स्वरयंत्र : श्वसनमार्गाच्या प्रारंभी व घसा संपल्यानंतर सुरू होणार्‍या उपास्थियुक्त ( कूर्चायुक्त ) श्वासनालेच्या सर्वांत वरच्या भागाचे रूपांतर स्वरयंत्रात झालेले असते. त्याच पातळीवर घशाच्या मागच्या बाजूस अन्ननलिकेचा प्रारंभ होतो. जिभेच्या मुळाशी घशात असलेल्या स्नायू आणि मृदू उपास्थिमय अशा पानांसारख्या झडपेमुळे स्वरयंत्राचे अन्ना-पासून संरक्षण होते.

स्वरयंत्राची रचना बाहेरून बोटांनी चाचपून जाणवता येणार्‍या कठीण उपास्थींनी घडलेली असते. त्यांपैकी सर्वांत मोठी उपास्थी पुढील बाजूस असते. अवटू ग्रंथीला आधार देणारी ही कौकी उपास्थी गळ्याच्या हालचालींबरोबर ( उदा., आवंढा गिळताना, खोकताना ) वर-खाली होताना सहज दिसू शकते. तिच्या खाली असलेली एखाद्या जाड अंगठीच्या आकाराची मुद्रिका उपास्थी स्वरयंत्राला श्वासनालेस जोडते. अवटू उपास्थीच्या पातळीवर, मागील बाजूस दोन लहान खड्यांच्या आकाराच्या उपास्थी ( दर्वी उपास्थी ) असतात. या दोन उपास्थीं-पासून निघणारे दोन बंध अवटू उपास्थीच्या आतील पृष्ठभागाला एकाच ठिकाणी जोडलेले असतात. त्यांच्या या विशिष्ट रचनेमुळे श्वसनमार्गात पुढच्या बाजूकडे टोक असलेल्या लघुकोनाच्या आकाराची फट तयार होते. दर्वी उपास्थींच्या हालचालीमुळे दोन्ही बंध म्हणजेच ध्वनिरज्जू एकमेकांपासून दूर जाऊन श्वसनमार्ग पूर्ण मोकळा करू शकतात किंवा एकमेकांच्या जवळ येऊन तो अंशतः ( ध्वनिनिर्मितीच्या वेळी ) किंवा पूर्णतः ( अन्नमार्गातून अन्न किंवा द्रव पदार्थ गिळते वेळी ) बंद करू शकतात. स्वरयंत्राच्या रचनेतील इतर भाग अनेक स्नायू, संयोजी ऊतक ( समान रचना व कार्य असणार्‍या कोशिकांचा समूह ) आणि आतील पृष्ठभागावरील श्लेष्मल पटल यांनी तयार झालेला असतो. संपूर्ण स्वरयंत्रातील संवेदना ग्रहण करणार्‍या तंत्रिका मेंदूतील नवव्या तंत्रिकेच्या शाखा आणि स्नायूंचे आकुंचन घडविणार्‍या प्रेरक तंत्रिका मेंदूतील दहाव्या तंत्रिकेच्या शाखा असतात.

ध्वनिरज्जू आणि त्यावरील श्लेष्मल पटलाचे आवरण यांमुळे तयार झालेली रचना कंपनशील असते. अंशतः उघडलेल्या फटीतून फुप्फुसा-तील हवा बाहेर फेकली जात असताना ध्वनिरज्जूंच्या कंपनामुळे स्वरनिर्मिती होते. रज्जूंच्या ताणाचे प्रमाण, त्यांच्या कडांचा आकार व जाडी आणि दोन्ही रज्जूंमधील अंतर यांनुसार स्वराची उच्चनीचता आणि गरिमा अवलंबून असते. त्यामुळे निरनिराळ्या व्यक्तींच्या स्वराचा प्रकार वय, लिंगभेद, तंत्रिका तंत्राची स्थिती, श्वसन तंत्राची कार्यक्षमता व विकारांची उपस्थिती यांनुसार भिन्नता दर्शवितो. स्वरयंत्रातून निर्माण झालेला स्वर त्याच्यावरच्या टोकातून ( कंठद्वारातून ) घशात प्रवेश करतो तेव्हा त्याच्यावर घसा, जीभ, दात, नाक, ओठ यांसारख्या अवयवांकडून निरनिराळ्या प्रकारचे आघात होऊ लागतात. यामुळे होणार्‍या परिवर्तनातून व्यंजनांची निर्मिती होते आणि अंतिम ध्वनिनिर्मिती आकार घेते.

आ. १. स्वरयंत्रातील विविध उपास्थी व संधिबंध : ( अ ) अग्रदर्शन, ( आ ) पश्चदर्शन, ( इ ) मध्यदर्शन : (१) अधिस्वर द्वार, (२) कंठास्थी, (३) अवटु-कंठास्थी पटल, (४) अवटू उपास्थी, (५) अवटू उपास्थी उत्सेध, (६) मुद्रिका-अवटू संधिबंध, (७) मुद्रिका उपास्थी, (८) श्वासनाल उपास्थी, (९) श्वासनाल, (१०) स्वरयंत्र ( कंठ ), (११) कीलोपास्थी, (१२) शृंगी उपास्थी, (१३) दर्वी उपास्थी, (१४) मेद, (१५) प्रकोष्टीय संधिबंध ( आभासी ध्वनिरज्जू), (१६) खरा ध्वनिरज्जू.संपूर्ण स्वरयंत्राची हालचाल त्याला जोडलेल्या स्नायूंमुळे मुक्तपणे खाली किंवा वर अशी होऊ शकते. तोंडात असलेला घास किंवा द्रवाचा घोट गिळण्याच्या क्रियेत ध्वनिरज्जू एकमेकांजवळ येऊन श्वसनमार्ग पूर्ण बंद होतो आणि त्याच वेळी स्वरयंत्र वर ओढले जाऊन थोडेसे पुढे येते. जिभेच्या मुळाशी असलेली अधिस्वर द्वार ही झडप मागे झुकते व स्वरयंत्राच्या वरच्या भागावर ( कंठद्वारावर ) टेकते. त्यानंतर तोंडातील पदार्थ या झडपेच्या दोन्ही बाजूंनी ( डाव्या व उजव्या ) अन्ननलिकेत ढकलला जातो. या सर्व क्रियेत अधिस्वर द्वाराच्या मधल्या भागाशी  अन्नाचा संपर्क फारसा येत नसल्याने स्वरयंत्रात अन्नकण  किंवा द्रव शिरण्याची शयता फार कमी असते. खोकण्याच्या किंवा शिंकण्याच्या क्रियेत ध्वनिरज्जू एकत्र येऊन श्वसनमार्ग प्रथम पूर्णपणे बंद होतो. नंतर श्वसनाचे स्नायू ( ध्वनीच्या पिंजर्‍याचे ) आकुंचन पावून फुप्फुसे दाबली जातात व श्वसनमार्गातील हवेचा दाब वाढू लागतो. तो वाढत असतानाच एकाएकी ध्वनिरज्जू एकमेकांपासून दूर होऊन हवा बाहेर पडते व त्यामुळे मोठा स्फोटासारखा आवाज होतो आणि श्वसनमार्गातील अडकलेले कण किंवा द्रव बाहेर फेकले जातात.

आ. २. स्वरयंत्राच्या क्रिया-अवस्था : ( अ ) अंत:श्वसन करताना, ( आ ) ध्वनिनिर्मिती करताना : (१) अधिस्वर द्वार, (२) प्रकोष्टीय घडी, (३) ध्वनिघडी ( खरे ध्वनिरज्जू ), (४) जिव्हामूळ, (५) प्रकोष्ट, (६) श्वासनाल, (७) ग्रसिका.स्वरयंत्राच्या तपासणीसाठी रुग्णाला तोंड पूर्ण उघडायला सांगून घशात टाळ्याच्या मागच्या बाजूस एक छोटासा गोलाकार आरसा धरला जातो. त्यातून परावर्तित होणारा प्रकाश कंठद्वारातून आत ध्वनिरज्जूंवर पडतो. या प्रकाशाने उजळलेली स्वरयंत्राच्या अंतरंगाची प्रतिमा आरशात दिसू शकते. 

अधिक चांगल्या तपासणीसाठी स्वरयंत्रदर्शक हे उपकरण वापरले जाते. रुग्णाला भूल देऊन मान पूर्णपणे ताठ असलेल्या अवस्थेत हा दर्शक कंठद्वारात घालून स्वरयंत्र तपासता येते. शस्त्रक्रियेसाठी भूल देण्याकरिता श्वासनालेत नळी घालण्यासाठीही या उपकरणाचा उपयोग होतो. काचतंतू प्रकाशकी तंत्राचा वापर करणारे लवचिक नळीसारखे दर्शकही आता उपलब्ध आहेत. केवळ संवेदनाहरणाचा ( स्थानीय बधिरीकरणाचा ) अवलंब करून असा दर्शक तोंडातून किंवा नाकातून आत घालून स्वर-यंत्रापर्यंत ढकलता येतो. अशा दर्शकाच्या मदतीने श्वसनमार्गाच्या तपासणी-बरोबरच तेथील द्रवाचा किंवा ऊतकाचा नमुना घेणे, औषध फवारणे, साचलेले द्रव काढून टाकणे यांसारखी कामेही होऊ शकतात.

स्वरयंत्राच्या विकारांमध्ये मुख्यतः अल्पकालिक शोथ ( दाहयुक्त सूज ), ध्वनिरज्जूवर निर्माण होणार्‍या गाठी, व्रण आणि कर्करोग यांचा समावेश होतो. अल्पकालिक तीव्र शोथाच्या कारणांमध्ये विषाणुजन्य ( उदा., सर्दीमुळे होणारे ) संक्रामण, फुप्फुसे किंवा श्वासनलिकांमधून पसरत आलेले शाकाणुजन्य संक्रामण, हवेतील प्रदूषणकारक घटकांप्रती अति-संवेदन ( अधिहर्षता ), धूम्रपान, मद्यपान, सतत बोलल्यामुळे पडणारा ताण यांपैकी एक किंवा अनेक कारणे असू शकतात. अशा शोथामुळे आवाज पूर्ण बंद होणे किंवा घोगरा होणे, बोलण्याचा प्रयत्न केल्यास वेदना होणे, गिळताना दुखणे, घसा लाल होणे, खवखवणे, सतत खाकरणे, अस्वस्थता, सौम्य ज्वर अशी लक्षणे उद्भवतात. पूर्ण विश्रांती, वाफारे, वेदनाशामक औषधे आणि प्रतिजैविके यांच्या मदतीने ही लक्षणे दूर होऊ शकतात.

वारंवार आवाज बसणे किंवा सतत शोथाची लक्षणे निर्माण होणे यांसारख्या तक्रारी असल्यास ध्वनिरज्जूवर गाठी ( व्यवसायजन्य विकार उदा., गायक, वक्ते, विक्रेते यांमध्ये ) असण्याची शयता लक्षात घेतली जाते. आसपासच्या भागातील लसीका ग्रंथी वाढल्यासारख्या वाटल्यास कर्करोगाची शयताही असू शकते. शल्यचिकित्सेने गाठी, कर्कार्बुद यांसारख्या वाढलेल्या ऊतकांना काढून टाकून स्वरयंत्राची कार्यक्षमता सुधारता येते. यासाठी लेसर किरण शस्त्रकियेचा खूप उपयोग होतो. परंतु, प्रगत अवस्थेतील कर्करोगामुळे कधीकधी संपूर्ण स्वरयंत्र काढून टाकणे आवश्यक ठरते. अशा वेळी श्वासनालेत छेद घेऊन श्वसनासाठी कृत्रिम मार्ग केला जातो. नैसर्गिक स्वरनिर्मिती पूर्णपणे बंद झाल्यामुळे अशा रुग्णांना अन्ननलिकेच्या साहाय्याने ध्वनिनिर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. विजेच्या साहाय्याने स्वरनिर्मिती करणारे उपकरणही उपलब्ध होऊ शकते. स्वर-यंत्रावर शस्त्रक्रिया अनावश्यक असणार्‍या विकारांमध्ये इतर उपचारां-बरोबरच स्वरयंत्रावर अधिक ताण न पडू देता बोलण्याचे प्रशिक्षण ( स्वरप्रशिक्षण ) देणे आवश्यक असते.

श्वसनमार्गाबाहेरील कारणांमुळे कधीकधी स्वरयंत्राच्या कार्यात बाधा येऊ शकते. मेंदूमधील अर्बुद, पक्षाघाताचा झटका, तंत्रिकांच्या वसायुक्त आवरणाचा नाश करणारे विकार, अल्कोहॉल अथवा शिसे यांचा तंत्रिकां-वर घातक परिणाम, ध्वनिरज्जूंची हालचाल घडविणार्‍या तंत्रिकेवर दाब पडणारी अर्बुदे किंवा रक्तवाहिन्यांमधील फुगवटे ( उदा., अवटू ग्रंथीचे विकार व शस्त्रक्रिया, महारोहिणीविस्फार ), अपघातजन्य ( तंत्रिकेला ) इजा यांसारखी विविध कारणे ध्वनिरज्जूंची हालचाल कमी करू शकतात.अशा परिस्थितीत सुरुवातीला ध्वनिरज्जूंमधील फट अर्धवट उघडी राहत असल्याने आवाजात कुजबुजल्यासारखा घोगरेपणा निर्माण होतो. नंतर ध्वनिरज्जूंची हालचाल पूर्ण बंद झाल्यामुळे कंपनासाठी आवश्यक असा ताण त्यांच्यात निर्माण होत नाही व आवाज पूर्ण बंद होतो. अशा वेळी काहीही खाताना अथवा पिताना ठसका लागतो. कधीकधी आवाजात कर्कश्यता निर्माण होते आणि प्रत्येक श्वासाबरोबर आवाज निर्माण होतो व श्वसनात अडथळा येतो. या सर्व कारणांवर व त्यांच्या निर्मूलनासाठी आवश्यक उपचार करीत असताना कधीकधी श्वासनालाचे छेदन करून श्वसनमार्गासाठी तात्पुरते किंवा काही वेळी कायमस्वरूपी कृत्रिम द्वार बसवावे लागते.

संदर्भ : 1. Berkow R. Ed., Merck Manual of Medical Information,New Jersey, 1997.

           2. Guyton, A. C. Hall, J. E. Textbook of Medical Physiology, New York, 1996.

           3. Peters, M. BM Association A-Z Family Medical Encyclopedia, London,2004.

           4. Thibodeau, G. A. Patton, T. Anthony’s Textbook of Anatomy and Physiology, Missouri, U. S. A., 1994.

           5. Warwick, R. Williams, P. Eds., Gray’s Anatomy, 37th Ed., London, 1989.

श्रोत्री, दि. शं.