ओल्डेनबर्ग : पश्चिम जर्मनी राज्याच्या लोअर सॅक्सनी प्रांतातील एक जिल्हा-ठाणे. लोकसंख्या १,३१,५४५ (१९७१). जहाजवाहतुकीस सोयीस्कर अशा हुंटे नदीच्या दोन्ही काठांवर, ब्रेमेनच्या पश्चिमेस ४८ किमी. हे वसले आहे. इतिहासात याचा प्रथम निर्देश ११०८ मध्ये आढळतो. १३४५ मध्ये हे ओल्डेनबर्ग जहागिरीचे मुख्य ठाणे झाले. १९१८ पर्यंत या जहागिरीचे अस्तित्व टिकून होते. दुसऱ्या महायुद्धात विमानहल्ल्याने याचे बरेच नुकसान झाले परंतु जुना वाडा वाचला. तो  व भोवतालची विस्तीर्ण बाग आता सार्वजनिक संग्रहालय आहे. लोहमार्गाचे हे महत्त्वाचे केंद्र असून धान्य, गुरे, घोडे यांची ही मोठी पेठ समजली जाते. येथे काचसामान, तंबाखू, यंत्रे, बीअर वगैरेंचे कारखाने आहेत.

शहाणे, मो. ज्ञा.