बार्रुश, झ्युआंउद : (१४९६ ?–२० ऑक्टोबर १५७०). थोर पोर्तुगीज इतिहासकार. जन्म व्हीझेऊ येथे. पोर्तुगालचा राजा तिसरा जॉन (दों झ्युआंऊ तेसैरु) हा राजपुत्र असताना बार्रुश त्याचा व्यक्तिगत नोकर (पेज) होता. राजदरबारीच त्याचे शिक्षण झाले. तिसऱ्या जॉनसाठी त्याने क्रॉनिक द इंपॅरादोर क्लारिमुन्दु(१५२०. इं. शी. क्रॉनिकल ऑफ एंपरर क्लारिमुन्दु) हा रोमान्स लिहिला. हाच त्याचा पहिला ग्रंथ होय. तिसरा जॉन राजा झाल्यानंतर त्याने गिनीचा गव्हर्नर म्हणून बार्रुशची नेमणूक केली. पुढे भारताचा कोषपाल (ट्रेझरर ऑफ इंडिया) आणि भारतातील पोर्तुगीज वसाहतींसाठी राजप्रतिनिधी-Casa da India e Mina-ह्या पदांवरही त्याला नेमले (१५२५-२८, १५३३-६७).

दॅकादाश द आझिआ (४ खंड, १५५२,१५५३,१५६३ आणि १६१५ इं. शी. डेकेड्स ऑफ एशिया) हा बार्रुशचा प्रमुख ग्रंथ. साम्राज्यसंपादन, नौकानयन, व्यापार ह्यांसारख्या क्षेत्रांत, पोर्तुगालने आशियाच्या भूमीवर बजावलेली कामगिरी बार्रुशने आपल्या ह्या ग्रंथात वर्णिलेली आहे. साध्या परंतु जोमदार शैलीत लिहिलेल्या बार्रुशच्या ह्या ग्रंथाचा प्रभाव पोर्तुगीज महाकवी ⇨ कामाँइश ह्याच्यावरही पडला होता. विख्यात रोमन इतिहासकार लिव्ही ह्याचा आदर्श बार्रुशने स्वतःसमोर ठेवलेला होता. पोर्तुगीज लिव्ही म्हणूनही तो ओळखला जातो. बार्रुश हा सदसद् विवेकशील इतिहासकार होता. कोणत्याही व्यक्तीचा अधिक्षेप न करता वस्तुस्थिती मांडण्याची त्याची प्रवृत्ती त्याच्या ह्या ग्रंथातून प्रत्ययास येते.

उपर्युक्त इतिहासग्रंथाखेरीज कार्तीन्या पारा आमेन्देर अ लेर (१५४०, इं. शी. ए. प्रायमर फॉर टीचिंग टू रीड) आणि ग्रामातिका द लींग्वा पोर्तुगेझा (१५३९, इं. शी. ग्रॅमर ऑफ पोर्तुगीज लँग्वेज) ही शैक्षणिक स्वरूपाची पुस्तकेही त्याने लिहिली. तुमार येथे तो निधन पावला.

रॉड्रिग्ज, एल्. ए. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)