घार : घार फॅल्कॉनिडी या पक्षिकुलातील आहे. हिचे शास्त्रीय नाव मिल्व्हस मायग्रान्स असे आहे. हा पक्षी भारतात सगळीकडे आणि हिमालयात २,४४० मी. उंचीपर्यंत आढळतो.

सगळ्यांच्या परिचयाचा हा पक्षी गिधाडापेक्षा काहीसा लहान असून त्याची लांबी सु. ६१ सेंमी. असते. घारीचा रंग तपकिरी असतो डोके बसके चोच काळी आणि आकडीसारखी

घार

चोचीच्या बुडापासचा मांसल भाग (मेदुर) पिवळसर डोळे तपकिरी पाय आखूड, पिवळे व पिसांनी झाकलेले नख्या तीक्ष्ण व काळ्या पंख लांब व टोकदार शेपूट लांब व दुभागलेले असते.

घार माणसाच्या सहावासात राहणारी आहे. दाट वस्तीच्या गावात किंवा शहरात ती असतेच, पण दोनचार झोपड्यांच्या केवळ नाममात्र खेड्यातही ती दिसून येते. हिची उडण्याची शक्ती असामान्य आहे. तासन्‌तास ती आकाशात बऱ्याच उंचीवर उडत असते किंवा पंख पसरून बराच वेळ तरंगत असते. उडत असताना तिची तीक्ष्ण दृष्टी सारखी जमिनीकडे असते. एखादा साप, बेडूक, कोंबडीचे पिल्लू, सरडा किंवा उंदीर जमिनीवर हिंडताना दिसला की, ती वेगाने खाली येऊन त्याच्यावर झडप घालून तीक्ष्ण नख्यांनी त्याला पकडून झाडावर नेते व चोचीने टोचून ठार मारते. नंतर चोचीने त्याचे लचके तोडून खाते. वाळवी, गांडुळे, किडे वगैरेसुद्धा ती खाते. थोडक्यात सांगायचे तर खाण्याजोगा कोणताही पदार्थ तिला चालतो.

कावळ्याप्रमाणेच मनुष्यवस्तीतील घाण नाहीशी करण्याच्या कामी तिची मदत होते. उडत असताना किंवा स्वस्थ बसली असताना मधून मधून घार चीं ऽऽ हि ऽ ही, चीं ऽऽ हि ऽऽ ही असा एक प्रकारचा सुरेल आवाज काढते.

घारीच्या प्रजोत्पादनाचा काळ सप्टेंबरपासून एप्रिलपर्यंत असतो, पण वेगवेगळ्या प्रदेशांत तो थोडा पुढेमागे होतो. घरटे झाडावर उंच ठिकाणी फांद्यांच्या दुबेळक्यात असून काटक्या, चिंध्या वगैरेंपासून कसेतरी तयार केलेले असते. मादी दोन-चार अंडी घालते. ती पांढरी असून त्यांत गुलाबी छटा असते. अंड्यावर तांबूस तपकिरी ठिपके असतात. नर व मादी मिळून सर्व गृहकृत्ये पार पाडतात.

पहा : मोरांगी घार.

कर्वे, ज. नी.