कुनाल : याचा समावेश स्कोलोपॅसिडी पक्षिकुलात करतात. हा यूरोप, आशिया, आफ्रिका व अमेरिका या खंडांत बहुतेक सगळीकडे आढळतो. भारतात तो काश्मिरात आणि हिमालयात कायम राहणारा असून तेथेच त्याची वीण होते. याशिवाय हा पक्षी हिवाळ्यात बाहेरून भारतात येतो यामुळे त्याला हिवाळी पाहुणा म्हणता येईल.

कुनाल

सप्टेंबर महिन्यात यांचे थवे उत्तर व मध्य आशियातून भारतात येतात आणि सिंध, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, बंगाल इ. भागात पसरतात पण गोदावरीच्या दक्षिणेस ते थोडे आढळतात. ते एप्रिलमध्ये परत जातात. भारतात आढळणाऱ्या जातीचे शास्त्रीय नाव कॅपेला गॅलिनॅगो  असे आहे. याच्या पुष्कळ जाती आहेत.

तलावांच्या काठावरील गवताच्या आणि लव्हाळ्यांच्या जाळ्या, भातशेते, खाड्या, पाणथळ जागा इ. ठिकाणी हा आढळतो. हे एकएकटे किंवा यांचे थवे असतात.

भारतात आढळणारा सामान्य कुनाल लावा पक्ष्यापेक्षा थोडा मोठा असतो. शरीराची लांबी २८ सेंमी. डोक्याचा माथा काळा प्रत्येक डोळ्याच्या वर एक पांढरा पट्टा डोक्याच्या दोन्ही बाजू व हनुवटी पांढरी चोचीच्या बुडापासून एक तपकिरी पट्टा निघून डोळ्यातून मागे गेलेला असतो मान व छाती फिक्कट पिवळी आणि त्यांवर गर्द तपकिरी रेषा पाठ गर्द तपकिरी व तिच्यावर काळ्या, तांबूस व पिळसर रेषा किंवा बारीक पट्टे पोटाकडची बाजू पांढुरकी पंख गर्द तपकिरी चोच काळसर तपकिरी, बारीक व सु. ६·५० सेंमी. लांब असते.

हा ज्या परिसरात वावरतो त्याच्याशी याच्या शरीराचा रंग इतका एकरूप असतो की, जवळ गेल्याशिवाय हा पक्षी दिसून येत नाही. पण जवळ जाताच कर्कश आवाज करीत तो एकदम उडून नागमोडी वळणे घेत वेगाने दूर जातो. हा आपले भक्ष्य अगदी पहाटेस किंवा संध्याकाळी मिळवितो. आपली लांब चोच चिखलात खुपसून कृमी, कीटकांचे डिंभ (अळ्या), लहान मृदुकाय प्राणी इ. तो खातो.

काश्मीर आणि हिमालयात राहणाऱ्या कुनालाचा प्रजोत्पादनाचा काळ मे आणि जून हा असतो. घरटे वाटीसारखे असून पाणथळ जागी गवतात तयार केलेले असते. मादी त्यात चार अंडी घालते. त्यांचा रंग फिक्का हिरवट, निळसर किंवा फिक्कट तपकिरी असून त्यावर धुपेली (चॉकलेटी) अथवा काळे ठिपके असतात.

कर्वे, ज. नी.