स्मायलोडॉन : मांसाहारी ( कार्निव्होरा ) गणाच्या मार्जार ( फेलिडी ) कुलातील मखाइरोडोंटिनी या उपकुलामधील एक नामशेष झालेली प्रजाती. या प्रजातीतील प्राणी सामान्यपणे सेबर-टूथ्ड कॅट या इंग्रजी नावाने ओळखले जातात.

स्मायलोडॉन

सेबर-टूथ्ड कॅट : या मांजरासारख्या प्राण्याच्या वरच्या जबड्यात असणार्‍या लांब तलवारीसारख्या सुळ्यांच्या जोडीमुळे त्यांना हे नाव मिळाले आहे. त्यांना तलवारीसारख्या दातांचे वाघ किंवा सिंह असेही संबोधिले जाते. कारण आधुनिक काळातील सिंह आणि वाघ हे प्राणी फेलिनी या उपकुलात समाविष्ट केले जातात.

सेबर-टूथ्ड कॅट इओसीन कल्पापासून प्लाइस्टोसीन कल्पापर्यंत (५५.८ दशलक्ष ते ११,७०० वर्षांपूर्वी ) अस्तित्वात होते. जीवाश्मांच्या नोंदीनुसार निमरॅव्हिडी कुलातील प्राणी ३७ दशलक्ष ते ७ दशलक्ष वर्षांपूर्वीच नष्ट झाले असावेत. क्षेत्रानुसार त्यात काही पुढील जाती समाविष्ट केलेल्या आहेत : होमोथेरियम, निमरॅव्हस, डायनिक्टिस आणि बार्बरोफेलीस. मखाइरोडोंटिनी कुलातील प्राणी १२ दशलक्ष ते १०,००० वर्षांपूर्वी नष्ट झाले. त्यात स्मायलोडॉन, होमोथेरियम आणि मेगॅन्टेरॉन यांचा समावेश होतो. सेबर-टूथ्ड कॅट मायोसीन आणि प्लायोसीन कल्पात (२३ दशलक्ष ते २.६ दशलक्ष वर्षांपूर्वी ) उत्तर अमेरिका ते यूरोपपर्यंत अस्तित्वात होते. प्लायोसीन कल्पापर्यंत ते आशिया आणि आफ्रिका खंडांतही पसरले. प्लाइस्टोसीन कल्पात त्यांचा प्रसार दक्षिण अमेरिकेतही झाला.

सेबर-टूथ्ड कॅट या प्राण्यांमधील सर्वांत ज्ञात प्रजाती म्हणजे स्मायलोडॉन होय. प्लाइस्टोसीन कल्पात हा आकाराने मोठा व लहान पायांचा प्राणी उत्तर व दक्षिण अमेरिकेत आढळत होता. त्याचा आकार सध्याच्या आधुनिक आफ्रिकी सिंह ( पँथेरा लीओ ) एवढाच होता आणि तो तलवारीसारख्या दातांच्या प्राण्यांच्या उत्क्रांतीचे प्रतिनिधित्व करणारा होता. त्याच्या वरच्या जबड्यातील सु. २० सेंमी.पर्यंत लांब सुळ्यांचा वापर भक्ष्याच्या शरीरामध्ये खुपसण्यासाठी आणि कापण्यासाठी ( विशेषतः मॅस्टोडॉन या हत्तीसारख्या मोठ्या प्राण्यांवर वापरण्यासाठी ) होत असावा. 

स्मायलोडॉनच्या शारीरिक संरचनेवरून त्याची शिकार करण्याची पद्धत दिसून येते. डोके खाली घेण्याकरिता त्याच्या कवटीचा आकार अशा रीतीने तयार झाला होता की, मानेचे मजबूत स्नायू त्याकरिता वापरता येतील. खालच्या जबड्यांतील सुळे लहान झालेले होते आणि चर्वणक ( दाढा ) पात्यांसारखे बनून चावण्यासाठी जागा उरलेली नव्हती. वरच्या सुळक्यांचा वापर करता यावा म्हणून जबडा जवळपास ९०° पर्यंत उघडत असे. काही जीवाश्मशास्त्रज्ञांच्या मते आधुनिक मार्जार कुलातील प्राण्यांपेक्षा त्यांचे जबड्यातील स्नायू कमकुवत होते. स्मायलोडॉनाचे अनेक अवशेष ला ब्रे टार पिट्स ( लॉस अँजेल्स, कॅलिफोर्निया ) येथून प्राप्त झाले आहेत. 

मॅस्टोडॉन प्राणी नामशेष होण्यामुळे सेबर-टूथ्ड कॅट नाहीसे झाले. उत्तर प्लायोसीन कल्पात जुन्या जगातील हा हत्तीसदृश प्राणी नामशेष झाल्यामुळे ( व परिणामी अन्न नाहीसे झाल्यामुळे ) स्मायलोडॉन नामशेष झाले.

पाटील, चंद्रकांत प.; भारस्कर, शिल्पा चं.