सार्डिन : क्लुपिफॉर्मीस (आयसोस्पाँडीलाय) या गणातील क्लुपिइडी कुलात या सागरी अस्थिमत्स्यांचा समावेश होतो. हे मासे नेहमी कळपाने हालचाली करतात. सार्डिनेला या प्रजातीत सात जाती असून त्यांपैकी पाच महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आढळतात. हे लहान आकारमानाचे मासे आहेत. त्यांची लांबी १५–२० सेंमी. असते. शरीर लांबट निमुळते व दोन्ही बाजूंनी चपटे असते. उदराच्या अधर बाजूस काटेरी खवल्यांची रांग असते. तोंड मोठे, दोन्ही जबडे समान, खवले चक्रज असून ते शरीरापासून लगेच सुटे होतात. प्लवकजीव हे त्यांचे मुख्य अन्न आहे. सार्डिनाच्या काही जातींची माहिती पुढे दिली आहे.

सार्डिनेला लाँगिसेप्स : या जातीच्या माशाला ऑइल सार्डिन, मलबार सार्डिन, तरळी (तारळी), हैद इ. नावे आहेत. औद्योगिक दृष्ट्या या माशांना भारतात मोठे महत्त्व आहे. तरळीच्या तेलाचे अनेक उपयोग आहेत [⟶ तरळी]. तेल काढून घेतल्यावर शिल्लक राहिलेल्या वाळविलेल्या चोथ्याला ⇨ ग्वानो म्हणतात. ते खत म्हणून वापरतात.

सार्डिन (सार्डिनेला फिंब्रिएटा)सार्डिनेला फिंब्रिएटा : या जातीच्या माशाला व्हाइट सार्डिन, पेडवा व बशी अशी नावे आहेत. हा भारताच्या दोन्ही सागरी किनाऱ्यांवर आढळतो. पूर्व किनारपट्टीच्या उत्तरेस व पश्चिम किनारपट्टीच्या दक्षिण बाजूस तो मोठ्या प्रमाणावर आढळतो. त्याची लांबी १२-१३ सेंमी. असून याचा वरचा जबडा किंचित मोठा असतो. पृष्ठपक्ष (पक्ष म्हणजे हालचालीस उपयुक्त अशी त्वचेची स्नायुमय घडी) मोठा, तर पुच्छपक्ष दोन भागांत विभागलेला असतो. याची पृष्ठीय बाजू निळसर हिरवट व कडा चंदेरी रंगाच्या असतात. पुच्छपक्ष निळसर असून त्याच्यावर काळ्या रंगाचे ठिपके असतात.

ऑइल सार्डीन मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्यावर सा.फिंब्रिएटा या जातीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. त्याच्यापासून मिळणाऱ्या तेलाचे प्रमाण कमी असले तरी हा तेलाच्या दृष्टीने महत्त्वाचा मासा आहे. सप्टेंबर ते जानेवारी या काळात भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर त्याची मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. अतिरिक्त माशांचा खत तयार करण्यासाठी उपयोग करतात.

यांशिवाय सा.मेलॅन्युरा, सा.सिंडनेसिस, सा. डेई रेगन या सार्डिनाच्या जाती महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आढळतात. रत्नागिरीच्या किनाऱ्यावर यांची मासेमारी चालते. सा. सिंडनेसिस जातीची लांबी सु. २० सेंमी. असून त्रिवेंद्रमच्या किनाऱ्यावर ती मोठ्या प्रमाणावर आढळते. सा. मेलॅन्युरा ही जाती मलबार, अंदमानच्या सागरात आढळते. सा.अलबेला ही जाती भारताच्या किनारपट्टीवर आढळते. यामध्ये तेलाचे प्रमाण कमी आहे. याचा उपयोग खत बनविण्यासाठी करतात. सा. सिर्म ही जाती भारतात दक्षिण किनारपट्टीवर व श्रीलंकेच्या सागरात आढळते. यूरोपात यूरोनियन सार्डिन (सा. पिलकार्डस ) ही जाती आढळते. या जातीत लहान व मोठ्या खवल्यांच्या एकाआड एक रांगा असतात. उष्ण प्रदेशांत आढळणाऱ्या जातींत उदरावरील खवले काटेरी असतात.

पाटील, चंद्रकांत प.