बहुरूपता : (अनेकरूपता). एकापेक्षा अधिक रूपांत अस्तित्वात राहण्याचा पदार्थांचा वा सजीवांचा गुण. रसायनशास्त्र, स्फटीकविज्ञान आणि जीवविज्ञान यांमध्ये ही संज्ञा वापरण्यात येते व या विषयांनुसार या संज्ञेचे खाली विवरण दिले आहे.

रसायनशास्त्र : काही मुलद्रव्ये व संयुगे बहुरूपी असतात. उदा., कार्बन, गंधक, कॅल्शियम कार्बोनेट इत्यादी बहुरूपांचे भौतिक गुणधर्म निराळे असून त्यांचे एकमेकांत रूपांतर करता येते. रूपांतर होण्यासाठी लागणारा कालावधी काही सेकंद इतका थोडा किंवा काही वर्षांइतका दीर्घ असू शकतो व तो पदार्थानुरूप वेगवेगळा असतो. तापमानात वाढ केली असता रूपांतर जास्त त्वरेने घडून येते त्यावर दाबाचा परिणाम फारसा होत नाही. प्रत्येक रूपाबरोबर काही ऊर्जेचे साहचर्य असते व त्यामुळे रूपांतर होताना उष्णता शोषली जाते किंवा बाहेर टाकली जाते. ज्या रूपाची ऊर्जा सर्वांत कमी असेल, ते रूप स्थायी असते. ठराविक परिस्थितीत स्थायी रूपाचा बाष्पदाब इतर रूपांच्या बाष्पदाबापेक्षा कमी असतो, तसेच त्याची ठराविक विद्रावकात विद्राव्यता (विरघळविणाऱ्या पदार्थात विरघळले जाण्याची क्षमता) जास्त असते. बहुरूपी पदार्थाच्या बाष्पाचे संद्रवण केले किंवा वितळलेल्या स्थितीतून अथवा विद्रावकातून त्याचे स्फटिकीभवन होऊ दिले, तर प्रथम त्याचे अस्थायी रूप निर्माण होते आणि नंतर त्या परिस्थितीत जे रूप स्थायी असेल त्यात त्याचे रूपांतर होते.

प्रकार : बहुरूपतेचे तीन प्रकार पडतात : (१) स्थिरैकरूपी, (२) तापमानानुवर्ती व (३) गतिक.

(१) स्थिरैकरूपी : यामध्ये बहुरूपांपैकी एकच रूप स्थायी असते. दुसरी रूपे अस्थायी असून त्यांची प्रवृत्ती स्थायी रूपात जाण्याची असते. स्थायी रूपाचे अस्थायीमध्ये रूपांतर करणे कठीण असते.

(२) तापमानानुवर्ती : यामध्ये ठराविक तापमानाच्या पल्ल्यात निरनिराळी रूपे अस्तित्वात असतात. ज्या तापमानाला एका रूपाचे दुसऱ्यात रूपांतर होते, त्याला संक्रमण बिंदू म्हणतात. या तापमानाला दोन्ही रूपांचा बाष्पदाब व एखाद्या विद्रावकात असणारी विद्राव्यता सारखी असते.

(३) गतिक : या प्रकारात सर्व रूपे भौतिक परिस्थितीच्या विस्तृत पल्ल्या त एकत्र अस्तित्वात असतात. या पल्ल्या च्या मर्यादेत परिस्थितीत बदल घडविला, तरी कोणतेही रूप नाहीसे होत नाही परंतु त्याच्या प्रमाणात बदल होतो. उदा., आयोडिनाची I व I अशी दोन रूपे आहेत. ८३५ से. तापमानास I चे प्रमाण १६% व I चे ८४% असते. तापमान १,०४३ से. केले, तर ते अनुक्रमे ४०.४% व ५९.६% होते व १,४६८ से. तापमानास ते अनुक्रमे ८४.५% व १५.५% होते. या पल्ल्यातील एखाद्या तापमानाला बाहेरून I रेणू मिश्रणात समाविष्ट केले, तर त्यांपैकी काहींचे I बनतील आणि I : I यांचे गुणोत्तर मुळात असेल तेच राहील.

गुणधर्म व उदाहरणे : बहुरूपांचे रासायनिक गुणधर्म तेच असतात. त्यांच्या भौतिक गुणधर्मात असलेला फरक रेणूमधील अणूंची रचना किंवा संख्या वेगवेगळ्या असल्यामुळे पडतो.

हिरा व ग्रॅफाइट ही कार्बनाची बहुरूपे होत. त्यांच्या आणवीय संरचनांत फरक आहेत [⟶ ग्रॅफाइट हिरा]. ⇨ गंधक, ⇨ फॉस्फरस, ⇨ कथिल यांची बहुरूपे अशाच तऱ्हेची आहेत. ⇨ आर्सोनिकाची  करडे, पिवळे व काळे अशी तीन रूपे आहेत. नेहमीचे आर्सेनिक करड्या रंगाचे, स्थायी रूप ठिसूळ व स्फटिकी आहे. त्याचा वितळबिंदू ८१७ से. व घनता ५.७३ ग्रँ./सेंमी. आहे. हे तापविले असता ६१० से. तापमानास त्याचे संप्लवन होते व पिवळ्या रंगाची वाफ बनते. ती त्वरित थंड केली म्हणजे पिवळे रूप मिळते. याची घनता १.९७ ग्रॅ./सेंमी.३ आहे. तापविले म्हणजे त्याचे स्थायी करड्या आर्सेनिकात रूपांतर होते. काळ्या आर्सेनिकाची घनता ४.७ ग्रॅ./सेंमी.३ आहे.

लोहाच्या शरीरकेंद्रित घनाकार [ ⟶ स्फटिकविज्ञान] रूपाला आल्फा लोह (किंवा फेराइट) म्हणतात. ते ७७० से. तापमानापर्यंत टिकते व ७५० से. तापमानापर्यंत चुंबकीय गुणधर्म दाखविते. बीटा लोह हे स्फटिकी संरचना न बदलता आल्फा लोहापासून ७७० से. ला तयार होते. तथापि हे स्वतंत्र बहुरूप मानण्याबद्दल व त्याच्या स्फटिकी संरचनेविषयी शास्त्रज्ञांत मतभेद आहेत. गॅमा लोह (किंवा ऑस्टेनाइट) हे फलककेंद्रित स्फटिकरूप ९१२ से. तापमानाच्या वर स्थायी असते. ते चुंबकीय नाही. १,४०० ते १,५३५ से. या तापमान मर्यादेत डेल्टा लोह हे शरीरकेंद्रित स्फटिकरूप अस्तित्वात असण्याची शक्यता आहे [⟶ लोखंड].बिस्मथाची काळे व पिवळे अशी दोन बहुरूपे आहेत. यांशिवाय बेरिलियम, कॅल्शियम, सिझियम, क्रोमियम, कोबाल्ट, हाफ्नियम, लँथॅनम, मँगॅनीज, निकेल, ऱ्होडियम, स्ट्रँशियम, टिटॅनियम, टंगस्टन, झिर्कोनियम इ. मूलद्रव्यांचीही बहुरूपे आहेत. संक्रमणी धातूंत साध्या धातूंपेक्षा बहुरूपता अधिक आढळते.

ओझोन हे ऑक्सिजनाचे बहुरूप आहे. ऑक्सिजनाचा रेणू दोन ऑक्सिजन अणूंचा व ओझोनाचा तीन ऑक्सिजन अणूंचा बनलेला असतो.

शेजवलकर, वा. ग. केळकर, गो. रा.


स्फटिकविज्ञान : एकापेक्षा अधिक स्फटिकरूपे धारण करण्याच्या संयुगाच्या गुणाला बहुरूपता म्हणतात. या विविध रूपांचे भौतिक गुणधर्म वेगळे असतात. प्रत्येक स्फटिकी संरचनेत आंतरिक आणवीय संरचना वेगळी व विशिष्ट असल्यामुळे प्रत्येक स्फटिकरूप हे त्या खनिजाची वेगळी जाती असते. काही पदार्थ दोन बहुरूपांत आढळतात. त्यांना द्विरूपी म्हणतात. उदा., कॅल्शियम कार्बोनेट : ॲरॅगोनाइटामध्ये ते समचतुर्भुजी व कॅल्साइटामध्ये त्रिकोणी या दोन स्फटिकरूपांत आढळते. [⟶ स्फटिकविज्ञान]. तीन स्फटिकरूपे असणाऱ्या (त्रिरूपी) खनिजाचे उदाहरण म्हणजे टिटॅनियम ऑक्साइड होय. याचे रूटाइल हे चतुष्कोणी, ॲनॅटेज हे चतुष्कोणी व ब्रुकाइट हे समचतुर्भुजी अशी तीन रूपे आहेत. ती सामान्य तापमानास व तापमानाच्या मोठ्या पल्ल्या त स्थिर असतात. क्वॉर्‌्ाझ, क्रिस्टोबलाइट आणि ट्रिडिमाइट या बहुरूपांच्या स्थैर्याची तापमानमर्यादा ठराविक असते.

पायराइट व मार्‌कॅसाइट या बहुरूपांपैकी पायराइट हे स्थायी रूप आहे. मारकॅसाइटाचे पायराइटात रूपांतर होते परंतु पायराइटाचे मार्‌कॅसाइटात कधीच होत नाही. बहुरूपतेच्या काही प्रकारांत एका बहुरूपाचे दुसऱ्यात रूपांतर ठराविक तापमान व दाब वापरल्यास घडून येते व ही क्रिया उलट सुलट होऊ शकते. उदा.,

 

८६७से. 

 

क्वॉर्ट्‌झ 

⇌ 

ट्रिडीमाइट 

 

१ वातावरण दाब 

 

एका बहुरूपाचे दुसऱ्यात रूपांतर अगदी सावकाश किंवा जलद होऊ शकते. हा बदल होत असताना कधीकधी निरनिराळ्या अणूंमधील किंवा आयनांतील (विद्युत भारित अणू, रेणू व अणूगट यांतील) बंध मोडत नाहीत, तर फक्त वाकविले जातात. उदा., नीच क्वॉर्ट्‌झ ⟶ उच्च कॉर्ट्‌झ, नीच ल्यूसाइट ⟶ उच्च ल्यूसाइट. उच्च व नीच तापमानास आढळणाऱ्या बहुरूपांच्या स्फटिकी संरचनांतील फरक इतका मामुली असतो की, हे प्रकार थोडासा संरचनात्मक फरक असलेली अशी एकाच जातीची खनिजे ठरतात. या प्रकारचे बदल रूपांतरणाच्या तापमानास अगदी झटकन घडून येतात. उच्च तापमानातील बहुरूप खालच्या तापमानास टिकत नाही. उच्च तापमानातील बहुरूप नीच तापमानातील रूपापेक्षा नेहमीच अधिक सममित असते. बहुरूपांच्या इतर बदलांमध्ये अणू व आयन यांतील बंध मोडले जातात आणि अणू व आयन यांची परत नवीन मांडणी होते. या विक्रिया सामान्यतः मंद गतीच्या असतात. त्यांना पुनर्रचनेच्या रूपांतर क्रिया म्हणतात. उदा., क्वॉर्ट्‌झ ⇌ ट्रिडिमाइट ⇌ क्रिस्टोबलाइट. स्फटिकातील घटक पत्रकांच्या सुव्यवस्थित संरचानात्मक मांडणीतील फरकांमुळे काही खनिजांच्या सूक्ष्म फरक असलेल्या बहुरूपाकृती तयार होतात. उदा., क्वॉर्ट्‌झ, ट्रिडिमाइट, क्रिस्टोबलाइट व कोएसाइट ही सिलिकेची खनिजे त्याच आणवीय घटकांची भिन्न प्रकारांनी तयार झालेल्या निरनिराळ्या संरचनांची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. स्फटिकी संरचनेतील सुव्यवस्थितपणा व अव्यवस्थितपणा यांचा प्रकार व त्यांचे प्रमाण यामुळे अल्प प्रमाणात संरचनात्मक फरक असलेली बहुरूपे तयार होतात. सिलिकेटांच्या संरचनात्मक सांगाड्यातील चतुष्फलकीय स्थानावरील ॲल्युमिनियम व सिलिकॉन यांच्या सुव्यवस्थित मांडणीतील फरकावरून मायक्रोक्लीन व सॅनिडीन यांच्यातील फरक समजतो. एखाद्या पदार्थाच्या स्फटिकी संरचना केवळ त्याच्या रासायनिक संघटनावरच अवलंबून असतात, हे बहुरूपतेमुळे दिसून येते. एकाच पदार्थाचे तेच अणू किंवा आयन त्याच प्रमाणात असूनदेखील त्याचे कोणते बहुरूप तयार होईल हे दाब, तापमान, सभोवतालच्या द्रव्याचे रासायनिक संघटन, स्फटिक तयार होण्याचा वेग व पद्धत यांसारख्या अनेक गोष्टींवर अवलंबून असते. एखाद्या पदार्थाची निरनिराळी बहुरूपे दाब, तापमान व रासायनिक स्थिती यांच्या निरनिराळ्या परंतु ठराविक परिस्थितीमध्ये तयार होतात. त्यामुळे एखाद्या खडकात एखादे बहुरूप असल्यास तो खडक कोणत्या परिस्थितीत तयार झाला असेल, याचा अंदाज करता येतो. उदा., मारकॅसाइट ४५० से. पेक्षा कमी तापमानास व अम्ली्य विद्रावातून तयार होते, यावरून एखाद्या खडकात ते असल्यास खडकनिर्मितीची परिस्थिती वरील मर्यादेत असल्याचे स्पष्ट होते.

आगस्ते, र. पां.

जीवविज्ञान : एकाच जातीचे प्राणी व वनस्पती यांमध्ये आकारमान, आकार, वर्ण, आहार, स्वभाव, सवयी, आयुर्मान इत्यादींमध्ये विविधता आढळते. ही विविधता जननिक किंवा अजननिक कारणामुळे असू शकते.

प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या परिवर्तनाचा अभ्यास निरनिराळ्या दृष्टिकोनांतून करण्यात येतो. यात भौगोलिक, ऋतुमानपरत्वे घडणाऱ्या व अजननिक परिवर्तनांचा समावेश आहे. या सर्व अभ्यासास बहुरूपता ही संज्ञा दिली जात असे परंतु अलीकडे या शब्दाची व्याख्या काटेकोर व निर्बंधित केली गेली आहे. सर्वसाधारणपणे ई. बी. फोर्ड यांनी १९४० साली केलेली व्याख्या सर्वमान्य आहे. या व्याख्येचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. एकाच निवासक्षेत्रात एकाच जातीच्या दोन किंवा अधिक भिन्न रूपांच्या प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे समूह आढळतात. या समूहाचे परस्पर प्रमाण काहीही असू शकते. एखादा समूह अगदी विरळही असू शकतो. तरीही या विरळ समूहाचे प्रमाण जीनांच्या (गुणसूत्रांमध्ये म्हणजे आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांमध्ये असणाऱ्या आनुवंशिक घटकांच्या एककांच्या) उत्परिवर्तनाच्या (आनुवंशिक लक्षणांमध्ये एकाएकी होणाऱ्या बदलाच्या) प्रमाणापेक्षा पुष्कळच अधिक असते. ज्या जातींत समूहाचे अस्तित्व जीनांच्या नुसत्या उत्परिवर्तनावर आधारलेले नसते त्या जातींत बहुरूपता आढळते.


प्रत्येक प्राण्याच्या अगर वनस्पतीच्या जातीत सारखी परिवर्तने घडून येत असतात. ही परिवर्तने कोणत्याही लक्षणात असू शकतात. त्यांचा उगम जननिक वा अजननिक कारणापासून झालेला असू शकतो. ⇨रक्तगटासारखे लक्षण जननिक असते. याच्यावर परिस्थितीचा काही परिणाम होऊ शकत नाही पण काही परिवर्तने जननिक व परिस्थितीनुरूप या दोन्ही कारणांमुळे असू शकतात. उदा., एखादा प्राणी आकारमानाने लहान असतो. याला कारण जननिक असू शकते पण त्याचबरोबर जर त्याला सकस आहार मिळाला नाही, तरीही त्याचे आकारमान लहान होऊ शकते.

जननिक परिवर्तन खंडित वा अखंडित असू शकते. ही दोन्ही परिवर्तने जीनांमुळेच होतात. खंडित परिवर्तन पुष्कळ जीनांच्या विकल्पांच्या संकलित परिणामामुळे होते. अखंडित परिवर्तनामुळे एका जातिसमूहाचे दोन अगर अधिक भिन्न समूहांत विभाजन होते. या समूहांची वारंवारता जर उत्परिवर्तनाच्या वारंवारतेपेक्षा पुष्कळच जास्त असेल, तर हे समूह बहुरूपतादर्शक आहेत, असे समजले जाते. बहुरूपतेचे अत्यंत साधे व नेहमी आढळणारे उदाहरण म्हणजे कोणत्याही जातीतील लिंगभिन्नतेवर आधारलेले दोन समूह. दुसरे उदाहरण मानवातील रक्तगटांचे देता येईल. अखंडित परिवर्तनामुळे समूहाचे भिन्न व एकमेकांपासून ओळखता येणारे असे गट होत नाहीत. सर्व प्राण्यांत अगर वनस्पतींत या परिवर्तनाच्या दोन अंतिम परिस्थीमध्ये अखंड क्रम आढळतो. असे परिवर्तन सर्वच जीवांत आढळते व ते जर जननिक कारणामुळे असेल, तर ⇨ नैसर्गिक निवडीमुळे थोड्याच काळात त्यात फरक पडतो. मनुष्यप्राण्यातील उंची हे या प्रकारचे परिवर्तन आहे पण या परिवर्तनाबरोबरच जननिक कारणामुळे आणि नैसर्गिक निवडीमुळे या समूहात अंतिम टोकाजवळ असणारे ठेंगू व खूप उंच असे मानवही आढळतात.

पुष्कळ प्रकारची अजननिक परिवर्तनेही आढळतात. अशा प्रकारच्या काही परिवर्तनांनी प्रौढ प्राण्याचे दृश्य रूप बदलते. उदा., काही पक्ष्यांच्या पंखांचे रंग ऋतुमानपरत्वे बदलतात. मृदा, सूर्यप्रकाश आणि परिस्थितीतील इतर काही बदल यांमुळे काही वनस्पतींचे दृश्य रूप बदलते. तापमान, अम्लीता या गुणधर्मांनुसार गोड्या पाण्यातील काही माशांचे दृश्य रूप बदलते. तसेच निरनिराळ्या ऋतूंत तापमान आणि आर्द्रता यांत होणाऱ्या बदलांमुळे लेपिडॉप्टेरा गणातील यूरोपियन फुलपाखरू (ॲरॅशनिया लेखाना) व आफ्रिकन फुलपाखरू (प्रेसिस सेसामस) यांचे दृश्य रूप बदलते. जननिक दृष्ट्या एकच असलेल्या काही कीटकांत निरनिराळे दृश्य रूप असलेल्या जाती निर्माण होतात. या कीटकांना त्यांची वाढ होताना मिळालेले अन्न याला कारणीभूत असते, असे आढळले आहे. मुंग्यांत व इतर कीटकांत आढळणाऱ्या जाती या प्रकारच्या आहेत.

लैंगिक प्रजोत्पादन होत असलेल्या प्राण्यांत अगर वनस्पतींत कोणत्याही दोन व्यक्ती अगर जीव जननिक दृष्ट्या एकरूप अशू शकत नाहीत. या भिन्नत्वावरच त्याचे दृश्य रूप आधारित असते. शरीर रचनात्मक, शरीरक्रियात्मक किंवा कोशिकाविज्ञानात्मक (कोशिकांची – पेशींची – संरचना, वर्तन, वृद्धी, प्रजनन आणि कोशिका – घटकांचे कार्य आणि रसायनशास्त्र यांच्या बाबतीत होणारे) फरकही यांमुळेच आढळतात. जेव्हा हे बहुभिन्नत्व एका जीनाच्या किंवा एका गुणसूत्राच्या अगर गुणसूत्राच्या एका विशिष्ट भागाच्या नियंत्रणाखाली असते, तेव्हा त्या प्राण्यात अगर वनस्पतीत जननिक बहुरूपता निर्माण होते. हा आविष्कार प्राण्यांत व वनस्पतींत बऱ्याच वेळा आढळतो.

सीलेंटेरेटा या प्राणिसंघात बहुरूपता आढळते. यात पॉलिप (जीवक) व मेड्युसा अशा दोन रूपांत हे प्राणी दिसतात. पॉलिप (किंवा हायड्राइड) हे या प्राण्याचे स्थानबद्ध रूप होय. याचा आकार दंडगोलाकृती (नळकांड्यासारखा) असून तो एका बाजूने बंद असतो. या बाजूने हा प्राणी दगड किंवा इतर वस्तूस चिकटतो आणि स्थानबद्ध राहतो [⟶ सीलेंटेरेटा]. याच्या दुसऱ्या बाजूस तोंड व तोंडाभोवती संस्पर्शक (लांब, नाजूक व लवचिक स्पर्शेद्रिये) असतात. एकाच जातीत पॉलिपाचे निरनिराळे आकार असू शकतात. याउलट मेड्युसा हा याच जातीचा मुक्तप्लावी (मोकळे पोहू शकणारा) प्राणी आहे. याचा आकार लहान घंटेसारखा असतो. घंटेच्या मध्यावर तोंड व कडेवर संस्पर्शक असतात. ही दोन्ही रूपे एकाच जातीची असली, तरी पुष्कळ वेळा या दोन रूपांत पिढ्यांचे एकांतरण आढळते [ ⟶ एकांतरण, पिढ्यांचे]. रोटिफर [⟶ रोटिफेरा] या प्राण्यांत नर व मादी अगदी भिन्न रूपांत आढळतात. नर मादीपेक्षा आकारमानाने फारच लहान असतो. पॉलिझोआ [⟶ एक्टोप्रॉक्टा] संघातील काही जातींत बहुरूपता आढळते. या बहुरूपतेत काही प्राण्यांचे सर्व शरीर बदलून त्याचा एक अवयव बनतो व तो दुसऱ्या प्राण्याच्या शरीरावर राहून विवक्षित कार्य करतो उदा., एव्हिक्युलेरियम. ॲनेलिडा संघातील ⇨ नीरीज या प्राण्याचे रूप प्रजोत्पादनाच्या वेळी बदलते. ही बहुरूपता फक्त प्रजोत्पादनाच्या काळातच आढळून येते. कीटकांमध्ये निरनिराळ्या कीटकांत व त्यातल्या त्यात सामाजिक जीवन जगणाऱ्या कीटकांत पुष्कळच बहूरूपता आढळते. मुंग्या, मधमाश्या व वाळवी यांमध्ये राणी, कामकरी, शिपाई, नर असी एकाच जातीत विविध रूपे आढळतात. माव्यासारख्या कीटकांत पंखरहित, पंख असलेली, अंडी देणारी अगर पिलास जन्म देणारी अशी विविध रूपे आहेत. फुलपाखरांच्या बहुरूपतेत पंखांचे रंग बदललेले प्रामुख्याने आढळते. इतर प्राणिसमूहांतही अशी किती तरी उदाहरणे आढळतात.

एकदलिकित व द्विदलिकित वनस्पतींच्या कित्येक गणांतही बहुरूपता आढळते (उदा., ॲस्टरेलीझ गणातील झेंडू, ग्रॅमिनेलीझ गणातील गहू, मका इत्यादी).

बहूरूपतेच्या लक्षणात रंग, संरचना, लैंगिक उपलक्षणे, कीटकांच्या जाती, वनस्पतींतील बाष्पनशील (बाष्परूपात उडून जाणारी) तेले, रक्तगट, रक्तविकार, गुणसूत्रांची संख्या, गुणसूत्रांची रचना व आकार, प्राण्यांचे संचलनात्मक वर्तन, रोगप्रतिकारशक्ती, कर्करोग होण्याची शक्यता वगैरे शरीररचनात्मक, शरीरक्रियात्मक व जीवरासायनिक क्षेत्रांतील लक्षणे आढळतात. बहुरूपतेमुळे निर्माण होणाऱ्या अंतर्जातीय आकारभिन्नतेमुळे प्राण्यास अगर वनस्पतीस भिन्न परिस्थितीशी जुळवून घेणे सुलभ होते. नवीन लक्षण जर उत्परिवर्तनामुळे निर्माण झाले असेल व जर प्राप्त परिस्थितीत प्राण्यास अगर वनस्पतीस त्याचा उपयोग होत नसेल, तर यथाकाल त्या लक्षणाचा नाश होतो व या उत्परिवर्तित जीनाचे प्रमाण त्या प्राणिसमुदायात घटत जाते व शेवटी हे प्रमाण उत्परिवर्तनाच्या प्रमाणाइतके होते. याउलट जर हे लक्षण प्राण्यास फायदेशीर असेल, तर त्याचे जीन यथाकाल जास्त प्रामाणात प्राणिसमुदायात आढळतील. हे लक्षण जर दृश्य रूपात प्रामुख्याने दिसत असेल, तर मूळ जातीपेक्षा निराळा असा प्राणिसमूह या प्राणिसमुदायात तयार होईल व येथेच बहुरूपतेचा प्रारंभ होईल. ज्या स्थितीत असा फायदेशीर जीन प्राणिसमुदायात पसरत असेल, त्या स्थितीस बहुरूपतेचा संक्रमण काल असे म्हणता येईल. जेव्हा या जीनाचा पसरण्याचा काल संपेल व या जीनाचे त्याच्या विकल्पाशी समतोल संबंध राहतील, तेव्हा या स्थितीस ‘समतोल बहुरूपता’ असे संबोधावे लागेल. जेव्हा हा समतोल नष्ट होऊन एकच जीन सर्व प्राणिसमुदायात आढळेल तेव्हा बहुरूपता नष्ट होईल व नवी जाती निर्माण होईल. उत्परिवर्तने सारखी होत असल्यामुळे व परिस्थितीही सारखी बदलत असल्यामुळे प्राणिसमुदायात निरनिराळे संक्रमण काल येत राहतात व एका संक्रमण कालात जो जीन प्राण्यात फायदेशीर नसतो, तोच दुसऱ्या संक्रमण कालात कदाचित फायदेशीर ठरण्याचा संभव असतो.


संक्रमण कालातील बहुरूपतेची उदाहरणे म्हणून मध्य रशियातील काळपट हॅमस्टर व टास्मानियातील काळा ऑपॉस्सम यांचा निर्देश करता येईल. या बहुरूपतेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे औद्योगिक परिसरातील पतंगांच्या शरीरावर निर्माण झालेले कृष्णरंजक हे रंगद्रव्य होय. काही औद्योगिक परिसरात पतंगांच्या निरनिराळ्या जातींत एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतरच्या काळात ही कृष्णरंजकता निर्माण झालेली आहे. संशोधनानंतर असे आढळले की, या पतंगाच्या साध्या परिसरात राहणाऱ्या सु. शंभर जातींत रंजकता निर्माण करणाऱ्या जीनामध्ये उत्परिवर्तन झाले. यामुळे कृष्णरंजकता हे लक्षण या पतंगांत निर्माण झाले. जेव्हा असे पतंग औद्योगिक परिसरात आले तेव्हा अंगावर काळा रंग निर्माण झाल्यामुळे ते सभोवतालच्या परिस्थितीशी समरस होऊ शकले. या परिसरात धूर व कोळशाचे कण असल्यामुळे या पतंगांना त्यांच्या जातीच्या इतर पतंगांपेक्षा जास्त संरक्षण मिळाले व यामुळे या पतंगांत बहुरूपता निर्माण झाली. जेव्हा धूर-प्रतिबंधक नवीन कायदे अस्तित्वात आले तेव्हापासून या काळ्या रंगाच्या पतंगांचे प्रमाण कमी होऊ लागले व त्यामुळे या बहुरूपतेच्या गुणोत्तरात फरक पडू लागला. ज्या प्राण्यांत समतोल बहुरूपता आढळते त्या प्राण्यांच्या समुदायात निरनिराळ्या रूपांचे गुणोत्तर स्थायी स्वरूपाचे असते. पुष्कळशा प्राण्यांत असे आढळले आहे की, समतोल बहुरूपता ही त्या प्राण्यातील जीवनकलहात विषमयुग्मजांच्या (गुणसूत्रावरील जीनांच्या एका अगर अधिक स्थिर स्थानी निरनिराळे विकल्प असल्यामुळे दोन अगर अधिक भिन्न प्रकारची युग्मके-प्रजोत्पादक कोशिका-उत्पन्न करणाऱ्या प्राण्याच्या) निवडक्षमतेवर आधारित आहे. हे विषमयुग्मजत्व एक किंवा अनेक जीनांच्या बाबतीत किंवा गुणसूत्राच्या एका भागाच्या बाबतीत असू शकते. प्राप्त परिस्थितीत विषमयुग्मज हे दोन्ही समयुग्मजांपेक्षा (गुणसूत्रावरील जीनांच्या एका अगर अधिक स्थिर स्थानी एकसारखेच विकल्प असल्यामुळे सर्व युग्मक एकसारख्या प्रकारचेच उत्पन्न करणाऱ्या प्राण्यांपेक्षा) बलिष्ठ ठरतात. बहुरूपतेचे गुणोत्तर काय असावे हे विषमयुग्मज किती बलिष्ट आहेत त्यावर अवलंबून असते. परिणामी समयुग्मजाचे प्रमाण जरी कमी झाले, तरी प्राणिसमुदायात प्राणघातक व अपायकारक जीनांच्या संख्येची वाढ होत राहते.

मानवजातीत निरनिराळ्या प्रकारची बहुरूपता आढळते. रक्तगट, तनुकोशिक पांडूरोग (कूली पांडुरोग), दात्र-कोशिका पांडुरोग व फाव्हिझम [ व्हिक्सिया काव्हा  या घेवड्याच्या बियांशी वा परागांशी संपर्क आल्यामुळे होणारा तीव्र रक्तविलयक पांडुरोग ⟶ पांडुरोग ] ही शरीरक्रियात्मक बहुरूपतेची ठळक उदाहरणे होत. दात्र-कोशिका पांडुरोगात विषमयुग्मज भानवांना हिवतापाचा (मलेरियाचा) विशेष त्रास होत नाही. यामुळे समतोल बहूरूपतेत या जीनाच्या विषमयुग्मजाचे प्रमाण स्थिर राहत असावे.

काही प्राण्यांत अनुकरणात्मक बहुरूपता आढळते. काही फुलपाखरांच्या जातीत निरूपद्रवी किंवा रूचकर असलेली फुलपाखरे, इतर प्राण्यांस न रूचणाऱ्या फुलपाखरांचे अनुकरण करतात. हे अनुकरण प्रामुख्याने पंखांच्या रंगाचे असते व असे केल्याने त्यांचे संरक्षण होते. या प्रकारास बेट्‌सीय अनुकृती (एच्. डब्ल्यू. बेट्‌स या ब्रिटिश शास्त्रज्ञांच्या नावावरून) म्हणतात. इतर प्राण्यांना व त्यातल्या त्यात पक्ष्यांना आवडत नाहीत अशी इतर काही फुलपाखरे आपले भडक रंग जास्त प्रामुख्याने प्रदर्शित करतात. अनुकरण नुसते रंगांचेच नसते, तर त्यात आकार, वास, संचलन वगैरेंचाही समावेश असतो. हा फसवाफसवीचा प्रकार प्रामुख्याने मादीत आढळतो [⟶ अनुकृति].

वर्तनातील फरक हीही एक प्रकारची बहुरूपता होय. अशी बहुरूपताही काही प्राण्यांत आढळते. कोकिळा दिसण्यास निरनिराळी अशी अंडी घालते व ती निरनिराळ्या पक्ष्यांच्या घरट्यात उबविण्याकरिता ठेवते. सारखी दिसणारी अंडी एकाच प्रकारच्या पक्ष्याच्या घरट्यात ठेवण्याची दक्षता मादी घेते. ज्या पक्ष्याच्या घरट्यात अंडी ठेवली जातात तो पक्षी यास विरोध करणार नाही या त्या पक्ष्याच्या वर्तनाचे ज्ञान मादीस असते व त्यात कोणते अंडे ठेवायचे हे ती ठरविते. निरनिराळ्या अंड्यांवर निरनिराळ्या खुणा असतात. निरनिराळ्या विशिष्ट खुणांची अंडी एकच नर फलित करतो. यावरून असे दिसते की, या अंड्यांवरील विशिष्ट खुणाचे जीन मादीत असलेल्या Y गुणसूत्रावर असावेत व यामुळे तिचे अंडे कोणत्याही नराने फलित केले, तरी अंड्यांवरील खुणांवर त्याचा काही परिणाम होत नाही.

बहुरूपता कार्यक्षम होण्यास प्रजनन तंत्रावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. हे नियत्रंण वनस्पतींत भिन्न किंजलत्वामुळे [ निरनिराळ्या फुलांतील किंजलांची लांबी भिन्न असण्याच्या गुणधर्मामुळे ⟶ फूल] घातले जाते व ते प्रिम्युलेसी या कुळात आढळते. या प्रकारात गुणसूत्रावरील जीनाच्या स्थिर स्थानावर असलेले सात जीन मिळून एक अधि-जीन तयार होतो व यामुळे फुलातील पुं-पुष्प व स्त्री-पुष्प यांच्या जागांची अदलाबदल होते. परागकोश उंचावतात व किंजल्क खाली येतात किंवा यांच्या स्थानाची अदलाबदल होते. यामुळे कीटकांत परागण (परागसिंचन)करणे कठीण जाते. ⇨प्रिमरोझच्या  या जननरचनेवर आधारित असे दोन समूह आढळतात. एका समूहास ‘थ्रम’ तर दुसऱ्यास ‘पीन’ अशी नावे आहेत. ही स्थिती बहूरूपता म्हणून गणली जाते. चार्ल्‌स डार्विन यांच्या मते भिन्नकिंजलत्वामुळे भिन्नसमूहाचे मीलन शक्य होते व समसमूहाच्या मीलनात प्रतिबंध होतो. जेव्हा अधि-जीन असलेल्या दोन पुष्पांचे फलन होते तेव्हा एकाच उंचीवर असलेल्या परागकोश व किंजल्स असलेल्या फुलांची निर्मिती होणे शक्य होते व वनस्पतिसमुदायात दोनप्रकारचे समूह समतोल रीतीने आढळतात. हे समूह म्हणजे बहुरूपतेची स्थिती होय.

इनामदार, ना. भा.

 पहा : अनुकृति आनुवंशिकी प्रण्यांचे वर्तन फुलपाखरू.

 संदर्भ : 1. Dana, E. S. Ford, W. E. Ed, Textbook of Mineralogy, Bombay. 1962.

             2. Dobzhansky, T. Genetics and Origin of Species, New York, 1951. 

            3. Durrant, P. J. General and Inorganic Chemistry, London, 1964.             4. Ford, E. B. Genetics for Medical Students, London, 1968.             5. Huxley, J. S. New Systematic, London, 1945.             6. Mason, B. Betry. L. G. Elements of Mineralogy, San Francisco. 1968.             7. Parkes, G. D. Ed., Mellors Modern Inorganic Chemistry, London, 1961.