लँडा (लंडौ), ल्ये अव्ह डव्ह्यीडव्ह्यिच : (२२ जानेवारी १९०८-१ एप्रिल १९६८). रशियन भौतिकीविज्ञ. संघनित द्रव्यासंबंधीच्या (घन व द्रव अवस्थेतील द्रव्यासंबंधीच्या) संशोधनाबद्दल, विशेषतः द्रवरूप हीलियमाच्या बाह्यात्कारी विरोधाभासी वाटणाऱ्या गुणधर्माविषयी त्यांनी दिलेल्या सैद्धांतिक स्पष्टीकरणाबद्दल, १९६२ चे भौतिकीचे नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले.

लँडा यांचा जन्म बाकू, आझरबैजान येथे झाला. वयाच्या तेराव्या वर्षीच शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर १९२२ मध्ये बाकू विद्यापीठात भौतिकी, गणित व रसायनशास्त्र या विषयांचे अध्ययन करण्यास प्रारंभ केला. १९२४ मध्ये त्यांना लेनिनग्राड विद्यापीठात पाठविण्यात आले. तेथून १९२७ मध्ये पदवी संपादन केल्यावर त्यांनी लेनिनग्राड फिजिको-टेक्निकल इन्स्टिट्यू टमध्ये संशोधन चालू ठेवले. १९२९ मध्ये सोव्हिएट सरकारची प्रवासी अधिछात्रवृत्ती व रॉकफेलर प्रतिष्ठानची अधिछात्रवृत्ती मिळाल्यावर जर्मनीतील गटिंगेन व लाइपसिक येथे ते थोडा काळ राहिले आणि मग डेन्मार्कमधील कोपनहेगन येथील नील्स बोर यांच्या इन्स्टिट्यूट फॉर थिऑरेटिकल फिजिक्स या सुप्रसिद्ध संस्थेत गेले. बोर यांच्या कार्याचा व त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या अध्ययनाचा लँडा यांच्या भौतिकीविषयीच्या दृष्टिकोनावर फार मोठा प्रभाव पडला. १९३१ मध्ये रशियाला परतण्यापूर्वी त्यांनी केंब्रिज व झुरिक येथेही काही काळ अध्ययन केले. त्यानंतर १९३३ व १९३४ मध्ये कोपनहेगनला अल्प काळ भेट देण्याखेरीज लँडा यांनी आपले उर्वरित आयुष्य रशियातच काढले. १९३२ साली ते खारकॉव्ह येथील युक्रेनियम फिजिको टेक्निकल इन्स्टिट्यू टमध्ये भौतिकी विभागाचे प्रमुख झाले. १९३७ पासून अखेरपर्यंत त्यांनी रशियाच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट फॉर फिजिकल प्रॉब्लेम्स या संस्थेत सैद्धांतिक विभागाचे प्रमुख म्हणून काम केले. त्याच वेळी खारकॉव्ह व मॉस्को विद्यापीठांत सैद्धांतिक भौतिकीचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी सातत्याने अध्यापन केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे खारकॉव्ह हे रशियातील सैद्धांतिक भौतिकीचे केंद्रस्थान बनले. स्टॅलिन यांच्या कारकिर्दीत लँडा यांना १९३८ मध्ये कैद करण्यात आले होते, परंतु पी.एल्. काप्यिट्स या भौतिकीविज्ञांच्या व्यक्तीगत मध्यस्थीमुळे त्यांची सुटका झाली.

लँडा यांची त्यांच्या काळातील सैद्धांतिक भौतिकीविज्ञांमध्ये गणना होते. त्यांनीनीच तापमान भौतिकी,पुंजयामिकी, आणवीय व अणुकेंद्रीय भौतिकी, खगोल भौतिकी,ऊष्मागतिकी, पुंज विद्युत् वगैरे भौतिकीच्या विविध शाखांत महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी पुंजयामिकीच्या बहुकणयुक्त स्थितींकरिता विस्तार केला. यांपैकी हीलियम वायूच्या २.२° के. तापमानाच्या खाली आढळणाऱ्या हीलियम-II या गूढ द्रवरूपाच्या अतिप्रवाहितेचे (घर्षणरहित प्रवाहीपणाचे) त्यांनी दिलेले स्पष्टीकरण सर्वांत उल्लेखनीय आहे [⟶ अतिप्रवाहिता नीच तापमान भौतिकी हीलियम]. लँडा यांनी आपल्य पुंज द्रायुगतिकीद्वारे अतिद्रायुरूप हीलियम ही प्राथमिक क्षुब्धावस्थांच्या श्रेणीशी ⇨फोनॉन व उच्च कोटीच्या रोटॉन नामक क्षुब्धावस्था) सह-अस्तित्वात असलेली पुंजयामिकीय निम्नतम अवस्था आहे, असे प्रतिपादिले आणि त्यावरून द्वितीय ध्वनी या नवीन तरंगगतीचे भाकीतही वर्तविले. फोनॉन, रोटॉन व द्वितीय ध्वनी यांची प्रयोगिक पडताळणीही नंतर यशस्वीपणे करण्यात आली.

त्यांनी भौतिकीच्या विविध शाखांत केलेले कार्य लँडा प्रतिचुबकत्व, घन अवस्था भौतिकीतील लँडा पातळ्या, ⇨आयनद्रायू भौतिकीतील लँडा दमनक्रिया, नीच तापमान भौतिकीतील लँडा ऊर्जा वर्णपट यांसारख्या त्यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या निरनिराळ्या संज्ञांवरून दिसून येते. त्यांनी १९३० मध्ये चुंबकीय क्षेत्रातील मुक्त इलेक्ट्रॉनांच्या वर्तनासंबंधी पुंज-सैद्धांतिक दृष्ट्या केलेले आपले संशोधन प्रसिद्ध केले आणि ते धातूंचे गुणधर्म समजण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. १९३५ मध्ये त्यांनी लोहासारख्या पदार्थातील आणवीय चुंबकांच्या वर्तनाचे गणितीय स्पष्टीकरण देऊन लोहचुंबकत्वासंबंधीच्या ज्ञानात महत्त्वाची भर घातली. १९५० नंतरच्या काळात त्यांनी हीलियमाच्या तीन अणुभार असलेल्या समस्थानिकाच्या (अणुक्रमांक तोच पण तीन अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकाराच्या) गुणधर्मासंबंधी संशोधन केले. हा समस्थानिक निरपेक्ष शून्य तापमानाच्या [⟶केल्व्हिन निरपेक्ष तापक्रम] वर १/१० अंशापेक्षा कमी इतक्या तापमानालाच तयार हात असल्याने त्याचा अभ्यास करणे अतिशय अवघड होते. १९५६-५८ या काळात त्यांनी या समस्थानिकाच्या गुणधर्मांसंबंधीचे सिद्धांत प्रसिद्ध केले आणि त्यांत त्यांनी एका नवीन प्रकारच्या तरंग प्रसारणाचे (‘शून्य ध्वनी’चे) भाकीत वर्तविले होते.

त्यांनी ई.एम्. लिफशिट्स यांच्या समवेत भौतिकीच्या संपूर्ण विषयाचे एकत्रितपणे विवरण करणारा कोर्स ऑफ थिऑरेटिकल फिजिक्स हा सुप्रसिद्ध ग्रंथ (इंग्रजी भाषांतर ८ खंड) लिहिला आणि त्याबद्दल त्या दोघांना लेनिन विज्ञान पारितोषिक संयुक्तपणे मिळाले. याखेरीज त्यांना हीरो ऑफ सोशॅलिस्ट एफर्ट हा किताब, रशियाचा राज्य पुरस्कार तीन वेळा, तसेच माक्स प्लांक पदक व फ्रिट्झ लंडन पारितोषिक हे बहुमान मिळाले. रशियाची ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस लंडनची रॉयल सोसायटी, अमेरिकेची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस वगैरे मान्यवर संस्थांचे ते सदस्य होते. त्यांचे वैज्ञानिक निबंध डी.टर हार यांनी कलेक्टेड पेपर्स ऑफ एल्.डी. लँडा (१९६५) सर ग्रंथांत एकत्रितपणे संपादित केले. त्यांच्या सर्व ग्रंथांचे इंग्रजीत भाषांतर झालेले आहे.

लँडा हे जानेवारी १९६२ रोजी मोटारीच्या एका गंभीर अपघातात सापडले. अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तज्ञांनी त्यांना जिवंत ठेवण्याची पराकाष्ठा केली पण त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता सहकाऱ्यांना व विद्यार्थ्यांना थोडाफार सल्ला देण्यापलीकडे मूळ स्थितीत पुन्हा आलीच नाही आणि सहा वर्षानंतर ते मॉस्को येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.