करात (ज्यात आंत्र, जननवाहिन्या आणि मूत्रवाहिन्या उघडतात अशा शरीराच्या मागच्या टोकाकडे असणाऱ्या समाईक कोष्ठात) उघडतात काहींमध्ये मूत्राशय असतो.

(ज) मेंदू जास्त गुंतागुंतीचा असतो संरचना आणि कार्य या दोन्ही दृष्टींनी मेंदूचे निरनिराळे भाग पडलेले असतात. उच्च प्रतीच्या पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये प्रमस्तिष्क-गोलार्ध (मेंदूचा अग्र भाग) आणि निमस्तिष्क (मेंदूचा मागचा भाग) मोठे होतात मस्तिष्क तंत्रिकांच्या (मेंदूपासून निघणाऱ्या तंत्रिकांच्या) १०-१२ जोड्या असतात व त्या संवेदी आणि प्रेरक क्रिया पार पडतात मेरुरज्जूपासून भैरव तांत्रिकांच्या कित्येक जोडया निघतात एका स्वायत्त तंत्रिका तंत्राने (अनैच्छिक स्नायू व ग्रंथी यांना तंत्रिकांचा पुरवठा करणाऱ्या प्रेरक तंत्रिकातंतूंच्या तंत्राने) आंतरांगांच्या अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण होते.

(झ) पृष्ठवंशी प्राण्याच्या शरीरात कित्येक अंतःस्त्रावी ग्रंथी (ज्यांचा स्त्राव नेण्याकरिता वाहिन्या नसल्यामुळे तो रक्तात एकदम मिसळतो अशा ग्रंथी) असतात यांचे स्त्राव अथवा प्रवर्तके (उत्तेजक स्त्राव, हॉर्मोने) रक्तातून शरीरात निरनिराळया ठिकाणी जातात व शरीराच्या विविध क्रिया, वाढ आणि जनन यांचे नियंत्रण करतात.

(ट) लिंगे बहुधा भिन्न असतात प्रत्येक प्राण्यात जनन ग्रंथींची एक जोडी असते. या ग्रंथींत तयार झालेली युग्मके (जनन-कोशिका म्हणजे शुक्राणू व अंडाणू) वाहिन्यांमधून बाहेर पडतात.

वर्ग १. सायक्लोस्टोमाटा (गोलमुख वर्ग) : जिवंत पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये गोलमुख हे अत्यंत आद्य प्राणी होत. सिल्युरियन आणि डेव्होनियन (सु.४०-३६.५ कोटी वर्षापूर्वीच्या) कालातील मत्स्यसदृश कवचन्वित ऑस्ट्रॅकोडर्म यांचे जवळचे संबंधी होते. या वर्गातील काही प्राणी समुद्रात तर काही गोड्या पाण्यात राहणारे आहेत.

आ. ५. लँप्री (पेट्रोमायझॅान मॅरिनस)

गोलमुखांचे शरीर दंडगोलाकार, सडपातळ व लांब असते. त्वचा मृदू आणि गुळगुळीत असून तिच्यात पुष्कळ एककोशिक श्लेष्मग्रंथी (एक प्रकारचा गिळगिळीत पदार्थ स्रवणाऱ्या ग्रंथी) असतात. खवले, जबडे आणि पक्षांच्या (हालचालीस वा तोल सांभाळण्यास उपयुक्त असणाऱ्या त्वचेच्या स्नायुमय घडयांच्या, परांच्या) जोडया नसतात. मध्य-प्क्ष असून त्यांना उपास्थिमय अरांनी (कंटकांनी) आधार दिलेला असतो. मुख अधर पृष्ठावर असून वाटोळे व चूषी (चोखू शकणारे) असते त्याच्या काठावर मांसल संस्पर्शक (स्पर्शज्ञान, पकडणे, चिकटणे इ. कार्याकरिता उपयोगी पडणारी लांब तंतुसदृश इंद्रिये) अथव पिंडिका (मृदू ऊतकाचे लहान उंचवटे) असतात. नासा-कोश (नाकाची पोकळी) एकच व मध्य असतो. करोटी (कवटी) आणि ग्रसनी-चाप उपास्थिमय असतात. पृष्ठरज्जू स्थायी असते. तंत्रिकारज्जू अल्पवर्धित तंत्रिका-चापांनी वेढलेली असते. हृदयात एक अलिंद (अग्र कोष्ठ) आणि एक निलय (मुख्य संकोचशील कोष्ठ) असतो. क्लोमक्षेत्रात अनेक महारोहिणी-चाप (अधर महारोहिणीपासून निघालेली वाहिकांच्या जोड‌्यांची मालिका) असतात. रक्तात पांढऱ्या रुधिरकोशिका आणि वाटोळ‌्या, केंद्रकित तांबड‌्या रुधिरकोशिका असतात. ग्रसनीजवळ असलेल्या पिशवीसारख्या पार्श्वकोष्ठात (बाजूला असणाऱ्या कोठडीत) क्लोमांच्या ६-१४ जोड‌्या असतात. हे प्राणी अनियततापी (ज्यांच्या शरीराचे तापमान परिसराच्या तापमानाप्रमाणे बदलते असे प्राणी) असतात. वृक्क दोन असून त्यांच्या वाहिन्या जननमूत्रकोटराच्या (जनन व मूत्र वाहिन्या ज्यात उघडतात त्या खळग्याच्या) मार्गाने बाहेर उघडतात. मेंदूचे निरनिराळे भाग पडलेले असून मस्तिष्क तंत्रिकांच्या ८ किंवा १० जोड्या असतात. श्रवणेंद्रियात एक किंवा दोन अर्धवर्तुलाकृती नलिका असतात. जनन ग्रंथी मोठी व एकच असून तिला युग्मक-वाहिनी नसते. अंडयांचे निषेचन (फलन) बाहेर होते. उदा., लॅंप्री (पेट्रोमायझॉन मॅरिनस)  [ ⟶ लॅंप्री सायक्लोस्टोम].

वर्ग २. काँड्रिक्थीज (उपास्थिमत्स्य वर्ग) : या वर्गाला एलॅस्मोब्रॅंकिआय व सिलॅकिआय ही नावेही आहेत. या वर्गातील माशांच्या शरीरातील सांगाडा उपास्थींचा असतो, हा एक प्राचीन वर्ग असून आ.६ कॉंड्रिक्थीज (उपास्थिमत्स्य): शार्क (मुशी) यांच्या अवशेषांचे जीवाश्म विपुल आढळतात. या वर्गांत शर्क, रे, कायमीरा इ. माशांचा समावेश होतो. गोड्या पाण्यात राहणाऱ्या शार्क माशांच्या काही जाती वगळल्यास सर्व समुद्रात राहणारे आहेत हे सर्व हिंस्त्र आहेत.

आ. ६. काँड्रिक्यीज (उपास्थिमत्स्य) : शार्क (मुशी)


आ. ७. काँड्रिक्यीज (उपास्थिमत्स्य) :रे (पाकट).

उपास्थिमत्स्यांची त्वचा चिवट असून पट्टाम (तकटाससारख्या) शल्कांनी आच्छादिलेली असते. मध्य आणि युग्मित पक्ष असतात. श्रोणि-पक्षांच्या मध्ये आलिंगक (मैथूनाच्या वेळी उपयोगी पडणाऱ्या दंडाच्या आकारासारख्या संरचना) असतात. मुख अधर पृष्ठावर असते. दात पुष्कळ असून त्यांच्या टोकांवर दंतवल्काचे (दातावरील कॅल्शियममय बाह्य स्तराचे) टोपण असते. नासारंध्रे (नाकपुडीची भोके) एक किंवा दोन असतात आणि त्यांचा मुखगुहेशी काही संबंध नसतो. खालचा आणि वरचा  असे दोन्ही जबडे असतात. आंत्रात सर्पिल (मळसूत्राकार) कपाट (झडप) असते. कंकाल उपास्थिमय असून कर्पराला युग्मित संवेदी  संपुट जोडलेले असतात. पृष्ठरज्जू स्थायी असते. कशेरुका पुष्कळ असून पूर्ण आणि अलग अलग असतात. हृदय एक अलिंद  आणि एक निलय यांचे बनलेले असून त्यात फक्त शिरा-रुधिर (ऑक्सिजनाचे प्रमाण पुष्कळच कमी असलेले रक्त) असते. शिरा-कोटर (ज्यात शिरांत वाहणारे रक्त गोळा होते व जो अलिंदात उघडतो तो सगळयांत मागचा हृदयाचा कप्पा) आणि महारोहिणी शंकू (निलय व महारोहिणी यांच्या मधला शंकूसारखा भाग) असतो. महारोहिणी चापांच्या कित्येक जोडया असतात. तांबडया रुधिरकोशिका केंद्रकित (केंद्रके असलेल्या) आणि अंडाकृती असतात. श्वसनाकरिता पटलित (पातळ पत्रे असलेल्या) क्लोमांच्या  ५-७ जोडया असतात. वाताशय नसतो. श्वासरंध्र पृष्ठभागावर उघडते. हे प्राणी अनयिततापी असतात. लिंगे भिन्न असतात. जनन  ग्रंथी प्रारुपिकतया (नमुनेदारपणे) युग्मित (जोडीने) असतात. युग्मकवाहिन्या अवस्करात उघडतात. निषेचन आंतरिक (शरीराच्या  आत होणारे) असते. हे प्राणी अंडज किंवा अंड-जरायुज (मातेच्या गर्भाशयात फुटणारी अंडी उत्पन्न करणारे) आहेत. भ्रूणकला  (भ्रूणाभोवती उत्पन्न होणारी पातळ पटले) नसतात. रुपांतरण असते. उदा., मुशी, पाकट.

वर्ग-३. ऑस्टेइक्थीज (अस्थिमत्स्य वर्ग) : ज्यांच्या शरीरात अस्थी असतात अशा सर्व माशांचा या वर्गात समावेश होतो. यांचे शरीर सामान्यतः तर्कूच्या आकाराचे असते कंकाल अस्थिमय असून शरीर चर्मशल्कांनी (बाह्यत्वचेच्या खालील स्तरापासून निघणाऱ्या खवल्यांनी) आच्छादिलेले असते. हे सर्व प्रकारच्या पाण्यात (गोडे, खारे, मचूळ वगैरे) राहतात. फार प्राचीन काळापासून मनुष्य खाद्य म्हणून माशांचा उपयोग करीत आला आहे.

आ. ८. एक अस्थिमत्स्य-कानोशी(लेबिओ कॅल्बासू)

त्वचेत चर्मशल्क असून श्लेष्म ग्रंथीही असतात. युग्मित पक्ष आणि मध्य पक्ष असून त्यांना उपस्थि-अरांनी अथवा अस्थि-अरांनी आधार दिलेला असतो. मुख सामान्यतः अग्र टोकावर असून त्यात दात असतात. जबडे करोटीशी सांधलेले असतात. घ्राणकोश (घ्राणेंद्रिये ज्यात असतात तो कोश) दोन असतात. डोळे मोठे पण पापण्या नसतात. कंकाल वेगवेगळया अस्थींचा बनलेला असतो. कशेरुका पुष्कळ असून स्पष्टपणे वेगवेगळया असतात. पुच्छ बहुधा समपाली (दोन्ही पाळी जवळजवळ सरख्या असणारा पुच्छ-पक्ष) असते. पृष्ठरज्जूचे अवशेष पुष्कळदा टिकून राहतात. एक अलिंद व एक निलय यांचे हृदय बनलेले असते शिरा-कोटर आणि महारोहिणी-शंकू असतो. हृदयात फक्त शिरा-रुधिर असते. महारोहिणी-चापांच्या चार जोडया असतात. तांबडया रुधिरकोशिका केंद्रकित आणि अंडाकृती असतात. ग्रसनीच्या दोन्ही बाजूंना एकेक कोष्ठ असून त्यात अस्थिमय क्लोम-चापांवर क्लोमांच्या जोड्या असतात व त्या प्रच्छदाने (क्लोमांवरच्या झाकणाने) झाकेलेल्या असतात. बहुधा वाताशय असतो. मेंदूची विशेष वाढ झालेली असून मस्तिष्क-तंत्रिकांच्या दहा जोड्या असतात. लिंगे भिन्न असतात, जनन ग्रंथी प्रारुपिकतया दोन असतात. अस्थिमत्स्य सामान्यतः अंडज असतात पण काही अंड-जजरायुज तर काही जरायुज (पिल्लांना जन्म देणारे) असतात. निषेचन बाह्य असते. भ्रूणकला नसतात. कधीकधी पिल्ले प्रौढांसारखी मुळीच नसतात.

वर्ग ४. अँफिबिया (उभयचर वर्ग): पृष्ठवंशी प्राण्यांच्या इतर वर्गाशी तुलना करता आधुनिक उभयचर थोडे आहेत आणि आहेत ते विशेष महत्वाचे नाहीत. पाण्यातून जमिनीवर येणारे हे पहिलेच प्राणी असून निदान एकेकाळी तरी त्यांच्याखेरीज जमिनीवर हिंडणारे दुसरे प्राणी नव्हते. पण आज त्यांच्याच वंशजांनी-सरीसृप, पक्षी आणि स्तनी-महत्वाच्या दृष्टीने त्यांना मागे टाकले आहे.

आ.९. अँबिस्टोमा (उभयचर)

उभयचरांच्या जीवाश्मांशी तुलना केल्यास आधुनिक उभयचरांची संख्या सापेक्षतया कमी आहे या वर्गातील प्राणी अनियततापी असून ते पाण्याच्या आसपास, दमट जागी किंवा गोड्या पाण्यात आढळतात. खारे पाणी त्यांना मारक असल्यामुळे ते समुद्रात केव्हाही आढळत नाहीत. त्वचा ओलसर असते. फुप्फुसे श्वसनेंद्रिये म्हणून विशेष कार्यक्षम नसल्यामुळे त्वचेचा श्वसनांग म्हणून उपयोग होतो. त्वचेवर खवले किंवा केस नसतात. डिंभावस्थेत क्लोम नेहमी असतात काहींच्या प्रौढदशेतही ते टिकून राहतात. प्रौढांमध्ये फुप्फुसे असतात. हृदय त्रिकोष्ठ (दोन अलिंद, एक निलय) असते. शिरा-कोटर असते. अवस्कर आणि मूत्राशय असतात. बाह्यकर्ण नसल्यामुळे कर्णपटल (कानातला पडदा) उघडे असते. पंचांगुल (प्रत्येकी पाच बोटे असणाऱ्या) पादांच्या दोन जोड्या असतात. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या पायांची बोटे पातळ त्वचेने जोडलेली असतात. बोटांवर नखर नसतात. लिंगे भिनन असतात. उदा., बेडूक, भेक, सॅलॅमॅंडर [ ⟶ उभयचर वर्ग].

वर्ग ५. रेप्टिलिया (सरीसृप वर्ग): या वर्गातील प्राण्यांची कित्येक महत्वाच्या बाबतींत उभयचरांपेक्षा जास्त प्रगती झालेली आहे. बहुतेक सरीसृप भूचर असून जमिनीवर राहण्याकरिता त्यांचे अनुकूलन झालेले आहे. काही पाण्यात राहणारेही आहेत. या वर्गात सरडे, साप, कासवे, मगर इत्यादींचा समावेश होतो. सरीसृप अनियततापी आहेत.

आ.१०. सरीसृपांचा एक नमुना : पाल.

त्वचा शुष्क असून तिच्यावर बाह्यतवचीय शृंगमय (केराटिन नावाच्या एका प्रकारच्या प्रथिनापासून बनलेले) शल्क अथवा अस्थिमय पट्ट असतात. पंचांगुल पादांच्या दोन जोडया असून बोटांवर नखर असातत. काही सरड्यांचे पाद फार लहान असतात, तर काही सरडयांत व सापात ते मुळीच नसतात. समुद्रातील कासवांचे पाय वल्ह्यांसारखे असतात. कंकाल पूर्णपणे अस्थिमय असतो. पश्चकपालास्थिकंद (पश्चकपालास्थीवरील पुढे आलेला अस्थीचा वाटोळा फुगीर भाग) एकच असतो. बरगड्या असतात. श्वसन फुप्फुसांच्याद्वारे होते.

 


 

 

आ.११. सरीसृपांचा एक नमुना : ॲलिगेटर

पाणकासवांमध्ये अवस्करश्वसन (अवस्करामार्फत होणारे श्वसन) आढळते. हृदयात दोन अलिंद आणि अंशतः विभागलेला एक निलय असतो नक्र गणातील (मगरीच्या गणातील) प्राण्यांच्या निलयाचे पूर्णपणे दोन भाग पडलेले असतात. महारोहिणी-चापांची एकच जोडी असते. तांबडया रुधिरकोशिका अंडाकृती, केंद्रकित व उभयोत्तल (दोन्ही बाजूंनी बहिर्गोल) असतात. करोटी (डोक्याची कवटी) उभयचरांच्या करोटीपेक्षा लांब असून मस्तिष्क-तंत्रिकांच्या बारा जोड्या असतात. मैथुनांग (मैथुनाकरिता उपयोगी पडणारे इंद्रिय) असते. निषेचन आंतरिक असते. अंडी मोठी असून त्यांत पुष्कळ पीतक (अंड्यांत असलेले निर्जीव पोषक द्रव्य) असते त्यांच्यावर चामट किंवा कॅल्शियममय कवच असते. सरीसृप सामान्यतः अंडी घालतात पण काही सरडे आणि साप अंड-जरायुज असतात. विकासात  भ्रूणकला (उल्ब, जरायू, पीतक-कोश आणि अपरापोषिका) असतात [ ⟶ भ्रूणविज्ञान. डिंभावस्था व रुपांतरण नसते. उदा., कासव, सरडा, साप इत्यादी  [→ सरिसृप वर्ग] .

वर्ग ६. ऍव्हीज (पक्षी वर्ग): अंगावरील पिसे आणि हवेत उडण्याची क्षमता या दोन लक्षणांमुळे पक्षी सहज ओळखता येतात. इतर कोणत्याही प्राण्यांमध्ये पिसे आढळत नाहीत. बहुतेक पक्षी दिनचर असल्यामुळे सहज दृष्टीस पडतात. त्यांचे विविध रंग आणि आवाज माणसाचे मन आकर्षित करुन घेतात.

आ.१२. पक्षी- हिरवी मुनिया

पक्षी नियततापी (ज्यांच्या शरीराचे तापमान पिरसराच्या तामानापेक्षा स्पष्टपणे उच्च व स्थिर असते असे) प्राणी असून उड्डाणाकरिता त्यांच्या शरीराचे अनुकूलन झालेले असते. हे अनेक प्रकारे अतिविशेषित प्राणी आहेत. शरीर पिसांनी झाकलेले असून उडण्याच्या कामी आणि शरीराचे उच्च तापमान कायम टिकविण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. त्वचा पातळ आणि शुष्क असते. अवयवांच्या दोन जोडया असून पुढच्या जोडीच्या परिवर्तनाने उडण्याकरिता उपयोगी पडणाऱ्या पंखांची जोडी बनलेली असते. अवयवांच्या मागच्या जोडीचे चालण्याकरिता, धावण्याकरिता, पोहण्याकरिता व उंच जागी (तारेवर, झांडांच्या डहाळीवर वगैरे ठिकाणी) बसण्याकरिता अनुकूलन झालेले असते. पश्च पाद मोठे आणि मजबूत असून प्रत्येकावर चार बोटे असतात. नडगी आणि बोटे यांवर शृंगित (केराटिनयुक्त) त्वचेचे आवरण असते. बोटांवर नखर (नख्या) असतात. कंकाल वजनाला हलका पण मजबूत व पूर्णपणे अस्थिभूत (हाडांचा बनलेला) असतो. चोच शृंगी असते. आधुनिक पक्ष्यांना दात नसतात. कर्परगुहा (मेंदू असलेली पोकळी) मोठी असते. पश्चकपालास्थिकंद एकच असतो. श्रोणीचे (ढुंगणाच्या हाडांचे) पुष्कळ कशेरुकांशी सायुज्यन (एकत्रीकरण) झालेले असते. उरोस्थी मोठी असून सामान्यतः तिच्या मध्यावर कणा असतो. पुच्छ-कशेरुका थोड्या व बदलेल्या असतात. फुप्फुसे घट्ट व बरगड्यांना चिकटलेली असतात. फुप्फुसांपासून अतिशय पातळ भित्ती असलेले वायु-कोश निघून ते आंतरांगांच्या मध्ये असणाऱ्या जागांत शिरलेले असतात. कूजित्र (पक्ष्याचे ध्वनियंत्र) श्वासनालाच्या बुडाशी असते. हृदय दोन अलिंद आणि दोन निलय यांचे बनलेले असते. महारोहिणी-चाप फक्त उजव्या बाजूलाच असतो. तांबडया रुधिरकोशिकाकेंद्रकित, उभयोत्तल व अंडाकृती असतात. मूत्राशय नसतो. मस्तिष्कतंत्रिकांच्या बारा जोड्या असतात. पक्ष्याच्या मादीला बहुधा फक्त डाव्या बाजूचा अंडाशय व अंडवाहिनी असते. निषेचन आंतरिक असते. मादी नेहमी अंडी घालते. अंडी मोठी असून त्यांत पीतकाचा बराच साठा असतो. अंडयाचे कवच कठीण व कॅल्शियममय असते. अंडयाच्या आत भ्रूणाचा विकास होत असताना उल्ब, जरायू, पीतक-कोश आणि अपरापोषिका या भ्रूणकला असतात. नर व मादी पिल्लांची जोपासना करतात.

पक्षी वर्गाचे दोन उपवर्ग केलेले आहेत: (१) आर्किऑर्निथीज (आद्यविहंग-उपवर्ग) आणि (२) निऑर्निथीज (नवविहंग-उपवर्ग). पहिल्या उपवर्गात सरीसृपांची लक्षणे ज्यांत स्पष्ट दिसतात अशा सव लुप्त (निर्वंश झालेल्या) पक्ष्यांचा समावेश केलेला आहे उदा., आर्किऑप्टेरिक्स. दुसऱ्या उपवर्गात सर्व आधुनिक पक्ष्यांचा अंतर्भाव होतो [⟶ पक्षि वर्ग].

आ.१३. स्तनी वर्गातील काही प्राणी : (अ) अंडज स्तनी उपवर्गातील 'डकबिल' (आ) शिशुघानस्तनी उपवर्गातील वॅालबी.

वर्ग ७. मॅमॅलिया (स्तनी वर्ग): स्तनी वर्ग हा प्राणिसृष्टीतील सर्वोच्च वर्ग आहे. उंदीर, ससा, मांजर, कुत्रा, माकड, हरिण, गाय, घोडा, उंट, हत्ती, देवमासा, माणूस इ. अनेक प्राणी या वर्गातील आहेत. सर्वाच्या अंगावर केस असतात. स्तनी वर्गातील सर्व प्राणी नियततापी असतात. माद्यांच्या स्तनग्रंथीमध्ये उत्पन्न होणाऱ्या दुधावर पिल्लांचे पोषण होते. या वर्गातील प्राण्यांमध्ये पिल्लांच्या पालन पोषणाच्या जाणीवेची चांगलीच प्रगती झालेली असून माणसात तर ती कळसाला पोहोचलेली आहे. ध्रुवप्रदेश, समशीतोष्ण व उष्णकटिबंध, समुद्र, घनदाट अरण्य आणि रखरखीत वाळवंट अशा सर्व ठिकाणी विविध सस्तन प्राणी राहतात. बहुतेक दिनचर आहेत पण काही निशाचर असल्यामुळे क्वचितच दिसतात.

शरीरावर दाट किंवा विरळ केस असून ठराविक काळाने त्यांचे निर्मोचन होते (गळून पडतात). त्वचेमध्ये स्नेहग्रंथी (ज्यांच्या स्त्रावाने चरबी उत्पन्न होते अशा ग्रंथी), स्वेदग्रंथी (घामाच्या ग्रंथी), गंधग्रंथी व स्तनग्रंथी असतात. पश्च कपालास्थिकंद दोन असतात. मानेमध्ये सात कशेरुका असतात. शेपूट लांब असून हलविता येते. दोन्ही जबड्यांत दात असून ते गर्तिकांमध्ये (खळग्यांत) घट्ट बसविलेल असतात.

आ.१४. स्तनी वर्गातील काही प्राणी : (१) वटवाघूल ,(२) चौशिंगा,(३) गेंडा,(४) हत्ती,(५) देवमासा.

अन्नाचा प्रकार आणि ते खाण्याची रीत यांना अनुसरून दातांचे विभेदन (वेगवेगळे प्रकार होणे) झालेले असते. जीभ हलविता येते. डोळयांच्या पापण्या हलविता येतात. कानांना बाह्य, मांसल कर्णपाली (कानाच्या पाळी) असतात. उपांगांच्या दोन जोड्या असतात. प्रत्येक पायावर पाच बोटे असतात. चालणे, धावणे, वर चढणे, जमिनीत बिळे करणे, पोहणे इ. कामांकरिता पायांचे अनुकूलन झालेले असते. बोटांवर शृंगी नखर, नखे किंवा खूर असतात. पुष्कळदा तळ पायावर मांसल गाद्या असतात. एका पूर्ण स्नायुमय मध्यपटलाने वक्षगुहा (छातीची गुहा) उदरगुहेपासून (पोटाच्या गुहेपासून) अलग झालेली असते. वक्षगुहेत हृदय आणि फुप्फुसे असतात. हृदय दोन अलिंद व दोन निलय यांचे बनलेले असते. फक्त डावा महारोहिणीचाप असतो. तांबड्या रुधिरकोशिका सामान्यतः वाटोळया व अकेंद्रकित असतात. मूत्राशय असतो. मेंदू अतिविकसित असून प्रमस्तिष्क आणि निमस्तिष्क ही दोन्ही मोठी असतात. मस्तिष्कतंत्रिकांच्या बारा जोड्या असतात. नराचे वृषण (जनन ग्रंथी) सामान्यतः उदराबाहेर असलेल्या मुष्कात (वृषण जिच्यात असतात त्या उद्‌राबाहेर लोंबणाऱ्या पिशवीत) असतात. शिश्न (मैथुनेंद्रिय) असते. निषेचन आंतरिक असते. अंडी सामान्यतः सूक्ष्म असून त्यांच्यावर कवच नसते. मादीच्या गर्भाशयात निषेचित अंडयांची वाढ होते. उल्ब, जरायू आणि अपरापोषिका या भ्रूणकला असतात. अपरेने (वारेने) भ्रूण गर्भाशयाला जोडलेला असतो. भ्रूणाचे पोषण आणि श्र्वसन अपरेच्या व्दारे होते. जन्मानंतर पिल्लांचे पोषण स्तनात उत्पन्न होणाऱ्या दुधावर होते.स्तनी वर्गाचे प्रोटोथेरिया (अंडजस्तनी), मेटॅथेरिया (शिशुधानस्तनी) आणि यूथेरिया (जरायुस्तनी) असे तीन उपवर्ग केलेले आहेत [ ⟶ स्तनि वर्ग].

 

 

संदर्भ: 1. Barrington, E. J. W. The Biology of Hemichordata and Protochordata, San Francisco, 1965.

2. Young, C. Z. The Life of Vertebrates, Oxford, 1962.

3. Weichert, C. K. Anatomy of the Chordates, New York, 1965.

 

कर्वे, ज.नी