द्वीपकल्पी पट्टिताश्म : (पेनिन्‌शुलर नाइस). धारवाडी खडकांपेक्षा [→ धारवाडी संघ] व ⇨ चँपियन पट्टिताश्मांपेक्षा नव्या पण ⇨ चार्नोकाइट मालेपेक्षा व ⇨ क्लोजपेट ग्रॅनाइटांपेक्षा जुन्या अशा दक्षिण भारतातील पट्टिताश्म खडकांच्या गटाचे नाव. हे खडक विविध प्रकारचे व निरनिराळ्या वेळी तयार झाले आहेत. त्यांचे पुढील प्रकार आढळतात.

(१) धारवाडी कल्पाच्या अखेरीस घडून आलेल्या संपीडक (दाब पाडणाऱ्या) हालचालींमुळे भारताच्या द्वीपकल्पातील धारवाडी खडकांना घड्या पडून त्याचे कमीअधिक रूपांतरण (तापमान, दाब इत्यादींमध्ये बदल होऊन खडकाच्या रूपात झालेले बदल) झाल्यावर त्यांच्यात ग्रॅनाइटी शिलारसाची एकामागून एक अशी पातालिक (अतिशय खोल जागी) अंतर्वेशने (घुसण्याच्या क्रिया) झाली. ती होत असताना व त्यांच्या मागोमागच्या कालावधीतही संपीडक हालचाली चालू होत्या. द्वीपकल्पी पट्टिताश्मापैकी पुष्कळसे अशा पातालिक अंतर्वेशनांच्या खडकांपासून झालेले आहेत. त्यांच्यापैकी काही पातालिक प्रवाही पट्टन (पटे) असलेले पट्टित पातालिक खडक आहेत. या पट्टिताश्माचा सु.पाऊण भाग पोटॅश फेल्स्पार किवा सिकत (सिलिकेचे प्रमान अधिक असलेल्या) प्लॅजिओक्लेज याचा किंवा त्यांच्या कमीअधिक मिश्रणाचा असतो. कॉर्ट्‌झ सु. १०-२० % असते शिवाय कृष्णाभ्रक किंवा कृष्णाभ्रक व हॉर्नब्लेंड ही खनिजे अल्प प्रमाणात असतात खनिजाचे कण भरड किंवा मध्यम व एकविध आकारमानाचे असतात पण फेल्स्पाराचे मोठे स्फटिक असलेले पृषयुक्त (मोठे स्फटिक व लहान कण यांच्या मिश्रणाने निर्माण होणारी संरचना असलेले) खडकही आढळतात. खडकांची रचना सामान्यतः पट्टित व पट्टन सरळ असते. नागमोडी पट्टित किंवा अंधुक पट्टन असलेले प्रकारही आढळतात. या पट्टिताश्मांचे मुख्य प्रकार पुढील होत : ग्रॅनोडायोराइट, पट्टिताश्म, ॲडॅमेलाइट, पट्टिताश्म, ग्रॅनाइट, पट्टित ग्रॅनोडायोराइट, पट्टित ॲडॅमेलाइट, पट्टीत ग्रॅनाइट.

धारवाडी खडकांपासून निखळून पडून ग्रॅनाइटी शिलारसात गुरफटल्या गेलेल्या तुकड्यांच्या बाह्याश्मांची पुष्कळ ठिगळे द्वीपकल्पी पट्टिताश्मात विखुरलेली आढळतात. सामान्यतः ती काळी व हॉर्नब्लेंड आणि कृष्णाभ्रक यांच्या सुभाजांची (सहज भंग पावणाऱ्या शिस्ट नावाच्या खडकांची) असतात.

(२) द्वीपकल्पी पट्टिताश्मांचे काही प्रकार संयुक्त-पट्टिताश्म असून ते धारवाडी सुभाजांत ग्रॅनाइटी शिलारसाचे पर्णानुपर्ण अंतःक्षेपण होऊन (पापुद्र्यासारख्या थरामध्ये मधून मधून शिलारस घुसून) तयार झालेले असतात. अशा खडकांत फेल्स्पार व क्कॉर्टझ या ग्रॅनाइटी खनिजाच्या मिश्रणाचे पातळ थर व कमीअधिक रुपांतरीत अशा धारवाडी सुभाजांचे (सामान्यतः कृष्णाभ्रक किंवा हॉर्नब्लेंड यांच्या सुभाजांचे) पातळ थर एकाआड एक असतात.

(३) वर वर्णन केलेल्या पट्टिताश्मांपैकी कित्येक धारवाडी खडकांच्या ग्रॅनाइटीभवनाने (गॅनाइटाप्रमाणे संघटन व संरचना होण्याच्या क्रियेने) निर्माण झाले असण्याचा संभव आहे.

द्वीपकल्पी पट्टिताश्मांच्या गटाचे एकूण स्वरूप जटिल आहे व त्यांच्या घटकांचे आजच्यापेक्षा बरेच सविस्तर अध्ययन झाल्याशिवाय त्यांच्यापैकी कोणते अग्निज प्रकारांपासून व कोणते ग्रॅनाइटीभवनाने झालेले आहेत किंवा त्यांची सापेक्ष वये कोणती आहेत, हे सांगता येणार नाही.

कर्नाटकातील विस्तीर्ण क्षेत्र द्वीपकल्पी पट्टिताश्मांनी व्यापलेले आहे व ते आंध्र प्रदेशात, तमिळनाडूच्या व केरळच्या काही भागांतही आढतात. द्वीपकल्पी पट्टिताश्म हे धारवाडी खडकांपेक्षा जुने आहेत, अशी कल्पना पूर्वी होती म्हणून त्यांना मूल पट्टिताश्म (फंडामेंटल नाइस) असे नाव देत असत पण ते धारवाडी खडकांपेक्षा नवे आहेत, असे कळून आल्यावरून त्यांना म्हैसूर भूवैज्ञानिक सर्वेक्षण खात्याच्या डब्ल्यू. एफ्. स्मीथ या भूवैज्ञानिकांनी सुचविलेले द्वीपकल्पी पट्टिताश्म हे समर्पक नाव आता दिले जाते.

पहा : आर्कीयन ग्रॅनाइट धारवाडी संघ.

केळकर, क. वा.