सागरीकाकडीसागरी काकडी : (सी कुकुंबर). ⇨ एकायनोडर्माटा संघातील ⇨ होलोथूरॉयडिया वर्गातील सागरी प्राणी. याच्या सु. ५०० जाती आहेत. या संघातील इतर प्राण्यांपेक्षा या वर्गातील प्राण्यांचा आकार वेगळा असतो. हे प्राणी लांबट असून अळीसारखी हालचाल करू शकतात. जगातील सर्व समुद्रांत ते सापडतात. हे बहुधा समुद्रतळाच्या वाळूत तोंड खुपसून बसतात त्यांच्या शरीराचा मागील भाग तेवढा बाहेर राहतो.

सागरी काकडींचा आकार २-३ सेंमी.पासून काही मीटरपर्यंत असतो. त्यांचा रंग मंद राखाडी, तपकिरी ते काळसर असतो काही भडक रंगाचेही असतात. इतर एकायनोडर्माटा संघातील प्राण्यांमध्ये जी अरीय सममिती (ज्या स्थितीत प्राण्याचे शरीर मध्य भागातून जाणाऱ्या कोणत्या ही एका उभ्या पातळीतून विभागले असता त्याचे दोन सारखे अर्धे भाग पडतात ती स्थिती) असते ती यांच्यात दिसत नाही. या प्राण्यात द्विपार्श्व सममिती (ज्या स्थितीत एखाद्या प्राण्याच्या शरीराचे फक्त एकाच पातळीतून विभागून दोन सारखे अर्धे भाग करता येतात ती स्थिती) असते. यांच्या शरीराच्या पृष्ठीय व अधर अशा दोन बाजू स्पष्ट दिसतात. अधर बाजूला नालपादांच्या (चालण्याकरिता उपयोगी पडणाऱ्या आणि जलवाहक तंत्राशी जोडलेल्या नळीसारख्या बारीक पायांच्या) तीन ओळी असतात. या नालपादांना चूषक असतात. त्यांच्यामुळे प्राणी हालचाल करू शकतात. ही बाजू नेहमी जमिनीला टेकलेली असते. पृष्ठीय बाजू नेहमी वर असते. तिच्यावर नालपादांच्या दोनच ओळी असून त्या श्वसनक्रियेत भाग घेतात.

शरीराचे आवरण चिवट जाड असते. शरीरभित्तिकेत अगदी सूक्ष्म कंटिका (सिलिकेच्या किंवा कॅल्शियमाच्या बनलेल्या सुईसारख्या बारीक संरचना) असतात. शरीराच्या एका बाजूला मुख व त्याच्या विरुद्घ बाजूला अवस्कर (ज्यात आंत्र, युग्मक वाहिन्या व मूत्रवाहिन्या उघडतात असा शरीराच्या मागच्या टोकाकडे असणारा समाईक कोष्ठ) असतो. मुखाभोवती १० ते ३० शाखा असलेली स्पर्शके (पुष्कळ अपृष्ठवंशी प्राण्यांच्या डोक्यावर असलेली आणि स्पर्शज्ञान, शोध घेणे, पकडणे किंवा चिकटणे इ. कार्यांकरिता उपयोगात आणली जाणारी लांब सडपातळ व लवचिक इंद्रिये) एखाद्या झाडाप्रमाणे असतात. मुख व अवस्कर यांमधील देहगुहा (सीलोम) पाण्याने भरलेली असते. या देहगुहेच्या स्नायूंच्या हालचालींमुळे प्राणी एखाद्या अळीप्रमाणे हालचाल करतो.

आहारनाल (अन्न ग्रहण करणारा आणि त्याचे पचन व जीवद्रव्यात रूपांतर करणारा मुखापासून गुदद्वारापर्यंत असणारा नळीसारखा मार्ग) नलिकेसारखा व प्राण्याच्या शरीरापेक्षा तिप्पट मोठा असल्याने वेटोळ्यात असतो. ग्रसिका (ग्रसनी व जठर यांच्यामध्ये असणारा आहारनालाचा भाग) लहान असते. या प्राण्यांचे अन्न म्हणजे समुद्रतळाशी असलेले जैव पदार्थ होय. देहगुहेत पसरलेला श्वसन वृक्ष अवस्करात उघडतो. अवस्कर शरीरभित्तिकेला स्नायूंनी जोडलेला असतो. पाणी आत घेणे व बाहेर टाकणे हे कार्य अवस्कर करतो. जलवाहक तंत्रात (या प्राण्यांच्या शरीरात ज्या वाहिन्यांमधून पाण्यासारख्या पातळ द्रवाचे अभिसरण होते त्या वाहिन्यांच्या बनलेल्या तंत्रात) एक मॅड्रेपोराइट (एक चापट, वाटोळे किंवा पंचकोनी पृष्ठावर खोबणी असलेले व आरपार भोक पडलेले कॅल्शियमी तकट) व ग्रसिकेभोवती असणारा वर्तुळाकार निनाल यांचा समावेश असतो. या निनालापासून स्पर्शकांकडे व शरीरावर असणाऱ्या पाच निनालांकडे शाखा जातात. यांपासूनच नालपाद निघतात. तंत्रिका (मज्जा) वलय ग्रसिकेभोवती असते व त्यापासून तंत्रिका तंतू (मज्जातंतू) सर्व शरीरभर पसरतात.

बहुतेक जातींत लिंगे भिन्न असतात. क्वचित काही जाती एकलिंगीही आहेत. जननग्रंथी तंतूंच्या पुंजक्यासारख्या असून स्पर्शकांजवळ पृष्ठीय बाजूला एका छिद्राने बाहेर उघडतात. अंड व शुक्राणू त्या छिद्राद्वारे बाहेर टाकले जातात अंडाचे फलन शरीराबाहेर होते आणि त्यापासून ऑरिक्युलॅरिया डिंभ (एखाद्या प्राण्याची भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्वावस्था) तयार होतो. काही जातींत प्राण्यांच्या शरीरातही अंडाचे फलन होते.

इतर एकायनोडर्म प्राण्यांप्रमाणे यांच्यातही पुनर्जनन दिसते. काही मोठे प्राणी संकट आले असता आपले सर्व आंतरांग (शरीराच्या विविध गुहांमध्ये असलेली आंतरिक इंद्रिये अथवा अंगे) बाहेर टाकतात व नंतर पुन्हा त्यांचे पुनर्जनन होऊ शकते. [⟶ पुनर्जनन].

काही मोठे होलोथूरियन प्राणी गोड्या पाण्यात १५ ते २० मिनिटे उकळवितात व नंतर सुकवितात. त्याला ट्रेपांग म्हणतात. हा पदार्थ चिनी लोक आवडीने खातात. यात औषधी गुणधर्म आहेत असे समजतात.

संदर्भ : Storer, T. I. Usinger, R. L. General Zoology, New York, 1957.

चिन्मुळगुंद, वासंती रा.