व्हॉर्टिसेला : प्रोटोझोआ संघाच्या सिलिओफोरा वर्गातील एका एकपेशीय प्राण्याच्या प्रजातीचे नाव. या प्रजातीत सु. २०० जाती आहेत. हा प्राणी सार्वत्रिक असून खाऱ्या व गोड्या पाण्यात आढळतो. पुष्कळदा त्याचे झुबके असतात. व्हॉर्टिसेला मायक्रोस्टोमॅटा हा गोड्या पाण्यात आढळतो. व्हॉ. कम्पान्यूला व्हॉ. नेब्लिफेरा हे सूक्ष्मजंतू (बॅक्टेरिया) कमी असणाऱ्या पाण्यात आढळतात. हिरव्या रंगाच्या व्हॉ. व्हिरीडीसचे पोषण वनस्पतीसारखे होते.

व्हॉर्टिसेलाचे शरीर उलट्या घंटेसारखे असून, एका लांब देठाने त्याचे बूड पाणवनस्पती किंवा इतर वस्तूंना (पाने, दगड इत्यादींना) चिकटलेले असते. या देठात असणाऱ्या नागमोडी मध्यवर्ती सूत्राच्या आकुंचनाने देठाला मळसूत्राप्रमाणे वेढे पडून तो आखडल्यामुळे प्राणी आधाराकडे ओढला जातो. सूत्राच्या शिथिलनाने लवचीक देठ लांब होतो.  घंटेच्या रुंद उघड्या टोकावर एक आकुंचनशील वाटोळी तबकडी असून तिच्या काठावर ⇨ पक्ष्माभिकांची (केसांसारख्या वाढी) सर्पिल किनार असते. घंटेच्या उघड्या तोंडाची कडा आणि तबकडीचा काठ यांच्यामध्ये मुख्य असते. पक्ष्माभिकांच्या कंपनांमुळे पाणी मुखात ढकलले जाऊन त्याबरोबर सूक्ष्म

व्हर्टिसेला : (१) पक्ष्माभिका (२) तबकडी (३) मुख (४) संकोचशील रित्तिका, (५) गुरुकेंद्र, (६) लघुकेंद्र, (७) तनुच्छद (पातळ संरक्षक पटल), (८) अन्नरित्तिका, (९) नागमोडी मध्यवर्ती सूत्रे, (१०) देठ.

वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजंतू वगैरे अन्न मुखात जाते. अन्नाचे पचन अन्नरित्तिकांत (पटलाने वेष्टित असलेल्या व ज्याच्यात अन्नपचनाची क्रिया होते अशा पोकळ्यांत) होते. शरीराच्या जीवद्रव्यात लहान वाटोळा लघुकेंद्र आणि मोठा पट्ट्यासारखा गुरुकेंद्र असे दोन केंद्रक (कोशिकेतील कार्यावर नियंत्रण ठेवणारे जटिल गोलसर पुंज) असतात. जीवद्रव्यात संकोचशील रित्तिका [ आकुंचन पावणारी कोशिकेतील जलीय विद्राव व स्राव असलेली पोकळी → संकोचशील रित्तिका] असून ती ⇨ तर्षण नियमनाचे कार्य करते.

या प्राण्याचे जनन अनुदैर्घ्य (लांबीच्या दिशेतील) द्विभाजनाने होते. यामध्ये प्राण्यांच्या शरीराचे वरील भागापासून देठाच्या टोकापर्यंत लांबीच्या दिशेत विभाजन होते. गुरुकेंद्रकाचे व लघुकेंद्रकाचे विभाजन होऊन दोन प्राणी तयार होतात. एका प्राण्यास मूळचा देठ राहातो व दुसऱ्या प्राण्यात तो विकसित होतो. ही जननाची अलैंगिक पद्धत आहे. जननाची दुसरी लैंगिक पद्धत संयुग्मन ही आहे. ठरावीक कालावधीनंतर या पद्धतीने जनन होते. अनुदैर्घ्य द्विभाजनाने प्राण्याचे विभाजन होऊन युग्मक तयार होतात. मोठ्या आकारमानाच्या युग्मकास मादी युग्मक व लहानास नर युग्मक म्हणतात. नर युग्मकास पक्ष्माभिका असते व तो पाण्यात पोहतो. त्याचे आयुष्य २४ तासांचे असते. त्या काळात त्याचे दुसऱ्या मादी युग्मकाशी मीलन होते व युग्मज तयार होतो (मीलन न झाल्यास तो मरतो). तो द्विभाजनाने पुनरुत्पादन करतो. या पद्धतीत सात प्राणी तयार होतात.

प्रतिकूल परिस्थितीत त्याची लांबी कमी होते, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते व तो स्वतःभोवती पुटी निर्माण करतो. अनुकूल परिस्थिती येताच संकोचशील रिक्तिका मोठी होते. त्यामुळे पुटीवर दाब पडतो व आतील प्राणी पुटीतून बाहेर पडतो. तो काही वेळ पाण्यात पोहतो व योग्य जागी देठाच्या साहाय्याने चिकटतो. कधीकधी पुटीतच विभाजन होऊन आठ प्राणी तयार होतात व ते पुटीमधून बाहेर पडतात.

पहा : प्रोटोझोआ.

क्षीरसागर, व.ग. पाटील, चंद्रकांत प.