इक्थिओसॉर : सरीसृप (सरपटणाऱ्या प्राण्यांच्या) वर्गाच्या इक्थिओसॉरिया उपवर्गातील सगळ्या प्राण्यांना सामान्यत: इक्थिओसॉर म्हणतात. या वर्गातले सगळे प्राणी लुप्त झालेले आहेत. हे माशांप्रमाणे समुद्रात राहणारे असून पाण्यातील जीवनक्रमाला पूर्णपणे अनुकूलित झाले होते. ट्रायासिक कल्पात (२३ ते २० कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) हे प्रथम उत्पन्न झाले, जुरासिक कल्पात (१८ ते १५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) त्यांची कमालीची भरभराट झाली आणि नंतर हळूहळू त्यांची संख्या कमी होत जाऊन क्रिटेशस कल्पात (१४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) ते नामशेष झाले. या गटाचा बराच दूरवर विस्तार झालेला होता यांचे अवशेष यूरोप, उत्तर व दक्षिण अमेरिका, क्वीन्सलँड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीजमध्ये आढळले आहेत.

इक्थिओसॉराची लांबी एक ते दहा मी. होती. कवटी लांब होती. मुस्कट लांब, अक्षिकूप (डोळा ज्यात बसविलेला असतो तो खळगा) अतिशय मोठे व नाकपुड्या फार मागे म्हणजे अक्षिकूपांच्या लगेच पुढे होत्या. डोळे मोठे होते. दात अणकुचीदार, पाचरीसारखे आणि दंतवल्काच्या (दातावरील अगदी बाहेरच्या कॅल्शियमाच्या) जाड थराने झाकलेले होते.

इक्थिओसॉर (जुरासिक कल्पातील)

पाठीच्या कण्यातील कशेरुकांची (मणक्यांची) संख्या १५० पर्यंत असे यांपैकी दोन-तृतीयांश शेपटीत असत. बहुतेक सगळ्या कशेरुकांपासून बरगड्या निघालेल्या होत्या परंतु उरोस्थी (छातीचे हाड) नव्हती. अंसमेखला (खांद्याच्या जवळ असणारा अस्थींचा वाटोळा पट्टा) पूर्ण, पण श्रोणिमेखला (ढुंगणातील अस्‍थींचा वाटोळा पट्टा) ऱ्हास पावलेली होती. पुढचे आणि मागचे अवयव अगदी एकमेकांसारखे होते पण मागचे पुष्कळच लहान होते. अवयवांच्या अस्थी अतिशय लहान झालेल्या होत्या. अवयवांच्या दोन्ही जोड्यांचे रूपांतर होऊन अतिविशेषित वल्ही तयार झालेली होती. या वल्ह्यांमधील अंगुलास्थींची (बोटांच्या हाडांची) संख्या बरीच जास्त झालेली होती इतकेच नव्हे तर बोटेही सहा किंवा त्यापेक्षा जास्त होती. पुच्छपक्ष द्विपाली (दोन पाळी असलेला) असून पृष्ठवंशाचा (पाठीच्या कण्याचा) अखेरचा भाग खाली वळून पुच्छपक्षाच्या खालच्या पालीत गेलेला होता. शेपटी मजबूत असून पोहण्याच्या कामी तिचा उपयोग होत असे. पाठीवर एक मोठा खांडे पडलेला पृष्ठपक्ष होता.

इक्थिओसॉरांच्या शरीरात मासे आणि माखली (सेपिया) यांचे जीवाश्मीभूत (शिळारूप झालेले) अवशेष सापडले आहेत, त्यावरून ते या प्राण्यांवर उदरनिर्वाह करीत असत असे दिसते. पण यापेक्षाही कुतुहलजनक गोष्ट म्हणजे जरायुज (पिल्लांना जन्म देणाऱ्या) प्राण्यांच्या शरीरात गर्भ ज्या जागी असतो त्याच जागी काही मोठ्या इक्थिओसॉरांच्या शरीरात लहान इक्थिओसॉरांचे परिरक्षित प्रादर्श (नमुने) आढळले आहेत. यावरून हे पूर्ण वाढ झालेल्या पिल्लांना जन्म देत असत असे मानले जाते.

कर्वे, ज. नी.