काळी मैना : हिला पहाडी मैना असेही म्हणतात. स्टर्निडी या पक्षिकुलात हिचा समावेश होतो. हिचे शास्त्रीय नाव ग्रॅक्युला रिलिजिओझा  आहे. ही भारत, श्रीलंका, ब्रह्मदेश, मलाया, सुमात्रा, जावा आणि बोर्निओ येथे आढळते. भारताच्या तीन वेगवेगळ्या प्रदेशांत ती आढळते : (१) हिमालयाच्या पायथ्याच्या टेकड्यांत सु. ७६५ मी. उंचीपर्यंत अल्मोडोपासून आसामपर्यंत (२) छोटा नागपूर, ओरिसा आणि मध्य प्रदेशाचा आग्नेय भाग (३) पश्चिम घाट, मुंबईपर्यंत.

ही साळुंकीपेक्षा मोठी व कबूतरापेक्षा लहान असते शरीराचा रंग काळा असून त्यात हिरवट आणि जांभळ्या रंगाची तकाकी असते पंखांवर स्पष्ट पांढरा पट्टा असतो चोच नारिंगी आणि पाय नारिंगी पिवळ्या रंगाचे डोक्यावर नारिंगी पिवळ्या रंगाची पिसे नसलेल्या कातडीची चकदळे (लहान चकत्या) आणि गलुली असतात. नर आणि मादी यांत फरक नसतो. यांची जोडपी, लहान टोळकी किंवा थवे असतात.

काळी मैना

काळी मैना वृक्षवासी असून सर्व प्रकारच्या (दाट, विरळ वगैरे) अरण्यांत व जंगलांत, त्याचप्रमाणे शेतीच्या आसपासच्या झाडांवर राहते. पोपटाप्रमाणे हे गोंगाट करणारे पक्षी आहेत. ही मैना निरनिराळ्या प्रकारचे सूर काढते. काही मंजूळ, काही घुरघुरल्यासारखे, तर काही कर्कश आणि किंचाळल्यासारखे असतात. हा एक उत्तम अनुकरण करणारा पक्षी आहे. शिकविले तर काळी मैना चांगले बोलू शकते, उच्चार फार स्पष्ट करते आणि कित्येक वाक्ये लागोपाठ सफाईने म्हणते. तिच्या या गुणामुळे पुष्कळ लोक – विशेषत: उत्तर भारतातील – हिला पिंजऱ्यात बाळगून बोलायला व वेगवेगळ्या प्रकारचे गोड सूर काढायला शिकवितात.

निरनिराळ्या जातींची लहानमोठी रानफळे आणि किडे हे यांचे भक्ष्य होय. शेवरी, पांगारा वगैरे झाडांच्या फुलांतला मध यांना फार आवडतो. यांचा प्रजोत्पादनाचा काळ मार्चपासून ऑक्टोबरपर्यंत असतो. जंगलातील एखाद्या अतिशय उंच झाडावरील नैसर्गिक ढोलीत गवत, पाने आणि पिसे घालून घरटे तयार केलेले असते. ते जमिनीपासून १०—२२ मी. उंचीवर असते. मादी दोन-तीन अंडी घालते. ती गडद निळ्या रंगाची असून त्याच्या तांबूस तपकिरी रंगाचे थोडे ठिपके किंवा डाग असतात.

  

कर्वे, ज. नी.