कवडी: सायप्रिइडी कुलातील सायप्रिया वंशाच्या सागरी गोगलगाईंच्या शंखांना कवडी म्हणतात. कवडी-गोगलगाईंच्या सु. १६५ जिवंत जाती आहेत. या उथळ पाण्यात राहतात आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या उष्ण प्रदेशात मुबलक आढळतात.

कवडी, आतील जिवंत प्राण्यासहित : (१) प्रावाराच्या काठावरील संस्पर्शक, (२) प्रावार, (३) पाद, (४) निनाल.

या गोगलगाईंचे कवच (कवडी) प्रावाराने (कवडीच्या लगेच खाली असलेल्या त्वचेच्या बाहेरच्या मऊ घडीने) अर्धवट किंवा पूर्णपणेझाकलेले असते. ही मुख्यतः शाकाहारी आहे. कवड्या विविध रंगांच्या, चकचकीत व सुंदर असल्यामुळे शंख-शिंपल्यांचे संग्राहक त्या मौल्यवान मानतात. पूर्वी आफ्रिकेत आणि भारतात कवड्यांचा नाण्यांप्रमाणे उपयोग करीत त्याचप्रमाणे त्या दागिने म्हणून वापरीत. एके काळी फिजी बेटातील टोळ्यांचे नायक आपल्या दर्जाचे चिन्ह म्हणून ऑरँशियम जातीची कवडी शरीरावर लावीत.

जमदाडे, ज.वि.