हिमालयीन : वीझल मुस्टेला सायबिरिका.वीझल : या लहान मांसाहारी सस्तन प्राण्याचा समावेश मांसाहारी गणाच्या मुस्टेलिडी कुलात होतो. या कुलाच्या पुष्कळ प्रजातींतील प्राणी वीझल म्हणून ओळखले जातात. त्याच्या किमान बारा जाती आहेत व त्यांचा प्रसार जगात अनेक प्रदेशांत म्हणजे आशिया (जावा, सुमात्रा, बोर्निओ), यूरोप, उत्तर आफ्रिका, उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग येथे झालेला आहे. मुस्टेला निव्हॅलिस ही वीझलची सामान्य वा यूरोपियन जाती आहे. या जातीच्या प्राण्याचे शरीर लांबट व सडपातळ असून लांबी १२-२५ सेंमी. आणि शेपटी २.५-१५ सेंमी. लांब, बारीक व टोकाला निमुळती असते. त्याचे वजन ४२-२८० ग्रॅ. असते. वीझलची मु. रिक्झोसा ही जाती अस्तित्वात असलेल्या मांसाहारी प्राण्यांमध्ये सर्वांत लहान आहे. याचे शरीर १५ सेंमी. लांब, शेपटी २.५-२.८ सेंमी. लांब व वजन ३०-७० ग्रॅ. असते. सामान्य वीझलचे डोके लहान व चपटे, मान लांब व वळवता येणारी, पाय आखूड व प्रत्येकाला पाच बोटे आणि बोटाला तीक्ष्ण व वाकड्या नख्या असतात. बोटे जुळलेली असून वीझल बोटांवर चालतात. अंगावरील ⇨ फर आखूड व दाट असते. ती  फर सामान्यतः उन्हाळ्यात पाठीवर तपकिरी व हिवाळ्यात पोटाकडील भागावर पांढरी किंवा पिवळसर असते. उत्तर व समशीतोष्ण प्रदेशांत हिवाळ्यात त्यांचा रंग साधारणतः पांढरा होतो [→ आवर्तिता, सजीवांतील ]. वीझलला ३४ दात असून दंतसूत्र पटाशीचे दात ३/३, सुळे १/१, उपदाढा ३/३ व दाढा १/२ असे असते.

भारतातील हिमालयीन वीझल (मु.सायबिरिक) ह्या जातीचे शरीर ३० सेंमी. लांब व शेपटी १५ सेंमी. लांब असते. तिचा प्रसार हिमालय पर्वतात भारताच्या सीमेबाहेर, मध्य व पूर्व आशिया, उत्तर म्यानमार व जावा येथे आहे. हिमालयात ती समशीतोष्ण व आल्पीय जंगलांत आणि खुल्या गवताळ व झुडपाळ प्रदेशांत १,५२५-४,८८० मी. उंचीच्या पट्ट्यात राहते. भारतात तिचे सबहिमाचलन, कॅनिग्युला व हॉगसोनी हे तीन वंश आढळतात. तिचा रंग लाल खोकडासारखा भडक ते गर्द चॉकलेटी असतो. पाठीच्या व पोटाकडील रंगांत विशेष फरक नसतो.

अन्य हिमालयीन वीझल म्हणजे एर्माइन वा ⇨ स्टोट (मु. एर्मिनिया) हा होय. त्याचा फरधानी हा वंश चित्रल, हाझरा व काश्मीरमध्ये आढळतो. फिकट वीझल (मु. अल्टाइका) जातीचे वास्तव्य हिमालयात ३,९६० मी. उंचीपर्यंत आहे. त्याचा टेमन हा वंश तेथे आढळतो. पिवळ्या पोटाच्या वीझलचे (मु. काठिया) वसतिस्थान पश्चिम हिमालय ते पूर्व हिमालय आसामपर्यंत आहे. त्याचे काठिया व कॅपोरियाकॉय हे दोन वंश भारतात आहेत. पट्टेरी पाठीचा वीझल (मु. स्ट्रायजिडॉर्सा) हा दुर्मिळ प्राणी असून त्याच्या पाठीवर व पोटावर ठळक पांढरा किंवा पांढरट रंगाचा पट्टा असतो. तो १,२२०-२,१३५ मी. उंचीवरील समशीतोष्ण जंगलात आढळतो.

पॅटॅगोनियन वीझल (लिंकोडॉन पॅटॅगोनिकस) ही दक्षिण अमेरिकेतील जाती असून ती अर्जेंटिना व चिलीमधील पंपास प्रदेशात आढळते. तिचे शरीर ३०-३५ सेंमी. लांब, शेपटी ६-९ सेंमी. लांब व करड्या रंगाची असते. खालची बाजू गर्द तपकिरी असून कपाळावरील आडवा पांढरा पट्टा मानेच्या दोन्ही बाजूंनी जातो.

उत्तर आफ्रिकी ठिपकेदार वीझल (पीसिलिक्टिस लायबिकस) ही जाती शेतात आढळते. शरीरावर काळे पांढरे ठिपके असून लांबी २३-२९ सेंमी. व शेपटी १३-१८ सेंमी. लांब असते. चेहरा व पाठीप्रमाणे शेपटीवरही पट्टे असतात. आफ्रिकी पट्टेरी किंवा केप वीझल (पीसिलॉगेल आल्बिन्यूका) ही जाती काँगोच्या दक्षिणेस आढळते. तिचे शरीर २५-३५ सेंमी. लांब व शेपटी १५-२५ सेंमी. लांब असून अंगावर पिवळसर व काळे पट्टे आणि खालची बाजू काळी असते. शेपटी पांढरी असते.

वीझल चपळ, धीट व रक्तपिपासू वृत्तीचा आहे. तो खडक, वृक्षांच्या मुळांच्या खाली, लाकडांच्या ढोल्यांत व कधीकधी इतर प्राण्यांच्या बिळांत वसती करतो. डोंगरी प्रदेशातल्या खेड्यांत आढळणारा वीझल भिंती, घराच्या जमिनी व धाबे यांतील बिळांतही राहतो. तो खादाड परभक्षक (अन्य जीवांवर उपजीविका करणारा) असून उंदीर, घुशी व इतर कृंतक (कुरतडणारे) प्राणी तसेच मासे, बेडूक, पक्षी, पक्ष्यांची अंडी, सरीसृप (सरपटणारे) प्राणी व कीटक यांचा फडशा पाडतो. रात्रीच्या वेळी तो शिकार करतो.

वीझल पाठीला पोक काढून बरेचसे अंतर कापतो किंवा चपळाईने उड्या मारीत चालतो. वासाच्या मदतीने तो शिकारीचा माग काढतो. भक्ष्याचा पाठलाग करीत पाण्यात जातो व उत्तम प्रकारे पोहतो. मधून मधून थांबून ताठ उभे राहून आजूबाजूची टेहळणी करतो. सदैव अस्वस्थ व हालचाल करीत असतो आणि चपळाईने बिळे, घळी, झाडी इत्यादींतून भक्ष्यावर तुटून पडतो. खेड्यांच्या जवळपास वसतीला असणारे वीझल कोंबड्या व कबुतरांच्या खुराड्यांवर हल्ला करतात आणि खाण्यापेक्षा जास्त पक्षी मारून टाकतात व रक्त पितात. तो धीट असल्यामुळे आपल्यापेक्षा मोठ्या प्राण्यावरही हल्ला करतो. भीतीमुळेच भक्ष्य अर्धमेले होते, त्यामुळे त्याला मारण्यासाठी फार कष्ट पडत नाहीत. भक्ष्याने प्रतिकार केलाच, तर तो भक्ष्याच्या नरडीचा घोट घेतो, विणीचा हंगाम किंवा पिले बरोबर असतानाचा काळ सोडून वीझल एरवी एकटाच शिकार करतो.

भारतीय जातींच्या वीझलांच्या विणीविषयी कसल्याच माहितीची नोंद झालेली नाही. इतर वीझलांना जातिपरत्वे एका वेळेला ३-१३ पिले होतात. वर्षातून १-२ वेळा वीण होते. गर्भावधी ३५-३३७ दिवसांचा असतो (फलित अंड्याचे गर्भाशयभित्तीत रोपण होण्यास विलंब होतो व त्यामुळे गर्भावधी वाढतो). सामान्य वीझल जमिनीतील बिळात किंवा ढोलीत पालपाचोळ्याचे घरटे तयार करतो व त्यात तीन पिलांची काळजी घेतो. वीझलचा आयुःकाल सु. ८ वर्षे असतो.

वीझलच्या (विशेषतः एर्माइनाच्या) हिवाळ्यातील पांढरया फरपासून एर्माइन कोट हे स्त्रियांचे महागडे वस्त्र बनवितात. चीनमध्ये कलाकारांचे कुंचले बनविण्यासाठी वीझलच्या शेपटीचा उपयोग करतात.

पहा : फर-२ फेरेट मार्टेन स्टोट.

जमदाडे, ज. वि. डाहाके, ज्ञा. ल.