हान्सेन, मार्टिन आल्फ्रेड : (२० ऑगस्ट १९०९–२७ जून १९५५). विख्यात डॅनिश लेखक. काहीशी रूढीवादी पठडी, मिथकाविषयीचा पूर्वग्रह आणि संस्कृतीच्या पाळामुळांविषयीचे भान या सर्व गोष्टी त्यांच्या सर्व साहित्यकृतींमध्ये आढळतात.

 

हान्सेन यांचा जन्म स्ट्रोबी (डेन्मार्क) येथे झाला. ते सुरुवातीस शेतमजूर होते. पुढे १९३०–४० दरम्यान त्यांनी शिक्षकाचे काम केले. Nu opgiver han (१९३५, इं. शी. ‘नाउ ही गिव्ह्ज अप ङ्ख) आणि घेश्रेपळशप (१९३७, इं. शी. ‘द कॉलनी’) या त्यांच्या सुरुवातीच्या कादंबऱ्यांमध्ये त्यांच्या सामाजिक जाणिवेचा प्रत्यय येतो. त्यांनी Jonatans rejse (१९४१, इं. शी. ‘जोनाथन्स जर्नी’) ही अमर्याद कल्पना-सृष्टीची गोष्ट आणि Lykkelige Kristoffer (१९४५, इं. शी. ‘लकी क्रिस्टोफर’) ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी Logneren (१९५०, इं. भा. द लायर) ही मानसशास्त्रीय कादंबरी लिहिली. Orm og tyr (१९५२, इं. शी. ‘सर्पंट अँड बुल’) ही त्यांची अखेरची साहित्यकृती कार्यकारणभाव वापरून लिहिली असून ती तत्त्वमीमांसात्मक आहे. तिच्यात काहीसा बुद्धिवादापलीकडचा विचार व्यक्त झाला आहे.

 

कोपनहेगन (डेन्मार्क) येथे त्यांचे निधन झाले.

ठाकूर, अ. ना.