अवशिष्ट प्राणिसमूह : प्राचीन भूविज्ञानीय कल्पांमध्ये (भूविज्ञानाच्या दृष्टीने मोजलेल्या कालखंडांमध्ये) फार दूरवर फैलावलेला एखादा प्राणिसमूह जर आज जवळजवळ लुप्त झाला असेल, तर त्या समूहातील मागे राहाणाऱ्या किंवा उत्तरजीवी प्राण्यांना ‘अवशिष्ट’ म्हणतात आणि एखादा प्राणिसमूह जर अशा तऱ्हेने शिल्लक राहिला असेल, तर त्याला अवशिष्ट प्राणिसमूह म्हणतात. डिप्‍नोई उपवर्गाचे असंख्य प्रतिनिधी पुराजीव-महाकल्पात अस्तित्वात होते, पण आज मात्र त्यांच्यापैकी दक्षिण अमेरिकेतील लेपिडोसायरन पॅरॅडॉक्सस, आफ्रिकेत आढळणारा प्रोटॉप्टेरस ॲनेक्टेन्स आणि ऑस्ट्रेलियात सापडणारा निओसेरटोडस फॉर्स्टरोय याच काय त्या फुप्फुसमीनांच्या (कल्ल्याबरोबरच श्वसनासाठी उपयुक्त असणारा फुप्फुसासारखा वायुकोश असलेल्या माशांच्या) तीन जाती अस्तित्वात आहेत. म्हणून त्या डिप्‍नोई उपवर्गाच्या अवशिष्ट होत.

अवशिष्टाचे एक चांगले उदाहरण स्फीनोडॉन या सरड्यासारख्या प्राण्याचे होय. हा प्राणी सरीसृपांच्या (सरपटणाऱ्या प्राण्यांच्या) र्‍हिंकोसीफॅलिया गणातला आहे. हा गण जवळजवळ लुप्त झालेला आहे, पण आज न्यूझीलंडलगतच्या काही बेटांत या गणातील फक्त स्फीनोडॉन हीच काय ती एक जाती आढळते. या प्राण्याची शरीररचना जुरासिक कल्पातील याच्या पूर्वजांच्या शरीररचनेसारखीच आहे. गेल्या १३ कोटी ५० लक्ष

वर्षांत या प्राण्यात फारसा बदल झालेला नाही, असे शास्त्रज्ञ समजतात. अवशिष्टाचे आणखी एक ठळक उदाहरण ⇨लॅटिमेरिया (लॅटिमेरिया कॅलम्नी) या माशाचे आहे. या माशाचा एक नमुना १९३८ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळील समुद्रात पकडण्यात आला. याच्या परीक्षणानंतर हा सीलॅकँथिडी या माशांच्या कुलातला आहे असे दिसून आले. यानंतर १९५२ मध्ये कोमोरो बेटाजवळ याच कुलातला आणखी एक नमुना सापडला. मध्यजीव-महाकल्पच्या अखेरपासून हे कुल लुप्त झाले असा समज होता.

असे अवशिष्ट त्यांच्या नातेवाइकांपासून कालाने अलग पडलेले असतात आणि दुसरे कित्येक स्थानपरत्वे विभक्त झालेले असतात. एखाद्या प्राणिसमूहाची परिस्थिती बदलून ती त्यांना राहण्याकरिता अयोग्य झाली म्हणजे आपल्याला दुसरा प्रकार (स्थानपरत्वे विभक्त) दिसून येतो. उदा., एखाद्या उपसागराचे किंवा आखाताचे समुद्रापासून अगल होऊन गोड्या पाण्याच्या सरोवरात रूपांतर होणे. उपसागराचा अथवा आखाताचा मूळ समुद्री प्राणिसमूह नष्ट होईल, परंतु त्यापैकी काही जाती नव्या परिस्थितीला अनुकूलित होऊन टिकाव धरून जिवंत राहू शकतील. यांना ‘समुद्री अवशिष्ट’ म्हणणे योग्य होईल. साधारणपणे त्यांच्यात फक्त शरीरक्रियात्मक बदल होतात असे नाही, तर आकृतिक बदलदेखील होतात. काळा समुद्र आणि कास्पियन समुद्र यांत राहणारे विशिष्ट हेरिंग मासे आणि क्रस्टेशियाच्या (कवचधारी प्राण्यांच्या) वेगवेगळ्या जिवंत जाती अवशिष्ट होत. अशा प्रकारे प्राणी समुद्री जातींचे अगदी जवळचे नातेवाईक अाहेत. अशा प्रकारे एके ठिकाणी आढळणाऱ्या सगळ्या प्राण्यांच्या समुच्चयाला ‘अवशिष्ट प्राणिसमूह’ म्हणता येईल. उत्तर अमेरिका, स्वीडन, आयर्लंड आणि स्कॉटलंडमधील सरोवरांत अशा प्रकारचे समुद्री अवशिष्ट आढळतात.

गेल्या हिमकालाची सुरुवात झाल्यावर व उत्तर ध्रुव प्रदेशात हिम व बर्फ साचून त्यांच्या थरांचा विस्तार वाढल्यावर ते थर दक्षिणेकडील प्रदेशावर अधिकाधिक पसरू लागले. त्याबरोबर ध्रुवीय प्रदेशातील मूळचे भूचर व गोड्या पाण्यातील प्राणी अधिक दक्षिणेकडील हिममुक्त प्रदेशात जाऊ लागले. बर्फाच्या थरांच्या लगतच्या जमिनीवर व गोड्या पाण्यात ते राहत असत. पुढे हिमकाल संपू लागल्यावर हिमाचे थर आखडत जाऊन उत्तरेकडे सरकू लागले. त्याबरोबर त्यांच्या लगतच्या हिममुक्त प्रदेशातील प्राणीही उत्तरेकडे सरकू लागले व हिमाचे थर नाहीसे झाल्यावर ते प्राणी परत उत्तरेकडील प्रदेशात गेले. हे होत असताना अधिक दक्षिणेकडील सखल व सपाट प्रदेशातील जलवायुमान ऊबदार झाल्यामुळे तेथे गेलेले जीव नाहीसे झाले. पण त्या प्रदेशात काही जागी उंच पर्वत होते व त्याचे जलवायुमान अधिक थंड होते. तसेच काही ठिकाणी थंड पाण्याची खोल सरोवरेही होती. अशा तुटक तुटक क्षेत्रांत मात्र त्या जीवांपैकी काही शिल्लक राहिले. अशा रीतीने तुटक तुटक क्षेत्रांत मागे राहिलेल्या जीव जातींच्या वंशजांना ‘हिमनदीय अवशिष्ट जीव’ असे म्हणता येईल. पण गोड्या पाण्यातील प्राण्यांपैकी पुष्कळ लहान प्राणी असे असतात की, त्यांचे वितरण वाऱ्याने किंवा अन्य मार्गानेही सहज होऊ शकते. म्हणून अशा सर्व जाती हिमनदीय अवशिष्ट जाती आहेत, असे निःसंशयपणे म्हणता येणार नाही.

कर्वे, ज. नी.