रॉजर वॉलकॉट स्पेरीस्पेरी, रॉजर वॉलकॉट : (२० ऑगस्ट १९१३–१७ एप्रिल १९९४). अमेरिकन तंत्रिकाजीववैज्ञानिक. मेंदूच्या कार्यासंबंधी अनुसंधान केल्याबद्दल स्पेरी यांना ⇨ डेव्हिड हंटर हुबेल आणि ⇨ टॉर्स्टन निल्स वीझल यांच्या समवेत १९८१ सालचे शरीरक्रियाविज्ञानाचे किंवा वैद्यकाचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. स्पेरी यांनी विशेषतः प्रमस्तिष्क गोलार्धाच्या कार्याविषयी वैशिष्ट्यपूर्ण संशोधन केले.

स्पेरी यांचा जन्म हार्टफर्ड (कनेक्टिकट) येथे झाला. त्यांनी इंग्रजी साहित्यातील बी.ए. (१९३५) आणि मानसशास्त्रातील एम्.ए. (१९३७) या पदव्या ओबर्लिन महाविद्यालयातून मिळविल्या. त्यानंतर त्यांनी प्राध्यापक पॉल ए. वाइस यांच्या मार्गदर्शनाखाली शिकागो विद्यापीठात प्राणिविज्ञान या विषयात पीएच्.डी. पदवी संपादन केली (१९४१). ते हार्व्हर्ड विद्यापीठाच्या यर्कीस लॅबोरेटरीज ऑफ प्रायमेट बायॉलॉजी येथे रिसर्च फेलो (१९४२–४६) शिकागो विद्यापीठामध्ये शारीर (शरीररचनाशास्त्र) विभागात साहाय्यक प्राध्यापक (१९४६–५२) व मानसशास्त्राचे सहप्राध्यापक (१९५२-५३) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ येथे विभाग प्रमुख (१९५२-५३) आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये मनोजीवविज्ञानाचे हिक्सॉन प्राध्यापक(१९५४ पासून) होते.

स्पेरी यांचे सुरुवातीचे संशोधन तंत्रिका तंतूंचे पुनरुद्भवन यासंबंधी होते. पुढे त्यांना मेंदूच्या कार्यासंबंधी गोडी निर्माण झाली आणि त्यांनी प्राण्यांवर संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अपस्मार झालेल्या रुग्णांच्या विभाजित मेंदूवर संशोधन सुरू केले. अशा मेंदूमध्ये उजवे आणि डावे मस्तिष्क गोलार्ध जोडणाऱ्या जाड तंत्रिकांची वाहिनी (तंतुपट्ट) नष्ट वा दुखापतग्रस्त झालेली असते. त्यांच्या अध्ययनानुसार त्यांनी दाखवून दिले की, मेंदूची डावी बाजू (डावा मस्तिष्क गोलार्ध) साधारणतः विश्लेषणात्मक आणि शाब्दिक कार्याबाबत प्रभावी असते, तर उजवी बाजू (उजवा मस्तिष्क गोलार्ध) संगीत, आकारासंबंधी आणि इतर विशिष्ट क्षेत्रांत सरस असते. स्पेरी यांनी १९४० च्या दशकात शेवटी शस्त्रक्रिया आणि प्रायोगिक तंत्रे विकसित करून मेंदूतील विविध भागांत चालणाऱ्या मनोक्रियांसंबंधी विशेष संशोधनाची पार्श्वभूमी तयार केली. याचा वापर नव्या पिढीतील शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ करीत आहेत.

स्पेरी यांना अनेक मानसन्मान व पुरस्कार प्राप्त झाले. त्यांपैकी काही महत्त्वाचे पुढीलप्रमाणे आहेत : नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९६०) आणि अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस (१९६३) या संस्थांवर निवड, सोसायटी ऑफ एक्सपेरिमेंटल सायकॉलॉजी या संस्थेचे हाउअर्ड् क्रॉस्बी वॉ रेन पदक (१९६९), कॅलिफोर्निया सायंटिस्ट ऑफ द इयर पुरस्कार (१९७२), ॲल्बर्ट लास्कर मेडिकल रिसर्च पुरस्कार (१९७९), अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ अचीव्हमेंट गोल्डन प्लेट पुरस्कार (१९८०) इत्यादी.

स्पेरी यांचे पॅसाडीना (कॅलिफोर्निया) येथे निधन झाले.

भास्कर, शिल्पा चं.