श्वेतकोशिकान्यूनता : रक्तातील श्वेतकोशिकांची (पांढऱ्या पेशींची) संख्या प्रतिमायक्रोलिटर (घन मिलीमीटर) ४,००० पेक्षा कमी होण्याच्या स्थितीस श्वेतकोशिकान्यूनता म्हणतात. अस्थिमज्जा आणि विविध स्थानी पसरलेली लसीकाजनक ऊतके (समान रचना व कार्य असणारे कोशिकासमूह) यांच्यात या कोशिकांची निर्मिती होते. या ऊतकांवर अनिष्ट परिणाम करणारे क्ष-किरण, गॅमा किरण कोशिकांवर विषाक्त परिणाम करणारी कर्करोधक औषधे आणि कोशिकानिर्मितीस आवश्यक अशा आहारद्रव्यांची (फॉलिक अम्ल, बी१२ जीवनसत्व, प्रथिने) कमतरता यांसारख्या कारणांनी कोणत्याही प्रकारच्या श्वेतकोशिकांची न्यूनता उद्‌भवू शकते. अतिशय गंभीर स्वरूपाची जंतुरक्तता आणि रक्ताचा कर्करोग [⟶ श्वेतकोशिकार्बुद] यांमध्येही श्वेतकोशिका (निरोगी आणि उपयुक्त) कमी झालेल्या दिसतात. कोणत्याही विकारासाठी अधिवृक्क स्टेरॉइड द्रव्यांचा उपचार चालू असताना श्वेतकोशिकांची संख्या (विशेषतः लसीका कोशिका, इओसीनरागी आणि क्षारकरागी कणकोशिकांची संख्या) कमी होऊ शकते. विविध प्रकारच्या श्वेतकोशिकांच्या न्यूनतांची इतर विशेष कारणे पुढे दिली आहेत.

उदासीनरागी कणकोशिका : अनेक प्रकारची औदयोगिक रसायने आणि विविध विकारांवरील औषधे काही रूग्णांमध्ये या कोशिकांची संख्या कमी करून रोगप्रतिकारशक्तीत तात्पुरती अपूर्णता आणतात. परीणामतः तोंडात व्रण येणे (तोंड येणे), आतड्यात व मलमार्गात दाह होणे, ताप येणे इ. लक्षणे संभवतात. क्षयरोगाचे सार्वदेहिक संकामण, हिवताप, प्लीहेची वाढ, दीर्घकालिक मद्यासक्ती (मद्यविषाक्तता) या विकारांमध्येही अशी न्यूनता निर्माण होऊ शकते. सर्वच कणकोशिकांची संख्या या सर्व प्रकारच्या उदासीनरागी न्यूनतांमध्ये कमी झालेली आढळते.

इओसीनरागी कणकोशिका : अनेक प्रकारच्या शारीरिक तणावांच्या अवस्थांमध्ये यांचे न्यूनत्व संभवते उदा., शस्त्रक्रिया, दुखापती, गंभीर स्वरूपाचे भाजणे, तीव्र जंतुसंक्रामणाचा आघात इत्यादी. हॉर्मोनांच्या मदतीने केलेल्या उपचारांमध्येही अशी स्थिती संभवते. उदा., ॲड्रिनॅलीन, इन्शुलीन, स्टेरॉइड, अधिवृक्क उत्तेजक एसीटीएच (ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन) इत्यादी.

लसीका कोशिका : गंभीर दुखापती किंवा शस्त्रक्रियेचा ताण काही दिवस लसीका कोशिकांची न्यूनता निर्माण करू शकतो. प्रथिन कुपोषण, वृक्क (मूत्रपिंड) विकारांमुळे यूरियाचे प्रमाण वाढणे यांसारखी अनेक इतर कारणेही यामागे असतात. बी मालिकेतील कोशिकांच्या न्यूनतेमुळे रक्तातील गॅमा-ग्लोब्युलीन कमी होते. टी मालिकेचे न्यूनत्व एड्स या विकाराच्या प्रगतीचे लक्षण मानले जाते. विशेषतः टी-४ या कोशिकांचे प्रमाण नेहमीच्या ८०० ते १,२०० प्रतिमायक्रोलिटर वरून एकदम निम्म्यावर येते. गणना ४०० च्या खाली आल्यास विकाराचे गांभीर्य जाणून शक्य तेवढी औषधी उपाययोजना सुरू करावी लागते. [⟶ लसीका तंत्र].

बिंबाणुन्यूनता : (क्लथनकोशिकान्यूनता). रक्तप्रवाहातील एकूण बिंबाणूंची संख्या कमी होण्याला बिंबाणुन्यूनता म्हणतात. ही संख्या ५०,००० पेक्षा कमी होताच रक्तस्राव होतो व ती१०,००० पर्यंत घटल्यास बहुधा मारक ठरते. मासिक ऋतुस्रावाचे पहिले तीन दिवस व गर्भिणी अवस्थेतील विषाक्तता आणि ⇨ डेंग्यू ज्वर यांमध्ये बिंबाणुन्यूनता आढळते. ऊष्माघात, अतिशीतन, सर्प किंवा विंचू दंश, कीटकदंश, क्विनीन व सॅलिसिलेट आणि इतर अनेक औषधे, मद्यपान, व्हिनाइल क्लोराइड यांसारखी रसायने इ. अनेक घटक अशीच न्यूनता निर्माण करू शकतात. या न्यूनतेच्या लक्षणांपैकी नाकातून वा हिरड्यांमधून रक्त येणे, त्वचेखाली रक्त साकळल्याचे निळसर डाग दिसणे, लघवीतून रक्त जाणे यांसारखी लक्षणे सहज लक्षात येतात.

श्वेतकोशिकांपैकी क्षारकरागी (क्षारककर्षी), एककेंद्रक आणि प्लाविका कोशिकांची न्यूनता, त्यांची संख्या मुळातच कमी असल्याने, सहजासहजी लक्षात येत नाही. रक्ताच्या विस्तृत चाचण्या आणि अस्थिमज्जेची परीक्षा यांच्या मदतीने त्यांचे निदान होऊ शकते.

पहा : रक्त रोगप्रतिकारक्षमता श्वेतकोशिकाधिक्य श्वेतकोशिकार्बुद.

संदर्भ : 1. Berkow, R., Ed., The Merck Manual of Madical Information, New Jersey, 1997.

2. Eastham, R. D. Slade, R. R. Clinical Haematology, Oxford, 1992.

3. Guyton, A. C. Hall, J. E. Textbook of Medical Physiology, Philadelphia, 1996.

श्रोत्री, दि. शं.