पेट्रेल : ॲल्बट्रॉस पक्ष्यांशी [→ ॲल्बट्रॉस ] संबद्ध असणाऱ्या सागरी पक्ष्यांच्या गटातील पक्षी. त्यांची विभागणी दोन कुलांत करतात व त्या कुलांचा समावेश प्रोसेलॅरिफॉर्मिस गणात होतो. पाय लहान असून पायांना बदकासारखे पडदे असतात व नाकपुड्या नलिकाकृती असतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. नलिकाकृती नाकपुड्या एकमेकींना व चोचीच्या बुडाशी जोडलेल्या असतात, तर ॲल्बट्रॉसमध्ये दोन्ही बाजूंना त्या स्पष्ट वेगळ्या दिसतात. त्यामुळे पेट्रेलांचा समावेश प्रोसेलॅरिडी पक्षिकुलात होतो. बहुतेकांचे पादांगुष्ट (पायाची बोटे) ॲल्बट्रॉसपेक्षा चांगले विकास पावलेले असतात. त्याचे पंख लांब व टोकदार असतात. शेपटी आखूड पण विविध आकारांची असते. पिसे दाट व ओशट असल्यामुळे पाण्याने भिजत नाहीत. चोच काहीशी आकड्यासारखी असते. ते आपला बहुतेक वेळ समुद्रावर घालवितात व फक्त अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात. अत्यंत मोठ्या वादळातही ते समुद्रावर घिरट्या घालीत असतात.

पेट्रेलांच्या बहुधा ७५ जाती असाव्यात व त्यांचा प्रसार सर्वत्र आहे. ते लहान सागरी प्राण्यांवर उपजीविका करतात. जहाजांवरून टाकलेले सर्व प्रकारचे अन्न ते मिळवितात व त्यांना चरबी फारच आवडत असावी असे दिसते. त्यासाठी ते जहाजामागे दूरवर व सलग पुष्कळ दिवस जातात आणि जेथे अन्न आढळेल अशा ठिकाणी त्यांचे मोठाले थवे जमतात. त्यांना त्रास दिल्यास ते अत्यंत घाणेरड्या वासाचा द्रव ओकतात.

लीच पेट्रेल

अंडी घालण्यासाठी ते समुद्रालगतच्या ठिकाणी मोठ्या समूहाने जमतात. त्यांची घरटी कपारीत असतात. त्यासाठी बहुधा ते बिळे करतात किंवा सशासारख्या बिळे करणाऱ्या प्राण्याने पाडलेल्या बिळांत राहतात. जमीन फारच कठीण असेल व बिळे पाडणे शक्य नसेल तेव्हा पुष्कळ माद्या एकाच बिळांत अंडी घालतात. मादी एक पांढरे अंडे घालते. पिलाची वाढ फारच हळू होते. माद्या दिवसा समुद्रकिनाऱ्यावर आढळत नाहीत कारण त्या दिवसभर घरट्यांत लपून बसतात व अन्न शोधण्यासाठी रात्री बाहेर पडतात.

पेट्रेल वेगाने पाण्याजवळून उडतात. भक्ष्य शोधीत असताना आपले पंख पसरून वरचेवर तरंगतात. त्यामुळे ते पाण्यावरून चालत किंवा पळत आहेत असा भास होतो आणि त्यावरून त्यांना पेट्रेल हे नाव दिले आहे, कारण सेंट पीटर पाण्यावर चालले होते असे मानले जाते. हे पक्षी दिसले म्हणजे वादळ होते असा मच्छीमारांमध्ये समज आहे व त्यातील एकाद्या पक्ष्याची शिकार करणे दुर्भाग्याचे समजतात आणि म्हणूनच वादळी पेट्रेल (पेलॅगोड्रोमा पेलॅजिका) हे नाव सर्वपरिचित जातीला देतात. राक्षसी पेट्रेलाच्या (मॅक्रोनेक्टिस जायगॅन्टियस) पंखांचा विस्तार १.८—२.१ मी. असतो. उत्तर अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर आढळणारा व सर्वांच्या माहितीचा लीच पेट्रेल १५ सेंमी. लांब असून सर्व पाणपक्ष्यांत लहान आहे. हा सुदंर पक्षी काळा असतो व त्याच्या ढुंगणाचा भाग पांढरा असतो. तो अत्यंत कौशल्याने अविश्रांतपणे लाटांवरून जात असतो. सूर मारणाऱ्या पेट्रेलांचा वेगळा गट असून त्यांचा समावेश पेलिकनॉयडिडी पक्षिकुलात होतो. ते २०—२२ सेंमी. लांब असतात आणि ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथे मोठ्या संख्येने आढळतात. लाटांमधून पूर्ण वेगाने सूर मारण्याबद्दल ते प्रसिद्ध आहेत.

जमदाडे, ज. वि.