पांढऱ्या डोळ्यांचा तीसा (ब्युटॅस्टुर टीसा).

तीसा : फॅल्कॉनिडी या पक्षिकुलातील काही वंशांतल्या पक्ष्यांना बझर्ड (इंग्रजी नाव) हे सामान्य नाव दिले जाते. भारतात दोन–चार प्रकारचे बझर्ड आढळतात, पण त्यांपैकी पांढऱ्या डोळ्यांचा बझर्ड सगळीकडे आढळतो, यालाच तीसा हे भारतीय नाव आहे. याचे शास्त्रीय नाव ब्युटॅस्टुर टीसा असे आहे.

झुडपे असलेल्या खुल्या प्रदेशात व लागवडीखाली असलेल्या शेतांमध्ये हा राहतो. डोंगर आणि दमट व दाट अरण्यात राहणे त्याला आवडत नाही. हे पक्षी एकेकटेच असतात. 

तीसा साधारणपणे ⇨ डोमकावळ्याएवढा असून त्याची लांबी सु. ४५ सेमी. असते. पाठीचा रंग तपकिरी असून कधीकधी त्यात तांबूस छटा असते. हनुवटीचा रंग पांढरा असतो, गळादेखील पांढरा असून त्यावर तीन उभे काळे पट्टे असतात. मानेच्या काट्यावर (पहिला मणका असलेल्या मानेच्या भागावर) मोठा पांढरा ठिपका असतो, डोळे पांढरे किंवा पिवळसर पांढरे असतात. चोच वाकडी, अणकुचीदार असून तिचे बूड नारिंगी रंगाचे व टोक काळे असते, मेदुर (चोचीच्या बुडाशी वरच्या बाजूला असणारी मांसल फुगीर जागा) नारिंगी असते, शरीराचा खालचा भाग तपकिरी व पांढरा असतो, शेपटीची वरची बाजू तांबूस तपकिरी आणि खालची पांढरट तपकिरी असते, पाय मळकट नारिंगी पिवळ्या रंगाचे असतात. नर आणि मादी दिसण्यात सारखीच असतात.

हा हिंस्र पक्षी असूनदेखील स्वभावाने सुस्त आहे. वठलेली झाडे, तारायंत्राचे खांब इ. ठिकाणी हा बसलेला असतो आणि तेथूनच भक्ष्यावर झडप घालतो. उंदीर, सरडे, बेडूक, टोळ, नाकतोडे आणि इतर मोठे कीटक याचे भक्ष्य होय. 

या पक्ष्यांच्या प्रजोत्पादनाचा काळ फेब्रुवारीपासून मेपर्यंत असतो. नर व मादी काटक्याकुटक्या आणून गर्द पालवी असलेल्या एखाद्या झाडाच्या फांदीच्या दुबेळक्यात कावळ्याच्या घरट्यासारखे एक ओबडधोबड घरटे बांधतात. मादी त्यात तीन अंडी घालते, त्यांचा रंग हिरवट पांढरा असतो. उबविते, पण पिल्लांचे संगोपन दोघेही करतात. 

लांब पायांचा बझर्ड हा भारतात हिवाळी पाहुणा आहे. ऑगस्ट पासून नोव्हेंबर पर्यंत केव्हातरी तो येतो आणि फेब्रुवारी व मार्च या महिन्यात आग्नेय यूरोप, ईशान्य आफ्रिका आणि मध्य आशिया यांपैकी एखाद्या ठिकाणी परत जातो.

कर्वे, ज.नी.