रोमर (रमर), ओलाउस (ओले) : (२५ सप्टेंबर १६४४-१९ सप्टेंबर १७१०). डॅनिश ज्योतिषशास्त्रज्ञ, ज्योतिषशास्त्रीय वेधांवरून प्रकाशाला वेग असतो, हे त्यांनी प्रथम सिद्ध केले. तसेच प्रकाशवेग प्रथमच शास्त्रीय पद्धतीने काढण्याचे श्रेय रोमर यांना आहे.

रोमर यांचा जन्म ऑर्ह्‌स (डेन्मार्क) येथे झाला. १६६२ मध्ये कोपनहोगन येथे जाऊन त्यांनी इरॅस्मस बार्थोलिनस यांच्या मार्गदर्शनाखाली खगोलशास्त्र व गणित या विषयांतील शिक्षण पूर्ण केले. बार्थोलिनस यांनी रोमर यांच्याकडे ट्यूको ब्राए यांच्या अप्रकाशित हस्तलिखितांच्या संपादनाचे काम सोपविले. कोपनहेगन विद्यापीठातील अभ्यास पूर्ण केल्यावर रोमर यांनी १० वर्षे पॅरिस येथील शासकीय वेधशाळेत काम केले. १६८१ मध्ये ते कोपनहेगन येथे गणिताचे प्राध्यापक व वेधशाळेचे संचालक झाले. १६७९ मध्ये एक शास्त्रीय शिष्टमंडळ इंग्लंडला नेऊन तेथे त्यांनी न्यूटन, जॉन फ्लॅमस्टीड, हॅली वगैरे शास्त्रज्ञांची भेट घेऊन त्यांच्या कार्यांचा परिचय करून घेतला.

शास्त्रज्ञांच्या परिषदेने नियुक्त केलेले पीकार यांच्याबरोबर ते व्हेन येथे गेले होते. तेथे असलेल्या ब्राए यांच्या वेधशाळेचे रेखांश पुन्हा ठरवण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवलेली होती. तेथे त्यांनी गुरू ग्रहाच्या आयो या उपग्रहाच्या ग्रहणाचे खूप वेध घेतले आणि पृथ्वी व गुरू यांच्या सापेक्ष स्थानांनुसार ग्रहणांमधील कालावधीत पडणाऱ्या फरकांवरून प्रकाशाला वेग असतो, हे दाखवून त्याचे मापन केले. गुरूच्या उपग्रहाचे ग्रहण त्याच्या गतीच्या गणिताने वर्तविलेल्या अपेक्षित वेळी नेहमीच लागते असे नाही. गुरू आणि सूर्य पृथ्वीच्या एकाच अंगास असताना म्हणजे सूर्य व गुरू युतीत असताना ग्रहण उशिरा लागते, कारण गुरू पृथ्वीपासून कमाल अंतरावर असतो. उलट गुरू व सूर्य पृथ्वीच्या विरुद्ध अंगास असताना म्हणजे गुरू व सूर्य प्रतियुतीत असताना ग्रहण लवकर लागताना आढळते. कारण या वेळी गुरू पृथ्वीपासून किमान अंतरावर आलेला असतो. सूर्य व पृथ्वीपासून गुरू समान अंतरावर असताना होणारी ग्रहणे गणितावरून वर्तविलेल्या वेळीच लागतात. ग्रहण कालावधीत पडणारा हा फरक प्रकाशाला कमीअधिक अंतर आक्रमिण्यासाठी लागणाऱ्या कमी अधिक वेळामुळे पडतो, असे रोमर यांनी प्रतिपादन केले. ५ सप्टेंबर १६७६ रोजीच्या आयोच्या ग्रहणाला १० मिनिटे उशीर लागेल, असा त्यांनी केलेला कयास बरोबर ठरला. अशा रीतीने प्रथमच अजमावलेला प्रकाशाचा वेग सेकंदाला सव्वादोन लक्ष किमी. आला होता. अगदी अलीकडील मापनानुसार प्रकाशाचा वेग सेकंदाला तीन लक्ष किमी. आला आहे.

कोपनहेगन विद्यापीठाच्या वेधशाळेत असताना त्यांनी उन्नतांश व क्षितिजांश दर्शक महावृत्ते असणारे उपकरण बनवून त्यास साध्या दुर्बिणीची जोड दिली व त्याच्या साहाय्याने अनेक ताऱ्यांचे वेध घेतले. पाणी उकळताना असणारे तापमान व बर्फ वितळत असताना असणारे तापमान यांमधील फरकावर आधारित एक तापमापक त्यांनी बनविला होता. हीच कल्पना व तंत्र वापरून सेल्सिअस व फॅरेनहाइट तापमापक पुढे निर्माण झाले. घड्याळाच्या अंतर्गत रचनेतही त्यांनी सुधारणा सुचविल्या होत्या.

टांकसाळीचे प्रमुख, बंदरांचे सर्वेक्षक, नौकावास्तुशिल्प निरीक्षक, प्रिव्ही कौन्सिलचे सभासद, प्राक्षेपिकीतील तज्ञ, कोपनहेगनचे महापौर व पहिले न्यायाधीश इ. कित्येक पदांवर त्यांनी निष्ठापूर्वक काम केले. रोमर यांनी केलेल्या लिखाणाची बहुतेक हस्तलिखिते १७२८ च्या कोपनहेगनच्या मोठ्या आगीत जळून भस्मसात झाली.

कोपनहेगन येथे ते मृत्यू पावले.

ठाकूर. अ. ना.